हॅलोसाठी ‘वंदे मातरम्’ तर‘बाय बाय’साठी कोणते वंदे?

हॅलोसाठी ‘वंदे मातरम्’ तर‘बाय बाय’साठी कोणते वंदे?

काय झाडी, काय गाडी म्हणत आणि राजकीय बंड करणार्‍या घटकाबरोबर सत्तेवर आलेल्या महाराष्ट्रातील नव्या सरकारमध्ये आता कडवे हिंदुत्ववादी आणि प्रतिहिंदुत्ववादी, असे दोन पक्ष आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे हिंदुत्व सौम्य व्हायला लागले म्हणून त्यांच्या चाळीस सहकार्‍यांनी बंड केले. वेडात दौडले सात याप्रमाणे वेडात दौडलेले चाळीस आणि आणखी काही यांचे हिंदुत्व उतू जाणार्‍या दुधाप्रमाणे आहे. भाजपचे हिंदुत्व शांत तापणार्‍या दुधाप्रमाणे आहे. पुन्हा येईल असे आश्‍वासन पंधरा कोटींच्या महाराष्ट्राला देणारे देवेंद्र एक पायरी खाली हा होईना; पण आले. या दोघांचे हिंदुत्व विजयी झाले. स्वाभाविकच भाजपला हिंदुत्वाचा विचार वेगवेगळ्या प्रतीकांमध्ये बसवण्याची घाई झाली. सरकार किती काळ टिकेल, याचे उत्तर सरकार स्थापन करणार्‍यांकडेही नसल्याने जे काही करायचे ते हिंदुत्वाच्या, मातृभूमीच्या नावाने करून घ्या, या भावनेतून आता तोच जुना संस्कृतीचा, मातृभूमीप्रेमाचा पाठ शिकवण्याचा प्रयत्न होतो आहे. मातृभूमीचा पाठ खूप संवेदनशील असतो. एकदा या पाठात लोक शिरले, की लोक भूक, तहान विसरतात. जगण्या-मरण्याचे प्रश्‍न विसरतात. एकदिलाने वंदे मातरम् म्हणायला विसरतात. संघाला जन-गण-मन ऐवजी वंदे मातरम् हेच मुख्य राष्ट्रगीत हवे होते; पण तसे तेव्हा घडले नाही. आता त्याचे अधिक उदात्तीकरण करून ते हिंदुराष्ट्राशी जोडता येऊ शकते का, याचा प्रयत्न महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करून पाहिला. फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम् म्हणा, असा त्यांचा आग्रह आहे. फोन हा इंग्रजी शब्द आहे. तो आपल्या संस्कृतीला पूरक नाही आणि शिवाय जेवढ्या वेळेला आपण फोन करू किंवा घेऊ, तेवढ्या वेळेला आपोआपच आपल्याला मातृभूमीवर प्रेम व्यक्त करण्याची म्हणजेच वंदे मातरम् म्हणण्याची शुभ संधी मिळणार आहे. राष्ट्रभक्ती करण्याची संधी मिळणार आहे. अर्थात, कल्पना चांगली असली, तरी अन्यधर्मीयांच्या दृष्टीने ती अडचणीची ठरणार आहे. तिसेक वर्षांपूर्वीही वंदे मातरम् सर्वांनी म्हणजे शाळकरी पोरांनी म्हणणे सक्तीचे करावे, अशी चर्चा दक्षिणेकडे सुरू झाली. ख्रिस्ती धर्मीयांच्या शाळांमध्ये वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती नव्हती. यावरून खूप वाद झाला. जे वंदे मातरम् म्हणणार नाहीत, ते राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी नाहीत, असे समीकरण तयार करण्यात आले. कोणीच विचार केला नाही एखाद्याने भक्तिमय जगणे चांगले असते; पण भक्ती हा सक्तीचा विषय नसतो. भक्ती चळवळ भराला आल्याच्या काळातही सक्तीच्या भक्तीची भाषा कोणी करत नव्हते. भक्ती हा परमेश्‍वराकडे पोहोचण्याचा एक मार्ग असतो आणि सर्वांनी परमेश्‍वराकडे पोहोचलेच पाहिजे, असा कायदा कोणी करत नाही. दुसरी गोष्ट, रोज दहा वेळा, शंभर वेळा वंदे मातरम् म्हणणारे प्रत्यक्षात राष्ट्रप्रेमी बनतात किंवा असेही नाही. मुनगंटीवारांना काय साध्य करायचे होते किंवा आहे, हे कळायला मार्ग नाही. नुसतीच हूल उठवली की हिंदुराष्ट्राच्या अजेंड्यातील एक पत्ता बाहेर काढला, हे त्यांनाच ठाऊक.


हिंदुत्वाचा नारा देत सत्तेवर आलेल्या सरकारला असे काही तरी रोज करावे लागणार आहे. कर्नाटकात भाजपच्या सरकारने गावगन्ना असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा फतवा काढला आणि राबवला. गावोगावच्या पुजार्‍यांना श्रेष्ठ धर्मसेवक असे समजून त्यांना मानधन सुरू केले. महाराष्ट्रातही आता दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला जाणार आहे. दहीहंडीसुद्धा कृष्णापर्यंत पोहोचण्याचा एक अवघड मार्ग आहे. या प्रकारात जोखीम असते. अनेक गोविंदा ती घेत असतात. किती अवघड कडे पार करून तुझ्या भक्तीच्या शिखरापर्यंत पोहोचतोय, हे भक्तिगीतेच गाऊन सांगत असतात. उद्या आता या भक्ती प्रकाराचाही खेळ होईल. त्याचे आयोजक येतील कदाचित मॅचफिक्सिंगसारखे कटू प्रकारही घडू लागतील. शेवटी दहीहंडी रोज रचायची गोष्ट नसते. कृष्णाच्या नावाने वर्षातून एकदा मोठ्या श्रद्धेने रचायची असते. आता श्रद्धेचे द्वेषात रूपांतर होईल. मुनगंटीवार यांचा हॅलोला आक्षेप आहे; पण रोज त्यांच्या ओठावर येणार्‍या शेकडो इंग्रजी शब्दांना नाही. फोन संपवताना बाय बाय म्हणतात. आता त्याऐवजी काय म्हणायचे? फोन इंग्रजांनी केला हे खरे आहे; पण परकीयांनी तयार केलेल्या वस्तू, औषधे वापरूच नका अशी टोकाची भूमिका कुणालाच परवडणार नाही. जो निर्माण करतो, तोच आपल्या निर्मितीला नाव देत असतो. हॅलो, बाय बाय, मोबाइल, टेबल, हे सगळे त्यातच आहे. ज्यांनी हॅलो शब्द जन्माला घातला, त्यांनी हॅलोऐवजी आपल्याला देवाचे, धर्माचे नाव घ्या, असे का सांगितले नाही. त्यांना ठाऊक आहे, की कोणतीही गोष्ट धर्मात मिसळल्यास धर्माचेच अवमूल्यन होण्याची शक्यता असते. आता हे मुनगंटीवारांना कोण सांगणार? मातृभूमीला वंदन करण्याचा एवढा साधा-सरळ आणि कमी महत्त्वाचाच मार्ग त्यांनी का निवडावा, हेही त्यांनाच ठाऊक. आपल्याला चिन्हांकित, प्रतीकात्मक, वन डे मॅचसारखा झटपट मार्ग हवा आहे, की देश, प्रेम, मातृवंदन याविषयी गांभीर्य निर्माण करणारा मार्ग हवा आहे?

-पंक्चरवाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.