भारताचा ब्रिटिशकालीन इतिहास आणि त्यानंतरचा बराच कालखंड काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस स्थापन झाली ती एक सांस्कृतिक संवाद साधणारी संघटना म्हणून. अलॅन ह्यूम तिचे संस्थापक आणि सदस्य होते बहात्तर. ह्यूम हे निवृत्त ब्रिटिश होते. म्हणजे आजच्या आयएएस श्रेणीतल्या अधिकार्यासारखे. 1857 च्या बंडानंतरची ही घटना होती. भारतातील शिकल्या-सवरल्या व्यक्तींमध्ये नागरी आणि राजकीय संवाद साधण्यासाठीचे एक व्यासपीठ म्हणजे काँगे्रस होती. 28 डिसेंबर 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँगे्रस (इंडियन नॅशनल काँगे्रस ‘आयएनसी’) स्थापन झाली. मुंबईतल्या गोकुळदासमध्ये स्थापन झालेल्या काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते बॅनर्जी. पहिल्या दोन दशकांत काँग्रेसने नागरी हक्क, प्रशासन, अर्थकारण, घटनात्मक बाबी, परराष्ट्र नीती, अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू केल्या आणि भारतीय राष्ट्रवादाचे बीजारोपण केले. एक जहाल पिढी काँग्रेसच्या नेतृत्वात जशी तयार झाली होती, तशी गोखले, मेहता यांच्या रूपाने एक उदारमतवादी किंवा मवाळ पिढीही होती. गोखलेंनी उघडपणे लोकमान्य टिळकांच्या जहाल भूमिकेला विरोध केला होता. याचदरम्यान प्रथम राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा, यावरही वाद सुरू झाला. यात टिळक राजकीय सुधारणांच्या बाजूने होते. पुण्यातल्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी सामाजिक विषयांवर चर्चा करण्यास विरोध केला. विठ्ठल रामजी शिंदे यांचा त्याबाबतचा बेत हाणून पाडला.
प्रारंभी, काँग्रेसचे अध्यक्षपद फक्त एका वर्षासाठी होते; पण अपवाद म्हणून काहींना ते दोन वेळाही मिळाले होते. अनेकदा परकीय वाटावेत असे लोकही अध्यक्षपदावर आले, जे स्थापनेच्या वेळीही होते. बॅनर्जी, नौरोजी, तयबजी, फिरोज मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, सयानी, गोखले, मालवीय, वेडरबर्न, अॅनी बेझंट, असा प्रवास करत नेहरू घराण्यात पहिल्यांदा अध्यक्षपद आले ते 1919 मध्ये. म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेनंतर चौतीस वर्षांनी. त्यानंतर 1924 ला महात्मा गांधी अध्यक्ष झाले, ते फक्त एकाच वर्षासाठी. पुढे मी काँग्रेसचा एक पैशाचा सदस्य नाही, असे ते म्हणत. कोलकात्याच्या अधिवेशनात म्हणजे 1928 ला पुन्हा एकदा मोतीलाल नेहरू अध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यांचे पुत्र जवाहरलाल नेहरू 1929 व 1930 ला अध्यक्ष झाले. त्यानंतर वल्लभभाई पटेलही अध्यक्ष झाले. स्वातंत्र्याची चळवळ महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भरात आली होती आणि तत्पूर्वीच नेहरू-गांधींनी काँग्रेसमध्ये आपले स्थान भरभक्कम केले होते. ते लोकप्रियतेच्या शिखरावर होते. 1947 ला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जे.