पाच-पाच वर्षांनंतर बदलतात अभिनेते
स्क्रिप्ट बदलते थोडी,
थोडे बदलतात संवाद
रंगमंच तोच,
थोडी रंगरंगोटी बदलते
म्हणावा असा, म्हणावा एवढा
पडत नाही फरक प्रयोगात
तुम्ही पाहा किंवा पाहू नका
तुम्हाला आवडो किंवा न आवडो
प्रयोग सुरूच राहतो
त्यांना गरज वाटत नाही तुम्ही दाद देण्याची
त्यांना वाटत नाही गरज तुमच्या टाळ्यांची
त्यांना वाटत नाही गरज तुमच्या प्रतिक्रियेची
त्यांना कशा कशाचीच वाटत नाही गरज
आणि
प्रयोग सुरूच राहतो
नाटक
तुम्ही पाहात राहायचं फक्त
तुम्ही सामील असूनही सामील नसता या
नाटक नावाच्या खेळात
आणि
आणि
आणि
प्रयोग सुरूच राहतो.
– डी.के. शेख