आदरणीय बाबासाहेब!
आता तुम्हालाच जय भीम कसं म्हणणार? नमस्कार, हॅलो, केलं, तर कट्टर आंबेडकरवादी चिडतील. शिवाय नावापुढे विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्त्व तर सोडाच; पण साधं डॉ. ही लावलं नाही म्हणून सोशल मीडियातून जी काही शिवीगाळ होईल ती वेगळीच! होतं काय 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर जवळ आले, की आमच्यातला तुमचा वंश जागा होतो! तुमची जयंती ते पुण्यतिथी यामध्ये आम्ही कुठे असतो ते विचारू नका. तेव्हा आम्ही आमचे असतो.
ज्या दोन-तीन गोष्टी तुम्ही आम्हाला दिल्यात, उदा. आरक्षण, बौद्ध धर्माची दीक्षा, बावीस प्रतिज्ञा, त्या आणि त्याच्या जोडीने पीपल्स एज्युकेशन सोसायटी, रिपब्लिकन पक्ष, मिलिंद महाविद्यालय, सिद्धार्थविहार हॉस्टेल, असं जे काही तुमच्या हयातीत दिलंत ते. त्याच्याबद्दल जर तुम्ही आम्हाला काही विचारलंत तर सॉरी बाबासाहेब, आम्ही तुम्हाला जे सांगू ते ऐकून तुम्ही उद्विग्न व्हाल, खंतावाल; पण आम्ही तुम्हाला म्हणू फार मनावर नका घेऊ! कारण आम्हीही हल्ली फार मनावर घेत नाही!
झालंय काय बाबासाहेब, आरक्षणातून शिक्षण आणि नोकरीत आपल्या जवळपास चार पिढ्या स्थिरावल्यात. गावगाड्यातील जातीयता, अस्पृश्यता आता बर्यापैकी रिमोट एरियापुरती मर्यादित आहे. तुम्हाला जाऊन पन्नास वर्षे झाली. महाराष्ट्रात तरी धर्मांतराने जो बदल घडवला तो आणि राज्य म्हणून बदलत्या महाराष्ट्रात महारवाडे बौद्धवाड्यात बदलले, शिवाय वाढत्या शहरीकरणात संमिश्र वस्तीत धर्मांतरित बौद्ध सामावून घेतला गेला. त्यामुळे त्याच्या पुढच्या पिढ्या देशात इंग्रजी माध्यमात शिकून, उच्च शिक्षणासाठी व नोकरीसाठी परदेशात पोहोचल्यात. हुशार आहेत; पण पूर्वेतिहासापासून पूर्ण अनभिज्ञ! कारण संमिश्र वस्तीत पूर्वीसारखी थेट जातीयता नसते. सटल असते. म्हणजे आडनाव. घरातले देव, फोटो वगैरेवरून जात शोधतात. हल्ली बीसी, सरकारी जावई वगैरे पण नाही म्हणत. कोटावाले म्हणतात.
शहरात एक जबरन सरमिसळ असते. पाहिजे तिथे अंतर राखून बाकी काहीच पाळत नाही, हा शहराचा स्वभाव असतो. म्हणून तर तुम्ही गांधी खेड्यांकडे चला म्हणत होते, तेव्हा म्हणालात शहरात चला. तुम्ही दूरदर्शी होता. शहरांना सेक्युलर व्हावंच लागतं. आता जागतिकीकरण व इंटरनेटच्या जमान्यात तर सनातन्यांची फार तारांबळ होते. म्हणून ते हिंसकही होताहेत. असो. तर शहरात येऊन आम्ही काय केलं? तर तुम्ही म्हणायचात ना शासनकर्ती जमात व्हा! तर राजकीय नाही; पण प्रशासनात आपले आयएएस व आयपीएस, आयएफएस वगैरे शासनकर्ती जमात म्हणता येतील इतक्या संख्येने नक्कीच आहेत; पण ते आहेत. आपापल्या जागी स्थिरावलेत. प्रशासन व राज्यकर्ते या संबंधाना सरावलेत. आपल्या जातीच्या युनियन, संघटना असतात.जयंती, पुण्यतिथीला ते थोडा हात सैलही करतात. व्याख्यानमाला, एखादा पुरस्कार वगैरे चालू असतं.
तुम्ही बौद्ध धम्म दिलात, तर आम्ही सध्याच्या काळात विपश्यना, झेन बुद्धिझम वगैरेही करतो. पाली शिकतो. शिकवतो; पण हे सगळं आतल्या आत. बाकी वस्ती पातळीवर बुद्धविहारं असतात, त्यात चिवरधारी पण अवलंबून असलेल्या भिक्खूनांही वस्त्या सांभाळून असतात. काही ठिकाणी तिबेटी भिक्खूही आणतात. कधी जयंतीला, कधी लग्नात पण त्यांचं कर्मकांड इतकं लांबतं, की यजमानांना कळत नाही, हे आता कसं आवरावं. कारण हिंदुंत जसे बामण नेमकं काय म्हणतोय हे बामणांनाही कळत नाही, तसं तिबेटी भिक्खूचं बुद्धस्तवन भारतीय, विशेषत: महाराष्ट्रीय बौद्धालाही कळत नाही!
म्हातारेकोतारे निमूट ऐकत बसतात. लहान मुले बागडत बसतात. तरुण गायब असतात व मध्यमवयीन पुढचं आटोपून पटकन मोकळं व्हायच्या चिंतेत असतात. आधीच कमिटीतले मानापमान काय कमी नसतात. मग काही जण करणारांची फजिती बघायला वा उडवायला आलेले असतात. बायाबापड्या नटूनथटून मराठी, हिंदी मालिकांच्या प्रभावातून वटपौर्णिमा वा करवा चौथला पॅरलल; पण निळी/पांढरी वेशभूषा करून वावरत वा मिरवत असतात. त्यांच्यातही मिस्टरांच्या श्रेणीनिहाय मानपान असते. तुम्ही हिंदू धर्माला रिप्लेसमेंट दिलीत आम्ही हिंदूंना पॅरलल बौद्ध कर्मकांड व प्रतीकांची निर्मिती करून कडवेपणाची एकमेकातच स्पर्धा लावतो. कोण जय भीम जोरात म्हणतो, कोण आवाज चोरतो, कोणाच्या घरी केवढा फोटो, कोण बुद्धवंदना घेतो, कोण ती नुसतीच पुटपुटतो, अशी सर्व वर्गवारी करून कौन बनेगा कट्टर बौद्ध आंबेडकरवादी? असा एक खेळ चालू असतो.
घरात दर्शनी भागात पुस्तकांची शोकेस आणि पुरस्कार व स्मृतिचिन्हांची आरास राखणार्यांचे वेगळेच बाबासाहेब असतात. यातले बरेचसे प्राध्यापक, साहित्यिक, वकील वा राजकीय-सामाजिक ‘अ’ वर्ग कार्यकर्ते असतात. हे स्वत:ला आंबेडकराईट म्हणवतात. तुमचा बायोडेटा सनावळ्यांसह पाठ असतो. 1956 पर्यंतचा इतिहास हेच भांडवल. हिंदू धर्म चिकित्सा व कठोर टीका. बुद्धाची थोरवी. गांधींवर, मार्क्सवर, दणकून प्रहार. समाजवादी कम्युनिस्टांसह रिपब्लिकनमधला आपल्या जवळचा तुकडा सोडून इतरांना शिव्याशाप. शेवटी मानधनाचे पाकीट व खाणेपिणे या निरोपसमारंभातही शेरेबाजी. आत्मस्तुती व आयोजकाला शाबासकी देतानाच ‘तूही कसा नालायक व नादावतोस’ अशी शिकवणी घेणारा हा वर्ग म्हणजे बाबासाहेब तुमच्या भांडवलावर आपली पतपेढी चालवणारा मर्यादित क्रियाशील आंबेडकरवादी!
बाबासाहेब राजकीयदृष्ट्या तर आपण अगदीच बेदखल झालोय. माफ करा; पण तुमचे नातू-पणतू वगैरे आहेत राजकारणात. इतर पक्ष त्यांची राखीव दखल घेतात; पण त्यांच्यात सर्वांना पंखाखाली घ्यायची तुमच्याएवढी क्षमता नाही. पुन्हा माफ करा; पण तुमचे थेट वारस व तुमचा वारसा सांगणारे यातच इतका विसंवाद आहे, की एकी हा शब्द निव्वळ व्याकरणासारखा वा तितपतच उपयोगी येतो.
