॥ एक अभिजात आत्मकथन ॥ – इंद्रजित भालेराव

॥ एक अभिजात आत्मकथन ॥ – इंद्रजित भालेराव

काळ्यानिळ्या रेषा म्हणजे माराचे वळ. राजू बाविस्कर आणि त्यांच्या समाजाला प्रस्थापित व्यवस्थेकडून जे भोगावं लागलं त्याचे आयुष्यावर उठलेले वळ म्हणजे हे आत्मकथन. वळ कुरवाळण्यातही एक सुख असतं. या लेखनातून ते सुख लेखकाला नक्कीच मिळालं असणार. शिवाय लेखक हा दुःखदारिद्य्राचा ख्यातिप्राप्त चित्रकार आहे. त्या अर्थानंही त्याच्या चित्राच्या रेषा या काळ्यानिळ्या रेषाच आहेत.
अर्थात, हे लेखन म्हणजे पारंपरिक दलित आत्मकथनासारखं दुःखाचं रडगाणं नाही. सुरुवातीच्या काही दलित आत्मकथनांना हे रडगाणं शोभूनही दिसलं; पण चतुर प्रकाशकांनी व्यवसाय यशस्वी करण्याचं साधन म्हणून काही लेखकांना हे रडगाणं गायला लावलं तेव्हा मात्र ते आरण्यरुदन झालं. त्यामुळंच पुढं दलित आत्मकथन लेखनाला उतरती कळा लागली. या पार्श्‍वभूमीवर आलेलं हे ‘काळ्यानिळ्या रेषा’ म्हणजे एका चित्रकारानं घेतलेला आपल्या चित्रप्रतिमांचा शोध आहे. तिथंच या आत्मकथनाचं वेगळेपण आहे. आपल्या चित्रातून येणार्‍या रेषा, आपल्या चित्रातून येणारे आकार, आपल्या चित्रातून येणार्‍या प्रतिमा, आपल्या आयुष्यातल्या कुठल्या अनुभवातून झिरपत आलेल्या आहेत, हे जेव्हा राजू बाविस्कर सांगतात तिथं या आत्मकथनाची उंची वाढते. अशा जागा या लेखनात खूप आहेत.
हे आत्मकथन वाचताना बहिणाबाई चौधरी यांच्या कविता सतत आठवत राहतात. राजू बाविस्कर यांच्या आईचे संवाद वाचताना बहिणाबाईच बोलत आहेत, असं वाटतं. या बोलीतलं इतकं समर्थ गद्य याआधी माझ्यातरी वाचनात नव्हतं. इथं जे काही संवाद येतात त्यातून त्या भाषेचा गोडवा, आशय व्यक्त करण्याचं सामर्थ्य तर येतंच; पण त्यासोबतच या सामान्य माणसांना जगण्याचं सार कसं समजलं होतं तेही कळतं. बहिणाबाईंनी गद्य लिहिलं असतं तर ते असंच लिहिलं असतं. जगण्याचं तत्त्वज्ञान तिनंही गद्यात मांडलं असतं, हे लक्षात येतं. ‘ही माझ्या एकट्याची कहाणी नाही. ती माझ्या संपूर्ण समाजाची कहाणी आहे’ असं जरी दलित आत्मकथनं म्हणत असली तरी ते तसं नसायचं; पण हे आत्मकथन म्हणजे खर्‍या अर्थानं संपूर्ण समाजाची आणि समाजातल्या इतरांचीच कहाणी जास्त आहे. 100 ओळी लिहिल्या तर लेखक 99 ओळी इतरांविषयी आणि एक ओळ स्वतःविषयी लिहितो. त्यामुळं यात आयुष्यात आलेल्या माणसांची इतकी व्यक्तिचित्रं आलेली आहेत की, जणू हे आत्मकथन नसून, हा एक व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे, असंच वाटतं.
