आप नावाच्या टोळीचा हिंदुत्ववादी चेहरा

आप नावाच्या टोळीचा हिंदुत्ववादी चेहरा

हिंदुत्ववाद्यांनी जवळपास शंभर वर्षं विणकाम करून एक मायावी जाळं निर्माण केलं आहे. ते वापरत वापरत ते संसदेत दोन वरून दोनशेवर गेलं आहे. या जाळ्यातून बाहेर बघितलं, की मतांच्या पेट्या दिसतात. देवादिकांच्या सावल्या दिसतात. झालंच तर हिंदुराष्ट्रही दिसायला लागतं. या गोष्टी खर्‍या की खोट्या यावर चर्चा होऊ शकते. हिंदुत्ववाद्यांना खरंच हिंदुराष्ट्र हवं आहे, की तोही एक चकवा आहे, असा प्रश्‍नही काही शहाणी माणसं उपस्थित करू शकतील. मुद्दा हा आहे, की ज्यांच्याकडं जाळे आहे, त्यांच्याकडं आकर्षण सुरू आहे. राजकीय उद्धारापोटी अनेक पाखरं जाळ्याकडं सरकली किंवा ओढली गेली. काहींनी स्वतःच असं जाळं तयार करण्याचा प्रयत्न चालवला. भारतीय राजकारणात काही मिळवायचं असेल किंवा तग धरून राहायचं असेल, तर धर्मस्थळांच्या चौकटीवर जाऊन देवासाठी कॉल बेल दाबावीच लागते, असा काहींचा भ्रम किंवा समज झालाय. काही हुशार पाखरं अशी आहेत, की ज्यांच्याकडं पूर्वीपासून जाळं होतंच; पण त्यांनी ते शुभ्र टोपीखाली लपवलं होतं. संतासारखा किंवा संत बनायच्या प्रयत्नात अयशस्वी ठरलेल्या एकाचा या पाखरानं पद्धतशीर वापर केला. दिल्लीत आणि बाहेर त्यांना घेऊन इव्हेन्ट घेतले. स्वच्छतेची भाषा वापरली आणि जाळ्याशिवाय हे पाखरू काही ठिकाणी सत्तेत पोहोचलं. नंतर त्याच्या लक्षात आलं, की संतसदृश माणसामुळं आपली अडचण होतेय. शिवाय सत्ताही मिळालीय. नवस पूर्ण झाला होता म्हणून त्यांची गरजही कमी झाली होती. हे सर्व घडत असतानाच ‘जे रामजादे नाहीत, ते हरामजादे’ आहेत, अशी घोषणाही राजकारणात हिट ठरली. धर्मस्थळे हिट ठरली आणि देशभराच्या मतपेट्या हिंदुत्ववाद्यांकडं आकर्षित झाल्या. पांढर्‍या टोपीच्या पाखरानं पंजाबात डॉ. आंबेडकरांचं कार्ड बेमालूमपणे वापरलं. अतिशय साधं; पण श्रद्धांवर स्वार होणारं ते कार्ड होतं. सर्व शासकीय कार्यालयांत बाबासाहेब आणि भगतसिंग यांचे फोटो वापरण्याचं ते कार्ड होतं. कार्डानं मतपेट्या जिंकून दाखवल्या. पंजाबनंही ‘जय भीम’ आणि ‘सत श्री अकाल’ म्हणत या पाखराला सत्तास्थानापर्यंत नेलं. हिंदुत्ववाद्यांना खूप बरं वाटलं. ते स्वतः पराभूत झाले होते; पण त्यांचा शत्रू असणारी काँगे्रसही पराभूत झाली होती. भारतीय क्रिकेटसारखं झालं. पाक क्रिकेटला कुणीही हरवलं, तरी आपण फटाके फोडतो. जिथं आपण काँग्रेसला हरवू शकत नाही तेथे तिला हरवणार्‍या कुणाशीही गुफ्तगू करण्यास हिंदुत्ववादी म्हणजे भाजप तयार झाला. तिथं त्याच्या सावलीत राहून देशात अनेक ठिकाणी बी टीम तयार करण्यात आल्या. भाजप म्हणजे ए टीम आणि तिचा शत्रू पराभूत करणार्‍या किंवा त्यासाठी भाजपला मदत करणार्‍यांची तयार झाली बी टीम. या टीमनं भाजपविरुद्ध रात्रंदिवस टीका करायची आणि त्याला आतून सशक्त करायचं. प्रसंगी काँगे्रसला नामोहरण करून स्वतः सशक्त व्हायचं, असा हा मामला. आपण जिंकलो काय किंवा बी टीम जिंकली काय, परिणाम एकच होता आणि तो म्हणजे भाजपचा शत्रू क्षीण किंवा पराभूत होणार होता. बी टीमला ए टीम सर्व प्रकारची रसद पुरवते आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ असं प्रोत्साहन देते. अशा अनेक बी टीम आहेत. काहींनी ट्वेन्टी-ट्वेन्टीचा गेम खेळला, तर काहींनी टेस्ट मॅचचा. उत्तर प्रदेश असो, आंध्र असो, तामिळनाडू असो किंवा महाराष्ट्र असो, अनेक ठिकाणी भाजपचे छुपे क्लोन आपल्याला दिसतात. म्हणजे वरून कीर्तन आणि आतून तमाशा… काहींना तमाशाचा फड दिसतोही. पांढर्‍या बगळ्याची नजर आणि चोच कुठं स्थिर झालीय, हेही कळतं. थोडा उशीर लागतो, हे खरं आहे; पण जेव्हा बी टीम ए टीमचा अजेंडा वापरायला लागते तेव्हा तर कळूनच चुकतं.


