अण्णा सावंत यांचे ‘फुलटायमर’म्हणजे कामगार चळवळीचा इतिहास – प्रा. डॉ. शशिकांत पाटील

अण्णा सावंत यांचे ‘फुलटायमर’म्हणजे कामगार चळवळीचा इतिहास – प्रा. डॉ. शशिकांत पाटील

जागतिकीकरणानंतर मराठी साहित्यामध्ये जी एक वैचारिक घुसळण झाली आणि त्याचा प्रभाव साहित्यामध्ये स्पष्टपणे जाणवू लागला. महात्मा फुले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने शिक्षण अतिशय तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचले. त्यातून साहित्यापासून कोसो दूर असणारा तरुणवर्ग लिहिता झाला. साठोत्तरी वाङ्मयामध्ये दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, जनवादी साहित्य, आदिवासी साहित्य, असे अनेक प्रवाह निर्माण झाले. कथा, कविता, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र आणि आत्मकथने या साहित्य प्रकारांतून आपण व्यक्त होऊ लागलो. त्यातला आत्मकथन वाङ्मय प्रकार विशेषत्वाने दलित साहित्यात आणि अलीकडच्या काळात फार मोठ्या प्रमाणात लिहिला जाऊ लागला. आत्मकथन म्हणजे आपल्या जीवनात भोगलेले, साहिलेले, पाहिलेले आणि प्रत्यक्ष जगलेले जीवन व त्यातला तो अनुभव याचे केलेले कथन म्हणजे आत्मकथन…

कामगार आणि कामगार चळवळीच्या कार्यकर्त्याचे आत्मकथन


आत्मकथन या संज्ञेचे स्पष्टीकरण करताना डॉक्टर वासुदेव मुलाटे म्हणतात,  “यातील  ‘मी’चे भोगणे, घडत जाणे हे नुसतेच व्यक्तिगत पातळीवर राहत नाही, तर त्याला आम्हीचे स्वरूप प्राप्त होते. असे असले तरी आम्हीचे चित्रण करताना आम्हीतला ‘मी’ त्यातून कधी वेगळा होऊन पुढे येत नाही. काही झाले तरी माणसाला सर्वप्रथम ‘स्व’प्रेम आधी असते. म्हणून आत्मकथनात ते अपरिहार्यपणे प्रकट होते. अण्णा सावंत यांच्या ‘फुलटायमर’ आत्मकथनासंदर्भात त्यांच्या ‘मी’चा एक कामगार म्हणून ‘आम्ही’ झालेला आहे. म्हणून मी याठिकाणी अधोरेखित करू इच्छितो, ‘फुलटायमर’ हे आत्मकथन एकट्या अण्णा सावंत यांचे राहत नाही, तर ते देशभरातील कामगार आणि कामगार चळवळीच्या कार्यकर्त्यांचे बनलेले आहे. एकूणच या आत्मकथनातून समकालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक जीवनासोबत भांडवलदार शोषणकर्ते, ज्यांचे शोषण होते तो कामगार आणि कामगार चळवळीचा लढा लढताना कार्यकर्त्यांची होणारी होरपळ ही केवळ व्यक्तिगत पातळीवर राहत नाही, तर ती सार्वत्रिक बनते. जो जीवनानुभव सार्वत्रिक असतो तेथे येणारा नायक हा नामधारी असतो. त्याचा सभोवताल, वास्तव परिस्थिती, अधिक ठळक होत जाते.
आत्मकथन हे तृप्त झालेल्या मनाने आयुष्याचे केलेले सिंहावलोकन नाही, तर ते मनाच्या खोल गाभार्‍यातल्या असंख्य जखमा आणि वेदनांचे खोललेले गाठोडे असते. या अनुषंगाने ‘फुलटायमर’ हे केवळ रंजनतेसाठी केलेले लेखन नाही, तर तो महाराष्ट्राच्या कामगार चळवळीचा आणि जालना जिल्ह्याच्या कामगार संघर्षाचा इतिहास आहे.


