आधुनिक काळातला हा लांडगा नदीच्या काठावर वरच्या बाजुने पाणी पित असतो… अहिंसा, समता, लोकशाही, शत प्रतिशत भाजप आणि घोषणांचा त्याच्यावरही परिणाम झालेला असतो… ‘अब की बार देश पार’ वगैरे वगैरे त्याच्याही कानावर काही येतच असतं… त्यानं स्वतः पंजा मारून तो कोणा कोकराच्या मानेत खुपसायचं बंद केलं… त्याऐवजी त्यानं सपोर्ट, सिस्टिम किंवा एजन्सी तयार केलीय… शिकार करण्यासाठी तो एजन्सी वापरतो… एजंटालाही थोडे फार देतो पाय, मुंडी, रक्ती, वजडी वगैरे… स्वतःला काळीज आवडतं म्हणून तो स्वतःकडेच ठेऊन घेतो… तर याची सपोर्ट सिस्टिम आहे कोल्हा… तो भक्ष्य कोल्ह्यापर्यंत नेतो… त्याबदल्यात त्याला खायला मिळतं… आणि इडी बीडी वगैरे अन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळतं… लांडगा आशीर्वाद घेऊन उभा असल्यानं त्याला यापैकी कोणाची भीती नाही वाटत… भक्ष्य त्यांच्यापर्यंत नेलं की बस. सिक्युरिटीच सिक्युरिटी… तर नदीच्या काठावर उभा राहिलेला लांडगा खालच्या बाजुला पाणी पिण्यास आलेल्या कोल्ह्याला म्हणतो, भाऊ अरे माझ्या मालकीचं पाणी तू का उष्टे करतोस? कोकरू म्हणतं, दादा तुम्ही वरच्या बाजुला पाणी पिताय… तुम्ही उष्टे केलेलं आणि वरून खाली येणारं पाणीच पितोय मी… लांडगा पुन्हा गुरगुरतच म्हणतो, खाल-वरची आता करू नकोस सगळी नदी माझी झालीय… दाखवू माझी शक्ती असं म्हणत तो कोल्ह्याला खुणावतो… कोल्हा कोकराला लांडग्याच्या हवाली करतो… लांडगा इतका खूश होतो कोल्ह्यावर की म्हणतो, माग काय हवं ते… कोल्हा म्हणतो, दादा ती इडी, आय.टी.चे प्राणी आमच्या मागं खूप लागले आहेत… आमची जमात धोक्यात येत आहे, काही तरी करा… सुरक्षित, प्रतिष्ठेची जागा द्या… एक कोकरू नव्हे, तर अख्खा कळपच घेऊन आलोय… लांडगा तथास्तू म्हणतो… कोकरांचा मालक कळपातील दोन-चार शिल्लक कोकरे घेऊन आपल्यावर अन्याय कसा झाला, हे भाषणातून सांगण्यासाठी निघून जातो… इकडे लांडगा कोल्ह्याला प्रोत्साहन देण्यासाठी जंगलाचा मोठा ऐरिया देतो… लांडगा असलो तरी त्यागी आहे, असं म्हणत स्वतः छोटा ऐरिया घेतो… ही झाली जंगलातील गोष्ट…
या गोष्टीची रचना चालू असताना महाराष्ट्राच्या राजकारणात असंच काही घडत होतं… ते कसं घडलंय या कथेची संहिता कोणी लिहिली, संवाद कोणी म्हटले, नायक कोण, खलनायक कोण, स्थळ कोणतं, किती प्रवेश वगैरे वगैरे आता माता भवानीच्या महाराष्ट्राला सारं काही ठाऊक झालंय… आखाडा तोच होता… पैलवान बदलले होते… एरव्ही तेल लावून आखाड्यात उतरणार्यांऐवजी दुसर्या पैलवानांनी तशी भूमिका केली… यापूर्वी शिवसेनेनं बंड करणार्या पैलवानांपेक्षा हा पैलवान वेगळा होता. कुठेही गर्दीत, कोणत्याही गल्लीबोळात, सिग्नल असो वा नसो; पण आपली रिक्षा आरामात बाहेर काढण्याचा हा पट्टीचा ड्रायव्हर होता. रिक्षा ड्रायव्हरला जेवढे डावपेच ठाऊक असतात, तेवढे एकसंध किंवा सुट्ट्या गर्दीला ठाऊक नसतात. या अगोदरच्या पैलवानांनी आपलं आपलं बंड केलं होतं; पण नव्या पैलवानानं बंडाच्या वगैरे नादाला न लागता अख्खी विधिमंडळ आणि संसदीय शिवसेनाच हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. आम्ही चाळीस म्हणजेच शिवसेना, असं ठासून सांगत भाजपशी घरोबा केला. अर्थात, भाजपला असा घरोबा काही नवा नाही. दोन-तीन डझन तर उंबर्याशी त्यांचा घरोबा आहे. वेगवेगळे उंबरठे आहेत. आंबेडकरवादी, जनतावादी, प्रादेशिकवादी असे किती तरी उंबरठे आहेत. उंबरठे हे आमचे वैभव आहे, असे सांगत हा पक्ष फिरत असतो. ज्या छोट्या-मोठ्या घराचा आपल्याला उपयोग आहे, असं त्याला वाटतं त्या घराचा उंबरठा तो पकडतो आणि पुढे ते घरच संपवतो. घराची डागडूजी होईल, कल्याणकारी गोष्टी मिळतील म्हणून उंबरठे मैत्रीचा हात पुढे करतात आणि हे हाताबरोबरच अख्खे घरच बळकावतात. या मोहिमेला त्यांनी सुंदर नाव दिलंय, ‘सब का साथ, सबका विकास’.
तर शिवसेनेत असं काही तरी होणार याचा अंदाज सर्वांनाच होता. मी पुन्हः येणार अशी भल्या पहाटे ज्यांनी शपथ घेतली होती ते काही स्वस्थ बसणार नव्हते आणि त्यांना पुन्हः येण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय दुसरी शिडी नव्हती. यापूर्वी राष्ट्रवादीची शिडी वापरण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता; पण ती आठ-दहा तासच टिकली. तर आता दुसरी शिडी कोणती, याचा विचार गेले काही महिने हे करत होते. शिवसेना आपण फोडायची नाही, तर तिच्यातल्या शिलेदारांनाच त्यासाठी ताकद द्यायची. हॉर्लिक्सचा डबा द्यायचा आणि अख्खी शिवसेनाच कमळाच्या सावलीत आणायची, असा हा डाव होता. इंग्रजीत त्याला प्लॉट म्हणतात. त्याचा अर्थ कट असा होतो. राजकारणात कटालाही प्रतिष्ठा असते. असे करणारा धुरंधर राजकारणी ठरतो. तो पुढे मोठा होतो, हेही नव्या कटवाल्यांना ठाऊकच असणार. एक-दोन-चार करत जवळपास चाळीस शिलेदारांना म्हणजे शिवसैनिकांना गळाला लावण्यात आले. विशेष म्हणजे, आमदारांनी स्वेच्छेने हा गळ घोषण देऊन राकट झालेल्या जीभेवर घेण्याचे ठरवले आणि शिवसेना म्हणजे विधिमंडळ शिवसेना मोकळी झाली. आता शिवसेना हे नाव, तिचे निवडणूक चिन्ह सारं काही हे चाळीस लोक मागतील यात शंकाच नाही. त्यांच्या या महान कामगिरीबद्दल भाजपनं खळखळ न करता मुख्यमंत्रिपद बहाल केलं आहे. दोन पावलं पुढं जायचं असेल, तर एक पाऊल मागं जात उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानलं आहे. मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेला माणूस एक पाऊल मागं कसा येईल, हे सत्ताकारणात कोणी विचारत नाही. काँग्रेसमध्येही असे नेते आहेतच की… आमदारपदावरून निवृत्त होऊन नगरसेवक बनलेले पण आपल्याकडेच होतेच की… प्रश्न पुढे-मागे येण्याचा नाही, तर मूळ ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोल्हे संपवण्याचा आहे. वाघाचं कोकरू बनलेल्या शिवसेनेला संपवण्याचा आहे. राजकारणात असा झगमगणारा गोल कोणी तरी तयार करतात आणि त्याला आकर्षित होऊन काही जण जातातही तेथे… पुढे त्यांचे काय होते, याला फक्त गोल साक्षी असतो.
