दिल्लीतील एक उद्योगपती आणि वरिष्ठ अधिकार्याच्या घरात जन्माला आलेली लाडली, सुंदर आणि उच्चविद्याविभूषित पोरगी म्हणजे नुपुर शर्मा. तिची जडणघडण आणि राजकीय कारकीर्द संघाच्या एक घटक असलेल्या अभाविपमध्ये झाली. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेत अध्यक्षपद भूषवून तिने तिथे अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवली. ती पराभूत झाली. आपच्या भक्कम ढालीवर तिच्या तोफेचा परिणाम झाला नाही. याच कालावधीत भाजपमध्ये अशा अनेक धडाडत्या तोफांना महत्त्वाचे स्थान मिळाले होते. त्या साध्वीही होत्या. प्रचंड वक्तृत्वाच्या जोरावर त्या कुणावरही तुटून पडतात. नामोहरण करू शकतात. मुख्यमंत्र्यांपासून राज्यपालांपर्यंत आणि केंद्रीय मंत्रिपदापासून ते पक्ष प्रवक्तेपदापर्यंत अनेक ठिकाणी महिलांची फौज तयार करण्याचा झपाटा भाजपने सुरू केला. अर्थात, अन्य पक्षांनीही भाजपची रि ओढली. जी भाषा पुरुष वापरू शकणार नाहीत, अशी भाषा त्यांनी वापरायला सुरू केली. परस्परांविरुद्ध खटले भरायलाही सुरुवात केली. महिलांच्या भांडणात सहसा कोणी भाग घेत नाही, तर भाजपमधील महिलापर्व खूपच चकाकत राहिले. सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या, तर आम्ही मुंडण करू, असे सांगणार्या महिला त्यावेळी भाजपमध्ये होत्या. गांधींवर टीका करून जणू काही रोज त्यांची हत्या करणार्या बर्याच महिला भाजपमध्ये आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये गांधी घराण्यावर, काँग्रेसवर आणि मुस्लिमांवर त्या तुटून पडू लागल्या, की त्यांच्या जिभेला नैतिकतेचे एखादे साधे हाड आहे की नाही, असा प्रश्न पडावा एवढे त्या गुरगुरतात. डरकाळ्या फोडतात. अर्थात, अशा प्रकारामुळे महिलावर्गाची निंदा करावी, असे नाही. कारण त्या ज्या काही बोलतात ते कोणी तरी वदवून घेत असते. त्या ज्या काही बोलतात त्याची संहिता तयार करणारे काही अदृश्य हात असतात. संहिता तयार करणार्यांची संख्या संघ आणि भाजपमध्ये लाखोंच्या घरात आहे, दृश्य आणि अदृश्य स्वरूपात. काही काही वेळा संहिता उलटते तेव्हा सत्तेच्या जोरावर त्याचे परिणाम दाबून टाकले जातात. सावरकरांविषयी, गुरुजींविषयी एक शब्द इकडचा तिकडे झाला, की राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवला जातो; पण गांधी-नेहरूंची रोज बदनामी केली, की कधी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवला जात नाही. गाईवर खडा टाकला, की धर्मद्रोह होतो आणि सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांची कितीही निंदा केली, त्यांच्या खासगी जीवनावर शिंतोडे उडवले, तर कसलीच निंदा घडत नाही. यालाच सत्तेचे राजकारण म्हणतात. यालाच विरोधकमुक्त भारत म्हणतात.
