तासाला तीन बलात्कार, का ऐकला जात नाही चीत्कार…

तासाला तीन बलात्कार, का ऐकला जात नाही चीत्कार…

भारत आणि बलात्कार यात आता काहींना नवे वाटत नसणार म्हणून काही हा विषय दुर्लक्षित करता येत नाही. महिलांची प्रतिष्ठा, आत्मसन्मान, बंधुता, स्वातंत्र्य, कायदा आणि सुव्यवस्था, असे अनेक घटक बलात्कारामुळं दुर्बल झाल्यासारखे वाटतात. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (एनसीआरबी) दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत जे आपल्या लोकशाहीचं माहेरघर मानलं जातं, तिथं दिवसाला पाच बलात्कार होतात. देशभराच्या आकडेवारीचा एकत्रित विचार केल्यास हा आकडा दर दिवसाला सत्याऐंशी इतका मोठा म्हणजे तासाला तीनहून अधिक घटना घडतात. विशेष म्हणजे, बलात्काराचा आलेख दरवर्षी, दरतासाला वाढत जाताना दिसतोय. अतिशय काळजी वाटावी अशी ही गोष्ट आहे. महिलांच्या सुरक्षिततेविषयी जसा प्रश्‍न निर्माण होतो, तसाच तो वाढत चाललेल्या विकृतीकडेही लक्ष वेधायला लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून बलात्कार रोखण्यासाठी कायदे, प्रबोधन, शिक्षण याद्वारे प्रयत्न झाले नाहीत असं नाही; पण ही वाढती विकृती या सर्व प्रयत्नांना मागं टाकत पुढं निघाल्याची दिसते. बलात्कार करणार्‍याला होणारी शिक्षा सातवरून दहा वर्षांपर्यंत वाढवण्यात आली. बलात्कारात महिलेचा मृत्यू झाल्यास वीस वर्षे शिक्षा किंवा फाशीही होऊ शकते. तशी कायद्यात तरतूद आहे. महिलांचा कोणत्याही कारणानं लैंगिक छळाची व्याख्या वाढवत नेण्यात आली आहे. घरात होणार्‍या हिंसाचाराविरोधातील कायदे कडक करण्यात आले. बालिका रक्षणाचे कायदे कडक करण्यात आले; पण तरीही बलात्कार नावाची अमानवी, निर्दयी, घृणास्पद विकृती कमी का होत नाही, हा प्रश्‍न उरतो.
बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र मागं नाही; पण राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली ही काही राज्यं खूपच आघाडीवर आहेत. जवळपास उत्तर भारत बलात्काराच्या घटनांनी ढवळून निघतो. गेल्या वर्षी राजस्थानात 6,342 म्हणजे रोज 17, मध्य प्रदेशात 2,947 म्हणजे रोज आठ, उत्तर प्रदेशात गेल्या वर्षी 2,845 आणि दिल्लीत 1,252 घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील काही काळ कोरोनाचा होता. घराबाहेर पडणं अवघड होतं. याचा परिणाम घराबाहेर होणार्‍या लैंगिक छळाच्या घटना घडल्या; पण घरातील छळाच्या घटना वाढल्या. याचा अर्थ असाही होतो, की महिला कोठंही असली तरी तिच्या वाट्याला छळ येतोच आणि ही गोष्ट पुरुषी वर्चस्वाशी, त्यातून येणार्‍या विकृतीशी जोडली गेलेली आहे. महिला म्हणजे वर्चस्व गाजवण्याची आणि भोगाचीच गोष्ट आहे. या मानसिकतेतून बाहेर पडायला पुरुषप्रधान व्यवस्था तयार नाही. उत्तरेकडील महिला अजूनही वेगवेगळ्या जाळ्यांत अडकवून ठेवली जात आहे. पुरुष तिचा मालक आहे. पुरुषाची ती संपत्ती आहे आणि पुरुषासाठी ती केवळ भोगावयाचं साधन आहे. या मानसिकतेमध्ये अजून अनेक पुरुष अडकले आहेत, हेही या गोष्टींवरून दिसते. ज्यांना आपण गुन्हेगार जाती मानतो, आदिवासी मानतो त्याठिकाणी महिलांवर बलात्कार होण्याच्या घटना तुलनेनं कमी होतात. होतच नाहीत असं म्हणता येणार नाही. समृद्ध आणि प्रगत मानल्या जाणार्‍या घटकांमध्ये मात्र अशा घटना उफाळून येतात, हेही आकड्यांवरून दिसतं. ज्या घटकांमध्ये महिलांना थोडीफार प्रतिष्ठा आहे, मूल्य आहे, मातृप्रधान व्यवस्थेचा आदर आहे, तिथंही अशा घटना कमी आढळतात. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगरी मुंबईत बलात्काराच्या घटनांत जवळपास दोनशे, तर विनयभंगाच्या घटनांमध्ये दीडशे टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे खरं असलं, तरी नागपूरनं अशा घटनांत मुंबईला मागं टाकलं आहे. अन्य गुन्ह्यांच्या बाबतीतही नागपूर आघाडीवर आहे. गेल्या वर्षी एका नागपूरमध्ये चोवीस हजार दखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे.
बलात्कार एका मोठ्या विकृतीचं रूप घेऊन सर्वत्रच पसरतो आहे. त्यातून मग महिलांसाठी सुरक्षित ठिकाणं कोणती यावर चर्चा सुरू झाली. ती अयोग्य आहे, असं नाही; पण मूळ प्रश्‍न उरतोच आणि तो म्हणजे वाढत्या विकृतीचं काय करायचं, ती संपवायची कशी, यावर खूप मोठ्या गांर्भीर्यानं आपण विचार करत नाही. कायदे बदलून, शिक्षा वाढवून, भरपाईची रक्कम वाढवूनही बलात्काराचा आलेख कमी होत नाही. याचा अर्थ कायदा कितीही कडक केला, तरी तो एकटा काही करू शकत नाही. तो भीती किंवा दहशत निर्माण करू शकतो; पण मूळ रोग संपवण्यासाठी कायद्याबरोबरच अन्य काही गोष्टींचा, मार्गांचा विचार करावा लागेल. महिलांना हक्क दिले; पण त्याची अंमलबजावणी कशी होतेय, तिच्यासाठी कायद्यात बदल केले; पण त्याच्या अंमलबजावणीचं काय, विकृत बनलेल्या लोकांचं प्रबोधन कसं आणि किती चालू आहे, स्त्रीमध्ये केवळ मादीच नसते, तर आई, बहीण आदी सुंदर नातीही असतात, हे कसं सांगत असतो आपण, संस्काराच्या पातळीवर काय होतं, मुक्त जीवनाचा अर्थ आपण नेमका कसा घेतो, बंधुभाव आणि भगिनीभाव याचा जागर आपण किती करतो, अशा अनेक गोष्टी आहेत. कायदा आणि या गोष्टी हातात हात घालून चालल्या, की प्रश्‍न हलके, सैल व्हायला लागतात. आपण प्रबोधन पर्व संपवून बसलोय आणि थेट कृतीपर्वाला हात घालतोय. अनेक ठिकाणी गफलती होतात. बलात्कारात आघाडीवर असलेली दिल्ली नोटावरील चित्रांचा विचार करते; पण महिलांत वास करणार्‍या विविध नात्यांचा विचार करत नाही. फोफावणारा बलात्कार रोखण्याचा अधिक प्रयत्न केला नाही, तर जगात भारताची ओळख अन्य कारणानं पण होऊ शकते, हे ध्यानात ठेवायला हवं.


– पंक्चरवाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *