-आबासाहेब पाटील,
मंगसुळी, जि. बेळगाव
चंद्र पाहिजे नव्हं तुला?
मग घे की, तोडून
वटाभर चांदण्यापण बांध
पदरात
इकडं तिकडं काय बघतीस
मीच हाय चौकीदार इथं
येताना एखादी पिशवी आणायचीस की
रिकामी…
थोडे तारे पण वेचली असतीस
जाता जाता
हे बघ ढगाचे पतंग बांधून ठेवलेत
या पुढीत…
अन् इंद्रधनुष्याच्या सात रंगीत गुंड्या
तरंग तुला तरंगायचं तेव्हढं
त्यात काय लाजायचं?
अवखळ खोंडासारखा
उधळत आलाय हा वारा
फुलांच्या गावावरनं
लावतीस काय लाव दावं
फुलपाखराच्या पंखावरची नक्षी
अलगद उचल नजरेनंच
कुणी बघायच्या आधी
होडीचे हळवे हेलकावे
लपवून ठेव काळजात
कुणाला कळायच्या आत
आधीच तोंडात काही राहत नाही तुझ्या
कशाला मोजतेस
लाटांच्या येरझारा
हकनाक किनार्याला बदनाम करशील
तुला क्षितिजापर्यंत जायचं तर
आधीच सांग
मी आभाळ आणखी थोडं
वर ढकलून देईन
या कातर उलघालीच्या उरुसात
मार पाकीट
एखाद्या कफल्लक फकिराचं
सी.सी. कॅमेर्याच्या कक्षेत असलीस तरी
तू टाकलेल्या नाजूक निःशस्त्र दरोड्याचं
फुटेज तपासायला
कुणाकडं वेळ आहे?
इथं ज्याच्या त्याच्या मागं लागलंय
ज्याचं त्याचं व्याप
पंक्चर झालेली रसिकता
रस्त्याकडेला लावून
लोक घाई घाई तुडवत आहेत
आपापल्या घरची वाट
-आबासाहेब पाटील,
मंगसुळी, जि. बेळगाव