दलित पँथर : स्थापनेची तीन, तर फुटीची सत्तेचाळीस वर्षे – संजय पवार

 दलित पँथर : स्थापनेची तीन, तर फुटीची सत्तेचाळीस वर्षे – संजय पवार

दलित पँथरची स्थापना १९७२ सालातली आणि या संघटनेचे संस्थापक नसलेले; पण या संघटनेचे सर्वांत लोकप्रिय व संघटनेचा चेहरा बनलेले राजा ढाले यांनी स्वत:च दलित पँथर मार्च १९७७ मध्ये बरखास्त करून मास मुव्हमेंट नावाची नवी संघटना पँथर्ससोबत सुरू केली! ७२ ते ७७ हा म्हटला तर सहा वर्षांचा काळ; पण ७५ च्या आणीबाणीचे १९ महिने वजा केले, तर जेमतेम अडीच वर्षेच पँथर कार्यरत राहिली! पण या अडीच वर्षांवर आज पन्नास वर्षांनंतरही चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप चालूच आहेत!

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जगात एखाद्या वावटळीप्रमाणे येऊन गेलेली आक्रमक, लढाऊ, तरुण संघटना म्हणजे दलित पँथर!


तत्कालीन राजकीय पक्ष, संघटना यांच्यासाठी आकर्षणाचा विषय ठरलेली व आपल्या आधिपत्याखाली घेण्यासाठी हपापलेले, आसुसलेले हे सर्व पक्ष, संघटना या सर्वांनी मिळून अवघ्या तीन वर्षांत या धगधगत्या अग्निकुंडासारख्या दलित पँथरला गिळंकृत करून असा ढेकर दिला, ज्याची गुंज या संघटनेच्या पन्नाशीतही ऐकू येतेय!
दलित पँथर हे त्या काळाचे (६० आणि ७० चे दशक) अपत्यही म्हणता येईल. आज सर्वत्र रूढ झालेली साठोत्तरी ही साहित्यासंबंधातील संज्ञा, त्यावेळी केवळ मुंबई, महाराष्ट्र, मराठीपुरतीच मर्यादित नव्हती, तर ती सर्व प्रमुख भारतीय भाषांसह, जगभरातील छोट्या-मोठ्या देशांत, तेथील भाषांतही रूढ झाली होती.  
ही संज्ञा साहित्याच्या सोबतीनेच सर्व ललित कला, दृश्य कला, आविष्काराच्या सर्व माध्यमांत लागू झाली. ते दशकच जगभर सांस्कृतिक, सामाजिक राजकीय उलथापालथीचे होते. प्रस्थापित व्यवस्थेविरोधात जगभरातच प्रामुख्याने तरुण पिढीने बंडखोरी आरंभली होती. साहित्य, चित्र, नाट्य, चित्रपट, सामाजिक वा राजकीय परिवर्तन, अशा सर्वच क्षेत्रांत बंडखोरीचे लोण पसरले होते. एखाद्या साचलेल्या शेवाळयुक्त डबक्यात नेम धरून दगड मारावा आणि शेवाळ, साचलेपण दूर करून पाणी स्वच्छ, खळाळते व प्रवाही करतानाच ते नव्या वळणाने नवनवे प्रदेश ओलिताखाली आणेल, अशी एक सुस्पष्ट धारणा या बंडखोरीमागे होती.

…विघातक जसे घडले, तसेच विधायकही घडले


प्रस्थापित सर्व मूल्यव्यवस्थांना धडका मारायचे काम जगभरच्या तरुणांनी सुरू केले होते. हे तरुण लादलेल्या युद्धाने, सक्तीच्या लष्कर भरतीने जसे नैराश्यात गेले होते, तसेच प्रस्थापित व्यवस्था फक्त सुस्त अजगरासारखी आपल्या आयुष्याला वेटोळे घालून बसलीय, हे त्यांना तीव्रतेने जाणवले. त्यांनी सर्वप्रथम या मूल्यव्यवस्थेच्या सुस्त अजगरालाच ढोसायला सुरुवात केली. त्याला जखमी करत प्रसंगी रक्तबंबाळ करत त्याच्या वेटोळ्यातून बाहेर पडायचा आश्‍वासक प्रयत्न करू लागली. त्यासाठी तिने नवनवीन विचारधारा, जीवनशैलींना स्वीकारले, तसेच पराकोटीची व्यसनाधीनता, गुंडगिरी, हिप्पी, जिप्सी संस्कृतीचा अंगीकार करत गेली. यातून विघातक जसे घडले, तसेच विधायकही घडले.
विघातकात व्यसनाधीनता, आरोग्य हेळसांड, अपमृत्यू तसेच नागरी जीवनात वाढलेली गुन्हेगारी, नैराश्य यामुळे आत्ममग्न तसेच नकारात्मक विचार गर्तेत अडकत मनोविकारांची वाढ होत गेली. पर्यायाने मनोरुग्ण वाढले. हे प्रामुख्याने श्रीमंत देश व युरोपातील देशांत मोठ्या प्रमाणावर घडले.
तुलनेने आशियाई देश ज्यांना हजारो वर्षांची परंपरा आहे. लग्न, कुटुंबसंस्था, रूढी, परंपरा, अध्यात्म, ज्योतिष, धर्म, जात यांच्या चिरेबंदी बांधणीत समाज बांधला गेलेला आहे. त्यामुळे व्यक्ती सुटी न होता कुटुंबात, समाजातच राहत असल्याने टोकाच्या स्वैराचाराला थोडा लगाम बसला. प्रस्थापित व्यवस्थेबाबत चीड असली तरी त्याचा उद्रेक नव्हता झाला.
परिणामी अमेरिका, युरोपात जसे वा ज्या प्रमाणात घडले तसे आपल्या देशात, प्रदेशात घडले नाही. आवाज उठला, बंडखोरीही झाली, ती सफल-विफल दोन्ही झाली तरीही देश विकसनशील संज्ञेत बसत असल्याने राज्यकर्त्यांनीही बंडखोरी अराजकतेकडेच काय; पण मर्यादित पडझडीपलीकडे जाणार नाही, याची काळजी घेतली होतीच!