भाजपचे हिंदू राष्ट्र 2025 ला अस्तित्वात येणार, अशी घोषणा नागपूरवाल्यांनी केली आहे. तसे घडायचे असेल, तर फक्त हिंदुत्ववादी पक्ष शिल्लक असावा लागतो. गेली अडिच वर्षे कोण अस्सल हिंदुत्ववादी आणि कोण कम अस्सल हिंदुत्ववादी यावरच राजकारण तापले आहे. त्यातून बाहेर पडणार्या वाफांमध्ये सामान्यांचे जगण्या-मरण्याचे प्रश्न बाजुला पडले आहेत किंवा त्यांनी ते विसरावेत यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातल्या पडझडीच्या वेळी हिंदुत्ववादाचा मुद्दाच लावून धरण्यात आला. कोणाचे हिंदुत्व जहाल आहे, कुणाचे मवाळ झाले आहे, कोणाला अयोध्येत जायची घाई आहे, कोण मशिद पाडायला गेला, कोणाला रोखले, यावरच चर्चा घडवण्यात आली. हिंदुत्व ही अशी गोष्ट करण्यात आली, की एखादा कोण आहे याचं स्कॅनिंग करण्यासाठी हिंदुत्वाचं यंत्र वापरण्यात आलं. तसं तर ते देशभर वापरण्यात येतं. महाराष्ट्रातले कारभारी त्यात तज्ज्ञ आहेत. त्यांचं खूप मोठं प्रशिक्षण झालं आहे.
मूळ मुद्दा हा आहे, की हिंदुत्व म्हणजे नेमके काय आणि खरंच कोणा राजकारण्याचा त्याच्याशी संबंध आहे. ज्यांच्या घराला अनेक बिगरहिंदुत्ववादी उंबरठे आहेत, ते हिंदुत्ववादी कसे होतात? कोणी तरी हुतात्मा चौकात जाऊन प्रश्न विचारायला पाहिजे, की हिंदुत्व नेमकं काय असतं आणि आपण म्हणजे ते काय करत आहेत. भोंगा वाजवण्याला हिंदुत्व म्हणतात, मीच मशिद पाडली याला हिंदुत्व म्हणतात, दुसर्याच्या दारात हनुमान चालीसा वाचण्याला हिंदुत्व म्हणतात, भगवी पांघरण्याला हिंदुत्व म्हणतात, जुने वाडे उकरण्याला हिंदुत्व म्हणतात की अजून कशाला? याचे उत्तर द्यायला कोणीच येणार नाही. कारण हे सारे हिंदुत्वाच्या वर वाढलेल्या टरफलाशी खेळत आहेत. हिंदुत्वाशी खेळणे ही काही शिवथाळी मिळवण्याइतकी आणि आधार कार्ड मिळवण्याइतकी सोपी गोष्ट नाही.
