आंबेडकरवादी जाणिवांचा ऊर्जास्रोत : गनीम – प्रा. डॉ. शंकर विभुते

आंबेडकरवादी जाणिवांचा ऊर्जास्रोत : गनीम –  प्रा. डॉ. शंकर विभुते

‘वाद’ हा शब्द अभिधा (वाचार्थ) अर्थाने नाही तर ती तत्त्वज्ञानातील एक संकल्पना आहे. राष्ट्रवाद, जीवनवाद, कलावाद, मानवतावाद… हा जसा एक विचार आहे तसा मानवमुक्ती, समता व विश्‍वबंधुत्व, जाती-धर्मविरहित माणूस म्हणून, जगण्याचा मार्ग म्हणून आंबेडकरवादी विचारधारेकडे पाहिले जाते. कधी-कधी काही पारंपरिक संकल्पना त्या-त्या सांस्कृतिक मानसिकतेतून उदयास आलेल्या असतात. त्या शुद्ध हेतूने प्रेरित नसतात. त्या संकल्पना जोपासण्यामध्ये, टिकवून ठेवण्यामध्ये व त्यास प्रवाहित ठेवण्यामध्ये एक छुपा अजेंडा असतो.‘दलित साहित्य’ या संकल्पनेकडे या अर्थाने पाहता येईल. साधारणतः सामान्य माणूस किंवा वाचकांना यातील मर्मभेद सहजपणे लक्षात येत नाही; पण विचारवंत, अभ्यासक, प्रतिभावंत, संशोधक अशा बुरसटलेल्या संकल्पनेला छेद देऊन कालानुरूप नव्या संकल्पना उदयास आणतात. या संकल्पना मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ‘आंबेडकरवाद’ ही संकल्पना या गरजेतून, मानवी मूल्यांच्या पेरणीतून उदयास आली आहे. ही तात्त्विक संकल्पना ललित साहित्यातून व्यक्त करणे अतिशय कठीण कार्य आहे; पण ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंग्रजी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले व मराठीतील एक प्रभावशाली कवी डॉ. उत्तम अंभोरे यांनी ‘गनीम’ कवितासंग्रहाच्या निमित्ताने यशस्वी व जबाबदारीने लीलया पेलली आहे.


कविता हा अतिशय गांभीर्याने घेण्याचा विषय


‘पत्ता बदलत जाणारा गनीम’ व ‘धगीवरची अक्षरं’ या दोन कवितासंग्रहांतून मराठी वाचकांना कवी उत्तर अंभोरे यांची ओळख यापूर्वीच झालेली आहे. नुकताच त्यांचा ‘गनीम’ हा नवीन कवितासंग्रह वाचकांच्या हाती आला आहे. मानवमुक्तीच्या विचाराला शिरोधार्य मानणारी, कुठल्याही अंधविश्‍वासाला, श्रद्धेला बळी न पडता विवेक बुद्धीचे सतेज ज्ञान समाजात प्रवाहित करणारी, स्वयंप्रकाशित होण्यासाठी मर्म सांगणारी ही कविता आहे. या कवितासंग्रहाविषयी मनोगतात कवी लिहितात, जे वाटते ते सगळे शब्दांत बांधता येत नाही. काव्यात बांधण्याची कदाचित माझ्यात कुवतही नाही; पण जेवढे कळते तेवढेसुद्धा सांगणे महत्त्वाचे वाटले, म्हणून हा प्रयत्न! यातील बर्‍याचशा कविता स्वपरीक्षणाच्या, टोकदार वास्तवाच्या नि ढोंगीपणाचे बुरखे फाडणार्‍या दिसतील. जे आहे, जे कळले ते मांडत गेलो. स्वतःशीही भांडत गेलो. कविता हा अतिशय गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. या भूमिकेतून हे लेखन झालेले आहे.