साठोत्तरी पर्वाच्या आधीची ही सर्वांत मोठी भाषिक व राजकीय लढाई


आता पृथ्वीच्या नकाशावरून आपण भारताच्या व तिथून महाराष्ट्राच्या नकाशावर स्थिरावूया. साठच्या दशकात स्वातंत्र्य मिळून जवळपास दहा-बारा वर्षे झाली होती.स्वातंत्र्यानंतर वर्षाच्या आतच गांधी हत्या झाल्याने गांधी व्यक्ती म्हणून संपली; पण विचार अधिक रुजत गेले, त्याचवेळी काँग्रेस नामक स्वातंत्र्य चळवळीचे राजकीय पक्षात रूपांतर झाले होते. पन्नास साली भारताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली गठित घटना समितीने तयार केलेल्या राज्यघटनेचा स्वीकार केला गेला. संसदीय बहुपक्षीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता, ‘एक व्यक्ती एक मत’ या तत्त्वानुसार संसदीय लोकशाही, देशाचा कारभार लोकसभा, राज्यसभेद्वारे, तर राज्यांचा विधानसभेद्वारे. काही राज्यांत राज्यसभेच्या धर्तीवर विधान परिषदांची सभागृहेही स्थापली गेली. भारतीय राज्यघटना स्वीकारासोबतच भाषावार प्रांतरचनाही लागू झाली. या स्थित्यंतरात अनेक राज्यांत संघर्ष उभे राहिले. राज्यांचे आकार, राजधानी, भाषा, सीमावर्ती प्रदेश असे अनेक प्रश्‍न उभे राहिले, आंदोलने झाली. गुजरात, महाराष्ट्र या भाषावार प्रांतरचनेत द्वैभाषिक ठेवलेल्या राज्याबद्दल महाराष्ट्रात तीव्र असंतोष निर्माण झाला. यातूनच मुंबईसह महाराष्ट्राची मागणी करणारे संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाले. ज्यात १०५ हुतात्मे झाले. नेहरू व काँग्रेसबद्दल प्रचंड राग मराठी भाषकांत होता, ज्याला चूड देण्याचे काम संयुक्त महाराष्ट्र समितीने केले. या समितीचे नेतृत्व आचार्य अत्रे, कॉ. डांगे, एस.एम. जोशी, केशवराव जेधे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, अशा दिग्गजांनी केले आणि त्याला अमरशेख, अण्णा भाऊ साठे अशा शाहिरांनी आपल्या शाहिरीने, लेखणीने, वाणीने इतक्या उंचीला नेले, की शेवटी १ मे १९६० रोजी द्विभाषिक  विभक्त करून मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली; परंतु त्यावेळी अनिर्णीत राहिलेले सीमा प्रश्‍न आजही तसेच आहेत. साठोत्तरी पर्वाच्या आधीची ही सर्वांत मोठी भाषिक व राजकीय लढाई होती.


…पण बाबासाहेबांच्या राजीनाम्याचा उल्लेखही होत नाही!


