हे तथागता,
जनावरी वेशांतली हैवानं
उग्रतेच्या तोंडातून
भिरकावताहेत लोकशाहीवर दगडं
ठेचकाळताहेत बोकांडी बसून
अमानुषपणे…
भळभळताहेत निष्पाप देह
पडताहेत ढिगांवर ढीग… रक्तांचे
सारं काही कसं होतंय
लाल लाल लाल
प्रेयसीच्या ओठांपेक्षाही भडकहे तथागता,
बघतोहेस ना तू
भडके उडताहेत… भडकवले जाताहेत
शहरं पेटताहेत… पेटवले जाताहेत
रस्ते जळताहेत… जाळले जाताहेत
माणसं मरताहेत… मारले जाताहेत
हैवानं… हैवानं… हैवानं… चौफेर
हैवानियत… हैवानियत… हैवानियत… चौफेर
सारं क्रूर… क्रूर… क्रूर
उजाडण्यापूर्वीच रक्ताळून पडलेलं
आतंकींच्या चिमटीत सापडलेलंहे तथागता,
लाठीचार्ज
जमावबंदी
संचारबंदी
शूट अॅट साइटचे आदेश
लागू होतात इथं कोणत्याही क्षणी
तरी… निघतात
झुंडीच्या झुंडी
संपूर्ण आवेशात
हत्यारबद्ध होऊन
फडशा पाडायला
धुडगूस घालायला
…जातीयतेचा अंश घेऊनहे तथागता,
या शहरांची
इथल्या माणसांची अवस्था
गटारीत चिरून फेकलेल्या
अर्धमेल्या डुकरांसारखी झालीये
कानाकोपर्यांतले बकासुर काफिले
ओरडताहेत जिवाच्या आकांताने
बकासुरासारखे
मात्र कानाडोळा करून
दशावतारी लुटताहेत मजाहा देश केव्हाही असतो सज्जच
जळायला… जाळणार्यांसाठी
– बुद्धभूषण साळवे, नाशिक