कुणालाच कसे सुरक्षित
वाटत नाही आहे जिथे तिथे,
मारला जातो आहे माणूसच
रोज, जिथे तिथे
हे कसले पसरले आहे लोण,
जिथे तिथे,
कोणीही उठतो, जिवावर
कुणाच्याही, जिथे तिथे
विकत मिळतात का
माणसांना मारणारी
अशी माणसे
जिथे तिथे
कुठेही,
ठरवून विकत
घेतली जातात का ती
अशी, जिथे तिथे
एवढी कशी वाढली हो
बेरोजगारी, सार्याच चकचकीत समृद्धीच्या युगात,
जिथे तिथे
कोण आहेत ते सारेच,
जे तरीही, हातावर हात आणि
तोंडाला पट्टीच बांधून
असतात जिथे तिथे
दूर चालले आहे की
जवळ हे सारे
जिथे तिथे,
हे महत्त्वाचे नाही आहे
काही दाणे जात्यात
तर काही सुपात
आहेत
जिथे तिथे
निर्भय असण्याच्या आपल्या अधिकाराचे
काय झाले,
जिथे तिथे
इथून तिथून
सारेच फक्त कसे
भयग्रस्त
जिथे तिथे
तरी बरे, कायदा आणि
सुव्यवस्था
उत्तमच आहे
जिथे तिथे
परकीयच आहे म्हणतात ते
कुठलेही स्वकीय, जिथे तिथे
बाकी सारे उत्तमच आहे म्हणतात जिथे तिथे
येतात कसे ते इथपर्यंत
सारे सारे ओलांडून, जिथे तिथे
कोण आणते, कोण पळवते त्यांना, रक्त सांडून जिथे तिथे
कोण कोणाला नेमके कशासाठी घाबरवते आहे
जिथे तिथे, यासाठीच का ही सुरक्षा, शस्त्र, अस्त्र, अण्वस्त्र, जिथे तिथे
कोणाच्या ताब्यात काय काय आणि किती किती, जिथे तिथे
तेवढ्यासाठीच मारली जाताहेत का ही माणसे जिथे तिथे?
– श्रीपाद भालचंद्र जोशी