मैं स्कूल जा रहा हूँ…कोणत्या शाळेत आणि कशासाठी? – पंक्चरवाला 

मैं स्कूल जा रहा हूँ…कोणत्या शाळेत आणि कशासाठी? – पंक्चरवाला 

आपल्या देशातील सरकारी शिक्षणाविषयी कोणी काहीही म्हणो; पण वास्तव हेच सांगते, की या शिक्षणातील गुणवत्ता आणि एकूणच आम्ही शिक्षण देतो, अशी सांगणारी व्यवस्था बुडत्या जहाजासारखी झाली आहे. याला दोन कारणे आहेत. एक जागतिकीकरणातून आलेले खासगीकरण आणि दोन सूज आलेली, उदासीन झालेली, खुशालचेंडू आणि जबाबदारीहीन बनलेली शिक्षणव्यवस्था. अर्थात, तिच्यातील घटक म्हणजे सरकार, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक इत्यादी. भारत स्वतंत्र झाल्यापासून सरकारने अनेकदा साक्षर भारताचे म्हणजे शंभर टक्के साक्षर भारत निर्माण करण्याचे वायदे केले; पण ते पूर्ण झाले नाहीत. ते कधी पूर्ण होणार हे बसच्या ढुंगणावर चिकटवलेल्या आणि ‘स्कूल चले हम’ या चित्रातील पोरालाही सांगता येणार नाही. अजून सांगायचे तर सरकारी शाळांमध्ये मिळणार्‍या शिक्षणाची गुणवत्ता काय, यावरही कोणी जबाबदारीने भाष्य करू शकणार नाही. ऐंशीच्या दशकापासून खासगीकरणाने सरकारी शिक्षणाच्या कपाळावर, गालावर इतक्या चोची मारल्या, की त्याला आता ओळखताही येत नाही. त्याची विश्‍वासार्हता, गुणवत्ता यावर एनजीओच्या मदतीने सातत्याने प्रश्‍नचिन्ह कोरले गेले आहे. हे प्रश्‍नचिन्हही इतके गडद झाले, की सर्वप्रथम सरकारी शाळांतील शिक्षकांनी आपली पोरे आपल्या शाळांमध्ये दाखल करण्याचे बंद केले. जणू काही त्यांना कळून चुकले, की पोरगा सरकारी शाळेत गेला, की त्याची वाट लागते आणि खासगीत गेला, की त्याला सोनेरी वाट सापडते. शिक्षकांच्या मनातील विचार अन्य पालकांच्या आणि मुलांच्या मनातही झिरपला. सरकारी शाळा ओस पडायला लागल्या आणि तेथे धनदांडग्यांनी ग्रूप ऑफ इंडस्ट्रीज चालू करावे त्याप्रमाणे ग्रूप ऑफ स्कूल, नॉलेज सेंटर, करिअर सेंटर, इंटरनॅशनल वगैरे नावाने खासगीत शाळा चालू केल्या. सरकारी पोरे खासगीत भरती करणार्‍यासाठी कमिशन चालू केले. सेल लावला. दोन पोरे आणल्यास तिसर्‍याची फी माफ, असा तो सेल होता. आता एक दिवस शाळाच बंद पडणार याचा साक्षात्कार या शाळांमध्ये शिकवणार्‍या शिक्षकांना न झाल्यास नवलच म्हणावे लागेल. त्याने शिकवणे कागदोपत्री ठेवले आणि त्याऐवजी नव्या वेतन आयोगामुळे पगारपाणी किती होणार याचे गणित कॅल्क्युलेटर किंवा पोरांच्याच वह्यांतून फाडलेल्या पानावर करत बसले. शाळेत दाखल होईल तो पासच होणार, यामुळे शिकवायची आणि स्वतः वेगळे शिकण्याची गरज कमी होऊ लागली. अनेक शिक्षकांनी साइड बिझिनेस चालू केले. एकूण काय, तर शाळेपासून तो दूर जाऊ लागला. जे काय आहे ते कागदोपत्री शिल्लक राहिले. ग्रामीण आणि दुर्गम भागात हे चित्र खूप गडद पाहायला मिळते. ‘स्कूल चले हम’ असे बडबडत येणार्‍या पोरांचा मेंदू रिकामा आणि पोट मध्यान्ह भोजनाने म्हणजे खिचडीने भरले जाऊ लागले. शिक्षण आणि त्याची गुणवत्ता वळचणीला पडली. पाचवी-सातवीतल्या पोरांना जोडाक्षरे येत नाहीत, तेराच्या पुढचे पाढे येत नाहीत, हे सरकारच निर्लज्जपणे सांगू लागले. ते जसे सांगेल तशी खासगी शाळांची संख्या वाढू लागली. या शाळाही धनदांडगे आणि पुढार्‍यांच्या मालकीच्या बनल्या. पहिल्या धारेप्रमाणे खुळखुळणारा पैसा त्यांच्या हातात पडू लागला. जेथे शिक्षण मोफत तेथे गुणवत्ता नाही आणि जेथे जमीन गहाण ठेवून, डोनेशन भरून प्रवेश घेतला तेथे ते गुणवत्तापूर्ण, असा नवा सिद्धांत तयार झाला.


शिक्षकाची ढासळणारी गुणवत्ता आणि तिचा शिक्षणाच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम, ही काही नवी गोष्ट राहिली नाही. शिक्षकाकडे फक्त कागदोपत्री गुणवत्ता आहे; पण विद्यार्थ्यांना बुद्धिमान आणि गुणवान करण्याची साधने त्यांच्याकडे नाहीत. याचीही चाचपणी अनेकदा होते. गुणवत्ताहीन शिक्षकांना ओळखले जाते; पण कारवाई काही होत नाही. ज्याची नोकरी कधीच जाऊ शकत नाही असा एकमेव घटक म्हणजे शिक्षक. ज्याचे विद्यार्थी पास-नापास झाले काय, त्यांनी शाळेला दांडी मारली काय किंवा ते कच्चे राहिले काय, शिक्षकांवर कारवाई करण्याची तरतूद नाही. सबब गुणवत्तेच्या नावाने शिमगा आणि मागण्यांच्या नावाने दसरा, असा हा प्रकार सुरू आहे. डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले होते. प्रत्यक्षात शेळीचे, गाढविणीचे किंवा एखाद्या बोगस डेअरीतील दूधही त्यांच्या वाट्याला येत नाही. सरकारी शिक्षकांची बौद्धिक लायकी काय, हे तपासण्याचा प्रयत्न बिहारमधील शिक्षण खात्यातील एका बड्या बाबूने केला. तर बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील पकरिदयाल येथील सरकारी शाळेला एसडीओ या पदावर असलेल्या रवींद्र कुमार याने मुख्याध्यापकाचीच बौद्धिक चाचणी म्हणजे सामान्य ज्ञान तपासण्यासाठी कॅमेर्‍यासमोर एक अतिशय साधा प्रश्‍न विचारला. ‘मैं विद्यालय जाता हूँ, मैं विद्यालय जा रहा हूँ’ या वाक्याचा इंग्रजी अनुवाद करा, असा तो प्रश्‍न होता. आता सगळीकडेच पहिलीपासून इंग्रजी सुरू असल्याने तिला खूप महत्त्व आले आहे. हेडमास्तरला अनुवाद करता आला नाही. बुद्धीने मठ्ठ; पण व्यवहाराने चतुर असलेल्या मुख्याध्यापकाने चटकन उत्तर दिले, की मी संस्कृतचा शिक्षक आहे, मला इंग्रजीशी संबंध ठेवायचा नाही. मग अधिकार्‍यानेच फळ्यावर आपल्या प्रश्‍नाचा अनुवाद लिहून दाखवला आणि संस्कृतवाल्या शिक्षकाला ते म्हणाले, इंग्रजी येत नसेल तर मग मी शाळेला जातो आणि जात आहे, याचा संस्कृतमध्येतर अनुवाद करा. गुरुजी इथेही फेल झाले; पण त्यांना त्याबद्दल कसलीही लाज वाटली नाही. विद्यार्थी मात्र आशाळभूत नजरेने त्यांच्याकडे बघत राहिले. या बाबूने मग चैता पंचायत विभागात एका शाळेत शिकवत असलेल्या विशेष म्हणजे विज्ञान विषय मोठ्या तावातावाने शिकवत असलेल्या सहायक शिक्षकाला विचारले, जलवायू, मोसम आणि पर्यावरण यातील फरक काय? विज्ञानाच्या शिक्षकाला उत्तर देता आले नाही. तोही फेल झाला. इथेही अधिकार्‍याने योग्य उत्तर सर्वांना सांगितले. हा सर्व प्रकार कॅमेर्‍यात कैद झाला. त्याचा व्हिडीओ जगभर व्हायरल झाला; पण तरीही शिक्षकांवर त्याचा परिणाम शून्य. ज्याच्यावर पगारवाढीच्या आकड्याशिवाय कसलाच परिणाम होत नाही आणि बुडणार्‍या जहाजात बसूनही जहाजाच्या मजबुतीवर भाषण ठोकतो, तोच तर शिक्षक…

– पंक्चरवाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.