पंधरा ऑगस्ट 1947 ला भारताचे पहिलेवहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून केलेले पहिले वहिले भाषण देशाच्या इतिहासात अजरामर आहे. सध्याच्या भाजपने नेहरूंची कितीही निंदानालस्ती केली, सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही खोटे बोलण्याच्या मोहिमा चालवल्या, स्वतःच्या पक्षातील घराणेशाही टोपलीखाली दाबून काँग्रेसच्या घराणेशाहीवर कितीही टीका केली, तरीही नेहरूंचे हे अजरामर भाषण आणि त्यांचे देशाप्रती व्यक्त झालेले कर्तृत्व कुणालाही पुसून काढता येणार नाही. ज्यांचा स्वातंत्र्याशी संबंधच आला नाही, ते तरी कधीच हे पुसून टाकू शकणार नाहीत. जेव्हा नेहरू लाल किल्ल्यावरून सांगत होते, की अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता, याची पूर्तता आज पूर्णपणे नसली तरी थोडीबहुत आपण करत आहोत. मध्यरात्रीचा टोला पडताच सारे जग शांततेने झोपलेले असताना भारत स्वातंत्र्याच्या नव्या युगात जन्म घेत आहे. आज आपल्या दुर्दैवाची अखेर होत आहे. पुन्हा एकदा नव्या भारताचा शोध घेत आहे. ही वेळ क्षुद्र आणि विधायक टीकेला मूठमाती देण्याची आहे, एकमेकांविषयी दुष्ट हेतू किंवा दोष ठेवण्याची नाही. आपल्याला स्वतंत्र भारताचा उत्तुंग असा एक प्रासाद उभा करायचा आहे. ज्यामध्ये देशाची लेकरे सुखाने नांदतील. चिंब पावसात, ढगांच्या कडकडाटात नेहरूंची ही घोषणा, हा निर्धार जगभराने ऐकला (फ्रीडम अॅट मिडनाईट पान. 190 – लॅपिए-कॉलिन्स)
एका नव्या देशाची, नव्या समाजाची आणि अर्थातच नव्या माणसाची आखणी, मांडणी नेहरू करत होते. तेव्हा पुण्यातल्या एका मैदानावर अंदाजे पाचशे लोकांची गर्दी झाली होती. दिल्लीत तिरंगा फडकवला गेला. इथेही ध्वजारोहण झाले; पण तिरंगा नव्हता. स्वस्तिक कोरलेले होते. जे हुकूमशहा आणि वंशशहा हिटलरचे चिन्ह होते. हे सर्व लोक स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. सिंधू नदीच्या तीरापासून ब्रह्मदेशाच्या पूर्व सीमेपर्यंत, तिबेटपासून केप कामोटिंगपर्यंत अखंड हिंदुस्थानचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेले होते. या उपखंडावर हिंदूंची सत्ता राहिली पाहिजे आणि हिंदू-मुस्लीम भाई भाई ही घोषणा गैर आहे, असे त्यांना वाटत होते.
या मेळाव्यासमोर एक तरुण भाषण करण्यास उभा राहिला. त्याचे नाव नथुराम गोडसे. 15 ऑगस्ट, 1947 या स्वातंत्र्य दिनानिमित्त शोक, राग व्यक्त करण्यासाठी त्याने हिंदुराष्ट्र या आपल्या दैनिकातील अग्रलेखाची जागा मोकळी ठेवली होती. या जागेला काळी चौकट केली होती. हाच तरुण भाषण करण्यासाठी उभा राहिला. तो म्हणाला, आज जो भारतीय स्वातंत्र्याचा विजयोत्सव आहे, तो हिंदू बांधवांवर होत असलेल्या अन्यायावर घातलेले पांघरूण आहे. भारताचे विघटन म्हणजे भविष्यात लिहून ठेवलेले भीषण, यातनापूर्ण आणि अस्मानी संकट आहे. याला जबाबदार दोघे आहेत. एक काँग्रेस आणि तिचे नेते गांधी. माझ्या जन्मभूमीसाठी प्राणार्पण करण्याची माझी तयारी आहे, अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. पुढे नथुरामने अशीही एक प्रतिज्ञा घेतली, की हिंदुराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी त्याच्या आड येणार्या दुष्ट शक्तीचे पारिपत्य करण्यासाठी आपला जन्म आहे, अशा आशयाची ती प्रतिज्ञा होती. (फ्रीडम अॅट मिडनाईट. पान. 207) पुढे साडेपाच महिन्यांनी नथुरामने 30 जानेवारी 1948 ला म. गांधींची हत्या केली. 15 ऑगस्ट 1947 ला मिळालेल्या स्वातंत्र्याचा एका अर्थाने निषेध करण्यासाठी जमलेल्या गर्दीत आणि छातीपर्यंत आडवा हात धरलेल्यांच्या एका म्होरक्याने ही हत्या केली. उरला प्रश्न काँग्रेसचा. स्वातंत्र्यानंतर 67 वर्षांनी भारत काँग्रेसमुक्त करण्याची म्हणजे तिला संपवण्याची घोषणा मोदींनी केली. तिचा पुनरुच्चार स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी म्हणजे 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केला. घराणेशाहीचे नाव घेऊन.
तिसरा प्रसंग 14 ऑगस्ट 1947 ला म. गांधींच्या सायंकाळच्या सभेने सुरू झाला. ब्रिटिशांच्या राजवटीखाली असलेल्या भारतातील ही शेवटची प्रार्थना सभा होती. गांधींच्या सभेला प्रचंड गर्दी होती आणि दहा हजारांहून अधिक जनसमुदाय जमला होता. उद्याची प्रार्थना स्वतंत्र भारतात होणार होती. आदल्या दिवसाच्या अगोदरपासूनच धार्मिक दंगलींनी नखे वर काढली होती. परस्परांच्या गळ्यात ती घुसवली जात होती. म. गांधी सर्वांकडून अहिंसेचा करार करून घेत होते. उद्या स्वतंत्र भारत जन्माला येणार आहे, याची जाणीव करून देत होते. प्रार्थनेसाठी आलेल्या जनसमुदायासमोर ते म्हणाले, उद्यापासून आपण ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त होणार आहोत आणि मध्यरात्रीपासून देश दुभंगला जाणार आहे. उद्या जसा आनंद तसे दुःखही असेल (भारत-पाक फाळणीमुळे). स्वातंत्र्यानंतर आपल्या सर्वांच्या शिरावर ओझेही पडणार आहे. जर कलकत्त्याचा बंधुभाव शाबीत राहिला, तर भारत मोठ्या संकटातून वाचेल. जर हिंसाचाराने देश वेढून टाकला, तर नवजात स्वातंत्र्य कसे टिकून राहणार? उद्याचा स्वातंत्र्य दिन मला व्यक्तिशः आनंद देऊ शकत नाही, हे सांगताना मला खूप दुःख होत आहे. माझ्या अनुयायांनी उद्याचा दिवस उपोषण, प्रार्थना यात खर्च करावा. शक्य तेवढा वेळ सूतकताई करावी. भारताला वाचवण्यासाठी आण भाकावी. (फ्रीडम अॅट मिडनाईट. पान.180-181)
दिल्ली आनंदाच्या, उत्साहाच्या कळसावर पोहोचली होती. नव्या नवरीप्रमाणे सजवली गेली होती. देशातल्या अनेक शहरांतही असेच वातावरण होते. खेड्यापाड्यांतील लोक गावातील एखाद्या रेडिओसमोर गर्दी करून उभे होते. नव्या भारताचे स्वप्न नेहरू कसे मांडतात याविषयी त्यांना उत्सुकता होती आणि इकडे म. गांधी… त्यांच्या दृष्टीने हा पंधरा ऑगस्ट अतिशय क्लेशदायक ठरत होता. फाळणीवरून उसळलेल्या महा भयानक दंगलीमध्ये हजारो नागरिक कापले जात होते. अनेक ठिकाणी रक्ताचे थारोळे निर्माण झाले होते. म. गांधींनी झोपडीत कोंडून घेतले होते. मध्येच ते आक्रोश करायचे. भेटण्यासाठी आलेल्यांच्या मनगटावर अहिंसेचे कंकण बांधण्याचा प्रयत्न करायचे. जे राष्ट्रपिता होते, ते स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य दिनापासून, दिल्लीतल्या झगमगाटापासून, घोषणांपासून एका अर्थाने अंधार भरलेल्या झोपडीत होते. पुण्यातल्या त्या पाचशे लोकांनी 15 ऑगस्टला मिळालेल्या स्वातंत्र्याला, ते सांगणार्या तिरंग्याला नकार दिला होता. स्वतंत्र झेंडा, स्वतंत्र मार्ग आणि स्वातंत्र्याचे खोटे पांघरूण घालणार्यांचा द्वेष करत निघाले होते. नेहरू नव्या भारताचे विज्ञानवादी, समाजवादी, बंधुतावादी भारताचे स्वप्न रंगवण्यात गुंग होते. नियतीशी कसा करार होतोय, हेही खलवून-खलवून सांगत होते. म. गांधी स्वातंत्र्याच्या पुढे एक महत्त्वाचे पाऊल टाकण्याच्या प्रयत्नात होते. ते स्वप्न होते स्वराज्याचे. स्वातंत्र्य मिळणारच होते आणि त्यात गांधींना फारसा रस नव्हता. त्यांच्या छोट्या डोळ्यात स्वराज्याची मोठी स्वप्ने तरळत होती. या अगोदरच सांगितल्याप्रमाणे ती साडेपाच महिनेच टिकली. जिथून स्वप्नांचा जन्म होतो त्या काळातच गोडसेने गोळ्या घातल्या, ज्याला त्याचे चाहते आज महानायकाच्या भूमिकेत नेण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्वांत स्वराज्याचा विसर बहुतेक सगळ्यांना पडला आहे. 15 ऑगस्टचा अर्थ समजून घेण्याची मानसिकता अनेकांकडे नाही. 15 ऑगस्ट केवळ एक राजकीय घटना नव्हती, तर नवा देश, नवा माणूस तयार करण्याचा तो प्रयत्न होता आणि आहे. नव्या राष्ट्राऐवजी आपण हिंदुराष्ट्राच्या घोषणा ऐकत आहोत आणि पुण्यात जमलेल्या त्या समुदायाकडे आपण समाज नेण्याचा प्रयत्न करत आहोत की काय, हे लक्षात घेतले पाहिजे.
– पंक्चरवाला
1 Comment