बोले तो अमित भाईसुने तो सारा देश… – पंक्चरवाला 

बोले तो अमित भाईसुने तो सारा देश… – पंक्चरवाला 

सत्ताधारी आणि त्यांचा पक्ष यांनी काहीही बोलले तरी काही होत नाही. सत्ताधारी बोलण्यासाठीच असतात. त्यांनी बोलताना कसलेही विधिनिषेध, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान आदी बाबी पाळायच्या नसतात. ‘सब कुछ खुला है’ या तत्त्वानुसार ते चालत असतात. भाजपचे आर्य चाणक्य म्हणजे काहीही करून आपल्या पक्षाची सत्ता आणणारे वाक्बगार म्हणून त्यांची ख्याती आहे, तर अशा अमित भाईने हैदराबादमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले, की येणार्‍या तीस-चाळीस वर्षांत भारतात फक्त भाजपचीच सत्ता असणार आहे. खरे म्हणजे अमित भाई आकड्यांत का अडकले कळत नाही; पण हेही वास्तव, की त्यांना आकडे खूप आवडतात. त्यांनी यापुढे या देशात, इथल्या लोकशाहीमध्ये फक्त भाजपच राहणार आहे आणि बहुपक्षीय जाऊन एकपक्षीय लोकशाही येणार आहे, हेही सांगायला हवे होते. जाऊ द्या, पुढे-मागे हेही ते कोणत्या तरी ठिकाणी राहतील. खरे तर यांच्या भाकितामध्ये विशेष फारसे काही नाही. एक तर भाजपच्या विरोधातला एक-एक पक्ष संपवण्याचे कारस्थान चालूच आहे. कोणत्या तरी सरकारी एजन्सीचा वापर करून, विरोधकांना बदनाम करून, त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करून किंवा त्यांना कमळात जागा देऊन हे प्रयत्न सुरू आहेत. फुटीत आणि बेऐक्यात मशगूल झालेले विरोधक सहजपणेच अशा भाकिताचे बळी ठरतात. एक खोटी गोष्ट शंभर वेळा बोलली, की ती यांनाही खरी वाटायला लागते. जर त्यांचेच खरे ठरणार असेल, तर मग लढायचे कशाला या भावनेने हेही तलवारी म्यान करतात. त्या म्यान झाल्या, की मग अमित भाईसारखे लोक भाकीत करायला लागतात. ज्यांना स्वतःकडे बोट करण्याची सवयच नाही, ते इतरांच्या घराणेशाहीकडे बोट करतात. भाजपमधल्या घराणेशाहीवर बोलत नाहीत. लोक खरोखरच घराणेशाहीला कंटाळले असतील, तर मग ते भाजपमधील घराणेशाहीचे समर्थन कसे करतील, हेही विचार करण्यासारखे आहे; पण अमित भाई विचार करणार नाहीत. कारण तेही पंतप्रधानांच्या रांगेत आहेत. भाजपमधील घराणेशाहीही त्यांनी जाहीर करावी. पाचपेक्षा जास्त वेळा स्वतःच निवडून येणार्‍या नेत्यांची नावे सांगावीत. स्वतःपासून, साधू, साध्वीपर्यंत कोणाचीही नावे घ्यावीत आणि एक-एक मतदारसंघ एकेका नेत्याच्या मालकीचा कसा होतो, हेही सांगावे. आपल्या देशातील नागरिकांच्या रक्तातच घराणेशाही, राजेशाही अजून गच्च आहे. तिचा परिणाम म्हणून अनेक राजघराण्यांतील लोक स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत निवडून येतात. विशेष म्हणजे, त्यातील अनेक घराण्यांनी कमळात घरटी बांधली आहेत. भाजपने अशा घरट्यांना सुरक्षा दिली आहे. प्रतिष्ठा दिली आहे. इतिहास असलेली ही घरटी आहेत आणि भाजप इतिहासात रममाण होणारा आणि इतिहासाचे पुनर्लेखन करणारा पक्ष आहे. तो स्वतः राजेशाही, घराणेशाही कुरवळतो आणि इतर पक्षांतील घराणेशाहीवर भाष्य करतो. टाळ्या घेतो आणि झालेच तर मतांच्या पेट्याही पळवतो. देशातील सगळे राजकारण दोन-तीनशे कुटुंबांत एकवटले आहे. हे भाजपच्या सायबर सेलला आणि अतिशय सक्रिय झालेल्या ईडीफिडीला ठाऊक नाही काय?
अतिम भाईंनी याचा कार्यक्रमात मोठे कारभारी नरेंद्र भाईंना थेट शंकराच्या रांगेत बसवले. यापूर्वी त्यांना अवतार कल्पनेत विष्णूच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न झाला. त्यांचे मंदिर उभारण्याचा प्रयत्न पहिल्याच टर्ममध्ये झाला. आता दुसरी टर्म सुरू आहे आणि अमित भाई म्हणतात अजून तीस-चाळीस वर्षे भाजपच सत्तेत राहणार आहे. त्यानंतर कोण याविषयीचे भाकीत त्यांनी केलेले नसले, तरी पुन्हा भाजपच येणार हे सांगताना त्यांनी संकोच केला असावा, तर मोदी यांनी शंकराप्रमाणे विष पचवले, असे भावुक होऊन सांगितले. गुजरात दंगलीच्या मागे मोदींचाच हात आहे, असे आरोप तेव्हा झाले. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. 2002 च्या दंगलीप्रकरणी एसआयटीने (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) मोदी आणि इतर 64 जणांना क्लीन चिट दिली. दरम्यान, आपल्यावर झालेले आरोप शांत, संयम होऊन पचवणे म्हणजे विषच पचवण्यासारखे होते. ते मोदी यांनी मोठ्या मनाने पचवले, म्हणून तर अमित भाईंनी नरेंद्र भाईंची तुलना शंकराशी केली. खरे तर असे विष पचवण्यात अमित भाईही होते. त्यांना तर गुजरातचे गृहमंत्री असताना तडीपार करण्यात आले होते; पण तरीही त्यांनी मोठ्या धीराने हे विष पचवलेच. विष पचवण्याची एक परंपरा तयार झाली. हे सर्व पाहता त्यांनी स्वतःला छोटा शंकर म्हटले असते तरी कोणी आक्षेप घेतला नसता. कारण सत्ताधारी कोणीही असला तरी त्यांच्या नादाला कोणी लागत नाही. या सत्ताधार्‍यांकडे कायदे आणि व्यवस्था असतात. राष्ट्रप्रेमी, राष्ट्रद्रोही, घराणेशाही वगैरे पत्रे असतात. विशेषणे असतात. 64 जणांनी विष पचवले, असा अर्थ घ्यायचा झाल्यास हे विष कोणी तयार केले आणि विषनिर्मितीचा कारखाना बंद होणार नाही का, यावरही अमित भाईंनी बोलायला हवे. गृहमंत्र्यांशिवाय ही माहिती अन्य कोणाकडे असण्याची शक्यता नाही.

– पंक्चरवाला 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.