बरेच दिवस धर्मनिरपेक्षतेची टोपी वापरणार्‍या आम आदमी पार्टीनं शेवटी आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर टोपी हलवली आणि आश्‍चर्य टोपीखाली वेगवेगळ्या श्रद्धांची गर्दी दिसायला लागली. श्रद्धा व्यक्त करताना ‘आप’नं म्हणजे बी टीमनं टीम एचीच भाषा वापरली. ‘इस देश में रहना होगा तो ‘जय श्रीराम’ कहना होगा’, अशी ती भाषा होती आणि आहे. म्हणजे या देशात राहण्यासाठी पूर्वअट आहे आणि ती म्हणजे ‘जय श्रीराम’ म्हणण्याची. तीच अट ‘आप’नं उचलत आणि आपण मुळात हिंदुत्ववादी आणि त्यातही सर्व हिंदुत्ववादी संघटनांपेक्षा कडवे हिंदुत्ववादी आहेत, हे स्पष्टपणे सांगितलं. भाजपनं राम घेतला ‘आप’नं अरविंद केजरीवाल यांनी पहिला बार उडवला आणि नोटंवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापलाच पाहिजे, अशी मागणी केली. थेट ती देशाच्या मोठ्या कारभार्‍यापर्यंत पोहोचवली. आता धर्माचं कार्ड भाजपच्या हातात असताना हे नवं कार्ड का काढलं जात आहे. रामाऐवजी गणपती आणि लक्ष्मीची भाषा का बोलली जातेय, असा प्रश्‍न सामान्य माणसाला पडला. ‘आप’चे लोक कधी-कधी गांधीवादी असतात म्हणून त्यांनी गांधींना हात घातला नाही. गणपती आणि लक्ष्मीचं नाव घेऊन भाजपसमोर पेच तयार केला जातोय, असं सामान्य माणसाला वाटत होतं; पण प्रत्यक्षात भाजपला, अन्य हिंदुत्ववाद्यांना जे वाटतं होतं तेच ‘आप’नं बोलायला सुरुवात केली. ‘आप’चे काही नेते इतके आक्रमक झाले, की जर हा प्रस्ताव मान्य नसेल, काही अडचण असेल, तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावं, असं खडसावून सांगितलं. बरं आहे, की आपला शेजारी पाकिस्तान आहे. कुणालाही तिथं जा असं सांगता येतं; अन्यथा पंचाईत झाली असती. ‘आप’ गणेश-लक्ष्मीबाबत खूपच आक्रमक झालाय आणि हा मुद्दा निवडणुकीत मांडण्याच्या प्रयत्नात आहे. गंमत ही आहे, की ‘आप’च्या दिल्लीतील एका मंत्र्यानं डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारताना म्हणावयाच्या बावीस प्रतिज्ञांचं वाचन केलं म्हणून त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं, तर पंजाबात बाबासाहेबांचा फोटो वापरून मतं गोळा करण्यात आली. दिल्लीत बावीस प्रतिज्ञा वाचणं, हा पक्षीय गुन्हा ठरवण्यात आला.
‘आप’नं गणेश आणि लक्ष्मी या देवतांना निवडणुकीत वापरावयाच्या अस्त्राप्रमाणं बाहेर काढलं. बाकीचे पक्षही अशाच अस्त्रांचा विचार करत असल्यास नवल वाटायचं काही कारण नाही. भारत भुकेच्या निर्देशांकात पाक-बंगालपेक्षा वर का गेला, बेकारांची संख्या कोट्यवधी उड्डाणे का घेत आहे, शिक्षण आणि जगणंही महाग का होत आहे, घटनात्मक संस्थांची विश्‍वासार्हता कमी का होत आहे, औषधाविना कोरोनात मरण पावलेल्या लोकांबद्दल जबाबदार कोण, असे अनेक प्रश्‍न आहेत. देवांच्या संख्येपेक्षा त्यांची संख्या कमी असेल कदाचित म्हणून काय तिकडं बघायचं नाही. ‘आप’नं दिल्लीत शाळा आणि दवाखान्याचं एक अल्पकालीन मॉडेल तयार केलं हे खरं; पण त्याला चोहोबाजुंनी गंज चढतो आहे, हे कोणी पाहत नाही. काहीही असो, आपण देवाधर्माच्या नावानं कुठं तरी वेगळ्या ठिकाणी नेलं जात आहोत का, असा प्रश्‍न तयार होतो आहे. त्याचं उत्तर शोधायला हवं. ते न शोधल्यास राजकारण मोकाट सुटेल आणि दुर्बलांचा आक्रोश ऐकण्याऐवजी घंटा ऐका, असं सांगितलं जाईल.

– पंक्चरवाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.