कोण वाघ, कोण शेळी
खूप भांडलो
आता म्हणाले समजून घेऊ
त्यांचे कुळाचार आपले म्हणून
आता पुनः घरी नेऊ
समजले आहे म्हणाले
वाघही गवत का खातो ते
वाघाकडे राहूनच त्या
शिकलो आहे म्हणाले ते
ज्या जंगलात आहे
राहायचे त्याला
ते वाघभक्षक
झाले आहे
आधी ते
वाघांचे होते
आता अशा माणसांचे
झाले आहे
वाघांनी सोडून दिले आहे
डरकाळणे
ते काम अशा
माणसांकडे आले आहे
नरभक्षक तेच
झाले आहेत
वाघ झाले
शाकाहारी
जुळवून घेऊ
म्हणतात
आणू सन्मान
आपल्या दारी
हयातीत तरी आपल्या
म्हणाले
स्थिती बहुधा
अशीच राहणार
आपण गेल्यावर
कोण वाघ, कोण शेळी
कोण विचारणार,
कोण पाहणार?
– श्रीपाद भालचंद्र जोशी