भाजपाच्या सत्ता प्राप्तीची नवी पॉलिसी !!! – चेतन शिंदे.

भाजपाच्या सत्ता प्राप्तीची नवी पॉलिसी !!! – चेतन शिंदे.

भाजपाचे जातीय जनगणनेला विरोधी धोरण असताना नितीश कुमारांनी तेजस्वी यादव यांच्या जातीय जनगणनेची मागणी पूर्ण केली. नितीश कुमारांनी मोदी-शहांच्या बैठकींना टाळून स्वतंत्र निर्णय घेतले. यावरून भाजप गोंधळला होता, याच दरम्यान नितीश कुमारांनी भाजपला धडा शिकवण्याचा निर्णय घेऊन पुन्हा ‘राजद’ला सत्तेत सहभागी करून घेण्याची युक्ती लढवली. त्यात ते यशस्वी झाले आणि नव्या लढाईला आरंभ झाला. भाजपने महाराष्ट्रात राबवलेल्या सत्तेच्या गणिताची नवी पॉलिसी बिहारमध्ये निकामी ठरली. जमेल त्या मार्गानी सत्ता मिळवायची,टिकवायची याची ख्याती असलेल्या मोदी-शहांच्या राजकारणाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नख लावले आहे.

सत्ता पिपासू भाजपाची साथ सोडून बिहारमध्ये नितीश कुमार जे डी यु सोबत युती करून आठव्यांदा मुख्यमंत्री झाले. नितीश कुमार यांच्या भाजप सोडचिठ्ठीने विरोधी पक्षात जीव आला आहे. 2024 ची भाजपाची चिंता वाढली आहे. इडी , सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांचे काम वाढणार आहे.त्यांना बिहारचे दौरे करावे लागणार आहेत.भाजपाच्या गोदी मिडीयाला, व्हॉट्स ॲप, फेसबुक, इंस्टाग्राम विद्यापीठाच्या फेक विद्यार्थांना काम वाढणार आहे.नव्या नितीश कुमार सरकारच्या बदनामीचे ,आलेख,लेख, मीम्स,जाहिराती कराव्या लागणार आहेत.विरोधाचे,बदनामीचे, संभ्रमाचे लेखन करावे लागणार आहे.सारेच चिंतेत आहेत. भाजपची नेते मंडळी तर सर्वाधिक चिंतेत पडली आहे.महाराष्ट्राच्या सत्ता प्राप्तीचा आनंद लुटायच्या आधी बिहार भाजपच्या हातून निसटला. देशात सत्ताधारी पक्षाच्या सोबत जाण्याचे तपास यंत्रणांनी वातावरण निर्माण केलेलं असताना नितीश कुमार मात्र तपास यंत्रणांच्या नोटीसिला किंवा धमकीला भिख न घालता विरोधकांच्या रांगेत उभे राहिले आहेत. हे विशेष आहे.


सत्तेसाठी भाजप किती खालाच्या थराला जावू शकते? प्रबळ विरोधी पक्षाचे कसे अपहरण करता येऊ शकते, हे महाराष्ट्रात घडवलेल्या सत्तांतराने लक्षात येते. महाराष्ट्रात नैतिक व्यभिचार करून सत्तेत आलेला ‘भाजप’ बिहार मध्ये ‘सत्ते’ बाहेर फेकला गेलेला आहे.
महाराष्ट्रात जसे भाजप नेत्यांनी शिवसेनेच्या आमदारांना पैसे देऊन आणि ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सची भीती दाखवून फोडले, असे सांगितले. तसेच काहीसे आरोप बिहारमध्ये नितीश कुमार यांनी केले आहेत. महाराष्ट्रात भाजपने 105 आमदार असताना दुसऱ्या क्रमांकाची सत्ता मिळवली आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पेक्षा भाजपचे (नितीशकुमार 44) 33 आमदार अधिक असताना सत्ता गमावली. तपास यंत्रणांच्या मदतीची आणि सोबत राहून पाठीत खंजीर खुपसण्याची सवय बिहारमध्ये भाजपच्या अंगलट आली. भाजपच आपले आमदार फोडण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात आल्याबरोबर चाणाक्ष नितीश कुमार यांनी भाजपला जमिनीवर आपटले आहे.
भाजपला आपल्या राजकीय कौशल्याचा अंदाज न येवू देता राष्ट्रपतिपदाच्या ‘मुर्मूं’ना पाठिंबा दिला. दुसरीकडे, तेजस्वी यादवांसोबत इफ्तार पार्टी केली..