भाजपचे प्रवक्ते अन्य धर्मावर, अन्य धर्मांच्या नेत्यांवर जी गरळ ओकत असतात त्यास भारतात प्रत्युत्तर देणार्या शक्ती क्षीण होत आहेत. त्या क्षीण होत आहेत म्हणून आणखी प्रतिकार वाढतो आहे. आपण 370 रद्द केले किंवा आपण बाबरी मशीद पाडू शकलो, या सार्या गोष्टीतून या सर्वांना सैतानी बळ प्राप्त झाले आहे. परिणाम, अजून टीका चालू झाली. व्यक्तीपासून धर्मापर्यंत आणि धर्मापासून प्रेषितांपर्यंत ती पोहोचली. अर्थात, अशा व्यूहरचनेत प्रतिस्पर्ध्यांची ताकद अजमावण्याचाही डाव असतो. कोणत्या खड्यातून किती तरंग उठतात हे पाहण्याचा प्रयत्न असतो. तरंगाच्या रूपात अवतरणार्या अनेक शक्तींचे भाजपशी संधान झाले आहे. त्यात दलित नेते आणि काही विचारवंत आहेत, मुस्लीम नेते आहेत आणि त्यांच्या काही संघटना भाजपची बी टीम असल्याप्रमाणे काम करतात. लाल किंवा भगव्या रंगाच्या गोफणीतून फेकले जाणारे दगड रोखणारे हातही कमी होत आहेत आणि भाजपच्या काही नेत्यांच्या जिभा सैल होत आहेत. अशीच नुपूर नामे महिलेची जीभ सैल झाली. तिने प्रेषित महम्मदसाहब पैगंबर यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल आक्षेप घेणारी विधाने त्यांच्याच विचारांना वाहिल्या गेलेल्या एका टी.व्ही. चॅनलवर केली. हे चॅनल मुद्दाम असे वाद घडवते. सत्ताधार्यांचे पाठबळ असल्याने त्याच्यावर कुणी कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. पैगंबरांच्या वैवाहिक जीवनावर भाष्य करताना नुपूरच्या लक्षात आले नाही, की असे भाष्य जर पलीकडून हिंदू देव-देवतांच्या वैवाहिक जीवनावर केले, तर किती मोठे संकट उभे राहील; पण नुपूर अशा संकटाची प्रतीक्षा करत असावी. कोणी आपला धर्म आपल्या तत्त्वज्ञानाच्या जोरावर वाढवते जसे की, गौतम बुद्ध. कोणी शस्त्रांच्या, युद्धाच्या जोरावर वाढवते, तर कुणी दुसर्या धर्माची निंदानालस्ती करून आपला धर्म श्रेष्ठ असल्याचे सांगते. त्यांचा धर्म भोंग्याला चिकटतो, हनुमानाच्या जन्मस्थळाला चिकटतो आणि अनेक जुन्या इमारती किंवा थडग्यांनाही चिकटतो. तशीच प्रतिक्रिया समोरून आली, की मग धर्मकलह सुरू होतो. हिंसाचार सुरू होतो. जसे की, तो नुपूरच्या विधानावर सुरू आहे. त्याविषयी भाजपचे नेते आणि सरकार यांना काहीच वाटत नसावे. कारण दंगलखोरांची धरपकड करण्यापलीकडे ठोस आणि गांभीर्याने काहीच घडत नाही. हिंदू राष्ट्राची घोषणा करू पाहणार्या वातावरणात तसे काही घडण्याची अपेक्षा करणेही चुकीचे आहे.
नुपूरच्या विधानाची दखल भारताऐवजी आखाती राष्ट्रांत आणि त्यांच्या आखात सहकार्य समितीतून घेण्यात आली. तेथे निदर्शने झाली. पैगंबरसाहब यांच्यावर टीका करणार्या भारतातील उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा आदेश देण्यात आला. अनेक ठिकाणी भारतीय दूतावासांना बोलावून त्यांच्याकडे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. दौर्यावर असलेल्या उपराष्ट्रपतींच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला. ज्या अरब राष्ट्रांशी आपल्या अनेक अर्थांनी आर्थिक, सांस्कृतिक आणि वाणिज्यविषयक नाड्या जोडल्या गेल्या आहेत तेथून येणारी प्रतिक्रिया सहजासहजी दुर्लक्षित करता येण्यासारखी नव्हती. नुपूरबाई उलटी करून गेली आणि तिची खूप मोठी किंमत देशाला चुकवावी लागली. मान खाली घालावी लागली आणि क्षमायाचना करावी लागली. जगात एक महाशक्ती बनण्याच्या प्रयत्नात असलेल्या देशावर अशा प्रकरणात माफी मागण्याची वेळ यावी, ही खूप नामुष्कीची गोष्ट आहे; पण भारतावर ती आली. भारत माफी मागताना हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांची सर्व पिलावळ मूग गिळून गप्प होती. माफीनाम्यामुळे केवळ आखातातच नव्हे, तर जगात भारताची अप्रतिष्ठा झाली. याला जबाबदार कोण? सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याने जाणूनबुजून उलटी केली, की उलटी होण्याची संहिता त्यांना करून दिली, हेही उजेडात यायला हवे; पण ते कोण आणणार, हा मोठा प्रश्न आहे. ज्या बाईच्या विधानामुळे दीडशे कोटींच्या देशाला माफी मागावी लागली तिच्यावरच राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, जसा नक्षलवाद्यावर होतो तसा. केवळ प्रवक्तेपण काढून घेण्यात काय अर्थ आहे?
नुपूर शर्माबरोबरच नवीन जिंदाल यांच्यावरही अशी वेळ आली. दोन वेळा हरयाणातून खासदार झालेल्या आणि सध्या जिंदाल स्टील आणि जिंदाल विद्यापीठाचे जे त्यांचेच आहे त्याचे ते प्रमुख आहेत. आग ओकणारी मशीन म्हणून तेही भाजपचे प्रवक्ते आहेत. कुणालाही राष्ट्रध्वज आपल्या घरावर लावता यावा यासाठी त्यांनी न्यायालयात आणि बाहेर आंदोलन केले होते. त्यांना न्यायालयात यश आले होते. त्यांनीही नुपूरप्रमाणेच प्रेेषितांवर टीकाटिपणी केली आणि त्याच वेळेला मोदी आणि शहांचे तोंडभरून कौतुक केले. देशातील लोकांनी आपल्या चामड्याचे जोडे त्यांच्या पायात घालावेत इतके काम ते करत आहेत, असे जिंदाल यांनी म्हटले. शिवाय, आपल्या धार्मिक टिपणीबद्दल क्षमाही मागितली आहे. त्यांचेही पक्ष सदस्यत्व निलंबित करण्यात आले. महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की सार्या जगावरच मूलतत्त्ववाद आणि धर्मवादाच्या सावल्या पडत आहेत. माणसांची मने आणि त्यांच्या भोवतालचे पर्यावरण एकदम नाजूक बनले आहे. कधीही कशाही स्वरूपात आणि कोठेही वणवा भडकू शकतो आणि स्वाभाविकच नेहमीप्रमाणे दोन डोंगरांच्या टकरीत झाडेझुडपेच नष्ट होत असतात. सध्या भारतात असंतोष निर्माण करू पाहणारे हे सगळे पाल्यापाचोळ्याप्रमाणे आहेत. हा जो ज्वालामुखीचा कडा तयार होतो आहे, त्यातून जगाला वाचवले पाहिजे. सुरुंगाच्या वातीला पहिली काडी कोण लावणार, या प्रश्नात कोणी आपल्या देशाला, धर्माला आणि लोकांना गुंतवू नये किंवा आपण त्यास जबाबदार ठरू नये, हाच आजच्या घडीचा संदेश आहे. पढवलेल्या पोपटांनी ओकलेल्या शब्दांमुळे महाकाय देशाला माफी मागावी लागणे, ही काही साधी गोष्ट नाही. म्हणून माफी मागणार्या सरकारनेच या दोघांवर इतकी कडक कारवाई केली पाहिजे, की अशा प्रकारे माफी मागण्याची वेळ पुन्हा येणार नाही.
– पंक्चरवाला
1 Comment