संविधाननिर्मितीत गुंतलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९५० साली जबाबदारीतून थोडे मुक्त झाले आणि त्यांनी पुन्हा आपल्या मूळ अस्पृश्यतेविरुद्धचा लढा, जातीयतेविरुद्धतेचा, ब्राह्मणी पुरोहितशाहीविरोधातला एल्गार पुन्हा तीव्र केला.संविधानामार्फत अस्पृश्यता, जातीयता याचे कायद्याने उच्चाटन करतानाच या वर्गाला आरक्षणातून समानसंधीसाठी विशेष संधी दिली. हिंदू कोड बिलातून हिंदू स्त्रियांची गुलामी दूर केली; पण नेहरूंनी हिंदू जातीयवाद्यांच्या दबावाला बळी पडून हिंदू कोड बिल अर्धवटच आणले. तेव्हा बाबासाहेबांनी सरळ आपल्या कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तत्त्वासाठी राजीनामा देणार्‍या मंत्र्यांची उदाहरणे दिली जातात तेव्हा सी.डी. देशमुख व लाल बहादूर शास्त्री यांची नावे घेतली जातात; पण बाबासाहेबांच्या राजीनाम्याचा उल्लेखही होत नाही!
१९३५ साली येवला येथे बाबासाहेबांनी घोषणा केली होती, की मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही! या घोषणेनंतरही इथल्या सनातन धर्मवाद्यांना प्रतिसाद द्यावासा वाटला नाही. तेव्हा जगातील सर्व धर्म, पंथ यांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी भारतातच जन्मलेला, जगभर प्रसार झालेला; पण इथेच गाडल्या गेलेल्या बुद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करून १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपूर येथे सामूहिक धर्मांतर केले! अनेक वर्षांपासून अनेक शारीरिक व्याधींशी झुंझत राहिलेल्या बाबासाहेबांचे धर्मांतरानंतर अवघ्या दोनच महिन्यांत, ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. साठोत्तरी पर्वाच्या सुरुवातीआधीची ही सर्वात मोठी अहिंसक धर्मक्रांती होती. जी दलित पँथरच्या जन्मास प्रेरणादायी ठरली. मात्र, हीच धर्मक्रांती पँथरच्या विभाजन व नंतर विलयास कारणीभूत ठरवली गेली.


बाबूराव बागूल हे पहिल्या पिढीचे नायक

बाबुराव बागुल


दलित पँथरच्या जन्माआधीची व साठोत्तरी पर्वाच्या सुरुवातीची ही पार्श्‍वभूमी मुद्दाम जितकी संक्षिप्ततेत सांगता येईल, ती सांगितली. कारण दलित पँथरचे जे कुणी संस्थापक होते ते तरुण होते. प्रस्थापित व्यवस्थेवर नाराज होते; पण मुख्यत: ते साहित्य चळवळीतले होते! तेव्हा दलित साहित्य या संज्ञेचा जन्मही नव्हता झाला. म.भि. चिटणीस, बाबूराव बागूल हे लिहीत होते. ते चर्चितही होते; पण त्याला लेबल नव्हते, उलट अण्णा भाऊ साठेंप्रमाणे बाबूरावांवरही कम्युनिस्ट हा शिक्का बसला होता. खरं तर ही तत्कालीन दलित लेखक, विचारवंत हे सर्व आंबेडकरवादी; पण रिपब्लिकन पक्षाची (तेव्हा व आताही!) राजकीय ताकद, धोरणे, वैचारिक समज या सर्वांना कधीच जवळची वाटली नाही. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर देशभर साहित्य, कला आदी क्षेत्रांवरला कम्युनिस्ट, विशेषत: मार्क्सवादी प्रभाव महाराष्ट्रावरही पडला. हिंदी सिनेसृष्टीसारख्या त्या वेळच्या तद्दन व्यावसायिक सिनेमातही के.ए. अब्बास, राज कपूर, कैफी आजमी, साहिर लुधियानवी, मंटो, अशा अनेकांवर हा प्रभाव होता व बरीच वर्षे इप्टा या नाट्यसंस्थेद्वारे नाट्यक्षेत्रावरही हा प्रभाव टिकून होता. साहजिकच देशातील इतर सर्व जाती-धर्मांतील तरुणांप्रमाणेच हा मार्क्सवादी प्रभाव त्या वेळच्या जन्माने दलित तरुण/प्रौढ लेखकांवरही पडला. बाबूराव बागूल हे त्या पहिल्या पिढीचे नायक म्हणता येतील.


अनेक तरुण समाजवादी, कम्युनिस्ट विचारांकडे आकर्षित


साठोत्तरी व्यवस्थापरिवर्तन विचारांचा महाराष्ट्रात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात लक्षणीय प्रभाव पडला. सत्ताधारी राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसकडे देशभर बहुमत होते व तो पक्ष विचारांपेक्षा आता सत्तासंपादन व सत्ताभोग व सत्तेद्वारे दमन, अशा चक्रात अडकला होता. त्याला प्रतिक्रिया म्हणून अनेक तरुण समाजवादी, कम्युनिस्ट विचारांकडे आकर्षित झाले. या तरुणांमध्ये सामाजिक न्यायासाठी तळमळ निर्माण झाली. अनेकांनी शिक्षण अर्धवट सोडून दलित आदिवासींमध्ये काम करायला सुरुवात केली. याचे टोक बंगालमध्ये नक्षलवादाच्या जन्मापर्यंत गेले. ज्याची सावली महाराष्ट्रावरही पडली. तरीही महाराष्ट्रात साठोत्तरी उद्रेकाची ठळक लक्षणे मुख्यत्वे साहित्य, नाट्य व काही अंशी चित्रपटांत दिसून आली.