भाजपाचे जातीय जनगणनेला विरोधी धोरण असताना नितीश कुमारांनी तेजस्वी यादव यांच्या जातीय जनगणनेची मागणी पूर्ण केली. नितीश कुमारांनी मोदी-शहांच्या बैठकींना टाळून स्वतंत्र निर्णय घेतले. यावरून भाजप गोंधळला होता, याच दरम्यान नितीश कुमारांनी भाजपला धडा शिकवण्याचा निर्णय घेऊन पुन्हा ‘राजद’ला सत्तेत सहभागी करून घेण्याची युक्ती लढवली. त्यात ते यशस्वी झाले आणि नव्या लढाईला आरंभ झाला. भाजपने महाराष्ट्रात राबवलेल्या सत्तेच्या गणिताची नवी पॉलिसी बिहारमध्ये निकामी ठरली. जमेल त्या मार्गानी सत्ता मिळवायची,टिकवायची याची ख्याती असलेल्या मोदी-शहांच्या राजकारणाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नख लावले आहे.
ज्या राज्यात भाजप सत्तेत येऊ शकत नाही किंवा सत्तेत नाही, तिथे सत्ताधार्‍यांच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा रेटा लावून आपला जनाधार निर्माण करायचा. केंद्रीय सत्तेचा गैरवापर करून भाजपेत्तर सत्ताधारी पक्षांना अडचणीत आणण्याचे षडयंत्र रचायचे. याला प्रादेशिक पक्ष जर पुरून उरत असतील, तर मग त्यांचे आमदार पैसे देऊन, भीती दाखवून फोडायचे.मुख्य म्होरक्याला महत्त्वाचे पद देण्याचे कबूल करून दुसर्‍या क्रमांकाचे पद मिळवायचे व कसेही करून सत्तेत राहायचे, या दृष्टीने काम सुरू केले आहे. निवडून आलेल्या आमदारांच्या बळावर मूळ पक्षाचे अपहरण करण्यासाठी म्होरक्यांना सोबत घेऊन पक्षाचेच अपहरण करायचे, हा नवा प्रयोग भाजपने राजकारणात केला आहे. महाराष्ट्र त्यांची प्रयोगशाळा ठरला आहे. सोबत राहून सत्ता मिळवायची आणि सोबतच्या पक्षनेतृत्वाला गाफील ठेवून त्यांचा पक्षच हायजॅक करायचा, हा नवा खेळ भाजपने खेळण्यास सुरुवात केली आहे. चाणाक्ष नितीश कुमारांनी हा खेळ तात्काळ हेरून भाजपवर डाव उलटवला. यानिमित्ताने त्यांनी भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपचा उधळलेला घोडा भेडवण्याचे काम 2017 च्या तुलनेत उत्तरप्रदेशात झालेल्या 2022 च्या निवडणुकीत अखीलेश यादवांनी केला. 2024 च्या निवडणुकीत बिहारमध्ये नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि काँग्रेससह इतर लहान-मोठे गट तोच घोडा अडवण्याचे काम करतील काय? याची चिंता भाजपला लागली आहे. महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस एकत्र लढली, तर 48 लोकसभा सीट असणार्‍या राज्यात भाजप त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जागा जिंकू शकणार नाही, तेच बिहारमध्ये घडेल. भाजपला ते नको आहे. 88 लोकसभा सीट असणारी ही दोन्ही राज्य भाजपच्या 2024 च्या स्वप्न भंगासाठी निर्णायक ठरू शकतात. उत्तरप्रदेश ,पंजाब, दिल्ली झारखंडसह दक्षिण भारतात भाजपला अडवणे सोपे जाईल. आज देशात शतप्रतीशत भाजप, 350 अधिक जागा जिंकण्याचे चित्र रंगवणारा भाजप मस्तवालपणे वागत आहे.तो विसरत आहे; ज्या काळात पंडित नेहरू, पुढे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा जलवा देशात होता. त्याकाळी बिहार, यूपीमधील समाजवाद्यांनी, लोहीयावाद्यांनी त्यांच्यासोबत वैचारिक लढाई लढून काँग्रेसला जमिनीवर जोरात आदळले होते. तसेच काहीसे मोदी-शाह या जोडगोळीला जमिनीवर आदळण्याच्या दृष्टीने नितीश कुमारांनी नवा एल्गार आपल्या कृतीने करून दाखवला आहे.
भाजपने 2024 ची चिंता करावी, असे नितीश कुमारांनी यावेळी जाहीर केले आहे. यामुळे भाजपची चिंता वाढली असून विरोधी पक्षात जीव आला आहे. लढाईआधीच पराभूत मानसिकतेत गेलेल्या विरोधकांना नितीश कुमार यांच्या खेळीने बळ मिळाले आहे. देशात सर्वत्र विरोधकांच्या बँक खात्यांचा, घरातील कपाटांचा, पक्ष निधीचा तपास करणार्‍या यंत्रणा आपल्याकडे येऊ शकतात, याची पुरेपूर कल्पना नितीश कुमारांना आहे. तरीही त्यांनी भाजपला अंगावर घेतले आहे.दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेल्या तेजस्वी यादवांना तर जेलमध्ये पाठवण्याचे भाजप नेते सुशीलकुमार मोदींनी जाहीर केले आहे. तरीही तेजस्वी यादव आपल्या पित्याप्रमाणे भाजपला अंगावर घेण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. नितीश कुमारांना भाजपने सन्मान दिला नाही. तेजस्वींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन नितीश कुमारांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. आपल्या कृतीतून त्यांना सन्मान दिल्याचे जाहीर केले. रोजगार, नोकरी देणार असल्याचे सांगितले आणि नितीश कुमारांच्या पक्षाची दोस्ती/युती तुटायची नाही, असा संकेत शपथ विधीतच दिला.या निमित्ताने कुमार-यादवांच्या जोडीमुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे चित्र बदलण्यास मोठा हातभार मिळणार आहे. अशा वेळी भाजपच्या विरोधी पक्षांनी वेगवेगळे लढण्यापेक्षा विचारपूर्वक लढलेले राष्ट्रहिताचे ठरेल. अहंकार बाजूला सारून लढावे लागेल. या जाणिवेतून प्रयत्न करावे लागतील. जर सर्वच विरोधक एका सुरात भाजपवर सत्तेच्या गैरवापराचे, लोकशाही धोक्यात टाकली जात असल्याचे, भाजपचे सरकार गरीबांच्या-वंचितांच्या-शेतकर्‍यांच्या-तरुणांच्या-बेरोजगारांच्या-व्यापार्‍यांच्या विरोधातले आहे, असे सांगत असतील तर त्यांनी, हे सरकार बदलण्यासाठी एका सुरात भाजपच्या विरोधात लढावे लागेल. जर सर्वांचे लक्ष भाजपला सत्तेपासून दूर करण्याचे असेल, तर भाजपविरोधात लढण्याचा एक मार्गदेखील स्वीकारावा लागेल.
भाजप कितीही मोठ्या अविर्भावात, आपणच जिंकू असे सांगत असला, तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. म्हणूनच तोडफोड करून, तपास यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सतत कुठे ना-कुठे सुरू आहे. ज्या शिवसेनेच्या मांडीवर बसून भाजपने आपले बस्तान वाढवले, ती शिवसेनाच फोडण्याचे, संपवण्याचे काम भाजपने सुरू केले आहे. महाराष्ट्र भाजपचे नेते हे कबूल करत नसले, तरी बिहारचे भाजपचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या सुशीलकुमार मोदींनी शिवसेना भाजपनेच फोडल्याचे कबूल केले आहे. लोक कोविडमध्ये जीवाच्या आकांताने श्‍वासाची मागणी करायचे, तेव्हा मध्यप्रदेशात भाजपने कमलनाथ सरकारला धमकावून, काँग्रेसची तोडफोड करून सत्ता मिळवली. कर्नाटकात काँग्रेस, जनता दल यांचे कुमार स्वामी सरकार पाडून भाजप सरकार स्थापन केले. उत्तराखंड आणि अरूणाचल प्रदेशात चुकीच्या पद्धतीने राष्ट्रपती शासन लादले. सिक्कीममध्ये 25 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या पवन कुमार चामलिंग यांची सत्ता घालवली. जिथे भाजप निवडणूक हरते, तिथे तपास यंत्रणा आणि पैसा यांच्या बळावर सत्ता मिळवली जाते. सोईनुसार नैतिकता शिकवली जाते. प्रवक्ते भाषण देतात, खोटे बोलतात आणि गोंधळ, संभ्रम निर्माण करतात. जे नेेते भाजपात नसतात, तेव्हा ते आरोपी, भ्रष्टाचारी असतात. भाजपात आले, की देशभक्त, राष्ट्रभक्त, समाजसेवक ठरतात. लोकांनी नाकारलेले असतानांदेखील ‘लोकमता’चा अवमान करून सत्ता मिळवतात, या खेळात मोदी-शाह पडद्याच्या मागे राहतात. गोदी मीडिया त्यांच्या यशाच्या कहाण्या रंगवून पुढच्या निवडणुकीत रंग भरतात. ते कसे यशस्वी पुरुष आहेत, त्यांच्या लेखी पराभव नाही, असा आभास निर्माण करतात. मात्र, तो आभास नितीन कुमार आणि तेजस्वी यादवांनी खोटा ठरवला. मोदी-शाहांना त्यांनी जुमानले नाही. अमित शहा यांनी पडद्यामागे बिहार मध्ये सर्व शक्ती पणाला लावली तरी, बिहारच्या लोहीयांच्या समाजवादाच्या शाळेत तयार झालेल्या नेत्यांनी नव्या लढाईला सुरुवात केली आहे. 2024 च्या निवडणुकीचे चित्र बदलण्यासाठी लढा पुकारला आहे, यात भारतात हिटलरचा जन्म रोखण्यात त्यांना यश मिळेल.

चेतन शिंदे,

संपादक, द पीपल्स पोस्ट, मुंबई.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.