चिनी कम पत्ती जादा – उत्तम कांबळे

चिनी कम पत्ती जादा – उत्तम कांबळे

भारतीय दलितांच्या जीवनात प्रकट झालेली आणि ज्वालामुखीप्रमाणे भडकलेली पँथर एक ऐतिहासिक घटना आहे. या घटनेने दलितांना आत्मसन्मानासाठी पडेल त्या लढाया करायला शिकवले. जनतेत ऐक्य आणि धग निर्माण करू पाहणार्‍या नेत्यांमध्येच बेकी झाली आणि चित्ता मवाळ, निष्प्रभ झाला. लोक अजूनही या तेजस्वी घटनेचे स्मरण करत असतात. त्यालाही आता पन्नास वर्षे होत आहेत. या स्मरण साखळीतून नवे काही उगवेल का, हा प्रश्‍नही जागवला जावा.

महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे बंड म्हणजे दलित पँथरची स्थापना होय. समाजजीवनाला हादरवून सोडणारी आणि नवे काही घडू शकते आहे, घडते आहे असा संदेश देऊ पाहणारी, संसद आणि संसदबाह्य लढायांना मोठं टॉनिक देऊ पाहणारी पँथर स्वतः मात्र अल्पकाळच जगली. अडीच-तीन वर्षेच. या काळात तिने फाटक्या-तुटक्या माणसाला रस्त्यावर येऊन लढायला शिकवले. अन्यायाला प्रतिकार करायला शिकवले, आत्मसन्मान मुठीत घेऊन फिरायला शिकवले, राजकारणातील तत्कालिन मावळत्या आणि गंज चढलेल्या दलित राजकारण्यांना घरी बसवले, नवा सूर्य येतोय असा एल्गार पुकारला. साहित्यात विद्रोह पेरला. साहित्याची परिभाषा बदलली. संस्कृतीला म्हणजे विषमताच बाळंत होणार्‍या संस्कृतिला भरचौकात विवस्त्र केले. एक मोठा विद्रोह म्हणजे पँथर! एका हातात लेखणी आणि दुसर्‍या हातात आंदोलनाची आयुधे घेऊन पँथर रस्त्यावर उतरली.  मी मी म्हणणार्‍यांना तिने भूरळ घातली आणि व्यवस्थेतील सत्तेच्या दलालांना धडकी भरवली. अजून काही तरी होईल, निळी पहाट जन्मास येईल, अशी स्वप्ने सामान्य माणसाला पडू लागली. डोळ्या समोरची स्वप्ने गडद होण्याच्या क्षणालाच पँथरला तडे गेले. फुटीचा रोग जो डॉ. बाबासाहेबांच्या नंतरच्या आरपीआय राजकारणाला लागला होता, त्याचा संसर्ग पँथरलाही झाला. एका पाठोपाठ एक फुटी पडत गेल्या. एकाचे दोन, दोन आणि दोनाचे चार असे अनेक तुकड्यांत ती विभागली. प्रत्येक तुकडा स्वतःलाच पँथरचा जन्मदाता समजू लागला आणि दुसर्‍याला खोडू लागला. या खोडाखोडीने फुटीचे राजकारणच शिल्लक राहिले. मूळ पॅथरमधील धगधगता विस्तव हळूहळू राखेचे रूप घेऊ लागला. आता या राखेचे विस्तवात रूपांतर व्हावे असे सर्वांनाच वाटते; पण वाटण्याचा उपयोग काय? स्वप्न आणि वास्तव यात फुटीचे काटेरी राजकारण, परस्परांना संपवू पाहणारा अहंकार आणि चतकोरभर सत्तेसाठी कुणाचीही गुलामी पत्करण्यास तयार असणारा काही घटक उभा आहे. चिनी भिंतीप्रमाणे हे सारे उभे आहे. आता भिंत हलवण्याची जोखीम नवी पिढी घेणार काय, या प्रश्‍नाभोवती घोडे अडले आहे. शेपूट पिरगळल्यावर बैल हलतो; पण घोड्याचे काय करायचे? पँथरच्या स्थापनेत विद्रोहाची उर्मी प्रचंड होती; पण या विद्रोहाला पुढे चळवळीचे रूप देण्यासाठी आवश्यक ऐक्य नव्हते. नेत्यांचा परस्परांवर विश्‍वास नव्हता. कोण मोठा, कोण छोटा, अशा भावना होत्या.
पँथरच्या स्थापनेपासूनच हे सारे सुरू होते. कुणाचा चेहरा लाल म्हणजे कोण लाल भाई? (लालभाई हा शब्द दादासाहेब गायकवाड यांना उद्देशून खूप पूर्वी वापरला गेला होता आणि वामनदादांनी आपल्या एका गीतात तसा उल्लेख केला होता. कारण त्यांनीही गटबदल केला होता. डाव्यांबरोबर सहकार्य करणार्‍या दादासाहेबांना उद्देशूनच त्यांनी, म्हातारपणी नार फसली लालजीच्या घरात घुसली, असे लिहिले होते.) कोण निळाभाई, कोण खादीभाई याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. निळ्या रंगाच्या भोवती कसलीच सावली येणार नाही याची काळजी घेणारा गट, याउलट साम्यवादाने जग बदलून टाकलंय याची खात्री सांगत, एकाच वेळी जय भीम आणि लाल सलाम म्हणण्याचा प्रयत्न करणारा एक गट, समाजवाद्यांच्या छावणीत घुसून सदाशिव पेठेशी नाते सांगत, मी सर्वांचाच आहे असे सांगणारा एक गट आणि इतरही काही गट यांच्या संघर्ष धुमसू लागला. परिणाम ऐक्याचा, एकात्मतेचा, परस्परांना समजून घेण्याचा आणि आदराचा गोडवा म्हणजेच चिनी, म्हणजेच साखर कमी होऊ लागली आणि अंतर्गत मतभेदाची, कडवट वादाची चहापूड म्हणजे पत्ती वाढत गेली. परिणाम या पत्तीने सतत आपलाच प्रभाव दाखवला. मलबार्‍यांच्या हॉटेलात जा, वसतिगृहातील कॅन्टिनमध्ये जा किंवा अन्य कोठेही जा, चहातील पत्ती प्रभावी ठरत होती. तिने असे काही केले, की पँथर दुभंगली, दुभंगत राहिली आणि या दुभंगल्या आठवणींनी पन्नाशीत प्रवेश केला.


पँथरच्या जन्मापूर्वी काय घडत होते. विशेषतः एकूण समाज आणि दलित राजकारणात काय घडत होते, हे पाहिल्याशिवाय पँथरच्या जन्मकळा आणि त्यातून अवकाश मिठीत घेणारा विद्रोह कसा बाहेर पडला, हे नीट समजणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या महापरिनिर्वाणाच्या तीस-पस्तीस दिवस अगोदर म्हणजेच 20 ऑक्टोबर 1956 ला दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानी एक बैठक होऊन शेकाफे (शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन) बरखास्त करून आरपीआय स्थापन करण्याची चर्चा केली होती. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रबुद्ध भारताच्या 1 ऑक्टोबर 1957 च्या अंकात आरपीआयच्या स्थापनेबाबत, त्याच्या भूमिकेबाबत बाबासाहेबांनी लिहिलेले सुमारे 21 कलमी खुले पत्र प्रसिद्ध करण्यात आले. या पत्राचा अनुवाद दादासाहेब रूपवते यांनी केला होता. ते कार्यकारी संपादक होते. पुढे असे पत्र अनुवादित करणारे रूपवतेच काँग्रेसमध्ये जाऊन राज्य मंत्री झाले. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 25 दिवसांनी दलित नेत्यांची एक बैठक नगरमध्ये झाली आणि त्यात पक्षाचा नेता कोण व्हावा, याविषयी एकमत न झाल्याने अध्यक्षीय मंडळ नेमण्यात आले. म्हणजे मंडळातील प्रत्येक जण अध्यक्ष होता. असाच प्रयोग पुढे काही वर्षांनी अल्पकाळ टिकलेल्या दलित ऐक्याच्या वेळीही झाला होता, हे सर्वश्रूत आहे. 