कवितासंग्रहाचे बलस्थान


सौरव प्रकाशन औरंगाबादने प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह मुखपृष्ठापासून वाचकांना आकर्षित करतो. पुस्तकाचे पहिले पान उघडताच एक वाक्य डोळ्यासमोर भेदून जाते. मी माझीच कविता दुरुस्त करीत चालतो. या वाक्याचे अनेक अन्वयार्थ वाचकांच्या मनाला स्पर्शून जातात. ही फक्त कविता दुरुस्ती नाही, तर कालानुरूप आपण आपल्याला दुरुस्त करता आले पाहिजे, हा संदेश मनाच्या गाभार्‍यात प्रवेश करतो. आपण अजून थोडे पुढे गेलो, की सुप्रसिद्ध कवी, वक्ते, समीक्षक अर्जुन डांगळे यांची प्रस्तावना तर या कवितासंग्रहाचा अर्क आहे. प्रस्तावना वाचताच संपूर्ण कवितासंग्रह वाचल्याशिवाय वाचक हे पुस्तक खाली ठेवू शकत नाही. विशेष बाब म्हणजे, संपूर्ण कवितासंग्रह वाचल्यानंतरही या कविता रसिकांना सोडत नाहीत, तर त्या सदैव मेंदूत घुसळण चालू ठेवतात, हे या कवितासंग्रहाचे बलस्थान आहे.


‘गनीम’ची जान आणि भान


‘गनीम’ हा कवितासंग्रह पाच भागांत विभागलेला आहे. एकूण शंभर कविता या संग्रहात आहेत. वीस-वीस कवितांचे पाच भाग या अर्थाने ही संख्यात्मक विभागणी केली नाही, तर परिवर्तन.. या पाच अक्षरांच्या अवकाशात सर्व कविता सामावलेल्या आहेत. ही पाच अक्षरे एकत्र करताच एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो ‘परिवर्तन.’ हा शब्द कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करतो. काळानुरूप आपल्यात परिवर्तन झाले पाहिजे, परंपरागत चौकटीत तयार झालेली मिथके तपासून घेतली पाहिजेत, ही कवीची इच्छा आहे. कवितेचे शीर्षकेही या अर्थाने बोलके आहेत. कविता अपरिहार्यतेच्या, अन्वयार्थ, लखलाभ, गद्दार, संभ्रमित, चळवळ : कालची आजची, अकलेच्या चड्डीचं बक्कल, तुटलेल्या बुद्धिवादी मेंदूला नाल, जिभेला लगाम, समरसता, मूक इशारा, इरादा, होपलेस, रिक्शन कविता : भारतरत्न… या नावातच सूचकत्व आहे. कवितासंग्रहाच्या शीर्षकाबद्दल प्रस्तावनेत ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे म्हणतात, ‘गनीम’ म्हणजे मानवमुक्तीच्या लढ्यात खोडा घालणार्‍या प्रवृत्ती होत. असे तत्त्वज्ञान, अशा संघटना आणि त्यांची कृती ही ‘फॅसिझम’कडे झुकणारी असते. या गनिमाचा प्रतिकार करावयाचा असेल, तर या गनिमाचे नेमके स्वरूप काय आहे, हे ओळखायला हवे आणि त्याबाबतची परिपूर्ण समज अंभोरे यांच्या कवितेला आहे. कविला या ‘गनीम’ची जान आणि भान आहे, म्हणून ते लिहितात,


आता थोडं सावध व्हायलाच हवं
पाठीशी उभं असणारावर नि
पाठीवरून हात फिरवणार्‍यावरही शंका घ्यायला हवी.


कारण शत्रू नव्या रूपात वावरतोय. आपण शत्रूच्या छावण्यांची पुराणी ठिकाणे तीच तीच समजून आपल्याच पायावर आपण दगड मारून घेत आहोत. ‘हे रस्ते, जमीन, इमारत, झाडे, पाने, फुले आपलीच आहेत, असे पिंजर्‍यात राहून फक्त हो हो म्हणायचे,’ ही हवा पालटलेली लोकशाही आहे. हे कळत असूनही जर तुम्ही कुणालाही न दुखवता मोठेपणाचे तत्त्व बाळगत असाल, तर कवी म्हणतो,


तुम्हाला लखलाभ
फुल्यांच्या घोषणेतच अडकायचं असेल तर
तुम्हाला लखलाभ
भीमाच्या पुण्याईतच मानायची असेल कमाई
तर तुम्हाला लखलाभ.


