सर्वप्रथम पंचाहत्तरी पार करत असलेल्या स्वातंत्र्याला मानाचा मुजरा. या स्वातंत्र्यामुळे आपल्या सर्वांना स्वतंत्र देशातील एक स्वतंत्र नागरिक म्हणून आणि भारताला स्वतंत्र, स्वायत्त अशी ओळख प्राप्त झाली. सुमारे शंभर वर्षांच्या अथक संघर्षानंतर आणि अनेकांच्या बलिदानानंतर प्राप्त झालेले स्वातंत्र्य आपण जपून ठेवू शकलो. आपल्या बरोबर किंवा आगेमागे स्वतंत्र झालेल्या अनेक शेजारी राष्ट्रांत कधी-कधी हुकूमशाही, एकाधिकारशाहीने, धर्मवादाने आणि सत्तावादाने खो-खोचा खेळ मांडला. लोकांनी निवडून दिलेले नेते लष्कराच्या वर्दी आणि बंदुकीने हद्दपार केले. काहींना फासावर लटकवले गेले. लोकशाहीचा संकोच झाला किंवा तिची जागा अन्य कोणत्या तरी अनिष्ट गोष्टीने घेतली. भारतात असे घडले नाही, त्याला दोन कारणे होती. एक या सर्वांना पायबंद घालणारी भारतीय राज्यघटना आणि नागरिकांच्या मनात रुजू पाहणार्या स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या भावना. याचा अर्थ आपल्या लोकशाहीवर, स्वायत्ततेवर कधी काळे ढग फिरकलेच नाहीत, असे नाही. आपल्या सीमांना कधी धोका पोहोचला नाही असे नाही; पण आपण त्यावर मात केली. अनेक शेजार्यांशी लढून-लढून आपण आपल्या सीमा आणि देशाचे सार्वभौमत्व जपून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यात आपल्याला यश आले आहे. आणीबाणीसह आपणही अनेक राजकीय संकटांना टक्कर दिली आहे. अनेक नैसर्गिक संकटांशी मुकाबला केला आहे. दुष्काळ, रोगराई, महापूर, भूकंप आदी अनेक नैसर्गिक शत्रूंशी लढून आपण पुरून उरलो आहोत. धरणे बांधण्यापासून ते चंद्रावर पाऊल ठेवण्यापर्यंत, अण्वस्त्र निर्मितीपासून ते अणुचाचणीपर्यंत, महामार्ग उभे करण्यापासून ते घरटी संडास उभा करण्यापर्यंत, नोबेल पुरस्कार जिंकण्यापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छबी निर्माण करण्यापर्यंत, आंतरराष्ट्रीय सत्तेचा तोल सांभाळण्यासाठी मदत करण्यापासून ते साक्षरतेचा अश्व पळवण्यापर्यंत अनेक गोष्टी आपल्याकडे घडवल्या, घडवल्या गेल्या. या सर्वांचे प्रेरणास्रोत असलेल्या संविधानाला आणि गांधी, नेहरू, आंबेडकरांच्या विचारांना आपण बर्यापैकी जपून ठेवले. राजस्थानातील सती प्रथा बंद करण्यापासून ते शाहबानो प्रकरणापर्यंत, राज्या-राज्यांतील बरेच वाद मिटवण्यापासून ते स्वतंत्र राज्ये निर्माण करण्यापर्यंत बरेच काही या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत आपण कमावले आहे, हे कोणालाच नाकारता येणार नाही. कृषी क्षेत्रात आपण हरित क्रांतीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या दोन पंतप्रधानांची आणि खुद्द राष्ट्रपित्याची हत्या होऊनही आपण न खचता स्वातंत्र्याचा हात हातात घेऊन चालत राहिलो. अनेक धार्मिक आणि जातीय दंगलीतील कत्तली पाहूनही धर्मनिरपेक्षतेचे गीत गात राहिलो. अजून किती तरी म्हणजे असंख्य गोष्टी आपल्याला स्वाभिमानाने नोंदवता येतील यासाठी वाव आहे. स्वतंत्र भारत, सार्वभौम भारत, धर्मनिरपेक्ष भारत, लोकशाही-समाजवादी भारत आणखी वेगवेगळ्या वैभवशाली शब्दांत मांडता येणे कुणालाही शक्य आहे. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर पानांवर गौरवास्पद घटना आपल्याला पाहायला मिळतील. हा सर्व इतिहास स्वतंत्र भारताने लिहिला आहे. या सर्वांना आपण क्रांतिकारी भारत म्हणू शकतो. स्वातंत्र्य मिळवणे आणि ते इतकी वर्षे सुरक्षित ठेवणे यालाही क्रांती म्हणू शकतो.