ब्राह्मणीछाप आणि अभिजनवृत्ती अदृश्यस्वरूपात कायम राहिली!


मराठी साहित्यात पारंपरिक साहित्यावर सदाशिव पेठेचा शिक्का होता. मूलत: मनोरंजन, स्मरणरंजन व कल्पनारम्यता यात अडकलेल्या साहित्याला सत्यकथा या मासिकाने छेद देत स्वत:चा असा एक नवा तोंडवळा दिला. त्यात प्रयोगशीलता असली तरी त्यामागे असलेला ब्राह्मणीछाप आणि अभिजनवृत्ती अदृश्यस्वरूपात कायम राहिली! त्यामुळे या प्रयोगशील सत्यकथेविरोधातच तरुण साहित्यिकांनी बंड केले. अशोक शहाणे, नेमाडे, मनोहर ओक, गुरूनाथ धुरी, कोलटकर, यांच्याबरोबरीनेच राजा ढाले, दया पवार, अर्जुन डांगळे, प्रल्हाद चेंदवणकर, ज.वि. पवार, नामदेव ढसाळ हेही होते. या तरुणांना नव्या परिवर्तनवादी, व्यवस्थाविरोधी विचारांनी भारून टाकले होते. त्यामुळे समांतर चाललेल्या सामाजिक चळवळींच्या प्रभावाने हे तरुण जातीधर्मांच्या भिंती ओलांडून सत्यकथेच्या विरोधात एकत्र झाले आणि त्यांनी सत्यकथेची जाहीर होळी सत्यकथेच्या कार्यालयाखालीच केली (बंडखोरांचा उत्साह इतका होता, की ते जमले सगळे; पण होळी करायला सत्यकथेचा अंकच कुणाकडे नव्हता! शेवटी सत्यकथेचे संस्थापक संपादक श्री.पु. भागवत यांनीच एक अंक या होळीसाठी दिला!)
साठोत्तरी साहित्य चळवळीने जोर धरलेला असतानाच यात कार्यरत; पण जन्माने दलित तरुणांना त्यावेळी देशभरातून येणार्‍या दलित अत्याचारांच्या बातम्यांनी अस्वस्थ केले. साहित्य चळवळीतले दलितेतर मित्र जाती-धर्मांपलिकडे जाऊन संवेदनशील व जातिअंताची भाषा बोलत असले, तरी तो त्यांचा प्राधान्यक्रम नव्हता.त्याचवेळी सामाजिक, राजकीय क्षेत्रांत कार्यरत समाजवादी, कम्युनिस्ट तरुणांत दलित प्रश्‍नांवर मतमतांतरे होती. समाजवादी गांधी विचाराने हृदयपरिवर्तन, लोकशाही पद्धतीने आंदोलने वगैरेवर निष्ठा ठेवून होते, तर कम्युनिस्टांना वर्णसंघर्षापेक्षा वर्गसंघर्ष महत्त्वाचा वाटत होता. आर्थिक समानता आली, की जाती नष्ट होतील या सिद्धांतावर ते ठाम होते.
साहित्य चळवळीतले जन्माने दलित तरुण या सर्व विचारधारांशी परिचित असले, काही त्यात कार्यरत असले, तरी त्यांचा मूळ वैचारिक पिंड हा आंबेडकरवादावर पोसलेला होता. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता होती. खरे तर रिपब्लिकन पक्ष व नेतृत्व सक्षम असते, तर बरेच प्रश्‍न सुटले असते; पण या साहित्यिक तरुणांचा राग आंबेडकरी राजकीय नेतृत्वावरही तीव्र होता.

सत्ताधार्‍यांसह सर्वांचेच धाबे दणाणले!


या अस्वस्थतेत एक ठिणगी पडली ती ७२ साली संसदेत मांडण्यात आलेल्या पेरूमल कमिटीच्या अहवालात ४५ ते ७० या तीन दशकांत देशभर दलितांवर झालेल्या अत्याचारांची जी आकडेवारी दिली होती, ती पाहून सत्ताधार्‍यांसह सर्वांचेच धाबे दणाणले. विरोधी पक्षांसह साठोत्तरी सर्व चळवळींनी या अत्याचारांवर विविध मार्गांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. देशभरातील दलित अत्याचारांच्या आकडेवारीत अर्थातच महाराष्ट्रातीलही आकडेवारी होती.
या आकडेवारीने अस्वस्थ साठोत्तरी साहित्य चळवळीतले राजा ढाले, ज.वि. पवार, दया पवार, अर्जुन डांगळे, प्रल्हाद चेंदवणकर, उमाकांत रणधीर, लतीफ खाटीक, असे जन्माने दलित तरुण जे आपापल्या गावाकडून शिक्षण व नोकरीसाठी मुंबई महानगरात स्थलांतरित झाले होते, त्यांना गावगाड्यातील जगणे आठवले आणि आता शब्दांचीच शस्त्रे नाहीत, तर खरी शस्त्रे घेऊन मैदानात उतरावे, अशा निर्णयाप्रत आले.
या आक्रमक प्रतिक्रियेला कदाचित त्यावेळी मुंबईत बाळ ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही संघटना मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून राडेबाज पद्धतीने सक्रिय होती, ज्यात मराठी म्हणून अनेक बौद्ध तरुणांसह हिंदू मागास व बहुजन जातींतील तरुणांचा सहभाग होता. ठाकरेशैली ही फॅसिस्टांच्या जवळ जाणारी.सत्ताधारी काँग्रेसने तिला कम्युनिस्टांविरोधात वापरून एकेकाळचा लाल गिरणगाव भगवा करून टाकला!