3 ऑक्टोबर 1957 ला म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर सुमारे एक वर्षांनी आरपीआयची अधिकृत घोषणा झाली आणि एन. शिवराज अध्यक्ष झाले. अपवाद वगळता अन्य कोणी दलित समाजातील या पक्षात महत्त्वाच्या पदावर नव्हते. याचा अर्थ बाबासाहेबांच्या स्वप्नातील, त्यांच्या खुल्या पत्रातील पक्ष अस्तित्वात आला नव्हता. आरपीआयविषयी बाबासाहेबांनी ज्या अनेक व्यक्ती आणि गटांशी चर्चा केली होती, त्यांचे प्रतिनिधी कोणी नव्हते. 1957 ते 1959 मध्ये आरपीआयने अनेक आंदोलने केली. दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली भूमिहिनांचे आंदोलन झाले होते. याच दरम्यान दादासाहेब व डावे यांची सलगी बी.सी. कांबळे यांना आवडली नाही. दीक्षाभूमी ठरलेल्या नागपूरमध्ये 14 मे 1959 ला त्यांनी आरपीआयमधून बाहेर पडून दुरूस्त गट स्थापन केला आणि मूळ म्हणजे शिवराज यांच्या अध्यक्षतेखालील पक्षाला नादुरूस्त गट ठरवले. पुढे धोतरे आणि पॅन्ट-टायवाले अशा उपाध्याही दोन्ही गटांना देण्यात आल्या. 1962 च्या 28 ऑक्टोबरमध्ये आर.डी. भंडारे यांनी स्वतःचा गट काढला. 1967 ला दादासाहेबांनी काँग्रेसशी युती केली. ‘बाबासाहेब तुमची लेकरे काँग्रेसच्या वळचणीला नेणार नाही’, असे उद्गार त्यांनी पूर्वी काढले होते. इतिहासात काही गोष्टींची पुनरावृत्ती होते. इथेही अशी झालीच. दादासाहेबांना बी.सी. कांबळे यांनी तर पँथरचे एक संस्थापक नामदेव ढसाळ यांना राजा ढाले यांनी कम्युनिस्ट ठरवले होते. मुळात ढसाळ साम्यवादीप्रेमी होते हा भाग वेगळा. गवई आणि खोब्रागडे यांच्यातील अंतर वाढत गेल्याने या दोघांनीही नागपूरमध्ये अधिवेशन घेऊन आपापले गट काढले, ते शेवटपर्यंत टिकवले. दादासाहेब आणि काँगे्रसच्या युतीचा परिणाम म्हणून किंवा बक्षिस म्हणून गवई आणि खोब्रागडे अनुक्रमे विधान परिषद आणि राज्यसभेत उपसभापती झाले होते. पुढे गवई आणि शांताबाई दाणी यांच्यातही वाद झाला. शातांबाईंनी दादासाहेबांच्या नावाने गट काढला. दादासाहेबांच्या पत्नी गीताबाईंनीही आपल्या पतीच्या नावाने गट काढला. अजूनही वेगवेगळ्या प्रदेशात गट निघत गेले. निपाणी भागात दत्ता कट्टींचा गट निघाला. मराठवाडा आणि विदर्भात आणखी काही गट निघाले. काही डाव्यांशी, काही काँग्रेसशी, काही समाजवाद्यांशी जोडून घेत होते. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेत 9 मार्च 1973 ला शिवसेनेशी आरपीआयने युती केली त्यात आरपीआयचा सपशेल पराभव झाला. युती तुटली. काही जण जनता पक्षात गेले. असे करत करत आरपीआय म्हणजे त्याचे तुकडे इतके क्षीण होत गेले, की 1972 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना फक्त एक जागा मिळाली. एवढे असूनही वेगवेगळ्या पक्षांशी आणि त्यातही काँग्रेसशी युती करणार्‍या गटा-तटांची संख्या काही कमी होत नव्हती. दलितांच्या राजकीय शक्तीचा क्षय होत होता. पुढे दलित पँथरची स्थापना करणारे सर्व नेते या काळात तरूण होते. त्यांना राजकारण आणि समाजाचे भान आले होते; पण ते प्रत्यक्ष काही करू शकत नव्हते.
डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली लाखो दलितांनी त्यातही पूर्वीच्या महार समाजाने मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले. धर्मांतरामुळे त्यांच्या कपाळावरील अस्पृश्यतेचा कलंक पुसला गेला. अस्पृश्यता हा आमच्या आत्म्यावरील कलंक आहे, असे बाबासाहेब म्हणत होते. अस्पृश्यांना धर्मांतरामुळे मोठा आत्मसन्मान मिळाला. त्यांनी बलुतेदारी पूर्ण फेकून दिली. हिंदू देवदेवता फेकून दिल्या. धम्माचे गोड, ऊर्जावर्धक वारे प्यालेला समाज आता स्वतःची वेगळी ओळख सांगू लागला. त्याने गावकी नाकारल्याचा, तो स्वाभिमानी झाल्याचा, स्वावलंबी होण्याच्या त्यांच्या प्रक्रियेचा गावगाड्यातील सर्वच सवर्णांना राग येऊ लागला. ते त्याचा द्वेष करू लागले. त्यातून गावोगाव नवबुद्धांवर हल्ले सुरू झाले. या हल्ल्याचे स्वरूप भीषण, हिंसक होते. घरे जाळणे, खून करणे, सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास बंदी करणे, पाण्यात विष्ठा टाकणे, महिलांवर बलात्कार करणे, बहिष्कृत करणे आदी अनेक मार्गांनी त्यांची कोंडी केली जात होती. रोज अशा घटना घडत होत्या आणि त्यांना प्रतिकार करणार्‍या राजकीय शक्तींचे विभाजन झाले होते. अनेकदा खेड्यापाड्यातील लोकांच्या मनात एकाकीपणाची भावना तयार होती. युती करून मिळवलेल्या सत्तेचाही फार उपयोग होत नव्हता. कायदा, घटना, सवलती वगैरे गोष्टी जणू काही मूक बनल्या होत्या. विद्यापीठ नामांतराच्या विषयाने केवळ मराठवाड्यातच नव्हे, तर महाराष्ट्रभर दलितांवर हल्ले झाले, खून झाले. दलितांच्या मनात प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली होती. राजकारणात त्यांचा आवाज नव्हता आणि समाजकारणातही तो क्षीण झाला होता. जो काही आवाज उठायचा तो तरूण मंडळींच्या साहित्यातून; पण या साहित्यिकांचेही मार्क्सवादी-आंबेडकरवादी, गांधीवादी, समाजवादी असे विभाजन झाले होते. कोणी तरी येईल आणि आपली असुरक्षितता संपवेल, कोणी तरी येईल आणि अन्यायाला वाचा फोडेल, कोणी तरी येईल आणि ठोशास ठोसा देईल अशा प्रकारच्या भावना सामान्य जनतेच्या मनात तयार होत होत्या. नव्यासाठी जणू काही एक पोकळीही तयार होत होती आणि ही पोकळी तरण्याबांड पोरांनी, लिहित्या वाचत्या पोरांनी, अन्यायाला-विषम व्यवस्थेला नकार देऊ पाहणार्‍या काहींनी भरून काढली. त्यातून एक बंड बाहेर पडले. एक ज्वालामुखी बाहेर पडला, विद्रोहाचा धारदार डोंगर तयार झाला, त्याचे नाव दलित पँथर!

दलित पँथरच्या सभेतील एक छायाचित्र.


दलित पँथरने अल्पावधीतच विद्रोहाची धग महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर पसरवली. पँथर असे नाव घेतल्याने जगातल्या अन्य पँथरमध्येही चर्चा सुरू झाली. अन्याय सहन करणार नाही, तर प्रतिकार करणार, तुमच्या परंपरा आणि कुणा वरिष्ठांची रखेल बनलेल्या किंवा बनवल्या गेलेल्या संस्कृत्यांना आम्ही धिक्कारणार, बेगडी असणारे तुमचे स्वातंत्र्य आम्ही नाकारणार, तुमची सदाशिवपेठी भाषा नाकारणार आणि विद्रोहाचे सुरूंग पोटात घेणारी भाषा तयार करणार, तुमच्या विषम संस्कृतीच्या गर्भाशयाची चिरफाड करणार, असा उद्रेक बाहेर पडायला सुरुवात झाली. खरे म्हणजे, या सर्व गोष्टींना तशी ठाम दिशा नव्हती. हे सारे कुणी आणि कोणती विचारधारा वापरून करायचे, यावरही लवकरच मतभेद सुरू झाले. कोणी कुणाला विचारून सभा घेतली, कोणत्या सभेला कोण गैरहजर राहिले, कोणी आपसात कोणावर आणि का टीका केली, कोण कोणाच्या वळचणीला जातेय यावरही मतभेद सुरू झाले. मुख्य मुद्दा मार्क्स आणि आंबेडकरी विचारधारेचा होता. हे सर्व एकीकडे चालू असतानाच पँथरच्या जन्मामुळे हादरलेली राजकीय व्यवस्था आणि त्यातही शिवसेना काही स्वस्थ बसणार नव्हती किंवा बसलेली नव्हती. 1973 मध्ये शिवशक्ती-भीमशक्तीचा केलेला प्रयोग मागे पडला होता. पुढे अशा प्रयोगाची घोषणा रामदास आठवले यांनी मुंबई विद्यापीठातल्या भाषणात केली होती. निळ्या पाखरांना पकडण्यासाठी, त्यांना गळाला लावण्यासाठी व्यवस्थेने नवनवे डावपेच रचलेलच होते. काही पाखरे फसतही होती. एकीकडे पँथरने रान पेटवले होते; पण दुसरीकडे काही धूर त्यांच्या ऐक्यातही धुसत होता. अहंकाराचा टकराव सुरू होता. सत्ता संघर्ष इथेही उसळलाच. 1975 च्या आणीबाणीनंतर देशातील राजकारणही बदलले. बलवान बनलेल्या शिवसेनेकडे, काँग्रेसकडे, छुप्या पद्धतीने आणि नंतर उघडपणे आकर्षित होणारी काही निळी पाखरे तयार झाली. परस्परांना पँथरमधून काढून टाकण्याचे प्रयोग सुरू झाले. जसे जुन्या आरपीआयमध्ये सुरू झाले. तीन-चार वर्षांत असे चित्र तयार झाले, की क्रांतिकारी नाव धारण करणारी पँथर जेवढ्या मोठ्या प्रमाणात दुभंगली तेवढ्याच प्रमाणात त्यांची शक्ती कमी होत राहिली. राजकारणात तिने आपला ठसा उमटवला नाही. सातत्याने परस्परविरोधी संघर्षामुळे जनतेची विश्‍वासार्हता कमी होत गेली.
पँथर सोडून काहींनी आपल्या गटाच्या नावाने आरपीआय हा आणखी एक तुकडा जन्माला घातला. शिवसेना या हिंदुत्ववाद्यांबरोबर लढाया करत करत काही त्यांच्याशी तडजोड करून बसले. काही साहित्यिक त्यांच्या गळाला लागले. काहींनी स्वतःहून आपल्या जिभेत गळ खूपसून घेतला. केवळ नरेंद्र जाधवच नव्हे, तर अजून काही नावे सांगता येतील. ढसाळही त्यापैकी एक. आणखी गम्मत म्हणजे, हिंदुत्वाच्या कळपात खूप आधी गेलेले रामदास आणि अर्जूनही पँथरची पन्नाशी करण्यात आता पुढे आले आहेत. नामदेव ढसाळांच्या पँथरचाही दरवर्षी वर्धापन दिन व्हायचा. नामदेव, ज.वि., राज ढाले आणि अर्जून यांनी पँथरविषयी असं काही लिहून ठेवलंय, की मूळ अध्यक्ष कोण, याचे उत्तर कोणा शहाण्यालाही मिळू नये. पँथर अजून काही काळ एकत्रित आणि प्रभावीपणे तग धरून राहिली असती, तर दलितांचे राजकारण अजून काही तरी वेगळे दिसू शकले असते. खरे म्हणजे, आताही एक पोकळीच निर्माण झाली आहे; पण त्याच वेळी विश्‍वासाने खांदा टेकवावा अशी जनतेची ठिकाणे कमी होत आहेत. लोक विश्‍वासाच्याही शोधात आहेत.