तर आता शिवसेनेचे काय होणार, उद्धव ठाकरे यांचे काय होणार, हे प्रश्नही बंडवाल्यांनीच उपस्थित केले आहेत. तू मेरी नही होगी, तो किसी की भी नही होगी? असा बर्याच हिंदी सिनेमात डायलॉग असतो आणि याला ते प्रेम म्हणतात. इकडेही असेच आहे. शिवसेनेला भले मोठे भगदाड पाडण्यालाच हे शिवसेनाप्रेम किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे वारसदार म्हणतात. अर्थात, हे तत्त्वज्ञान तयार करण्याइतके कोणी रिक्षावाले विद्वान असत नाहीत. कुणी तरी हे तत्त्वज्ञान तयार केले आणि प्रामाणिक रिक्षावाल्याप्रमाणे हे वाहून नेत आहेत. रिक्षात एखाद्याने बॅग विसरली, की काही रिक्षावाले ते प्रवाशास परत करतात. प्रामणिक रिक्षावाले अशी किर्ती त्यांना लाभते. इथं थोडं वेगळं झालंय आणि ते म्हणजे शिवसेनेत मी नाही तर शिवसेना माझीच आहे आणि ती माझ्याच सातबार्यावर कोरायची आहे. कोरीव काम करणारे त्यांच्या मदतीसाठी धाऊन आले. ते उच्चशिक्षित आहेत. प्रमाण मराठीचे अभ्यासक आहेत. त्यांनी स्क्रिप्ट केली आणि यांनी ती वापरली. शिवसेनेवर उलटवली. विरोधी पक्ष मुक्त भारताचे स्वप्न पाहणार्यांनी पडद्यामागून आवाज दिला आणि यांनी ओठ हलवले. शिवसेना दूरवर फेकली गेली. आता ती पुन्हः फुलवायची असेल, तर उद्धव ठाकरेंना केवळ भाषण करून चालणार नाही. आताच्या आता राजीनामा देतो आणि आताच्या आता बॅगा भरून मातोश्रीवर जातो, असे म्हणूनही चालणार नाही. नव्या काळात सत्तेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. ती व्हायरल झाली आहे. कोरोनाचा व्हायरस जसा कुठेही शिरू शकतो, तसाच सत्तेचा व्हायरस आहे. मातोश्रीच्या भिंती अभेद्य आहेत, असा दावा करून चालणार नाही. कारण व्हायरस घुसलाच. यापुढील काळातही सत्तास्पर्धा आणखी तीव्र राहणार आहे. सत्तेच्या परीघाबाहेर घुटमळत राहिलेल्या अजून शेकडो जाती, गट आहेत. तेव्हा जेव्हा धडका मारायला लागतील किंवा शमूला संपवण्यासाठी जो कोणी त्यांचा उपयोग करून घेईल, तेव्हा तर स्पर्धा आणखी टोकदार होणार आहे. याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. आघाडीत एखादा घटक गेला, की तो मोठा जसा होतो, तसा त्याच वेळी तो छोटाही होतो. सत्तेशिवाय जगण्याची सवय कुणाला नाही. संसदबाह्य राजकारण करण्याची हिम्मत कुणात उरलेली नाही. आघाडीतले घटक दिसायला मोठे आणि वापरायला छोटे असतात. शिवसेनेच्या लक्षात एव्हाना ही गोष्ट आली असेल. शिवसेनेचे बळ नेहमीच वेगळ्या गोष्टीत सामावले आहे. राजकारणात ज्यांना कधीच कोणी चेहरे दिले नाहीत, त्यांना ते शिवसेनेने दिले आहेत. रिक्षावाले, भाजीवाले, सुतार वगैरे त्यापैकी एक. आपण चेहरे दिले; पण विचार आणि बांधिलकी देण्यात कमी पडलो का, याचा विचार उरलीसुरली शिवसेना करेल अशी अपेक्षा आहे. मातोश्रीतून झुंजार शिवसैनिक बाहेर पडण्याच्या काळात कोल्हे कसे बाहेर पडले आणि लांडग्यांची कथा कशी चालवली. हे जे महाराष्ट्राला कळले ते शिवसेनेलाही कळलेच. तर शेवटी भाजपला शिवसेना फोडायची नव्हती किंवा संपवायची नव्हती, तर तिची जी काही ताकत आहे तिच्यासह तिचे अपहरण करायचे होते. ते अपहरण स्वतः न करता तिने करवून घेतले आहे.
– संपादक (द पीपल्स पोस्ट.)