या सर्व बाबी रक्त तापवणार्‍याच…


सेनेच्या राडेबाजीच्या कारणांपेक्षा दलित तरुणांना प्रक्षुब्ध करणारी कारणे अधिक संयुक्तिक होती. कारण मराठी माणसांना नोकर्‍यांत स्थान न मिळणे यापेक्षा गावगाड्यातला दलितांवरला सामूहिक बहिष्कार, वस्त्या पेटवणे, स्त्रियांवर बलात्कार, नग्नधिंड, दलित पाणवठ्यावर मानवी विष्ठा टाकणे, अशा अमानवी, संविधान व भारतीय दंड संहितेखाली गुन्हे नोंद व्हावीत, अशा घटना होऊनही पोलीस यंत्रणा सवर्णांना पाठीशी घालून दलित वस्त्यांनाच कायद्याचा बडगा दाखवीत होती. या सर्व बाबी रक्त तापवणार्‍याच होत्या. तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सुरुवातीपासूनच्या सर्व लढ्यांचा इतिहास हा अहिंसक, सनदशीर आणि समतेचा हात पुढे करणाराच होता. तोच आदर्श या तरुण पिढीतही होता. त्यामुळे थेट अरे ला कारे करण्याची काही गटांची खुमखुमी चर्चेअंती शांत करण्यात आली. त्यात आणखी एका दूरगामी परिणामाचा विचारही होता; तो असा एखाद्या ठिकाणी हल्ला करता येईल; पण हल्ला करून निघून गेल्यावर तिथल्या स्थानिक दलित वस्तीला गावकर्‍यांनी हररोज लक्ष्य केले असते; पण या मंथनातूच आता गप्प बसायचे नाही. हल्ला करायचा नाही; पण जाब विचारायचा, पोलिसांना कार्यवाही करायला लावायची, गुन्हे नोंद करायला लावायची व विधिमंडळासह सरकारवरही दबाव आणायचा. त्यासाठी समविचारी पक्ष, संघटना यांचीही मदत घ्यायची; पण नेतृत्व आपण करायचे.
याच विचाराने मुंबईत राजा ढाले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील वडाळा येथील सिद्धार्थ विहार हॉस्टेलमधून युवक आघाडी कार्यरत होती. याच काळात पुण्यासह सर्व महाराष्ट्रात मुख्यत: समाजवादी विचारांच्या तरुणांनी युवक क्रांती दल (युक्रांद) स्थापन केले होते व तेही सर्व प्रकारच्या विषमतेविरोधात लढत होते, संघटन करत होते.
पेरूमल अहवालानंतर काहीच दिवसांनी पुणे जिल्ह्यातील बावडा या गावी सवर्णांनी अस्पृश्यांवर बहिष्कार घातला, तर परभणीतील ब्राह्मणगावात सवर्णांच्या विहिरीवर दोन बौद्ध स्त्रियांनी पाणी पिऊन ती बाटवली म्हणून त्या दोघींना नग्न करून बाभळीचे फटके देत त्यांची गावभर धिंड काढली.


बहुधा त्यांचे मेंदूही व्हाइटवॉश केले गेले होते


आजवर बेदखल झालेल्या घटनांची नोंद दलित तरुण घेऊ लागला. तो आता प्रतिकार करू लागला. घटनास्थळी धाऊन जाऊ लागला, पोलिसांना गुन्हे नोंदवून घ्यायला लावू लागला, तसाच गाव, जिल्हा प्रशासन, पोलीस ते थेट मंत्रालयावर धडकू लागला. निवेदनांचा पाऊस पाडू लागला. सत्ताधार्‍यांविरुद्ध ‘जबाब दे’ आंदोलन करू लागला. संविधान, कायद्याचा कीस पाडत खटले लढू लागला. आता चपलेने विंचू मारावा तसा दलित मरणार नाही, अशा आत्मसन्मानाने प्रेरित होऊन तो अन्यायाविरोधात उभा राहिला. आता त्याला संघटनेची गरज भासू लागली. कारण प्रस्थापित रिपब्लिकन पुढार्‍यांवर त्यांचा विश्‍वास नाही, तर रागच होता. कारण त्यातले अनेक काँग्रेसवासी होऊन टोपीपासून बुटापर्यंत पांढरेधोप तर झालेच होते; पण बहुधा त्यांचे मेंदूही व्हाइटवॉश केले गेले होते. साहित्य चळवळीतील दलित तरुण या अत्याचाराबद्दल संवेदना दाखवायचे, प्रसंगी मोर्चात यायचे; पण काही जण सरकारी नोकरीमुळे थेट सहभाग टाळत होते, तर बाबूराव बागूलांसारख्यांना या तरुणांची शासन असमर्थ ठरले, तर आम्ही कायदा हातात घेऊ, ही भूमिका भाषेसहितच नापसंत पडली व ते या सर्व कृतींपासून लांब राहिले.