तुमच्या महापरिनिर्वाणानंतरच जी शकले पडत गेली, ती उत्तरोत्तर वाढतच गेली. नाही म्हणायला दलित पँथर नावाचे एक वादळ आले आणि गेले. नुकतीच आम्ही त्या वादळाची पन्नासावी जयंती व पुण्यतिथी एकत्रच साजरी केली. अर्थात, रिवाजाला धरून गटातटातच केली!
बाबासाहेब सध्या बौद्धांची गंमत अथवा गोची अशी झालीय, की आंबेडकरवाद्यात जसे गट-तट असतात, तसे या नवबौद्धातही गट-तट आहेत. पहिल्या गटात बावीस प्रतिज्ञावाले कट्टर, रविवारी शुभ्र वस्त्रांसह विहारात जाणारे. सर्व कार्यात बुद्धवंदना, त्रिशरण म्हणणारे. बौद्ध धर्मकार्य करणारे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत म्हणणारे. आयुष्यमान, आयुष्यमती संबोधणारे, स्मृतिशेष असा उल्लेख करणारे आणि हे न करणारे वा करताना लाजणारे वा मनोभावे न पाळणारे कट्टर गटाच्या द्वेषपूर्ण रोषास पात्र असतात.
दुसरा एक वर्ग विपश्यना, पाली, झेन बुद्धिझम, ओशोचा बुद्ध यांसह थेरीगाथा वगैरेंवर विद्वत्तापूर्ण चर्चा करत तत्त्वज्ञानाच्या अंगाने सारा भारत बौद्धमय करायचं स्वप्न पाहतानाच इतिहासात कसं बौद्ध धर्माचं उच्चाटन केलंय आणि आतासुद्धा विचारांच्या पातळीवर बुद्धाला बेदखल वा हायजॅक करताहेत, यावर उच्च पातळीवर बौद्धिक परामर्श करत असतो. इथेही एकमत होते असे नाही. अशा विद्वानांच्या तावडीत जो सापडतो तो स्वत:ला अज्ञानी समजून शरमिंदाच होतो. बौद्ध असूनही आपण बौद्ध साहित्य, विचार याबाबत काहीच करत नाही, या भावनेने खजील होतो. फक्त एका गोष्टीचा आनंद होतो, की पूर्वाश्रमीचे महार आता बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक म्हणून देश-विदेशात नाव गाजवत असतात. हे केवळ तुमच्यामुळे झालेय बाबासाहेब!
असे विचारवंत, लेखक समाजापासून चार हात अंतर राखूनच असतात. यांचं व्याख्यान 14 एप्रिल वा 6 डिसेंबर योग्य नसतं. त्यांची विचारपीठे विद्यापीठीय अथवा साहित्यिक कार्यक्रमात असतात. डिस्कोर्स, परामर्श वगैरे परिभाषा शिकावी लागते. इथले वा यांचे बाबासाहेब वेगळेच असतात. यातही केवळ अकादमिक म्हणवून घेणारे, तर काही स्ट्रॉन्च आंबेडकराईट म्हणवून घेणारे असतात. यांची शाब्दिक युद्धेही ग्रंथबद्ध होतात. विविध सेमिनार्सची शोभा वाढवतात. आंबेडकरी स्कॉलर अशीही ओळख यांची असते. काही मिरवतात, काही लपवतात, काही संदिग्ध ठेवतात.
बाकी वस्ती पातळीवर बाबासाहेब तुम्ही तसेच आहात जसे पन्नास वर्षांपासून आहात. वस्ती, नगर, कॉलनी महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात, शहरात, तालुक्यात असो. तिचा चेहरा सारखाच असतो. बैठ्या चाळी, मध्येच दुमजली वा तिमजली इमला. हा बहुधा तिथल्या राजकारणी वा समाजसेवकाचा असतो. वस्ती, कॉलनी, नगराच्या प्रवेशद्वारी धूळभरली सांचीची कमान, त्यावर रंग उडालेले निळे झेंडे, क्वचित बौद्ध धर्माचा झेंडा, पक्षांचे, गटांचे नोटीस बोर्ड, वाढदिवसाचे फ्लेक्स. ठरावीक ठेवणीतले चेहरे, क्वचित मिश्र वस्ती असेल, तर दर्गा व मशीदही असते. हातगाडीवाले, किराणावाले क्वचित वा कायम एक पोलिस व्हॅन. 14 एप्रिलचा पूर्वीचा कव्वाली सामन्यांचा जमाना जाऊन नवे डीजे आलेत. वामन कर्डक, श्रावण यशवंते, प्रल्हाद शिंदे जाऊन आनंद आदर्श शिंदे, वैशाली भसाने, असे नवे आवाज व हिंदी गाणी असतातच. काही जण व्याख्यान वगैरे ठेवतात; पण वक्ताही तुमच्या चरित्राचे रिपीट भाषण करतो. या भाषणात आरपीआय पुढार्यांवर तोंडसुख घेणं हे टाळीसाठी आवश्यक ठरते. ‘सुरामेय मज्ज पमाद ठाणा’चा सोइस्कर विसर पडून वा पाडून घमघमाट, बाचाबाची व कोपर्यावरच्या हॉटेलातली ऐपतीतली ऐश किंवा उधारीत भर वर्गणीतून जमा झालेली रक्कम खर्च कुठे व कशी हे जमा करणार्यांच्या चाल-चलन, चरित्राच्या पूर्वेतिहासवर अवलंबून असते. बाबासाहेबांसाठी काय पण, एकच साहेब बाबासाहेब, ही नवी अभिमानचिन्हे आहेत. बाकी पुतळा, अर्धपुतळा, निळा कोट, गुलाबी ओठ, काळा गोल चष्मा, निळीची उधळण, निळ्या पताकाच्या जोडीने आता निळी उपरणे, गमछे आलेत. या सर्वांना वाटते. शिकलेले, पॉश एरियात राहणारे, बंगलेवाले बेइमान, दलित ब्राह्मण किंवा बाबासाहेबांच्या नावे नोट छापणारे. तुमचेच अनुयायी वेगवेगळ्या प्रवर्गांत वेगवेगळ्या विभागांत आजही!
बाबासाहेब सध्या कला क्षेत्राला फार महत्त्व आलेय. कलेला शूद्र मानणारे सवर्ण व त्यातूनही ब्राह्मण स्त्री-पुरुष तर असे वावरतात, की या कला त्यांच्या रक्तातच होत्या! सध्या कलेचा व्यापारच चालू आहे आणि ब्राह्मणांनी त्यात अलिखित मक्तेदारी निर्माण केलीय. प्रवर्गाच्या भाषेत बोलायचं, तर दलित, ओबीसी, भटके, या वर्गांतील कलाकारही सर्वमान्यता मिळवून लोकप्रिय झालेत. त्यांची आंतरजातीय/धर्मीय लग्नं झालीत. आता इथे जो बौद्ध कलाकार असतो, स्त्री किंवा पुरुष त्याला आपली जात वा धर्म खुलेपणाने सांगायची सोय नसते. लगेच मक्तेदार गँग त्यांचं एलिनिमेशन करायला सरसावतात; पण काही कलाकार इतके गुणवान वा लोकप्रिय असतात, की त्यांना एलिनिमेट करणं अवघड असतं. या कलाकारांची गोची तेव्हा होते, जेव्हा त्यांचा जोडीदार सवर्ण वा बौद्धेतर असतो. त्याला व्यवसायाची गरज म्हणून हिंदू सणवार, चालीरीती याचा भाग व्हावा लागतो. बुद्धाची कलात्मक मूर्ती खपून जाते; पण तुमचा फोटो दर्शनी ठेवायचा म्हणजे ओळख उघड करणे. काही जण तेही करतात. अभिमानाने करतात; पण मक्तेदारीवाले ते बाजूला सारून बाकी गोष्टीच प्रोजेक्ट करतात. हे जे कलाक्षेत्रातले बाबासाहेब तुम्ही ना अनेकदा अंडरग्राउंडच राहता! किंवा व्यवस्था तुम्हाला अंडरग्राउंडच ठेवण्यात दक्ष असते.
आपल्यात आता उद्योजकही तयार झालेत. त्यांची संघटनाही आहे. ज्यात दलित हा शब्दही आहे. गंमत बघा बाबासाहेब, ज्या सवर्णांना साहित्य वा नाटकात दलित शब्द खटकत होता, त्यांना उद्योगात तो चालला! दलित उद्योजक म्हणून वेगळी ओळख ठेवू पाहणारे आदिवासींना वनवासी ठरवून, शबरी नि एकलव्याची प्रतीके सोयीने वापरणारेच आहेत, हे तुम्ही ओळखले असेलच बाबासाहेब!
हिंदुत्ववाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसविण्याचे त्यांचे हे उद्योग पाहिले, की वाटते सांगून धर्मांतर केलेल्या महामानवाची घरवापसी कशी काय होईल? पण त्यांनाही तुमचीच गरज आहे. आश्चर्य त्यांचे वाटते जे तुमचा डीएनए सांगतात, ते हे कलम खपवून कसे घेतात?
बाबासाहेब तुम्ही खो खो हसाल; पण आता गरीब सवर्णांनाही 10% आरक्षण संसदेसह सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलंय! या आरक्षणातून मेरिट कसं मोजणार? यातून जे डॉक्टर, इंजिनिअर होतील त्यांनी रोगी दगावले वा पूल पडले तर? बाबासाहेब आता जरा आणखी जोरात हसा. गावगाड्यात कुळांची माजोरी दाखवत ज्यांनी सर्वांत जास्त शोषण केलं, घरदारं पेटवली, बाया नासवल्या, गायरानं बळकावली, नामांतराच्या लढ्यात जिवंत जाळले, डोळे काढले, त्या मराठ्यांना आता मागासवर्गीय म्हणून आरक्षण हवंय. ओबीसीतून, सवर्णातून नाही, तर सामाजिक मागासवर्गातून आरक्षण हवंय! काही राज्यांत तर आता 82% आरक्षण लागू झालंय. त्यामुळे सर्वजातीसंमत एक नवेच बाबासाहेब देशात जन्माला आलेत!
बाबासाहेब महाराष्ट्रात तुमचा किंवा आपला म्हणूया समाज जो आहे ना तो फक्त आर्थिकच नाही, तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत क्रीमिलेअर गटात गेलाय. त्यामुळे तो जमेल तसे, सोसवतील इतपत बाबासाहेब आठवतो, जपतो, चालवतो. बाबासाहेब तुमची महत्ता आता उत्तर भारत, दक्षिण भारत व ईशान्य भारतातही सर्वांना तीव्रतेने जाणवतेय. महाराष्ट्रातले आंबेडकरवादी निवांत झालेत, तर उत्तरेत व दक्षिणेत अधिक क्रियाशील झालेत. त्यात नवहिंदुत्ववाद्यांनी सरदार पटेलांसोबत तुम्हालाही हायजॅक केल्याने त्यांच्यासाठी बाबासाहेब तुम्ही म्हणजे हातचा एक झालाय! राखून ठेवून सोयीने वापरायचा!
बाबासाहेब तुम्ही दलितांचे, पूर्वाश्रमीच्या व आजही कुठे कुठे ठेवलेल्या अस्पृश्यांचे नेते, बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करून त्याची दीक्षा घेताना सांगून हिंदू धर्माचा त्याग करणारे बंडखोर, विद्रोही धर्मसुधारक, प्रसारक, नेते, अशी जी तुमची ओळख होती वा आहे ती पुसून केवळ न केवळ संविधानाचे निर्माते म्हणूनच तुम्हाला जास्त मिरविले जाते, गौरविले जाते. कारण सर्वांना आरक्षण हवेय व हिंदुराष्ट्र स्थापायचं झालं, तरी संविधानाच्या चौकटीतच ते तुमच्याच नावे कसं स्थापता येईल, अशा प्रयत्नात एक यंत्रणा काम करतेय. भगतसिंह व विवेकानंदांप्रमाणे तुम्हाला भगव्या शालीत लपेटण्याचे षड्यंत्र रचले जातेय बाबासाहेब!
बाबासाहेब हल्ली पोरांना खेळायला पझल्स मिळतात. त्यात एका प्रतिमेचे तुकडे करून ठेवलेले असतात. ते जुळवत चित्रं पुरं करायचं. एकसंघ करायचं असतं. तुम्हालाही तशा तुकड्यात विभागलंय. जो तो आपला तुकडा घेऊन तुम्हाला एकसंघ करू पाहतोय!
यातली वाईट गोष्ट ही, की एकसंघतेच्या नावाखाली आधी तुमचं विभाजन केलं जातंय! 6 डिसेंबरला भेटूच. मग 14 एप्रिलपर्यंत तुम्ही तुमचे आम्ही आमचे!
– संजय पवार
(लेखक ज्येष्ठ नाटककार व विचारवंत आहेत.)