बी. कृपलानी अध्यक्ष होते, तर 1953 मध्ये नेहरू यांनी पंतप्रधानपदाबरोबरच काँगे्रसचे अध्यक्षपदही स्वीकारले. 1953 ते 54 आणि 1955 ते 56 ते अध्यक्ष होते. 1959 ला इंदिरा गांधी यांच्या रूपाने तिसरी पिढी अध्यक्षपदावर आली. फिरोज गांधी यांच्याशी विवाह झाल्याने त्या नेहरूंच्या गांधी बनल्या आणि गांधी घराण्याची कारकीर्द सुरू झाली. इंदिरा गांधी 1978 ते 83 अध्यक्ष होत्या. त्यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी 1985 ते 1991 पर्यंत अध्यक्ष होते. त्यांच्या हत्येनंतर म्हणजे नरसिंहराव व केसरी यांच्यानंतर सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या. पंतप्रधानपद स्वतःकडे त्यांनी ठेवले नाही; पण 1998 ते 2017 आणि 2019 ते 2022 अशी त्यांची सर्वांत दीर्घ कारकीर्द झाली. मध्ये त्यांचे पुत्र राहुल गांधी यांची कारकीर्द 2017 ते 2019 अशी झाली. काँग्रेसचा इतिहास 137 वर्षांचा आणि नेहरू-गांधी घराण्याची कारकीर्द पन्नास वर्षांचीही दिसत नाही, तरीही काँग्रेसचे विरोधक काँगे्रसवर घराणेशाहीचा अरोप करतात. काँगे्रसला एकूण 61 अध्यक्ष लाभले. त्यापैकी गांधी-नेहरू घराण्यातील पाच होते. अर्थात, 137 वर्षे काँग्रेसचे सदैव बरेच चालले होते, असेही समजण्याचे काही कारण नाही. भारताच्या राजकीय इतिहासात सर्वांत जास्त तुकडे पडले ते काँग्रेसचेच. प्रत्येक तुकड्याने आपापल्या नेत्याच्या नावाने काही काळ हा तुकडा चालता-बोलता ठेवला. काही तुकडे काँग्रेसमध्ये पुन्हा विलीन झाले. काही पुन्हा बाहेर पडले. पहिली फूट 1907 मध्ये सुरत अधिवेशनात पडली. त्यानंतर 87 वेळा फूट पडली. 137 वर्षांत 87 वेळा फूट म्हणजे प्रत्येक दोन-अडीच वर्षांना एक फूट, असा प्रवास होता आणि जो आजही चालू आहे. समाजवादी, साम्यवादी, हिंदुत्ववादी, प्रादेशिक, असे अनेक घटक बाहेर पडले. त्यांनी स्वतःच्या चुली सुरू केल्या. विशेष म्हणजे केवळ काँगे्रस नव्हे, तर अनेक प्रादेशिक पक्षांत घराणेशाही चालू आहे. तामिळनाडूत एडीएमके आणि डीएमके, आंध्रात तेलुगू देसम, ईशान्य भारतात असेच काही पक्ष, काश्मीरमध्ये अब्दुला अजून किती तरी नावे सांगता येतील, की जेथे अजूनही घराणेशाहीच आहे. पूर्वीच्या अनेक संस्थानिकांमध्येही घराणेशाही आहे आणि अनेक नेत्यांच्या कुटुंबांतही घराणेशाहीच आहे. हे सर्व सोडून नरेंद्र मोदींनीही काँग्रेसमधील घराणेशाहीला लक्ष्य केले. आपल्या पक्षात गेल्या साठ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या घराणेशाहीकडेही दुर्लक्ष केले आणि काँगे्रसमुक्त भारत तयार करण्याचा म्हणजे विरोधी पक्षमुक्त भारत बनवण्याचा विडा उचलला आणि रोज ते दहा वेळा हा विडा चघळताहेत. लाल किल्ल्यापासून ते गुजरातपर्यंत फक्त ते हेच बोलतात. कारण भाजपला आजही खरा धोका आणि खरे आव्हान आहे ते काँगे्रसचेच. हे आव्हान परतवून लावण्यासाठी फक्त काँग्रेससाठीच घराणेशाहीचा पत्ता वापरला जातोय, जो यशस्वी होण्याची सुतराम शक्यता नाही.