इथूनच सुरू होते दलित पँथरच्या जन्माची कहाणी!


जगप्रसिद्ध राशोमान चित्रपटाच्या कथेसारखी दलित पँथरच्या जन्माची व निर्वाणाची कहाणी अनेक जण अनेक प्रकारे कथन करताहेत. जुलै ७२ हे दलित पँथरचे जन्मसाल बहुतेक मान्य करतात; पण तारखेवर वाद आहेत! ठिकाणावर वाद आहेत. नामकरणावर वाद आहेत. संस्थापकांसह सदस्यांवर वाद आहेत. धोरणे, कार्यक्रम आंदोलने यावर वाद आहेत. पँथर बरखास्तीवरून वाद आहेत. पँथरच्या पुनरुज्जीवनावरून वाद आहेत. व्यक्तींवरून वाद, त्यांच्या लिखित, मौखिक वक्तव्यावरून वाद आहेत. श्रेय, अपश्रेयाचे वाद आहेत. ऐतिहासिक नोंदीवरून वाद आहेत. दलित पँथर नावाची संघटना जी जन्माला आली होती ती काही काळ महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात कार्यरत होती, हे सर्वच मान्य करतात. हे मान्य करताना तिचे पितृत्व हक्काने सांगणारे दुसर्‍याचे पितृत्व मात्र नाकारतात! मात्र, याच दलित पँथरचा शेवट कसा झाला याच्याही कथा, दंतकथा आहेत आणि त्याचे अपश्रेय मात्र पितृत्व स्वीकारणारे हिरीरीने दुसर्‍याच्या गळ्यात मारतात!
संपूर्ण भारतात दलित पँथर  ही एकमेव संघटना अशी असावी जिच्या स्थापनेबाबत, संस्थापक, संस्थापक सदस्य, तिचा कार्यकाळ, या काळातील संघटनेचे धोरण, अंतर्गत विरोध, घटना, संघटनेचे कार्यक्रम, त्यातला इतरांचा सहभाग व इतर संघटनांच्या कार्यात पँथरचा सहभाग याबाबत या संघटनेच्या इतिहासकारात, भाष्यकारात, दस्तऐवजीकरणार्‍यांतच इतके मतभेद, मतमतांतरे आहेत, की खरे काय, खोटे काय, तपासायला काही वावच नाही. कारण हा इतिहास, आठवणी, दस्तऐवज हे सर्व पँथरमध्ये सक्रिय असलेले व संस्थापक असल्यापासून इतर सर्व गोष्टींवर दावा सांगणार्‍या नेतेमंडळींनीच हा इतिहास लिहिलाय! (शरणकुमार लिंबाळे, लता मुरूगकर, असे काही अपवाद) त्यामुळे तटस्थ, वस्तुनिष्ठ मांडणीऐवजी भला इसकी कमीज मेरे से ज्यादा सफेद कैसी? हे विचारण्यात वा मेरी कमीज कैसे असली सफेद! हे सांगण्यातच या सर्व पुस्तके, पुस्तिकांची पाने खर्ची पडली आहेत. त्यामुळेच या लेखाच्या उपशीर्षकात ‘स्थापनेची तीन, तर वर्षे फुटीची सत्तेचाळीस वर्षे’ असे जे लिहिलेय ते त्यासाठीच!
दलित पँथरची स्थापना ७२ सालातली आणि या संघटनेचे संस्थापक नसलेले; पण या संघटनेचे सर्वांत लोकप्रिय व संघटनेचा चेहरा बनलेले राजा ढाले यांनी स्वत:च दलित पँथर मार्च ७७ मध्ये बरखास्त करून मास मुव्हमेंट नावाची नवी संघटना पँथर्ससोबत सुरू केली! ७२ ते ७७ हा म्हटला तर सहा वर्षांचा काळ; पण ७५ च्या आणीबाणीचे १९ महिने वजा केले, तर जेमतेम अडीच वर्षेच पँथर कार्यरत राहिली! पण या अडीच वर्षांवर आज पन्नास वर्षांनंतरही चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप चालूच आहेत!

ढसाळांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत दलित पँथर जिवंत ठेवली

नामदेव ढसाळ


राजा ढालेंइतकेच आणि पँथरचे संस्थापक असलेले कवी, फर्डे वक्ते आणि आपल्या रंगढंगयुक्त जगण्याच्या पद्धतीमुळे लोकप्रिय ठरलेले राजा ढालेंना समांतर असे नेतृत्व पँथरमध्ये असलेले नामदेव ढसाळ यांनी मात्र ढालेंच्या पँथर बरखास्तीला अजिबात दाद न देता दलित पँथर जिवंत ठेवली ती २०१४ ला अखेरचा श्‍वास घेईपर्यंत!
वास्तविक राजा ढाले आणि नामदेव ढसाळ हेच पँथरचा एकत्रित चेहरा, पँथरचे बेसिक पिलर होते; पण दोघांच्या स्वभावदोषाने, वैचारिक अंतराने अगदी सुरुवातीपासूनच दोघांचे सूत काही संघटनेत जुळले नाही. त्यात नामदेवच रंगढंगीले जगणे राजा ढालेंना कधीच औत्सुक्य म्हणून पण रुचले नाही. या दोघांमधले वादविवाद, निर्णय प्रक्रियेमधील विसंवाद याची परिणीती म्हणजे राजा ढालेंनी पँथर बरखास्तीचा निर्णय.वास्तविक ते संस्थापक नव्हते, तरी त्यांनी पँथर बरखास्त केली. नामदेव ढसाळांनी ती चालूच ठेवली.
यातला वेदनादायी भाग असा, की संघटनेतील मतभेद, फूट याचा राग, नाराजी राजा ढाले यांनी वैयक्तिक आयुष्यातही कायम ठेवली. ते स्वत: लिटिल मॅगझीनच्या चळवळीतून दलित साहित्य व नंतर दलित पँथरमध्ये आले; पण ते ढसाळांना कवीच मानत नसत! आणि हा राग त्यांनी नामदेव ढसाळांच्या मृत्यूनंतर दादरपासून जवळ विक्रोळी येथे राहत असून ना ते अंत्यदर्शनाला आले, ना अंत्ययात्रेला! २०१९ मध्ये राजा ढालेंचे निधन झाले. ७७ पासून ते सार्वजनिक जीवनात आत-बाहेर करत राहिले; पण स्वभावामुळे कुठेच स्थिरावले नाहीत. शेवटची काही वर्षे तर ते जवळपास मौनातच गेले होते. काय आणि किती आपल्या छातीत, मनात ठेवून ते गेले असतील? ढसाळांनी किमान मृत्युशय्येवर असताना पँथरचा इतिहास लिहिण्याचा क्षीणसा प्रयत्न केला तरी.ढाले ७७ नंतर दलित पँथरवर एक शब्द बोलले नाहीत. मात्र, एक आश्‍चर्यकारक शेरेबाजी त्यांनी त्यांच्या एका हिंदी पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत केलीय, जी यूट्यूबवर पाहता येईल. त्यात त्यांना दलित पँथर या नावाविषयी विचारले असता ते जोरात हसले व पत्रकाराच्या खांद्यावर थोपटत म्हणालेत, की अरे वो जवानी का जोश था… पँथर मतलब चिता… ऐसे जानवर का नाम कोई देता है क्या संघटन को. (शब्द हेच नसतील; पण आशय हाच.)
याच ढालेंनी दलित पँथर या नावाबद्दल स्वत:च लिहिलेल्या पुस्तिकेत ते लिहितात, ६० च्या दशकात मी टाइम साप्ताहिक वाचायचो. ज्यातून मला ब्लॅक पँथरची माहिती झाली. त्यावर मी मराठीत लिहिले. म.भि. चिटणीसांनीही ब्लॅक पँथरसारखी संघटना इथे हवी असे म्हटले. मग मी त्यावर भाषणेही केली नामदेव व ज.वि. पवार यांच्या सांगण्यावरून. त्यातूनच पुढे दलित पँथर हे नाव संघटनेला दिलं गेलं. अशा प्रकारे राजा ढाले यांनी स्वत:च स्वत:चा इतिहास पुसण्याचा प्रयत्न का केला कळत नाही.
पुढे ७७ नंतर प्रा. अरुण कांबळे व रामदास आठवले यांनी दलित पँथरचे पुनरुज्जीवन करून अखिल भारतीय दलित पँथर स्थापन केली. ज्यांनी जवळपास २० वर्षे मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा लढवला, ज्यात दलितांसह समाजवादी, कम्युनिस्ट, स्त्रि संघटना, भटके विमुक्त यांसह भाजपही होता! पुढे नामांतर झाले. रिपब्लिकन ऐक्य झाले आणि फुटलेही. रामदास आठवले काँग्रेसप्रणीत आघाडीत राज्यात मंत्री व राज्यसभेत खासदार झाले. केंद्रात मंत्रिपद काँग्रेस आघाडीने दिले नाही म्हणून ते भाजपप्रणित आघाडीत जाऊन आज केंद्रात मंत्री आहेत!
लेखाच्या सुरुवातीला साठोत्तरी युगाचा जागतिक इतिहास लिहिला तो मुद्दामच.कारण त्या साठोत्तरी पिढीने जगभर साहित्य, चित्र, नृत्य, नाट्य, संगीत, चित्रपट यावर स्वत:ची अशी मुद्रा उमटवली. भारतात प्रायोगिक नाटक, चित्रपट तयार झाले, दलित रंगभूमी, दलित साहित्य लिहिले गेले. देशीवादाच्या चर्चा झडल्या व सदाशिवपेठी साहित्य बेदखल झाले.

शिवसेनेला अंगावर घेत सेनाभवनाजवळच गीतादहन


दलित पँथर याच काळाचे अपत्य होते. त्याला जन्माला घालणारे जे पँथर्स होते त्यांची आज आपण नावे जरी नुसती वाचली तरी किती जबरदस्त स्फोटकाचा साठा होता, याच्या नुसत्या जाणिवेने अंगावर काटा येतो. राजा ढाले, नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, ज.वि. पवार, भाई संगारे, अविनाश महातेकर, उमाकांत रणधीर, प्रल्हाद चेंदवणकर, दया पवार, अरुण कांबळे, रामदास आठवले, जयदेव गायकवाड, एल.डी. भोसले, लतीफ खाटीक, प्रीतमकुमार शेगावकर, गंगाधर गाडे, मल्लिका अमरशेख, कमलेश यादव, ही यादी अशीच पेटत्या वणव्यासारखी मोठी आहे. काय नव्हते या संघटनेकडे? जगाचे लक्ष लागले होते; पण हे आपसातच इतके भांडत राहिले, की जेमतेम अडीच वर्षे ही संघटना टिकली. त्यात तीन मोठे मोर्चे, वरळीची पोटनिवडणूक व त्यानंतरची दंगल, 10 जानेवारीचा वरळी दंगलीबाबतचा मोर्चा त्यात शहीद झालेला भागवत जाधव. त्याआधी नामदेव ढसाळांचा पहिलाच गाजलेला कवितासंग्रह ‘गोलपिठा’ आणि स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवानिमित्त पुण्याच्या साधना साप्ताहिकातला राजा ढालेंचा ‘काळा स्वातंत्र्य दिन’ हा लेख, त्या लेखातले तिरंग्यावरचे भाष्य, त्यावरून उठलेले वादळ, साधनेवरच्या विरोधकांच्या मोर्चाला पँथरचे पहिल्याच मोर्चाने उत्तर, त्यातूनच नामदेवची अटक, नामदेवने काळ्या रंगाच्या पार्श्‍वभूमीवर लाल रंगात दलित पँथर रंगविणे. जाहीर सभाही दोन-तीनच झाल्या. वस्तींपातळीवर मात्र शेकड्यांनी सभा झाल्या. महाराष्ट्रभर छावण्या उभ्या राहिल्या. छोट्या सभांतून हिंदू धर्म, देव देवतांची चिकित्सा, टिंगलटवाळी, प्रसंगी शिवराळ शेरेबाजी यातून शिवसेनेला अंगावर घेत सेनाभवनाजवळच गीतादहन केले राजा ढालेंनी!
या प्रवासात सर्व जवळ येण्याऐवजी लांब गेले. नामदेवची प्रजा समाजवादी पक्षाची पार्श्‍वभूमी, सुनील दिघे, अनिल बर्वेसारखे कम्युनिस्ट मित्र यामुळे राजा ढालेंनी त्याला कम्युनिस्ट नक्षलींचा हस्तक ठरवणे, तर राजा ढालेंच्या ‘सारा भारत बौद्धमय करेन’ या घोषणेने आपण सर्वहारा लुंपेन यांची एकजूट करू शकणार नाही, हे नामदेवचे म्हणणे, यातून संघटनेतच ढाले-ढसाळ असे दोन गट पडले. ढसाळ गटाने पुणे गाठले, तर ढाले गटाने नागपूर गाठत थेट संघटनाच बरखास्त केली! संपले! तपशिलात देता येतील असे त्या अडीच वर्षातले छोटे-मोठे जय आहेत; पण त्यातही वाद आहेत. जन्मापासून बरखास्तीपर्यंत वाद हा या संघटनेला सयामीजुळ्यासारखा चिकटला होता, तो आज वेगळे होऊन मृत झाल्यावरही चालूच आहे! दलित पँथरचा इतिहास लिहिताना वा पन्नाशीवर लिहिताना धगधगती अडीच वर्षे व त्यातील काही लक्षणीय आंदोलने सोडली, तर हाती येतात ती आरोप-प्रत्यारोपाची 47 वर्षे! आता 50 वर्षांनंतर तरी कुणी संशोधकीय शिस्तीने, तटस्थपणे व्यक्तींपलीकडे जाऊन संघटना म्हणून जे काही निखारे राखेत गाडले गेलेत त्यांना हवा देता येईल? पुढचा अग्निकल्लोळ निदान स्वप्नात तरी पाहता येईल!

– संजय पवार


(लेखक ज्येष्ठ नाटककार व विचारवंत आहेत.) 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *