पुणे विद्यापीठ तसे मुळात क्रांतिकारी, पुरोगामी वगैरे नव्हते. काही वेळा काहींनी या विद्यापीठाला तसा चेहरा देण्याचा प्रयत्न केला हे खरे आहे; पण त्याच वेळेला कुलगुरुपदावर राहून, डॉ. आंबेडकर यांचे नाव घेऊन गणपती उत्सवात आरत्यांना हजर राहण्याचा विक्रम करणारे कुलगुरूही या विद्यापीठात घुसले आणि नंतर रामनाम जपत उच्चपदावर पोहोचले. जगविख्यात शास्त्रज्ञही विद्यापीठाला लाभले. गेल्या दहा वर्षांपासून मात्र जो उजव्या बाजूने जातो, उजव्या कुशीवर झोपतो, उजव्या बाजूने विचार करतो, अशांची कुलगुरुपदी वर्णी लागू लागली. देशभर असेच चित्र आहे. पुणेही त्याला अपवाद नाही. हे करण्याचे कारण म्हणजे सांस्कृतिक संघर्ष आणि बंड सुलभरीत्या करण्याचे साधन म्हणजे शिक्षण असते. त्यात अभ्यासक्रम असतो. तसा अनेक वर्षे आपला अभ्यास देवा-धर्मात, उजव्या विचारांतच अडकलेला होता. अभ्यासक्रम तयार करणारे तेच लोक होते. सबब आपल्या अभ्यासक्रमात देवा-धर्माची जेवढी गर्दी असते, तेवढी अन्यत्र कोठे नसावी. संस्कृती, धर्म, संस्कार, परंपरा याच्या नावाखाली गेल्या काही वर्षांपासून अनेक गोष्टी शिक्षणात घुसडण्यात आल्या. यज्ञसंस्कृतीपासून ते मनुस्मृतीपर्यंत. मुक्त विद्यापीठाने तर आठ-दहा वर्षे मनुस्मृतीच चालवली. विज्ञान विद्यापीठ आसाराम, श्री श्री महाराज, प्रजापिता यांच्या वाटेवरून चालवण्याचा प्रयत्न करत होते. उत्तरेकडे अनेक विद्यापीठांचे भगवेकरण झाले आहे. अनेक ठिकाणी टिळा लावून विद्यार्थी वर्गात जातात. काही ठिकाणी बुरख्यावरून, काही ठिकाणी आरतीवरून, काही ठिकाणी देवांच्या जयंत्या-मयंत्यांवरून वाद होतो. या सर्व गोष्टी आता शिक्षणाचा भाग बनत आहेत किंवा बनवल्या जात आहेत.
पुणे विद्यापीठाने गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात आणले आहे आणि विशिष्ट दिवस ऑनलाइन अभ्यास करून विद्यार्थ्यांना झटपट प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. विद्यापीठात बंद पडण्याच्या अवस्थेत असणार्या संस्कृत आणि प्राकृत विभागाला या अभ्यासक्रमामुळे जीवदान तर मिळालेच, शिवाय गलेलठ्ठ पगार घेऊन पांढरे हत्ती बनलेल्या मास्तरांच्या नोकर्याही टिकणार आहेत. पुण्यातील प्रसिद्ध गणपती दगडूशेठ हलवाई आणि टिळक विद्यापीठाचा या उपक्रमात सहभाग असणार आहे. अर्थात, अथर्वशीर्ष म्हणणारे लोक तयार झाले, की स्वाभाविकच गणेशभक्तही वाढतात. गणेशोत्सव सुरू करण्याचे श्रेय घेणार्या टिळकांचे नावही अजरामर होते. संस्कृत भाषेविषयी जिव्हाळा आणि भारतीय संस्कृतीची माहिती व्हावी म्हणून हा अभ्यासक्रम सुरू केला, असा खुलासा पुणे विद्यापीठाने केला असला, तरी तो खोटा आहे. अथर्वशीर्ष धर्माशी जोडले. ती एक प्रार्थना, एक भक्तिगीत वाटावे असे आहे. अशा गीताला कोणी संस्कृतीचा आत्मा करणार नाही. भारतीय संस्कृती महान आहे याविषयी कोणत्या प्रमाणपत्राची गरज नाही; पण त्यात धर्माच्या, संस्कृतीच्या आणि संस्कृतच्या नावाने अथर्वशीर्ष घुसडण्याचे कारण नाही. संस्कृती ही देवाची भाषा होती. माणसाची आणि बहुजनांची नव्हे, असे हेच लोक सांगतात. अथर्वशीर्ष आणि धार्मिक दृष्टिकोनाचा संबंध नाही, असेही सांगतात आणि प्रत्यक्षात अथर्वशीर्ष व्यक्तिविकासाचा भाग आहे, असे ठोकत त्याचा अभ्यासक्रमही बनवतात. अर्थात, हे पुण्यात आणि पुणे विद्यापीठात घडावे यातही फार वेगळे नाही. ते तेथेच घडत आले आहे.
अथर्वशीर्ष, गणपती श्रद्धेचा भाग असू शकतो. त्यात ढवळाढवळ करण्याचे काही कारण नाही. श्रद्धा ही व्यक्तिगत बाब असते. ती सार्वत्रिक करत अभ्यासक्रमात नेण्याचे कारण काय? विमानाचा शोध विज्ञानाने लावला, टेस्टट्यूब बेबीचा शोधही त्यानेच लावला. असे असताना हे सारे श्रेय धर्माला देण्याचे कारण काय? देव-धर्म या आपल्या व्यक्तिगत बाबी आहेत. त्या आपल्या घरापुरत्या मर्यादित असणेच समाजहिताचे असते. संविधानात तेच सांगितले आहे. हे सारे विसरून विद्यापीठेच जर हिंदुत्वाच्या दिंडीत स्पर्धा करू लागली, तर मागास, मागे जाणार्या विद्यार्थ्यांचाच एक समाज तयार होईल. महासत्ता बनण्यास निघालेल्या भारताला तो परवडणार नाही. विद्यापीठे स्वायत्त असतात. परिणामी आपल्या मालकांच्या दबावाखाली ते काहीही करायला तयार होतात. पुणे विद्यापीठाला क्रांतिज्योती सावित्रीबाई यांचे नाव देताना कोण आणि कसले डावपेच लढवत होते. महात्मा फुल्यांच्या पुतळ्याला कोण विरोध करत होते आणि विरोध करणारे बक्षीसपात्र कसे ठरले, याविषयी नव्याने काही बोलावे-लिहावे असे नाही. विद्यापीठे अशीच मस्तीत वागणार असतील, कोणत्यातरी रंगात रंगण्याचा प्रयत्न करणार असतील, समाज मागे नेण्यासाठी सुपारी उचलत असतील, तर विद्यापीठांचा घटक असलेल्या विद्यार्थी आणि पालकांनीही जागे व्हायला हवे. आपल्याला शिक्षणात काय हवे आणि काय नको, हे त्यांनीच ठामपणे सांगितले पाहिजे. व्यवस्थेचे लाभार्थी आणि गुलाम बनलेले पांढरे हत्ती आणि त्यांचा मालक यापैकी कोणीही उजेडवाटा तयार करू शकणार नाही. उद्या अथर्वशीर्षाबरोबरच संडे प्रेअर, बांग आणि त्रिशरणही अभ्यासात आणा, अशी मागणी झाल्यास मतिमंद विद्यापीठे काय करणार?
– पंक्चरवाला