आता देशात विविध ठिकाणी घराणेशाही का निर्माण झाली? सहकार, उद्योग, संस्कृती अशा अनेक ठिकाणी घराणेशाही आहे. राजकारणात ती थोडी जास्त दिसते. कारण हे क्षेत्र अधिक मोठे आहे. लोकशाही असतानाही लोक घराणेशाही का स्वीकारतात? या प्रश्नाचे साधे उत्तर लोकांना ती आवडते. लोकांनी आपल्या गरजेपोटी ती स्वीकारली आहे. त्यातूनच एकेक नेता दहा-पंधरा वेळा निवडून येतो. आपली घराणेशाही तयार करतो. कारण लोक त्यांना पाठिंबा देतात. लोक ज्या मानसिकतेचे असतात त्याच मानसिकतेचे नेते बनतात. भारताचा इतिहास दीर्घ असला तरी तो राजेशाहीचा, घराणेशाहीचा, मोगल इंग्रजशाहीचाच आहे. आपल्या देशात लोकशाहीचे वय अवघे 75 वर्षांचे आहे आणि लोकशाहीशिवायचे वय हजारो वर्षे आहे. लोकशाही नको ठोकशाही पाहिजे म्हणणार्यांनाही लोक पाठिंबा देत होते आणि वडिलांनंतर नातवालाही पाठिंबा देत होते. एखाद्याने किती वेळा निवडून यावे याविषयी आपल्याकडे नियम नाही. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्येही घराणेशाही मुक्त संचार करताना दिसते. ती संपवायची असेल, तर जनतेला लोकशाहीच्या अंगाने साक्षर बनवावे लागेल. संविधान साक्षर बनवावे लागेल. तसे न करता केवळ सत्तासंघर्ष म्हणून एखाद्याला सतत झोडपणे अनैतिक आणि स्वार्थीपणाचे आहे. स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दडवून दुसर्याच्या डोळ्यातील कुसळ दाखवण्यासारखे आहे. हे करताना काँग्रेसच्या घराणेशाहीने स्वातंत्र्यपूर्ण आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे कुठे आणि कसे नुकसान केले, हेही सांगितले पाहिजे. ‘भारत दौड़ रहा है’ असे म्हणणार्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की धावण्यासाठी रस्ता काँग्रेसनेच बनवला आहे. काँगे्रसच्याच अनेक नेत्यांनी सर्वोच्च त्याग केला आहे. भाजपचे असे कोणते नेते आहेत, की ज्यांनी तुरुंगवास भोगला आणि बलिदान केले. काँग्रेसचा त्याग, त्यांची धर्मनिरपेक्षता, देश अखंड ठेवण्याचे प्रयत्न, विकासाचे प्रयत्न लोकांना भावले म्हणून लोक काँग्रेसच्या बाजूने आणि तिच्यातील कथित घराणेशाहीच्या बाजूने उभे राहिले. निवडणुकीत ती मागे पडली असली तरी लोक तिच्याच बाजूने उभे आहेत. राहुल गांधींच्या ‘भारत जोड़ो यात्रेच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा सिद्ध होते. निवडणूक निकाल हेच फक्त एखाद्याच्या अस्तित्वाचे चिन्ह नसते. भाजप दोनवरून दोनशेपर्यंत पोहोचण्यास पन्नास वर्षे लागली. याचा अर्थ पन्नास वर्षांत भाजपचे अस्तित्व नव्हते, असे समजायचे काय? कोणतीही शासन पद्धती लोकांच्या मनात जन्माला येते, राष्ट्रही तेथेच जन्माला येते आणि हो घराणेशाहीही तेथेच जन्माला येते.
