सद्यःस्थितीला भिडस्तपणे सामोरे जात आपल्या लेखणीला धार देत सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याची दिशा ठरविणारा साहित्यिक, विचारवंत, लेखक, कवी इतिहास घडवीत असतात. समाजमनाला एक नवी जागृती निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशा प्रयत्नांतून जाती-धर्माच्या पलीकडचा माणुसकी जोपासणारा माणूस घडताना दिसत असतो, असा माणूस घडावा, अशी अपेक्षा समाजमन आजही ठेवून आहे, ही अपेक्षा रास्त आणि स्वाभाविक अशीच आहे. लाचार आणि स्वार्थी जगणार्या माणसांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. आपल्या कुटुंबाला सुख, चैन आणि मौजमस्ती या पलीकडे दिशा न देणारी मानसिकता वाढू लागली असल्याने माणसाच्या नैसर्गिक अधिकारांची मागणी करणार्या चळवळी हळूहळू लाचार आणि बेबनाव करणार्या ठरू लागल्या आहेत, अशा लाचार मानसिकतेला जागा दाखवणारा ‘सालं अतीच झालं!’ हा खेमराज भोयरलिखित कवितासंग्रह समाजमनाला आत्मभान आणणारा असाच आहे. 96 कवितांचा समावेश असलेला हा कवितासंग्रह जी वास्तवता मांडून जातो त्या वास्तवतेतून निश्चितच चीड निर्माण होऊन वेदनेतून विद्रोहाकडे होणारी वाटचाल आपल्या न्याय्य हक्कांकडे नेणारी ठरत असते. कवी खेमराज भोयर ‘रोडवर अन् बेडवर’ या कवितेत लिहितात,
इरसाल प्रस्थापित कारट्यांनो
तुम्हीही त्याच मायच्या
उदरातून जन्मल्या
आणि आम्हीही त्याच मायच्या उदरातून
मग तुम्ही काहून बेडवर आणि आम्ही काहून रोडवर
याचं खरं कारण
मले आता आता कळलं
शिक्षणातून आलेल्या सजगतेमुळे आपल्याला फसवणारी प्रस्थापित समाज व्यवस्थेची मानसिकताच उघडपणे लक्षात येते. ही किडलेली, सडलेली मानसिकता लक्षात घेत कवी आपल्या कवितेतून त्या मानसिकतेचा समाचार घेतात. त्यांना त्यांची जागा दाखवतात. लेखणीचे हत्यार उगारतात. लेखणीतून प्रस्थापित समाजव्यवस्थेला जाब विचारतात. उघडपणे होणारा अन्याय अत्याचार हा कसा जाणीवपूर्वक केला जातोय याची मांडणीच कवी कवितेतून लिहितात.
समाजात असणार्या उपद्व्यापी, अराजक माजविणार्या मानसिकतेला लगाम घालण्यासाठी आपल्यातली नैतिकता आणि विचारशीलता जागृत करण्याबरोबरच आता आम्हाला घराबाहेर पडले पाहिजे, घराला सोडताना समाजाची माणसे माणुसकीच्या वर्तुळात आणण्याची जबाबदारी आम्हाला समजून घेतली पाहिजे. माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तीला एकूणच जबाबदार असलेल्या व्यवस्थेला बदलविण्यासाठी आम्हाला निश्चितपणे बर्याच अंशी त्यागाची, शौर्याची, पराक्रमाची इतिहासातील पाने पडताळून पाहिली पाहिजेत. यासाठी कवी आपल्या स्वतःच्या लेखणीला परजून घेताहेत, सोडवून घेत आहेत. ‘पेट्रोल काढू दोस्ता’ कवितेत ते लिहितात,
नाव डबक्यातील आता सागरात सोडू दोस्ता
लाथ मारून पाणी नाही चल पेट्रोल काढू दोस्ता
काठ फिरून खोलीचा अंत लागणे नाही इथे
मेंदू नासण्या भक्तीची
ती कोंडी फोड दोस्ता
आपली लेखणी परजून घेताना कवी आपल्या कवितेतून नवा आशावाद मांडतात. हा आशावाद स्फोटक जरी असला तरी त्यातून माणसांच्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी कवीचा आक्रमकपणा निश्चितपणे समाजपरिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणारा असाच आहे.