‘पँथरची पन्नाशी’ हा तसा लोकांच्या आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. या अल्प चळवळीत सामान्य कार्यकर्त्यांनी वर्णन करता येणार नाही इतका त्याग केला आहे. व्यवस्था, पोलिस आदींच्या छळाला अनेक कार्यकर्ते बळी पडले आहेत. पँथर म्हणजे जणू काही एक क्रांती आहे, या भावनेने कार्यकर्त्यांनी काम केले. गावोगावचे देव हद्दपार करण्यात, अन्याया विरोधात मोर्चे काढण्यात, लाठ्या-काठ्या खाण्यात आणि या सर्वांचे साहित्य करण्यात कार्यकर्ते आघाडीवर होते. संघटनेत फूट पडली; पण कार्यकर्त्यांनी संघर्षात फूट पडू दिली नाही. लढण्याची नवी धमक, नवी ऊर्जा घेऊन ते रस्त्यावर संघर्ष करत होते. शिवसेनेसारख्या बलाढ्य आणि सत्ताधार्‍यांचा छुपा पाठिंबा असणार्‍या संघटनेविरुद्ध पँथरच दोन हात करू शकली. हिंदुत्ववाद्यांविरुद्धची लढाई आणखी तीव्र करण्यासाठी नेते कार्यकर्त्यांना चेतवत होते. कार्यकर्ते पेटत होते. पुढे सत्तेलाही अधिक महत्त्व आले. सत्ता मिळवण्यासाठी, तिच्या सावलीत जाण्यासाठी आठवलेंनी काँग्रेस आघाडी ते भाजप युती, असा थेट प्रवास केला. ढसाळ, डांगळे शिवसेनेबरोबर, ढाले भारिप-बहुजन आघाडी बरोबर, अरूण कांबळे जनता दलाबरोबर, ज.वि. ही भारिप बरोबर गेले. जय भीमच्या घोषणा देत हे वेगवेगळ्या पक्षात गेले. पुढे आठवले, ढसाळ, डांगळे, अरूण यांनी स्वतःच्या वेगळ्या संघटना काढल्या. त्यांचे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या बरोबर गेले. पँथर ते भाजप-शिवसेना-काँग्रेस असा प्रवास करताना, नव्या अवतारात जाताना कार्यकर्त्यांना काय वाटेल किंवा वाटले असावे, याचा विचार कोणी केला असावा का? डरकाळी मारणारा चित्ता ते सुंदर, नाजूक पाकळ्यांचे कमळ या प्रवासाचे लोकांना काय वाटले असेल?

आक्रमक असलेला चित्ता फुटीच्या राजकारणामुळे मवाळ झाला.


महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता पन्नास वर्षे आपल्या मनात पँथरचे स्मरण जीवंत ठेऊन आहे ते एवढ्यासाठीच की जनतेला आशा आहे, की कुठून तरी निर्भेळपणे जय भीमचा घोष येईल… जेव्हा जनतेच्याच मनात अशी स्वप्ने उगवतात तेव्हाच काही तरी घडण्याची शक्यता असते. एका धगधगत्या घटनेचे सामान्य माणसाला अप्रूप आहे आणि ती दीर्घायुषी झाली नाही याचे दुःखही आहे. ‘चिनी कम पत्ती जादा’ असे घडायला नको होते. याच पार्श्‍वभूमीवर आता ‘चिनी जादा आणि पत्ती कमी’ असे काही तरी घडेल का, असा प्रश्‍न जनतेच्या ओठावर आहे. धर्म, सत्ता आणि भांडवलशाहीने पुन्हा एकदा आवळलेल्या मगरमिठीत घुसमटून जाणार्‍या माणसाच्या ओठावर असा प्रश्‍न येणेही स्वाभाविक आहे.

– उत्तम कांबळे

(लेखक अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आणि सकाळ माध्यम समूहाचे माजी संचालक संपादक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.