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे चाललेल्या काँग्रेसमध्ये घराणेशाही किती काळ होती, हे आपण पाहिलेच आहे. काँगे्रसचे राजकीय चारित्र्य काय? काँग्रेस शेठजी-भटजींची आहे, अशी टीका खूप वर्षांपासून तिचे विरोधक करतात; पण तेही फारसे खरे नाही. महात्मा गांधींचा भारतात उदय झाला आणि शेठजी-भटजी दूर फेकले गेले, असाही इतिहास आहे. स्वातंत्र्यासाठी उत्सुक झालेल्या सर्व जाती-धर्मांतला फाटकातुटका माणूस गांधींच्या मागे उभा राहिला आणि काँगे्रसचे राजकीय, सामाजिक चारित्र्य बदलू लागले. काँगे्रस दलितांची झाली, अल्पसंख्याकांची झाली आणि सत्ताकेंद्रात तेथूनही वेगवेगळे घटक येऊ लागले. बाबू जगजीवन राम काय, त्यांची कन्या काय, महात्मा गांधींनी मोठ्या आदराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे दिलेल्या जबाबदार्या काय, सीताराम केसरी काय, ख्रिस्ती, मुस्लीम, जैन आदी अल्पसंख्याक ठरवल्या गेलेल्या धर्मांतील लोक काय, या सर्वांना घेऊन काँग्रेस चालत राहिली. कारण तिचे घटक तिची राजकीय शक्ती होते. प्रश्न होता तो काँग्रेसच्या नेतृत्वाचा. स्वातंत्र्यानंतर बरीच वर्षे या पक्षाचे नेतृत्व नेहरू-गांधी घराण्याकडे राहिले; पण 75 वर्षे ते त्यांच्याकडेच होते, असे म्हणणे बरोबर नाही. निम्म्याच्या जवळपास होते, असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. याच काळात अन्य पक्षातही वरच्या वर्गाचे नेतृत्व होते. त्याला भाजप, कम्युनिस्ट, असे कोणी अपवाद नाही. भाजपने एकदा-दोनदा नेतृत्व बदलण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने अगदी अलीकडे आपला राष्ट्रीय नेता दलितवर्गातून आणला. भाजपने आंबेडकरी नेतृत्वात फूट पाडून बरेच नेते आपल्याकडे खेचले. या सर्व पार्श्वभूमीवर गेली 20-25 वर्षे काँगे्रसचा अध्यक्ष गांधी घराण्यातीलच होते. आजोबा, वडील, मुलगी, नातू, सून, पणतू, असा हा प्रवास आहे; पण तो सलग नाही, पन्नासेक वर्षांचा आहे. काँग्रेसचे नेतृत्व हे येथील जनतेच्या जगण्याचा आविभाज्य भाग बनले आहे. याच नेतृत्वाच्या नावाने निवडणुका जिंकल्या किंवा हरल्या जातात. जसे भाजप हिंदुत्वाच्या नावाने आणि डावे मार्क्सच्या नावाने लढतात. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दीर्घ इतिहासाने कूस बदलली आणि सलग बावीस वर्षांनंतर निवडणुकीद्वारे अध्यक्षपदाची निवड केली आणि खुल्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांचा विजय झाला. कोणत्याही पक्षात अध्यक्षपदासाठी राखीव जागा नाहीत, हेही लक्षात ठेवावे लागेल. खूप वर्षांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दलित समूहातून अतिशय कष्टाने, जिद्दीने आणि दीर्घ लढाई करून आलेला माणूस अध्यक्ष झाला आहे. खरगे यांना मिळालेली प्रचंड मते स्वाभाविकच काँग्रेसच्या सामाजिक प्रतिमेकडे बोट करतात. एका दलिताचा पराभव करणे काँग्रेसमधील लोकांना सहज शक्य होते; पण तसे झाले नाही. वरच्या नेतृत्वापासून खालच्या फळीपर्यंत सर्वांनीच खरगे यांना पाठिंबा दिला आणि एका अर्थाने आपले लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष चारित्र्य स्पष्ट केले आहे. भाजपचा नेता आणि नमो असणार्या मोदींना जे जमले नाही, ते काँग्रेसने करून दाखवले आहे.