बाबासाहेबांनी सांगितलेल्या क्रांती-प्रतिक्रांतीच्या सिद्धांतानुसार भारतात क्रांतीची जशी सुरुवात होत होती तशी त्याच वेळेला प्रतिक्रांतीच्या म्हणजे धर्मवादाचा आधार घेऊन वेद-पुराणे आणि स्मृतीच्या आधारे धर्मराष्ट्र बनवण्याचे प्रयत्नही चालू होते. स्वातंत्र्याच्या चळवळीबरोबरच त्यांचाही उदय झाला होता. यातील अनेक घटक मिळेल त्याठिकाणी जाऊन आपल्या मुठीतील प्रतिक्रांतीची स्वप्ने पकडून होते. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या वाटचालीत तेही आपली स्वप्ने बाळगून होते. स्वातंत्र्य पन्नाशीच्या घरात पोहोचत असताना त्यांच्या स्वप्नांना अंकुर फुटत होते आणि 75 व्या वर्षात त्यांना फुले आल्याचेही आपण पाहतो आहोत. गीता प्रेसपासून सुरू झालेला हा प्रवास 2025 मध्ये हिंदू राष्ट्र येईल, अशी घोषणा करण्यापर्यंत पोहोचतो. हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदूंचे राष्ट्र, असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा त्याचा अर्थ अल्पसंख्याकांना दुय्यम ठरवण्याचा, दमन करण्याचा प्रयत्न, असाही होऊ शकतो. या सर्वांचा उच्चार आणि उल्लेख एवढ्याचसाठी करायचा, की संविधानाने दिलेले धर्मनिरपेक्षतेचे, समता, बंधुतेचे, समाजवादाचे, न्यायाचे आणि सामाजिक न्यायाचे आश्वासन नेमके कुठे आहे आणि त्याचे काय घडते आहे, हेही शोधण्याचा प्रयत्न करता येतो.
स्वातंत्र्याच्या काळात दरडोई उत्पन्न जसे वाढले तसे दरडोई कर्जही वाढले आहे. उत्पन्न वाढत जाणारा एक मूठभर उच्च मध्यम वर्ग तयार झाला. भांडवलशाहीने पूर्णपणे इथली व्यवस्था आपल्या पंजात घेतल्याच्या काळात श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत गेले. कोरोना महामारीच्या काळात ही गोष्ट आपण अधिक स्पष्टपणे पाहिली आहे. श्रीमंतांना विमानाद्वारे इंजेक्शन आणि गरीब कोणता तरी काढा पिऊन किंवा कोणत्या तरी अंधश्रद्धेला बळी ठरत जगण्याची लढाई लढत होते. एकीकडे मृतांवर सुरक्षितपणे अंत्यसंस्काराची सोय, तर दुसरीकडे गंगेच्या पात्रात तरंगणारी, रेल्वेच्या रुळावर दिसणारी बेवारस मढी, असे चित्रही आपण स्वातंत्र्याला पंचाहत्तरीच्या सुरू असलेल्या कळांच्या काळात आपण पाहिले आहे. एकीकडे दारिद्य्राची रेषा शेअर बाजार उसळावा तशी उसळत आहे, तर दुसरीकडे देशातील ऐंशी टक्के लोकांकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी देशातील पाच-सहा धनिकांच्या मुठीत आहे. तेच ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ म्हणतात किंवा ‘व्हाट अॅन आयडिया’ तरी म्हणतात. समाजवादाचे, समतेचे आश्वासन देणार्या देशातील हे चित्र आहे आणि समाजवाद संविधानामध्ये एक शोभेचा शब्द म्हणून घर करून बसलेला आपण पाहतोही आहोत. रोजीरोटीसाठी प्रचंड स्थलांतर सुरू आहे आणि त्यातून भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा असे वाद, भाषिक वाद रोज आपल्या पाचवीला पुजले जात आहेत. देशात आणि देशाबाहेरील, असे प्रचंड प्रमाणात स्थलांतर वाढत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणार्यांना चढत्या क्रमाने वेतन, तर बाहेरच्या म्हणजे मूठभरांच्या विकासाच्या वर्तुळाबाहेर राहिलेल्यांना उतरत्या क्रमांकाने वेतन किंवा कंत्राटी वेतन, असेही स्वातंत्र्यात घडते आहे. किमान वेतन, समान कामासाठी समान वेतन, नोकरीतील सुरक्षितता या सार्या गोष्टी बघता-बघता उडून गेल्या आणि बिनकॉलरचा, अदृश्य कामगार असा जन्माला आला हेही मी-मी म्हणणार्यांना कळले नाही. जगण्याच्या प्रत्येक अंगाला विषमतेने घोरपडीसारखा विळखा घातला आहे आणि संविधानातील उद्दिष्टे बाहेर पडणार नाहीत, अशी व्यवस्था तयार होते आहे. मूठभर लोकांच्या वाट्याला पोते भरून विकास, तर पोतेभर माणसाच्या वाट्याला मूठभर विकास, असे हे प्रकरण आहे.
देश विकास करतो की नाही, हे कसे ठरवायचे आहे. तो देश विकास करतो का ज्याला विषमतेने घेरले आहे, मूलतत्त्ववाद आणि धर्मवादाने घेरले आहे, आत्महत्यांनी घेरले आहे, रोजीरोटीच्या प्रश्नांनी घेरले आहे, जो शिवथाळी किंवा अम्मा थाळीची वाट बघतो आहे, जो दिल्लीतील कोणा कारभार्याच्या नावाने गॅस कधी येईल, मनिऑर्डर कधी येईल आणि कच्च्याबच्च्यांना चड्डी कधी येईल? माणसाला रोजीरोटीबरोबर स्वाभिमानही प्यारा असतो. त्याचे मन, मेंदू आणि मनगटाला काम हवे असते, निर्मितीसाठी प्रेरणा हव्या असतात आणि नेमके तेथेच स्वातंत्र्याने मुके होण्याचे ठरवलेले दिसते. राष्ट्र, स्वातंत्र्य या कल्पना सामान्य माणसाच्या मनात जन्माला येतात. राष्ट्र त्यांचे असते. राष्ट्राचे आणि तिथे जन्माला येणार्या संपत्तीचे मालक तेच असतात. आपल्याकडे उलटे घडताना दिसते आहे. आजमितीला देशाच्या मालकीचे काय आहे, असा प्रश्न कोणी तरी विचारावा. उत्तर काय मिळेल. उत्तर हेच असेल, की आपल्या मालकीचे काही नाही. समुद्रातील गॅस, जहाज, रेल्वे, विमान, रस्ते, शस्त्रे, शिक्षण, आरोग्य, नोकर्या हे सारेच्या सारे खासगी क्षेत्राच्या मालकीचे झाले आहे. स्वाभाविक जो मालक तोच संपत्तीचाही धनी होणार, तोच आपल्या हातातील धनशक्तीवर देश चालवणार, तोच सार्या गोष्टींचे कंत्राट घेणार हे स्वाभाविक होते. हे सारे घडत असताना कल्याणकारी राष्ट्र, सामाजिक न्याय, समता, जगण्याचा आणि तेही सन्मानाने जगण्याचा हक्क आदी गोष्टी कोठे तरी अंग चोरून बसतात किंवा या सर्वांना स्पेसलेस केले जाते, हे आपण पाहतो आहोत. खासगीकरणार्या प्रक्रियेत विकासाचे केंद्रीकरण होते आहे आणि भाकरी विरुद्ध पिज्झा, लोक विरुद्ध बहुराष्ट्रीय, असे युद्धही सुरू होते आहे. अर्थात, या सर्व आपल्याला दिसणार्या गोष्टी सर्वसामान्यांना दिसणार नाहीत. यासाठी एक पद्धतशीर व्यूहनीती आखली गेली आहे. माणसाच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलले आहेत. आत्मसन्मानाचे जीवन लाभावे हा प्राधान्यक्रम की अजान, भोंगा, देवाची घरे किंवा त्यांचे जीर्णोद्धार ही प्राधान्यक्रमे, असा पेच तयार केला गेला आहे. हा प्रेचप्रसंग दिवसेंदिवस तीव्र होत सारे राजकारण सिद्धांताऐवजी श्रद्धेभोवती एकवटले जात आहे किंवा यासाठीचे प्रयत्न होत आहेत. आता तर हे स्वातंत्र्य विरोधी पक्षापासून मुक्त करण्याचा प्रयत्न होतो आहे. न्यायालयांत चक्रावून टाकणारे निकाल लागत आहेत. चौकाचौकांत जाणीवपूर्वक संस्कृतीसंघर्ष किंवा धर्मसंघर्ष पेटवला जातोय. रोजीरोटीसाठी बाहेर पडणारा माणूस या संघर्षात अडकतो. ज्या स्वतंत्र देशात विरोधी पक्षच राहणार नसतील किंवा जे आहेत त्यांना सत्ताधार्या दरबारात मान झुकवण्यासाठी कोणते तरी आमिष दाखवले जाणार असेल किंवा कोणत्या तरी एजन्सीला त्यांच्या मागे लावले जात असेल, तर कशालाच काही अर्थ राहत नाही. एक अराजकसदृश किंवा एकाधिकारशाहीसदृश परिस्थिती निर्माण होण्याला वेळ लागणार नाही. आपल्याला स्वतंत्र भारत मिळाला. आपण स्वतंत्र भारतात राहतो आहोत ही आनंददायीच गोष्ट आहे; पण हे स्वातंत्र्य अर्थपूर्ण, परिणामकारक आणि लोककल्याणकारी किंवा कल्याणकारी राष्ट्राकडे वळवायचे असेल, तर देशाचे, स्वातंत्र्याचे मालक असलेल्या सामान्य माणसानेच जागल्याची भूमिका घ्यायला हवी. त्याच्या मालकीचे जे-जे आहे आणि संविधानाने दिले आहे त्याचे कोणी अपहरण करते आहे का, हे पाहायला हवे आणि लोकशाही ते मनुशाही हा उलटा प्रवास परवडणार नाही, हेही समजून घ्यायला हवे. स्वातंत्र्याचे वय मोजणे जेवढे आनंददायी तेवढेच हे स्वातंत्र्य आशयपूर्ण, मूल्यपूर्ण असणेही आवश्यकच आहे.
– संपादकीय
( द पीपल्स पोस्ट.)