गावाबाहेर आणि गावातच व्यथांचे डोंगर उभे असताना तुम्ही बुद्ध, फुले आंबेडकरांचा पीर करण्यात धन्यता मानत असाल, तर हे जगणे तुम्हालाच लखलाभ असो, असे कवी चिडून म्हणतो. पेटणारा वणवा आणि जळणारी पायवाट यांचा आपला काय संबंध आहे असे वाटत असेल, तर ‘आता आपलं चांगभलं ’ असं कवी उपहासाने म्हणतो.
आज आपण एका अनाकलनीय व्यवस्थेतून वाटचाल करीत आहोत आणि आपले नेते, वक्ते, समाजसुधारक, जनता या चक्रात सहज अडकले जात आहेत. ही भीती कवीला वाटते आहे. म्हणून कवी उपहासाने, तर कधी उपरोधाने चिमटा काढतो. ‘वक्तापुरता वक्ता नि कालचाच तक्ता’ कवितेत कवी म्हणतो, शत्रू नेहमीच चांगला बोलतो. आपला इतिहास, संघर्षमय गाथा शब्दाशब्दांत रंगवतो. तोंडपाठ बोलणे हा त्यांचा धंदा आहे; पण वांधा आपला होतो.


करायचेच असेल क्रांतिपुरुषांना
‘बाबा’
अवतारीपुरुष’
तर ते
गुलाल-नारळ फोडतील’


असे मतलबी समाजवादी कवींना सगळीकडेच दिसतात. यांच्यात आणि बेडकामध्ये काही फरक कवींना वाटत नाही. बेडूक उभयचर असतो, तर हा समचर असतो, एवढाच काय तो फरक. ‘भाजप, काँग्रेस, लाल निशाण किंवा कुठलाही गामी-आगामी-पुरोगामी-प्रतिगामी सर्वत्र याचा संचार असतो’ यास आजचे विचारवंतही अपवाद नाहीत, असे कवीला वाटते. कुठल्याच दावणीला विरोध न करणारे आपण ‘जरीला’ झालोय ही खंत कवीला आहे.


डोळ्याला झापड
मेंदूला नाल
जिभेला लगाम
लावणं जमलं की
सारंच सुजलाम सुफलाम होतं


सावल्या सावल्यांनीच जगायचे म्हटल्यावर उन्हात पाय कुणी ठेवायचा? चौकटी कुणी मोडायच्या, हरवलेल्या वाटा कुणी शोधायच्या? असा प्रश्‍न कवी विचारतो. सावल्या सावल्यातच बा गेला असता, तर त्याचा बाबासाहेब झाला असता का? हा प्रश्‍न तर आपल्या मेंदूत घुसळण करून जातो.
आपणास प्रश्‍न पडले पाहिजेत. व्यवस्थेने लादलेल्या संकल्पना तपासून घेता आले पाहिजे. त्याचा अन्वयार्थ लावता आला पाहिजे, ही भूमिका कवीची आहे.
कवी जसा आपणास व्यवस्थेतील कुटिल चाली उलगडून दाखवतो, तसा तो आम्ही जागरूक झालोय, हे प्रस्थापितांना आणि विषमतावादींना प्रतिमांच्या भाषेत सांगतो,


तहान भागविण्याची कला
कावळे शिकलेत
खडे उचलून उचलून घामाघूम होण्यापेक्षा
पाण्याचाच नवा साठा शोधण्याच्या गोष्टी ते
कोवळ्या कावळ्याला शिकविताहेत


या अर्थाने अनेक मिथकांना कवीने दिलेले उत्तर वाचकांना विचार करायला भाग पाडणारे आहेत.
थोडक्यात, उत्तम अंभोरे यांचा गनीम कवितासंग्रह म्हणजे आपल्या जगण्याच्या पद्धतीला, मोठेपणाच्या गर्वाला, परंपरागत विषमतावादी मूल्ये रुजविणार्‍या मिथकांना उघडी पाडणारी आहे. एक वैचारिक मंथनातून तयार झालेली ही कविता बुद्ध, कबीर, फुले, मार्क्स, आंबेडकर यांची पायवाट रुजविणारी आहे.

प्रा. डॉ. शंकर विभुते


(लेखक साहित्यिक आहेत.)

Related Articles

1 Comment

Avarage Rating:
  • 0 / 10
  • डॉ.धोंडोपंत मानवतकर , September 21, 2022 @ 2:59 pm

    “गनीम” या कवितासंग्रहाला न्याय देणारं
    चिकित्सक विवेचन..!
    सुंदर परीक्षण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *