– डॉ. बापू चंदनशिवे, अहमदनगर
ते तुला भोंग्यात आणि हनुमान चालीसात गुंतवतील…
दंगलीतही तुलाच पुढं करतील…
हिरवा किंवा भगवा झेंडा हातात देतील…
तू जिवाच्या आकांतानं घोषणा देत पुढं धावत राहा
…यावेळी सकाळी बाप उपाशी पोटानं
मजुरीला गेल्याचं तुला आठवणार नाही…
आई औषधाविना अंथरुणावर असलेली
तुला आठवणार नाही…
झेंड्याची धुंदी तुला हातात तलवार, चाकू
किंवा बंदूक घ्यायला भाग पाडेल…
ते तुला खुशाल लढ म्हणतील,
तुला वाघाचा बछडा म्हणतील,
सिंहाचा छावा म्हणतील…
तुझी छाती अभिमानानं टच्चं फुगेल…
अरे झेंड्यासाठी, धर्मासाठी तू मेल्यावर
तुला ते शहीदही म्हणतील…
ते तुझी समाधी बांधण्यासाठी पुन्हा आंदोलन करतील
आणि पुन्हा तुझ्या भावाच्या हातात हेच झेंडे देतील…
ते मात्र राहतील नामानिराळे,
वावरतील अंगरक्षकांच्या गराड्यात
तुला वार्यावर सोडून…
तुझी नशा मात्र कायम राहील धर्मासाठी मरण्याची आणि मारण्याची
झेंड्यासाठी शहीद होण्याची…..
…तू कधी विचार केला नाही आई-बापाचा
भाऊ-बहिणीचा…
त्यांनी मात्र कधीही आपल्या मुलांना
रस्त्यावर उतरवले नाही,
हातात झेंडा दिला नाही,
जीव तोडून घोषणा देताना पाहिले नाही…
ते शिकवतील आपल्या मुलांना परदेशात
आपल्या देशावरील व धर्मावरील प्रेम अबाधित ठेवून…
मित्रा तुला आता एकच टार्गेट…
भोंगा किंवा चालिसा
मुर्दाबाद- झिंदाबाद…
मित्रा, स्पीकरचा आवाज कानाचे पडदे फाडून आत गेला पाहिजे कानामध्ये
अन् डोक्यामध्ये धर्माचं तांडव झालं पाहिजे
हृदयातून उकळी घेऊन भगव्या किंवा हिरव्या रंगाचं रक्त
नसानसांत भिनलं पाहिजे,
सारा देश हिरवा किंवा भगवा होईपर्यंत…
सारा देश हिरवा किंवा भगवा होईपर्यंत…
– डॉ. बापू चंदनशिवे, अहमदनगर