– पंक्चरवाला
मशिदीला जोडून आलेल्या ज्ञानवापी या शब्दाचा अर्थ ज्ञानाचा साठा, ज्ञानाचा तलाव किंवा सागर असा होतो. बाबरी मशिदीनंतर वादात अडकलेल्या या मशिदीमध्ये गोड पाण्याने भरलेली एक विहीर आहे आणि तिचे पाणी पवित्र मानले जाते. अर्थात, आपल्याकडे बहुतेक जलाशयाचे साठे, नद्या यातील पाणी पवित्रच मानले जाते म्हणून तर काही नद्यांच्या काठावर कुंभमेळे भरतात आणि पवित्र पाण्यात डुबकी मारून पापमुक्त होण्याचा प्रयत्न होत असतो, तर ही ज्ञानवापी मशीद म्हणजे हिंदूंचे प्राचीन मंदिर आहे आणि ते त्यांच्या ताब्यात द्यावे यासाठी अनेक वर्षे सुरू असलेला वाद आता ऐरणीवर आला आहे. कुतुबमीनारसह अनेक वास्तू ज्यात ताजमहालाचाही समावेश आहे, त्या वादात म्हणजे धार्मिक वादात अडकल्या आहेत किंवा अडकवल्या जात आहेत. हिंदू राष्ट्रच येणार असल्याने या वादाला आणि त्यावरील तोडग्याला आणि त्यासाठीच्या संघर्षाला महत्त्व प्राप्त होते. हे महत्त्व स्वाभाविकच राजकारणाला आणि हिंदुत्वाला मोठी रसद पुरवत असते. आताही तसेच होत आहे आणि ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटणार आहेत.
जम्मू-काश्मीरचे विभाजन, तीन वेळा तलाक म्हणण्याचा कायदा, नागरिकत्व, गोमाहात्म्य, बुरखा, भोंगा अशी अनेक रूपे धारण करत आता ज्ञानवापीपर्यंत ते पोहोचले आहे. देशात अनेक ठिकाणी मुस्लिमांच्या काळात तयार झालेल्या वास्तू आहेत; पण त्या हिंदूंच्या वास्तू पाडून तयार केल्या गेल्या, असा दावा असल्याने कोर्टात त्यांच्यावर सुनावणी सुरू आहे. खरे तर, भारताच्या धार्मिक इतिहासात एक धर्म विरुद्ध दुसरा धर्म, असे अनेक संघर्ष झाले आहेत. हिंदू विरुद्ध जैन, जैन विरुद्ध बुद्धिस्ट, हे दोन्ही धर्म विरुद्ध बुद्धिस्ट, हिंदू विरुद्ध मुस्लीम, हिंदू विरुद्ध ख्रिस्ती, असे ते संघर्ष आहेत. प्रत्येक संघर्षात कुणी तरी काही तरी गमावते आणि कुणी तरी काही तरी कमावते. बौद्ध संस्कृतीवर केवळ मुस्लिमांनीच हल्ला केला असे नाही, तर भारतातील अनेक धर्मांनी हल्ले केले आहेत. मुस्लिमांनी या सर्व धर्मांवर हल्ले केले आहेत. महम्मद घोरीपासून ते सुरू होतात आणि औरंगजेबापर्यंत येऊन थांबतात. अशी अनेक धर्मस्थळे आहेत, की त्यांच्यावर वारंवार हल्ले झाले आहेत. ज्ञानवापी मशीद त्यापैकी एक.
ज्ञानवापीबाबतचा वाद तसा नवा नाही. तो चारशे वर्षांपासून सुरू होतो. कोर्टाद्वारे अनेक आदेश निघाले. अनेक अहवाल तयार झाले. हिंदूंच्या मते, मंदिर तोडून तेथे मशीद बांधण्यात आली आहे. मंदिराचे अनेक अवशेष तेथे आहेत. स्वतः शंकरानेच लिंगपूजा करण्यासाठी तेथे पवित्र पाण्याची विहीर निर्माण केली होती. मशिदीच्या तळघरातही हिंदू धर्माच्या देवाचे अवशेष आहेत.
हिंदूंची मागणी आहे, की मंदिर पाडून मशीद बनवली आहे. आमचे मंदिर आम्हाला द्या. मुस्लिमांनी आपल्या बाजूनेही काही पुरावे दिले आहेत. मशिदीत ज्या गोष्टीला हिंदू लिंग समजतात ते मुस्लीम परंपरेतील दुसरेच काही सांगतात आणि चार-पाचशे वर्षांहून अधिक काळ आमचे येथे धार्मिक कार्यक्रम होतात आणि 1937 मध्ये इंग्रज सरकारच्या कोर्टानेच आम्हाला नमाज अदा करण्याचा अधिकार दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर न्यायालयाने दोन वेळा सर्व्हे करून घेतला. आता मुख्य निकालाकडे नजरा लागल्या आहेत. कोर्टाचा निकाल काहीही लागो; पण हिंदू आता या स्थळावरील हक्क सोडून देण्याची शक्यताच नाही.
सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे, की प्राचीन काळातील हे सर्व वाद उकरून त्यांना धार्मिक संघर्षाचे साधन बनवायचे काय, भारतात गुलाम घराण्याच्या राजवटीपासून सुरुवात होते. अकरा-बाराव्या शतकापासून या राजवटी येतात. खूप कमी वेळा धार्मिक आणि बहुतेक वेळा राजकीय संघर्ष होतो. या सर्व संघर्षामागे आजच्या पिढीचे काही देणे-घेणे नाही. अनेक वर्षे या दोन्हीही धर्मीयांनी धार्मिक, सामाजिक सलोखा टिकवण्याचे काम केले आहे; पण आता धार्मिकता हेच उभय बाजूंसाठी राजकारणात एक कारण बनले आहे. या संघर्षातून काही पोटसंघर्षही सुरू होणार आहेत. ज्ञानवापी जशी हिंदूंची तसे पंढरपूर बौद्धांचे, इथपर्यंत हे वाद वाढत जाणार आहेत. उद्या जैनधर्मीयही त्यात उडी मारतील. कारण त्यांचीही अनेक धर्मस्थळे पाडली गेली आहेत. या सर्वांमध्ये कलह सुरू झाला, तर तो कोणत्याच धार्मिक व सामाजिक सलोख्याला परवडणारा नाहीय. धार्मिक उन्माद वाढवण्यासाठी भूतकाळाचा आणि त्यातील मुक्या वास्तूंचा वापर होता कामा नये. सामान्य माणसाने याचा विचार अधिक करायला हवा. कारण अशा संघर्षात त्यांचीच होरपळ होत असते.
– पंक्चरवाला