भारतात एकीकडे आदिवासींचा सन्मान वाढवण्याच्या नावाखाली आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती बनवण्याच्या हालचाली सुरू होत्या आणि त्या अगोदर आठ वर्षे भाजपच्याच महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्या आणि निवृत्त सनदी अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी सीमा पात्रा यांनी आपल्या घरातील आदिवासी मोलकरणीचा असा काही छळ केला, की इतका निर्दयी छळ यापूर्वी कोण्या महिलेने कोण्या महिलेचा केला नसावा. सीमा पात्रा राजकारणात आणि बाहेर प्रतिष्ठित म्हणून वावरत होत्या. या प्रतिष्ठेच्या आवरणामुळे आदिवासी मोलकरीण सुनीता खाका हिचा आक्रोश बाहेर पडू शकत नव्हता. सीमाच्या मुलालाच हा छळ पाहताना असह्य झाले आणि आई करत असलेल्या पापाला त्यानेच वाचा फोडली. सीमाने स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच्या मुलालाच मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही आणि समाजात, देशात होत असलेल्या लज्जेखातर भाजपने सीमाला पक्षातून निलंबित केले. पोलिसांनी कारवाई करून तिला तुरुंगात टाकले. उद्या ती तुरुंगातून बाहेर पडेल, कदाचित तिला शिक्षाही होईल किंवा कदाचित ती निर्दोषही सुटेल; पण स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांत आदिवासींच्या वाट्याला आलेले यातनामय जीवन, अपमानास्पद जीवन, छळाचे जीवन संपत नाही, संपायला तयार नाही, हेच सिद्ध होते. भाजपमध्ये जाऊन खुर्च्या उबवणार्या कोणाही दलित वा आदिवासी नेत्यांनी याप्रकरणी तोंड उघडलेले नाही. मोफत गॅस घेणार्या आदिवासी महिलेबरोबरचे ज्यांचे फोटो देशभर लावले जातात, त्या कारभार्यानेसुद्धा तोंड उघडले नाही. हा प्रश्न एवढ्याचसाठी गंभीर वाटतो, की कारण अन्याय करणारे आणि ज्यांच्याकडून प्रतिकार किंवा प्रतिक्रियेची अपेक्षा असते, ते जणू काही मिलीजुली भगत झाल्यासारखे वाटतात. अशा घटनांमध्ये राहुल गांधी अन्यायग्रस्तांची भेट घ्यायला जातात, तेव्हा पप्पू म्हणून त्यांना हिणवणारे हेच नेते असतात. सवर्ण भारतीयाला अमेरिकेत गोर्या माणसाने अपमानास्पद बोल सुनावले, की हे जागे होतात. अमेरिकेला इशारा देण्यापर्यंत ते जातात. तसे घडायलाच हवे. प्रश्न तोच आहे, की भारतात उच्चवर्णीय सवर्ण इथल्या दलित-आदिवासींवर तसा किंवा त्यापेक्षा गंभीर अन्याय करतो, तेव्हा यांना दातखिळी का बसते? सगळेच पक्ष दलित-आदिवासींची मते पळवण्याच्या प्रयत्नात असतात; पण या अन्यायग्रस्तांना न्याय, सामाजिक न्याय देण्यासाठी कोण पुढे येणार? दलित नेते आपल्याच समाजात फितूर होऊन व्यवस्थेच्या कच्छपी लागले आहेत. एक तुकडा कुठून तरी आला, की यांचे भागते; पण त्याच तुकड्यासाठी बड्या लोकांकडे नोकरी करणार्यांच्या वाट्याला काय येत असेल, हे पाहण्यासाठी कोणती हेरगिरीची व्यवस्था आणायची, की ईडीचा वापर करायचा!
सीमा पात्रा कोणी सामान्य नाही. एका बड्या अधिकार्याची पत्नीच नाही, तर एकेकाळी आपल्या सौंदर्याच्या अहंकारातून ती बिहारची ड्रीम गर्ल बनण्याच्या प्रयत्नात होती. राजकारणातील काही गब्बर नेते वगळता ती कोणाच्या स्वप्नात जाऊ शकली नाही. तेव्हाचे आरजेडीचे एक नेते जे पुढे चारा प्रकरणात अडकले त्या आर.के. राणा यांनी या बाईला मुंबईत इतके फिरवले, की त्यासाठी वीस कोटी रुपये खर्च झाले आणि तेव्हा हा मुंबई दौरा बातम्यांचा विषय बनला. राणा जेव्हा लोकसभेसाठी 1991 मध्ये उभे राहिले, तेव्हा त्यांच्या प्रचारासाठी सीमाचे फोटो झळकवण्यात आले. जनता दलात आपली डाळ काही शिजत नाही, हे पाहून त्या काँग्रेसमध्ये गेल्या. तेथेही बस्तान बसेना म्हणून त्या भाजपमध्ये आल्या. एव्हाना भाजपमध्ये शुद्धीकरणाचा कारखाना सुरू झाला होता. भाजपमध्ये एखादा कोणी आला, की त्याच्यावर तीर्थ शिंपडून त्याला रात्रीत शुद्ध केले जाते आणि भाजप बाहेर राहणारा कोणताही सुगंधी स्प्रे शिंपडून घेऊ दे, तो अस्वच्छच राहतो. सीमा शेवटी भाजपच्या किनार्यावर जाऊन थांबली. एवढी मोठी बाई, एवढी कारकीर्द! ती महिलांच्या उद्धाराचे काही तरी करेल, या हेतूने तिला महिलांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत घेतले गेले. ज्यांच्या उद्धाराची म्हणजे महिलांच्या उद्धाराची जबाबदारी तिच्यावर होती, त्यापैकी एकीचा छळ करून हिने वाट लावली.
सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी आणि वरिष्ठ जात यांच्या जोरावर बरेच जण अहंकारी बनतात; पण हा अहंकार व्यक्त करण्यासाठी बाहेर कुठे जागा मिळाली नाही, की मग हे घरातल्या नोकरांचा छळ करतात. अशी किती तरी उदाहरणे घडली आहेत. मध्यंतरी पुण्यात एका महिला सनदी अधिकार्याने आपल्या दलित मोलकरणीला जातीच्या कारणावरून कसे छळले हाते, हे अजून ताजेच आहे. सत्ता, संपत्तीच्या जोरावर मस्तवाल, निर्दयी बनणारे आणि घरातील गरीब नोकरांना छळणारे खूप आहेत, तर या सीमाने कसलीही सीमा न बाळगता सतत-आठ वर्षे हा छळ होता. छळ करून सीमा स्वतः कंटाळली की काय म्हणून ती सुनीताला आपली मुलगी वत्सलाच्या घरी कामासाठी पाठवे. तिथेही काम कमी आणि छळ जास्त. बड्या कुटुंबातील या मायलेकींना विकृतीने घेरले होते. गरिबांचा जेवढा जास्त छळ करू तेवढी आपली प्रतिष्ठा वाढणार, म्हणून की काय सुनीताच्या वाट्याला छळाचे वेगवेगळे प्रकार आले. शिव्या, लोखंडी सळईचे चटके, उपासमार, डांबून ठेवणे, गरम तव्याचे चटके, असे सगळे प्रकार झाले, की या मायलेकी बाहेरगावी जाताना तिला डांबून ठेवायच्या. जेथे डांबून ठेवले जायचे, तेथे अन्नपाणी नसायचे. या परत येईपर्यंत ही उपाशीच. सांगता येत नाही आणि सहन करता येत नाही, अशा अवस्थेत ती जगत होती.
सीमाने छळाचे नवनवे प्रकार तयार केले होते, जे माणुसकीला काळिमा फासणारे आणि निर्दयतेला कळसावर पोहोचवणारे होते. दोन-दोन, चार-चार दिवस जेव्हा सुनीताला कोंडले जायचे, नाइलाजाने ती नैसर्गिक विधी स्वतःच्या कपड्यातच करायची. हे मलमूत्र जिभेने चाट आणि कपडे स्वच्छ कर, कामाला लाग, असे सीमा सुनीताला सांगायची. सुनीताला माराच्या, छळाच्या भीतीपोटी हे सारे करावे लागत असे. माणसाने स्वतःच स्वतःचे मलमूत्र खाणे, असा या गोष्टीचा अर्थ झाला. लाजेची, नैतिकतेची, माणुसकीशी संबंध नसलेली आणि विकृत बनलेली सीमा हे सारे रोज करायची. कसला आनंद मिळत असेल, हे तिलाच ठाऊक! रोजची ही छळछावणी तिच्या निवृत्त सनदी अधिकारी पतीला कशी दिसली नाही, हाही एक प्रश्नच आहे. शेवटी हे सारे पाहून वेड्याच्या अवस्थेत पोहोचू पाहणार्या सीमाच्या मुलाने हे प्रकरण बाहेर काढले. छळ करणार्याला काहीच लाज वाटत नव्हती. लाज वाटली ती रोज छळ पाहणार्या पोराला! छळामुळे सुनीताची प्रकृती इतकी खालावली आहे, की दुरुस्त होण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे. मानसिकदृष्ट्या ती इतकी खचली आहे, की त्यातूनही बाहेर पडायला काही काळ जावा लागणार आहे. आपल्या देशातील युवतीवर अत्याचार झाला आणि ती मरण पावली, की मेणबत्त्या पेटवण्यासाठी गर्दी करणारी काही मंडळी तयार होतात. अर्थात, ते चांगलेच करतात; पण दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांवर अन्याय होतो, तेव्हा मेणबत्त्या पेटवण्यासाठी गर्दी का होत नाही? अशा वेळी होलसेल मेणबत्त्या पेटवणारे आणि त्यांचे आंदोलनात रूपांतर करणारे मौनात का जातात? दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार त्यांना दिसतो आणि दिसायलाच हवा; पण रांचीतील घटना त्यांना का दिसत नाही? राज्यघटनेला हात लावला, तर हा कलम करू, अशा उसन्या डरकाळ्या फोडणारे नेमके कुठे असतात? अजून बरेच काही सांगता येईल…
– पंक्चरवाला