पासंगालाही न पुरनारं अवसान
घेऊन
दर सुनावनीवक्ती
न्यायाच्या मंदिराची चढली आशाळभूत
नजरेनं पत्थरदिल पायरी
जिच्यावर पहिलीबार गेलो तवा टेकीलं होतं मस्तक
दिवसायवर दिवस गेले
तारखायवर तारखा
कितीक आभाळायनी बदलली पानं
वकिलाची फी
जानं येनं
कागदायची तजवीज
साक्षीदारायची खुशामत
यांनी दिली नाई कसलीच सूट
सोबत नेलेली फरकुटातली भाकर
तिनंच काय तो केला पोटाचा खोळंबा शांत
कोर्टाभाईरल्या झाडाखाली
आन् एके दिशी
झाली सुनावनी
परकल्पात
गेलेल्या रानाची नुकसानभरपाई म्हणून
आले दीडदमडीचे धा हजार
जे कव्हाच बुडाले होते
फी आन् उलट्या खरचायच्या डव्हात
कोर्टाभाईर भेटताच
हातात ठेवत तो चेक
वकील तोर्यात बोलला
अभिनंदन ! तुम्ही केस जिंकली…
अमोल विनायकराव देशमुख
महेंद्र नगर, परभणी