ही व्यक्तिचित्रं रेखाटताना लेखक ती इतकी रेखीव करतो, की ती एक स्वतंत्र अभिजात कलाकृतीच होऊन जाते. ही व्यक्तिचित्रं केवळ मातंग समाजाचीच नाहीत, तर ती भिल्ल, तडवी, सवर्ण समाजातल्या माणसांचीही आहेत. या व्यक्तिचित्रांतली प्रत्येक व्यक्ती आपल्या काळजावर ठसूनच बसते. या व्यक्तिचित्रांत निसर्ग आणि प्राण्यांचीही व्यक्तिचित्रं आहेत. झडी शीर्षकाचा लेख म्हणजे पावसाचं एक जिवंत व्यक्तिचित्रच आहे, तर खंड्या हा कुत्र्यावरचा लेख केवळ अप्रतिम झालाय. गोरगरीब माणसं मुक्या प्राण्यांना कसा जीव लावतात त्याचा प्रत्यय इथं येतो. शेळ्या, मेंढ्या, कुत्री, कोंबडी या प्राण्यांचं विश्‍व इथं सविस्तर साकार झालेलं आहे. शिवाय भिलाटीमागचा सातपुड्याचा पहाडही फार जिवंतपणे इथं येत राहतो. त्या पहाडाविषयी इथं आलेले सगळे संदर्भ एकत्रित जुळवून घेतले, तर त्यातून या पहाडाचंही एक व्यक्तिचित्र साकार होईल. इतर दलित आत्मकथनांत कधीच न येणारा, भला-बुरा, छळणारा-पोसणारा निसर्ग हे या आत्मकथनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणून आपणाला सांगता येईल.
झडी हा लेख फारच सुंदर उतरलाय. हा लेख वाचताना मला अनंतराव पाटील या खानदेशी लेखकाचं ‘झडीचे दिवस’ हे पुस्तक आठवू लागलं. पाटलांच्या पुस्तकात भिलाटी नावाचाही एक लेख आहे. बाविस्करांच्या आत्मकथनातही सतत भिलाटी डोकावत राहते. बाविस्करांनी झड इतक्या अंगांनी उभी केलीय, की या संग्रहातला तो सर्वांत मोठा म्हणजे 28 पानांचा लेख झालेला आहे. त्यात झडीचं वर्णन, झोपडीतलं वर्णन, गरिबांचे होणारे हाल, झडीविषयीच्या दंतकथा, कथा, किस्से, मंत्र, लोकगीतं, असा सर्व पसारा येतो, तेव्हा झड लेखकाच्या अंगांगात कशी मुरलेली आहे, तेच आपल्या लक्षात येत जातं.
बैलाचं आंड ठेचण्याचं मराठी साहित्यात कुठंच न आलेलं वर्णन इथं तपशीलवार आलेलं आहे. यानिमित्तानं येणारी आणखी एक गोष्ट इथंच नमूद करतो. इतर आत्मकथनासारखा कंठाळी आवाजातला विद्रोह इथं कुठंही दिसत नाही; पण नीट लक्ष देऊन वाचलं, तर इथला विद्रोहही अभिजात स्वरूपाचा आहे. बैल अंडी ठेचण्याचं वर्णन संपल्यावर लेखक म्हणतो, माजलेला गोर्‍हा अंडी ठेचण्याचं काम, आडदांड बैलाला पासलं पाडून बाप करायचा; पण बैलाच्या आडदांड मालकापुढं मात्र त्याची नांगी पडायची. त्यानिमित्तानं वडील कसे घाबरट होते आणि आई कशी धीट होती, ती वडिलांना वेळोवेळी कसं धैर्य द्यायची, तेही लेखकानं लिहिलं आहे.


खंड्या कुत्र्याच्या व्यक्तिचित्रातही या अभिजात विद्रोहाची चुणूक आपणाला पाहायला मिळते. हा तगडा कुत्रा सवर्ण वस्तीतल्या कुत्र्यांना सहज चीत करायचा, लोळवायचा; पण त्याचा मालक म्हणजे लेखकाचा बाप मात्र सवर्ण वस्तीतल्या माणसांपुढं सतत शेपूट घालायचा. या प्रत्येक वेळी बापानं विद्रोही व्हायला पाहिजे होतं, असं हा कोवळा नायक सुप्तपणे, सूचकपणे मांडत जातो.
या आत्मकथनातले अनुभव लेखक आठवतील तसे नुसता मांडत गेलेला नाही. त्यानं प्रत्येक अनुभवाचं चिंतन केलंय, त्यावर तात्त्विक भाष्य केलंय. प्रत्येक अनुभवाच्या चिंतनातून त्यानं जीवनाचं सार काढलंय. संपादक, प्रकाशकांनी मजकुराची मांडणी करताना त्या-त्या प्रकरणाचं सार सांगणार्‍या चार ओळी प्रकरणाच्या सुरुवातीला टाकल्यात. त्यातून ती आठवण लिहिण्यामागचा लेखकाचा उद्देश आपल्या लक्षात येतो. बर्‍याचदा असं जगण्याचं सार लेखकाच्या आईच्या संवादातूनही आपणाला सापडतं. त्या-त्या वेळी लेखकाची आई आणि बहिणाबाई यांच्यातील साम्य आपल्या लक्षात येतं.
थोडाफार सुधारकी अवस्थेत जगणारा गाव आणि संपूर्ण आदिम अवस्थेत जगणारा मांगवाडा आणि भिलाटी यांचे सविस्तर तपशील लेखक देत जातो. जणू आदिम जंगल आणि गाव यांच्यातला दुवा म्हणजे मांग, भिल्ल आणि तडवी. ते जंगलात जातात, शिकार करतात, जंगली वस्तूपासून जीवनावश्यक साधनं तयार करून गावाला पुरवतात. वेळप्रसंगी चोर्‍यामार्‍याही करतात. गिरिकंदारातल्या सिकंदर काका या तडवी माणसाचं एक सविस्तर व्यक्तिचित्र इथं येतं. तो एका बाजूला आदिमानव वाटतो आणि त्याचवेळी तो मोठा कलावंतही आहे. त्याचं लेखकानं उभं केलेलं व्यक्तिचित्र मोठं रसरशीत झालेलं आहे.
राजू बाविस्कर हे आता ख्यातकीर्त चित्रकार आहेत. त्यामुळे आतापर्यंत त्यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठं केलेली आहेत. पुस्तकांच्या सजावटीही केलेल्या आहेत. या पुस्तकाचं मुखपृष्ठ मात्र त्यांनी केलेलं नाही. स्वतः राजू बाविस्कर ट्रंपेट हे बँडमधलं वाद्य वाजवताना काढलेला फोटो इथं वापरण्यात आलेला आहे. हे छायाचित्र निशंक बाविस्कर यांनी काढलेलं आहे. पुस्तकाच्या शीर्षकाचं सुलेखन विजय जैन यांनी केलेलं आहे. मुखपृष्ठाची रचना विकास मलारा यांनी केलेली आहे. हे सगळंच खूप चांगलं आहे; पण तरीही वाटतं की राजू बाविस्कर यांचं एखादं पोर्ट्रेट मुखपृष्ठासाठी घेतलं असतं, तर अधिक चांगलं झालं असतं. कारण त्यांचं एखादं रंगीत चित्र या पुस्तकासोबत लोकांच्या पाहण्यात आलं असतं. लोकांना त्यांच्या चित्रकारितेतल्या कामाचा अंदाज आला असता; पण प्रकाशकांनी कदाचित व्यावसायिक बाजू पाहिली असावी.
सुदैवानं आतली सगळी रेखाटनं मात्र बाविस्कर यांनीच काढलेली आहेत. प्रत्येक प्रकरणाला एक पानभर रेखाटन वापरलेलं आहे. प्रकाशकांनी त्यात मात्र कंजुषी केलेली नाही. प्रत्येक रेखाटनाला स्वतंत्र पान दिलेलं आहे. रिकाम्या जागेत रेखाटनांची बोळवण केलेली नाही. नेहमी मजकूर लिहिणारा एक आणि चित्र काढणारा दुसरा असतो. इथं मात्र दोन्ही एकच असल्यामुळं रेखाटनं नेमकी उतरलीत. चित्रकार दुसरा असता तर त्याला मजकूर वाचून, कल्पना करून चित्रं काढावी लागली असती. इथं मात्र चित्र काढणार्‍याच्याच डोक्यातल्या आठवणी असल्यामुळं त्यानं अचूक रेखाटनं काढलेली आहेत. शिवाय त्या निमित्तानं लेखकाच्या चित्रकारितेचाही अंदाज येतो.
या आत्मकथनातल्या प्रत्येक प्रकरणाची रचना कथेसारखी आहे. त्यामुळं हे प्रत्येक प्रकरण स्वयंभू आणि तरी मूळ आत्मकथनाशी जोडलेलं वाटतं. ही जशी व्यक्तिचित्रं आहेत तशाच या लहान-लहान कथाही आहेत. म्हटलं तर ही एक कादंबरीही आहे. त्यामुळंच आपणाला इथला मजकूर वाचत असताना आणखीही काय-काय आठवत जातं. चिल्या वाचताना वेंकटेश माडगूळकरांचा गणा भपट्या आठवतो, दलित वस्तीची वर्णन वाचताना नेमाडे यांच्या हिंदूतली अशीच वर्णनं आठवतात, तीन बोट्या वाचताना अण्णाभाऊंची स्मशानातलं सोनं ही कथा आठवते, झडीचे दिवस वाचताना त्याच नावाचा अनंतराव पाटलांचा लेख आठवतो, लेखकाचं बँड प्रकरण वाचताना आनंद यादवांचा ‘नटरंग’मधला गुना आठवतो. अर्थातच हे अनुकरण नाही. माझ्या वाचनातली ही साम्यस्थळं आहेत. त्यामुळंच हे लेखन अभिजात पातळीवर जात आहे, याचा अंदाज येतो.
भाकरी मागणं, मौतीत उधळलेले पैसे वेचणं, डफडं वाजवणं, मेलेली कुत्री, जनावरं ओढून नेणं, जनावरांची कातडी सोलून ती विकणं, या मांगकीच्या कामाचं वर्णन लेखकानं तपशिलानं आणि त्यातल्या खाचाखोचांसह, बारकाव्यानिशी केलेलं आहे. त्यामुळं हे लेखन जिवंत झालेलं आहे. भाकरी मागण्याचा हक्क असणारा मांग इतर मांगांना मोठा भाग्यवान वाटतो. चूल न पेटवताही तो पोटभर जेवू शकतो, याची इतर मांगांना असूयाही वाटते.
तसा भद्र समाजात शुभ शकुनी समजला जाणारा मांग स्वतः मात्र दुर्दैवी जीवन जगत असतो. आपल्या आईला प्रस्थापित वस्तीतल्या बाया कसा मान देत असत त्याचे तपशीलही लेखक देतो. अवतीभोवतीच्या काही व्यभिचारी स्त्रियांचीही व्यक्तिचित्रं लेखक रेखाटतो. विमला मावशी, वायची, राणू, हिरा ही काही अशीच व्यक्तिचित्रं आहेत. लेखक ना त्यांच्याकडं तुच्छतेनं पाहतो ना उगाच उदात्ततेनं पाहतो. आहे ते वास्तव तो आपल्या निरागस डोळ्यानं मांडतो. देखण्या, मायाळू, घरादारासह निर्मळ राहणार्‍या, दिलदार, अशा या बाया लेखकाला लळा लावून जातात; पण प्रत्येकीच्या आयुष्याचा शेवट शोकांतच होतो. हेही लिहायला लेखक विसरत नाही.
या पार्श्‍वभूमीवर लेखकाची आई फार वेगळी संस्कारसंपन्न आणि महत्त्वाकांक्षी वाटते. ती श्यामच्या आईपेक्षा तीळभरही कमी नाही. घडोघडी ती आपल्या मुलांमध्ये संस्कारांची पेरणी करते. त्यांनी चोरी करू नये, जुगार खेळू नये, खोटं बोलू नये, तमाशात वाजवू नये, मुक्या जिवांना जीव लावावा, संकटातल्या माणसांना समजून घ्यावं, मदत करावी, पोथी ऐकावी, खूप शिकावं, अशा कितीतरी गोष्टी ती आपल्या मुलांच्या मनावर बिंबवते. मांगवाड्याच्या खातेर्‍यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी धडपडते. त्यांना बँड उभा करून देते. त्यासाठी वडिलांकडून मिळालेलं वतन विकते. हर प्रकारे तिचा प्रयत्न असतो मुलांनी मोठं व्हावं, पुढं जावं, शिकावं.
याविरुद्ध वडील. त्यांचंही मुलांवर प्रेम आहेच; पण त्यापेक्षाही त्यांचं प्रेम व्यसनांवर असतं. जुगारावर असतं. त्यामुळं घराची शोकांतिका होते. आईची धडपड त्या शोकांतिकेतून घराला बाहेर काढण्यासाठी असते. निम्म्या पुस्तकानंतर सुरू होतो बँड. बँडपथक उभं करताना लेखक जी धडपड करतो ती वाचण्यासारखी आहे. त्यातली कला, त्याचे बारकावे, त्यातलं शास्त्र समजून घेण्याची धडपड, त्यासाठी एका गायकाला भेटणं, हे सगळं पाहिलं की त्याचा हा कलेवर असलेला जीव, ध्यास, वेड आनंद यादवांच्या ‘नटरंग’मधल्या गुणाची आठवण करून देतो. ते सगळेच तपशील मुळात वाचण्यासारखे आहेत. त्यातले सोबती, त्यातले गुरू, त्यातले जाणकार, त्यातले रसिक, यांची छोटी-छोटी व्यक्तिचित्रं खिळवून ठेवतात.
गावात इंदिरानगर ही सरकारी झोपडपट्टी आल्यावर मांगवाड्यातलं लेखकाचं एकटंच घर तिथं जातं आणि हे या कुटुंबाच्या जीवनातलंही स्थलांतर ठरतं. मांगवाड्याच्या खातेर्‍यातून मुलं बाहेर काढण्याची आईची इच्छा अशा प्रकारे आपोआप साध्य होते. भोवताल बदलतो, शेजारी बदलतात, मुलांचे मित्रं बदलतात. मुलं शाळेच्या नादी लागतात. लेखकाची मध्येच सुटलेली शाळा पुन्हा सुरू होते. आयुष्याची दिशा बदलते. आयुष्याचं कल्याण होतं.
धुपी, जिवर्‍या, राणू, हिरा, चिल्या, चट्टा, तीन बोट्या, रम्या, डिग्या, इवर्‍या, मल्या, मधुअप्पा, बळ्या, हे आपले बालसवंगडी लेखकानं फार जीव लावून रंगवले आहेत. अज्ञान, निरक्षरता, रोगराई, गरिबी, या गोष्टींनी त्यांना कसं खंगवून-खंगवून मारलं ते वाचताना आपण अस्वस्थ होतो. या सगळ्या खातेर्‍यातून लेखकाचं घर तेवढं बाहेर पडलं, शिकलं, नोकर्‍या लागल्या. त्यामुळंच या समग्र लेखनाची नायिका आहे ती लेखकाची आई. लेखक आईला माडे म्हणतो, ते माये या शब्दाचं खानदेशी रूप असावं. आई लेखकाला भुर्‍या म्हणते. त्याचा अर्थ पोरा, लेकरा असा असावा. हा भुरा आणि ही माडी हेच श्याम आणि श्यामची आई आहेत.
जे हाती घेतलं ते काम ध्यास घेऊन उंचीला नेणं हा लेखकाचा स्वभावच आहे. मग ते गावकीचं काम असो, की चित्र काढणं असो, गणपतीची मूर्ती घडवणं असो की बँड वाजवणं असो. याच ध्यासातून लेखक आज ख्यातिप्राप्त चित्रकार आणि आता लेखकही झालेला आहे. जगण्यावागण्यातला प्रामाणिकपणा लेखकानं लहानपणापासून कधीच सोडला नाही. हा गुण कदाचित आई-वडिलांकडूनच त्यांच्यात आला असावा. अर्थातच त्यामुळंच त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. हे लेखनही त्यामुळंच अतिशय प्रामाणिक झालं. म्हणूनच त्याची वाटचाल अभिजाततेकडं झालेली आहे.
या आत्मकथनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी साहित्यात अनोखं असलेलं बँड वाजवणार्‍यांचं भावविश्‍व इथं प्रथमच येत आहे आणि ते इतक्या चौफेर आलंय की त्यात सगळे जीवनकंगोरे येतात. त्यांच्या रिहर्सल, रियाज, वाद्य, त्या वाद्यांची वैशिष्ट्ये, वाजवणार्‍यांचे स्वभाव, त्यांच्यातली स्पर्धा, असूया ही सगळी मानवी अंगं लेखकानं इथं रेखाटलेली आहेत. बँडमध्ये काम करणार्‍यांचं कुणी असं आतलं भावविश्‍व मराठीत तरी रेखाटलेलं नव्हतं.
या आत्मकथनातलं शेवटचं, शिक्षण नावाचं प्रकरण म्हणजे लेखकाच्या आयुष्याची रूपरेषाच आहे. या 23 पानांच्या प्रकरणात लेखकाचं, त्याच्या कुटुंबाचं संपूर्ण चरित्र आलेलं आहे. खरं तर हे प्रकरण कचरू नावाच्या मोठ्या भावाचं व्यक्तिचित्र आहे. त्याच्या रूपानं मांग समाजात तालुक्यात पहिला पदवीधर नोकर झाला. त्याची प्रेरणा घेऊन लेखकही तोच मार्ग निवडतो आणि आयुष्याचं सोनं करून घेतो.

– इंद्रजित भालेराव

(लेखक हे सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *