राजस्थानात कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी तेथील मातीत रुजलेला प्रतिगामी, जातिवाद आणि धर्मवादाचा घटक काही कमी होऊ शकत नाही, हे पुन्हा एकदा राजस्थानने सिद्ध केले आहे. रूपकुंवर नावाची सती याच राज्यात आणि तीही आधुनिक काळात, सती प्रतिबंधक कायदा मंजूर झाल्यानंतर जवळपास शंभर वर्षांनी जन्माला आली होती. याच राज्यात गाईवरून खूप दंगली झाल्या. याच राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार्या दलितांवर, वरातीत घोड्यावर बसणार्या दलितांवर अन्याय-अत्याचार झाले आहेत. भवरीबाईवर अमानुष बलात्काराचे प्रकरण येथे घडले. वीरांची, लढवय्यांची भूमी असलेल्या या प्रदेशात सामाजिक विषमता इतकी का चिकटून बसली आहे, हे संशोधक शोधतही असतील; पण दरम्यानच्या काळात अन्याय-अत्याचाराच्या घटना काही थांबत नाहीत. अशीच एक घटना जी मानवतेला, मनावी हक्कांना, माणुसकीला काळिमा फासणारी आहे, ती राजस्थानात घडली.
ज्या शाळेचे नाव सरस्वती आहे, त्याठिकाणी ही घटना घडली. या शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणार्या इंद्रकुमार या अस्पृश्य मुलाने वीस जुलैला तहान लागली म्हणून शाळेत ठेवलेल्या भांड्यातील पाणी प्याले. हे भांडे शाळेचा एक शिक्षक आणि याच खाजगी शाळेचा मालक असलेल्या छैलसिंग याच्यासाठी राखीव होते. अजाणतेपणातून इंद्रकुमारच्या हातून ही गोष्ट घडली. सवर्णाचे भांडे स्पर्श केल्याबद्दल त्याला बेदम मारण्यात आले. वीस दिवसांच्या उपचारानंतर म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या फक्त दोन दिवस अगोदर इंद्रकुमार मरण पावला. आपल्याला न्याय मिळावा म्हणून आई-वडील आणि समाजाने या चिमुकल्याचा मृतदेह घेऊन आंदोलन केले. आंदोलक भडकू नये म्हणून सरकारने सायला तालुक्यात असलेल्या सुराणा गावाला पोलिसांचा वेढा टाकला. इंटरनेट सेवा बंद केली. खरंच इंद्रकुमारने भांड्याला स्पर्श केल्याने मारहाण झाली का, याचा शोध पोलीस घेत आहेत. उद्या संशोधनाच्या फायली तयार होतील आणि त्यांच्या ढिगार्याखाली कारण हरवलं असे जाहीर केले जाईल. स्वातंत्र्यानंतर आणि त्याही अगोदर जातीला रोखण्यासाठी ती संपवण्यासाठी इतके कायदे झाले; पण व्यवस्था नमायला किंवा या कायद्यांना गिनायला तयार नाही. कर्नाटकात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 21 तारखेला अशीच घटना घडली. दोन वर्षांचा पोरगा नजरचुकीने मंदिरात गेला म्हणून मंदिर बाटले, अशी तक्रार सवर्णांनी केली. आता मुलगा दोन वर्षांचा. ना त्याला मंदिर ठाऊक, ना जात, ना धर्म आणि ना देव! कोपाल तालुक्यातील मियापूर गावातील सवर्ण ही गोष्ट समजून घ्यायला तयार नव्हते. त्यांनी मुलाच्या वडिलाला मारहाण तर केलीच, शिवाय मंदिराचे शुद्धीकरण करण्यासाठी तीस-चाळीस हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली. गरीब वडील इतकी रक्कम कोठून आणणार आणि कशासाठी? विशेष म्हणजे, अस्पृश्यांच्या पैशातून मंदिर कसे शुद्ध होईल? अस्पृश्य पोरामुळे मंदिर बाटते, तर त्यांच्या पैशांमुळेही बाटायलाच हवे ना! व्यवस्था असा प्रश्न निर्माण करत नाही. शूद्र जातीत जन्माला येणेच हा काहींचा गुन्हा ठरतो. कर्नाटकात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. केंद्रातले कारभारी गेल्या आठ-नऊ वर्षांत घडलेल्या अशा सर्व गोष्टींचा लाल किल्ल्यावरच्या भाषणात उल्लेख करतील असे वाटले होते; पण कसचे काय…
– पंक्चरवाला