माणसाला मिळालेला निसर्गदत्त अधिकार जेव्हा माणूसच माणसाला नाकारतो त्यावेळी शोषणाच्या तर्हा वेळोवेळी लक्षात घेत अन्याय, अत्याचारी माणसाच्या विरोधात बंड करून उठण्याची ताकद येण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आत्मसात करण्याची गरज असण्याबरोबरच त्या विचारांना अनुसरून संघर्षाची तयारी केली पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरदेखील अस्पृश्यता कायम टिकवून ठेवणार्या इथल्या व्यवस्थेचा कवी निषेध करतात. माणसाच्या मनातल्या जातीयतेला इथल्या जातव्यवस्थेला सडेतोड उत्तर देण्याची गरजच कवीला अपेक्षित आहे. क्रिया, प्रतिक्रिया या उक्तीच्या अनुषंगाने जशास तसे अशा प्रकारची मानसिकता वृद्धिंगत करण्याची गरज निश्चितच आहे, हे कवी स्पष्टपणे मांडून जातात. वंचितांचे, कामगारांचे, मजुरांचे आणि शेतकर्यांचे दुःख हे समाजव्यवस्थेत अजून कायमच आहे. व्यवस्थेतील वास्तवता मांडताना कवी खेमराज भोयर आत्महत्या डॉट कॉम या कवितेत लिहितात,
कागदी घोडे अन्
कम्प्युटरचा जमाना आहे
शेतकर्यांसाठी आत्महत्येचा
कॉलम रोज रिकामा आहे
गेंड्याच्या कातड्याची असलेली इथली व्यवस्था माणसासाठी आहे की स्वार्थासाठी, प्रश्न दूर करण्यासाठी आहे की प्रश्न वाढविण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी आहे, असा सवालच कवी विचारतात. संगणकाच्या युगात माणुसकीशून्य होत जाणारा माणूस दुसर्याच्या दुःख, वेदनेकडे दुर्लक्ष करीत आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करतोय. यामुळे समाजव्यवस्था पोखरली जात असल्याचे लक्षात आल्यावाचून राहत नाही,
जनावरांच्या चार्याला सोन्याचा भाव येते
अन् सोन्यासारखा पोरगा
भाकर भाकर म्हणत जीव देते
याला जबाबदार आमचे नालायक भाडोत्री नेते
नाइलाज आमचा आम्ही पोटासाठी विकतो मते
भारतीय लोकशाहीची होणारी वाटचाल कवी वास्तव अशी मांडतात. इथल्या भांडवलदार व्यवस्थेने भारतीय लोकशाही फक्त नावापुरती मर्यादित केली आहे. इथल्या तळागाळातल्या वंचितांच्या लेकरांना भाकरीची आस अजूनही आहे. अन्न, वस्त्र, निवार्यापासून वंचित असलेली अनेक कुटुंबे आजही गावाच्या वेशी, शहराच्या फुटपाथवर कायम आहेत. दुःख, दारिद्य्रापासून अजूनही त्यांची सुटका नाही. राज्यकर्त्यांना त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या जीवनमानाला उंचावण्यासाठी प्रयत्न करावासा वाटत नाही. भांडवलदारी व्यवस्थेने घेरलेल्या इथल्या पुढार्यांना, नेत्यांना आपली दुकाने कायम टिकविण्यासाठी, थाटण्यासाठी गरीब-वंचितांना वेशीबाहेरच ठेवायचे आहे. सार्या गरिबांचाच असा कसा नाइलाज आहे, की ते पोटासाठी मत विकतात ही वास्तवता कवी आपल्या समाजव्यवस्थेतील भयानक, विदारक असे चित्रच कवितेतून रंगवतो. यातून लोकशाहीचा होणारा प्रवास किती यातनामय आहे, हे लक्षात येते. लोकशाहीचा डोलारा कोसळावा यासाठी सर्वांकडून प्रयत्न चालवलेले आहेत. धर्म, जातीच्या आड लेखण्या बरबाद केल्या जाताहेत. सर्व क्षेत्रांत राजकारणाचा प्रवेश होतोय. साहित्य क्षेत्रातल्या राजकारणाविषयी लिहिताना कवी साहित्यातील राजकारण कवितेत लिहितात,
साहित्याचे राजकारण दलालांच्या घरात आहे
लांडग्यांच्या दावणीला मेंढरांची वरात आहे
गंपूचे कंपू झाले कुणासाठी काय लिहितात
थापा परिवर्तनाच्या मन शाल पुरस्कारात आहे
समाजस्वास्थ्याच्या माणसाच्या जगण्याचा, त्याची दुःख, वेदना आणि त्यातून निर्माण होणार्या विद्रोहाचा विचार मांडणारी आपल्या लेखनातून व्यक्त होणारी फार थोडीथोडकी माणसे, लेखक, साहित्यिक लिहिणारी आहेत. बाकी बरीचशी साहित्य मंडळी राजकारण्यांच्या दावणीला बांधलेली आहे. काही खुशमस्करे स्वतःला मिरवत आहेत, तर मानपान आणि पुरस्काराकडे लक्ष ठेवून आपल्या लेखणीची वाट लावणारे आहेत. अशा या वृत्तीमुळे समाजमन दिशाहीन आणि भरकटलेले आहे. व्यवस्थेवरचा लेखणीचा असलेला अंकुश राहिलेला नाही. यामुळेच कवी आपल्या कवितासंग्रहाचे शीर्षक समर्पक असे देतात ‘सालं अतीच झालं!’. हे शीर्षक देशभरातल्या परिस्थितीचे भान लक्षात आणून देते. कवितासंग्रहाला ज्येष्ठ कवी प्रा. डॉ. यशवंत मनोहर सरांची प्रस्तावना असून, सासवडच्या ‘परिस पब्लिकेशन’ने प्रकाशित केलेले ‘सालं अतीच झालं!’ या कवितासंग्रहातील खेमराज भोयरलिखित कविता व्यवस्थेला जाग आणणार्या आहेत. वास्तवता निदर्शनास आणून देताना विनाशाचा इशारादेखील देऊन जाणार्या आहेत. कवी लोकनाथ यशवंत, सागर सरहद्दी यांनी कवितासंग्रहाची केलेली पाठराखण ही निश्चितपणे प्रामाणिक अशा देशाप्रती निष्ठा राखणार्या कवीला ऊर्जास्रोत देण्याबरोबरच लेखणीला अर्थ प्राप्त करून देणारी अशीच आहे. खेमराज भोयर यांच्या प्रामाणिक निष्ठेला, लेखणीला सन्मानपूर्वक शुभेच्छा!
– डॉ. मिलिंद विनायक बागुल
(लेखक भीम रमाई प्रतिष्ठान, जळगावचे अध्यक्ष आहेत.)