मोदींनी टीका केली म्हणून काँगे्रसने निवडणूक घेतली, असे समजणे घाईचे होईल. निवडणुकीत पराभव झाला म्हणून निवडणूक घेतली, असे म्हणणेही चुकीचे होईल. कारण गेल्या 75 वर्षांत बिगर गांधी कुटुंबातील किमान तीस-चाळीस तरी अध्यक्ष झाले आहेत. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनियांनी पंतप्रधान व्हावे, असे सर्वांनाच वाटत होते; पण त्यांनी ते ठामपणे आणि विनम्रतेने नाकारले. नरसिंहराव पंतप्रधान आणि अध्यक्ष झाले होते. या सार्याचा नीट अर्थ समजावून घ्यावा लागेल. एकीकडे पक्षाला आतून आणि बाहेरून तयार होणारी आव्हाने, हिंदुत्वाच्या लाटेला शरण जाणारे अनेक घटक आणि दुसरीकडे सैल जिभेने स्वतःवर होत असलेली टीका सहन करत त्यांनी काँग्रेस नावाचे घरटे जपून ठवले. भाजपने किती दलित मुख्यमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री केले आणि काँग्रेसने किती केले याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्रयस्ताने केला, तर उत्तर काय येईल? एक दीर्घ परंपरा असलेला पक्ष टिकवण्याचे सामर्थ्य सोनियांनी मिळवले आणि तेथील पद सोडून राहुल गांधी भारत जोडो यात्रेला निघाले. अध्यक्षपदी खरगे विराजमान झाले.
इतिहास कूस बदलत असतो आणि तसे केल्याशिवाय त्याला वर्तमानात, भविष्यात पाऊल टाकता येत नाही. त्यांच्याकडे सामर्थ्य असते तेच कूस बदलतात, हेही तितकेच खरे आहे. इथे काँग्रेसच्या इतिहासाने आणि खरगे यांच्या कारकीर्दीनेही कूस बदलली आहे, ती एक नवे वर्तमान घडवण्यासाठी. खरगे यांच्या पक्षनिष्ठेबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कोणीही शंका घेऊ शकत नाही. सारे आयुष्य पक्ष आणि समाजाची सेवा करण्यात त्यांनी खर्च केले आहे. मतदारसंघात आणि संसदीय राजकारणात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचे डोंगर उभे केले आहेत. मितभाषी आणि बहुभाषी असलेल्या खरगे यांना काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भारताच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक नाड्या ठाऊक आहेत. याशिवाय गांधी घराण्याचा त्यांना मनापासून पाठिंबा आहे. देशभर कार्यकर्त्यांचे भलेमोठे जाळेही त्यांच्यामागे कसे उभे आहे, हे निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे. राजकारणातील भीष्माचार्य, असे स्वरूप त्यांना प्राप्त झाले आहे. आपण केवळ दलित आहोत, अशी भावना त्यांच्या मनात कधीच नव्हती आणि नाही. भेदाभेदाचे चष्मे काढून समाजाकडे पाहण्याची एक व्यापक दृष्टीही त्यांच्याकडे आहे. या सर्वांचा लाभ त्यांना त्यांच्या नव्या कारकीर्दीसाठी होईल, यात शंका नाही. काँग्रेसमधील महत्त्वाचे वळण त्यांच्यापासून सुरू होते आणि ते काँग्रेसपुरते मर्यादित न राहता भारतीय राजकारणाचा महत्त्वाचा घटक होते. भारत एका नाजूक अवस्थेतून वाटचाल करतो आहे. मूलतत्त्ववादाचे मोतीबिंदू त्याच्या डोळ्यात जाणीवपूर्वक वाढवले जात आहेत, अशा परिस्थितीत नेहरू-गांधी घराण्याची परंपरा, धर्मनिरपेक्षतेची परंपरा लाभलेल्या पक्षाचे अध्यक्षपद खरगे यांना लाभणे हा त्यांचा आणि त्यांच्या परंपरेचाही गौरव आहे, यात शंका नाही. म्हणूनच या निवडीकडे केवळ पक्ष म्हणून न पाहता राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहायला हवे.
– संपादक ( द पीपल्स पोस्ट.)