कामगार चळवळीचा फुलटायमर कार्यकर्ता


लातूर जिल्ह्यातील टाकळगावसारख्या ग्रामीण भागातील छोट्याशा खेड्यात जन्माला आलेले अण्णा सावंत घरातील वारकरी संप्रदायातील प्रभाव, बालपण संस्कारित अध्यात्म पोथी, पारायण यात गुरफटलेले असताना कुटुंबातील शिक्षणाचे महत्त्व, मोठे भाऊ नागोराव नित्य वारी करणारे, शेती व्यवसाय सांभाळणारे रामराव, रंगराव हे दोन भाऊ, तर देवराव हे शिक्षक, चाकूर, उदगीर, औरंगाबाद, असा शिक्षणाचा प्रवास आणि या प्रवासात वाचनातून मूर्तिपूजा, अवतारवाद, जातिसंस्था, रामायण, महाभारत यासारख्या धर्मग्रंथांसोबत महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, सुभाषबाबू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव, कम्युनिस्टांची चळवळ आणि त्याच्याशी जुळत जाणारी अण्णा सावंत यांची भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिकच पकडली गेली. कार्ल मार्क्स, लेनीन यांचा विचार, रशियन क्रांती, चीन, क्युबेन क्रांती याविषयीचे वाचन, फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा यासंदर्भात प्रचंड वाचन असलेले अण्णा सावंत कम्युनिस्ट विचारसरणीच्या अनेक अभ्यासवर्ग आणि शिबिरांतून कामगार क्रांतीसंदर्भातल्या जगातल्या चळवळीचा अभ्यास त्यांचा झालेला होता. कॉम्रेड भवलकर, कॉम्रेड मानव, कॉम्रेड ओक, कॉम्रेड संझगिरी, कॉम्रेड रांगणेकर, कॉम्रेड अशोक गायकवाड, कॉमे्रड मराडे, कॉमे्रड पडोळे यांच्या सहवासात अण्णा सावंत यांच्या आयुष्याचा झालेला प्रवास एस.एफ.आय.च्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीच्या सहभागातून जालना जिल्ह्यातील सिटूच्या पक्षनेतृत्वापर्यंत अनेक संघर्षशील लढा देत अनेक प्रश्‍न सोडवत, एक कामगार चळवळीचा फुलटायमर कार्यकर्ता आपल्याला या आत्मकथनातून भेटतो.
‘फुलटायमर’ हे साधारण तीनशे पृष्ठांचे आत्मकथन. या आत्मकथनाला डॉ. प्रल्हाद लुलेकर यांची पाठराखण आणि नागनाथ कोतापल्ले यांची प्रस्तावना अधिक वाङ्मयीन मूल्य प्राप्त करून देते. समाजात झालेले परिवर्तन, बदललेल्या वृत्ती-प्रवृती क्रांतीची स्वप्ने आणि त्या भोवतीचा परीघ, जात, धर्म जाणिवेने न आलेले वर्गभान, ही या आत्मकथनाची वैशिष्ट्ये आहेत. कोत्तापल्ले सरांनी प्रस्तावनेत “राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाच्या अर्थकारणाचे कामगार जीवनावर होणार्‍या परिणामाचे चित्रण करणारे आत्मकथन आहे”, अशी दखल घेतली आहे. मराठी साहित्यात आत्मकथन म्हणून एक वेगळा ठसा उमटवणारे आणि स्वतःचे वेगळेपण सिद्ध करणारे हे आत्मकथन आहे, असे डॉ. प्रल्हाद लुलेकर अधोरेखित करतात.


समाजव्यवस्थेशी जोडलेल्या अनुभवाला आत्मकथनात स्थान


परिवर्तनवादी चळवळी आणि परिवर्तनवादी विचार घेऊन डाव्या पक्षांमध्ये काम करत असताना प्रस्थापित व्यवस्थेच्या, भांडवलशाही व्यवस्थेच्या, आर्थिक विषमतेविरुद्ध आवाज उठवून ही चळवळ यशस्वी करताना येणारे असंख्य अडथळे, होणारे जीवघेणे हल्ले, कायदा सुरक्षेच्या पातळीवर सत्ता आणि अर्थसत्तेच्या दावणीला बांधलेली प्रशासकीय व्यवस्था, होणारे विविध आरोप, त्यातून भोगाव्या लागणार्‍या यातना, समाजहितासाठी आणि अन्यायाने ग्रासलेल्या समूहाला त्यातून बाहेर काढणे. स्वतःच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनाला बाजूला सारून एका विचाराचे पाईक होऊन त्या विचाराला कायमस्वरूपी एकनिष्ठ राहत, वैयक्तिक स्वार्थ आणि प्रलोभनाला बळी न पडता जालना जिल्ह्यातील कितीतरी प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी सहकार्‍यांच्या माध्यमातून निर्माण केलेला लढा यशस्वीतेपर्यंत नेऊन पोहोचवणारे अण्णा सावंत स्वतःच्या कौटुंबिक नात्यातील भावनिक गुंत्याला थोडाही वाव न देता स्वतःतला मी बाजूला सारून कामगार समूहाची व्यथा आणि एकूण समाजव्यवस्थेशी जोडलेल्या अनुभवाला आपल्या आत्मकथनातून स्थान देतात.


अण्णा सावंत यांच्यातील सत्यधर्म  


कोरोना काळातील अतिशय वेदनादायक घटनांपैकी जालना जिल्ह्यातील परप्रांतातील कामगारांसंदर्भात रेल्वे पटरीवर घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या उल्लेखाने या आत्मकथनाची सुरुवात होते. ही सुरुवातच मुळात कामगार जीवनाविषयीची आपली संवेदना जागृत करते. अतिशय संयमी लेखणीने अन्य जीवनानुभवाला कुठेही वाट न करून देता केवळ कामगार आणि सामाजिक समस्या, प्रश्‍न केंद्रस्थानी ठेवून हे आत्मकथन पुढे चालते. आत्मकथनातील लेखकाचा काल आजच्या जीवनानुषंगाने तसा नगण्य असतो. त्याच्या लेखनातून गतकाळाला चैतन्य मिळते. या आत्मकथनाच्या माध्यमातून भूतकाळातील असंख्य गूढ उकलले जातात. अण्णा सावंत यांनी या आत्मकथनातून अशा अनेक घटना अतिशय निर्भीडपणे कोणताही आडपडदा न ठेवता चार भिंती आड झालेल्या बैठकीसुद्धा जशाच्या तशा वास्तव स्वरूप मांडलेल्या आहेत. आत्मकथन लिहीत असताना लेखकाला ते स्वातंत्र्य असते, कोणती गोष्ट समोर आणायची, कोणती सांगायची नाही; परंतु अण्णा सावंत यांच्यातील सत्यधर्म जसेच्या तसे ‘फुलटायमर’ या आत्मकथनातून त्यांना व्यक्तकरून जाते.


कामगार हा सत्ताधारीवर्गाच्या व भांडवलदारांच्या हातचे खेळणे  


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आजही भांडवलशाही धनिकांची एक फळी कामगारांचे कसे शोषण करते आहे. अनेक कामगार नेते या भांडवलदारांच्या हातचे खेळणे बनलेले आहेत, या वास्तवाला नजर अंदाज करता येणार नाही. हाही एक कंगोरा या आत्मकथनातून आलेला आहे. कामगार संघटित येताना त्यांच्या मनात निर्माण झालेल्या भांडवलदारांविषयाची भीती, प्रचंड दारिद्य्रामुळे संपकाळात होणारी उपासमार, कमी श्रममूल्यावर राबवला जाणारा कामगारवर्ग, कामगार युनियनमधील अंतर्गत मतभेद, कामगार युनियनमधील श्रेयवादाचे राजकारण, स्व-स्वार्थासाठी पडलेली फूट, परप्रांतातून कामगार मागवून स्थानिकांना कामावरून कमी करण्याची समस्या, अनेक कंपन्यांतील वेगवेगळे कामगारांचे प्रश्‍न, सफाई कामगारांचे प्रश्‍न, तेलघाण्यातील कामगारांचे प्रश्‍न, अंगणवाडी सेविका, विडी कामगार, या सर्व क्षेत्रातील कामगारांना एकत्रित करत एका युनियनपासून झालेले सुरुवात, जालना जिल्ह्यातील कामगारांना एकत्रित गुंफण्याचे काम पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून अण्णा सावंत यांनी प्रामाणिकपणे केलेले दिसते. फक्त पगारवाढ आणि बोनससाठी न लढता कामगारांनी रशियन क्रांती समजून घेतली पाहिजे. कामगारांचे राज्य आणून होणारे शोषण कायमचे थांबवले पाहिजे, असा आशावाद मांडत कामगार जात, धर्म, भाषा, पक्ष यामध्ये विभागला आहे. सत्ताधारी वर्गाच्या आणि भांडवलदारांच्या हातचे खेळणे बनलेला आहे. हा वास्तव विचार मांडणारे ‘फुलटायमर’ हे आत्मकथन आहे. जिल्ह्यामध्ये एस.एफ.आय.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या फीवाढीचा प्रश्‍न असेल, वसतिगृहातील निवास आणि भोजनाची समस्या असेल, यांनाही एका केंद्रभूत संघटनेकडे आणण्यासाठी अण्णा सावंत यांनी प्रयत्न केलेला आहे.
मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे, कौटुंबिक, भावनिक आणि नात्याविषयक बंधनात अण्णा सावंत यांचे फुलटायमर अडकलेले नाही. त्यांच्या जीवनसंगिनी पार्वतीताई यांच्यासोबत त्यांचा झालेला आंतरजातीय विवाह, हा तत्कालीन समाजव्यवस्थेसंदर्भातील परिवर्तन दाखवणारा प्रसंग आहे. चळवळ आणि काम याच्याशी एकरूप झालेले अण्णा सावंत कुटुंबात रममाण होताना दिसत नाहीत. वडील आजारी आहेत, अंतिम समय आलेला आहे, तरीही आपल्या कार्याला त्यांनी दुय्यम स्थान दिलेले नाही. अतिशय संयमी लेखणीतून आपली भूमिका आणि लेखन यातला अनुबंध कायम जपलेला आहे.


समग्र कामगारांच्या जीवनाचा जीवनानुभव


एक लेखक म्हणून आणि फुलटायमर हे आत्मकथन एक कलाकृती म्हणून आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा आत्मकथनाची वेगळी मांडणी झालेली दिसते. जे सांगायचे आहे, ते जसेच्या तसे कोणताही आडपडदा न ठेवता शब्दचित्रित झालेले आहे. ‘फुलटायमर’ हे आत्मकथन आत्मप्रकटीकरण करत नाही. स्वतःच बालपण, तारुण्यावस्था, प्रणयभाव, प्रेमभाव, भावनिक हलकल्लोळ, स्वप्रेम, वर्तमान आणि भविष्याची चिंता, या आत्मकथनात या गोष्टींना थारा नाही. याउलट एक कार्यकर्ता म्हणून वैचारिक पिंड या आत्मकथनाच्या प्रत्येक पानावर आपल्याला दिसतो आहे. यापूर्वी आलेल्या अनेक आत्मकथनांतून गतकाळातील वैयक्तिक जीवनाच्या सुख-दुःखाच्या घटना किंवा ऊर बडवून दुःखाचा आक्रस्ताळेपणा व्यक्त करून मन हलके करण्याचा प्रयत्न अनेक आत्मकथनांतून आलेला आहे. दलित आत्मकथनातील वास्तवता वगळता दलितेतर आत्मकथनातून आत्म प्रकटीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. अण्णा सावंत यांच्या ‘फुलटायमर’ या आत्मकथनाला हा दोष मात्र देता येत नाही. हे केवळ अण्णा सावंत यांचे आत्मकथन ठरत नाही, तर समग्र कामगारांच्या जीवनाचा हा जीवनानुभव आहे.
कोणतीही पाल्हाळीकता किंवा संवादाचा फापटपसारा न घेता घटनेचे नेमकेपण अतिशय वृत्तांत आणि अहवालस्वरूप शब्दांच्या माध्यमातून फुलटायमर पूर्ण झाले आहे. हे आत्मकथन संज्ञाप्रवाही असल्याने आशयस्वरूपाने एकसंघ वाटत नाही. साधी सोपी भाषा, वाक्य रचना कोणता अलंकारिक सोस न बाळगता एक कलाकृती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचले आहे. लातूर, उदगीर भागातील भाषा, ओघवती शैली, अतिशय वैविध्यपूर्ण हे आत्मकथन वाटते. हे आत्मकथन आपल्या हाती जेव्हा पडेल, तेव्हा लेखकाच्या समकालीन अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता त्याचबरोबर कामगार चळवळीचा दस्तावेज म्हणून याचा विचार आपण नक्कीच करू. एक व्यक्ती म्हणून कोणत्याही वाईट प्रवृत्तीला थारा न देता अंतर्मनातील भूमिकाबाह्य जगात घेऊन वावरणारा माणूस म्हणून निष्ठा आणि प्रामाणिक तत्त्व जोपासत फुलटायमर कार्यकर्ता अण्णा सावंत यांच्या ‘फुलटायमर’ या आत्मकथनातून नक्कीच आपल्याला भेटतो.

प्रा. डॉ. शशिकांत पाटील


(लेखक मराठी विषयाचे प्राध्यापक, कवी, समीक्षक, वक्ते आहेत.)

फुलटायमर
पृष्ठे : 300
प्रकाशन : लोकवाङ्मय गृह
किंमत : 325 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.