बाबासाहेबांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या म्हणून
अभिवादन करण्यासाठी जातो आपण ऐटीत
प्रसंगानुरूप अभिवादन करून फायदा नाही
हे का येत नाही आपल्या विचारांच्या दृष्टीत
बा भीमा, ज्या समाजासाठी झगडला तोच समाज
अंधारातच आहे काल, आज आणि कदाचित उद्यासुद्धा
तरी तुमच्या लक्षात कसे येत नाही
आयुष्यातील एका क्षणातसुद्धा
काल, आज आणि उद्यासुद्धा असेच राहिले
तर एका दिवसाच्या अभिवादनाने विकास होईल काय?
त्यांच्या विकासासाठी तुमचंही योगदान गरजेचं
हे तुमच्या लक्षात कधी येईल काय?
तुमचा झालेला विकास मिरवता या दिवशी
साडी, माडी आणि बसाया कमावली तुम्ही गाडी
बाबासाहेबांच्या अपूर्ण असलेल्या स्वप्नाकडे
तुमची वळू द्या नजर थोडी
तुमच्या साडी, माडी आणि गाडीचा
अभिमान वाटेल या समाजास
हा समाज म्हणजे बाबासाहेबांचं स्वप्न होय
असं वाटायला लागेल जेव्हा तुम्हास
तुमच्यासोबत घेऊन जाऊ या समाजास
तेव्हा परिस्थिती बदलायला लागेल
तेव्हा कुठे तरी बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीकडे
वाटचाल झाल्याचे जाणवायला लागेल.
– जी. संदीप (गोणार, नांदेड)