‘देशोधडी’च्या अंतरंगात शिरताना.. – लहू गायकवाड

‘देशोधडी’च्या अंतरंगात शिरताना.. – लहू गायकवाड

नारायण भोसलेलिखित ‘देशोधडी’ हा आत्मचरित्रपर ग्रंथ मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे लेखक प्राध्यापक पदापर्यंत कसे पोहोचले. तसे हे आत्मचरित्र नारायण भोसले यांचे असले तरी नंदीबैल या जमातीत जन्माला आलेल्या आणि आयुष्यात उभे राहू पाहणार्‍या समाजातील तरुणांना ते दीपस्तंभ ठरत आहे. पुस्तकाच्या पहिल्या पानावरील रेखाचित्र खूप काही सांगून जाणारे आहे. आपल्या जातीची, नातेवाइकांची आणि आई-वडिलांची भांडणे सोडविणारा नारायण आणि त्याचे भाऊ-बहीण कितीतरी समजदार वाटतात. हे केवळ नारायण भोसले यांचे आत्मचरित्र नाही, तर एकंदरीतच इतिहासाच्या नूतन प्रवाहांपैकी जन्मास आलेल्या मौखिक इतिहास प्रवाहांपैकी एक आहे.


‘भारत माझा देश आहे’ असे म्हणणार्‍या या लेखकास गाव नाही. लेखकाच्या वडिलांनी ज्याठिकाणी मुक्काम टाकला तेथील पोलिस व लोकांनी विचारले गाव कोणते, तर आणि कोठे चालला, तर पूर्वेकडून आलो आणि पश्‍चिमेकडे चाललो. पश्‍चिमेकडून आलो आणि पूर्वेकडे चाललो, असे म्हणण्याची सवय लागली होती. तरीही त्यांच्या वडिलांमधला आध्यात्मिक गुण मला फार आवडला. नाथपंथीयांचे साहित्य, कबीरांचे दोहे आणि एकंदरीतच त्यांना मुखोद्गत असलेले सर्व आध्यात्मिक साहित्य ते पटपट बोलत. किती मोठी ही त्यांची बुद्धिमत्ता. कोणत्याही शाळेत न गेलेला हा लेखकाचा बाप अनेक भाषा अवगत करतो. कित्येक साधूंना वादविवादाच्या स्पर्धेत पराभूत करतो. परिस्थिती अंगावर येईल असे वाटले आणि स्वतःची चूक नसली तरी लेकरांसाठी प्रसंगी माघार घेणारा हा माणूस मला मनापासून भावला. या पुस्तकाच्या लेखकाला आठ भावंडे. आता बघा भारतात कोणकोणत्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर भारत, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये त्यांची आठ भावंडे जन्मास आली. मग खर्‍या अर्थाने ‘आम्ही सारे भारतीय आहोत’ याचा पाया नारायण यांच्या स्वतःच्या घरातच घातला गेला, असे वाटते. नाही म्हणायला सोलापूर जिल्ह्यातील बामणी नावाचे गाव त्यांना जवळचे वाटते.
संपूर्ण पुस्तकामध्ये लेखकाची आई आणि आजी आपला प्रभाव टाकतात. कोणत्याही शाळेत न गेलेली आजी मला हुशार वाटली. आतापर्यंत आपल्या जमातीत असलेली सर्व बंधने तोडून आपल्या नातवांनी शिक्षण घ्यावे यासाठी ती कष्ट करत राहिली, झिजत राहिली. लेखकाचे आई-वडील आणि इतर सर्व भारतभर भीक मागण्यासाठी फिरत असताना आजी मात्र नातवांना शाळेसाठी घेऊन सोलापूर जिल्ह्यातील बामणी येथे पालात राहत असे. ते पाल कसे उभारत, कसे गुंडाळत, हे नारायणच्या आईकडून शिकावे. आयुष्यात सुख-समृद्धी असूनही वडिलांनी ज्याच्याशी विवाह करून दिला अशा भीक मागणार्‍या आणि भारतभर फिरणार्‍या माणसाबरोबर स्वतःचा संसार करणारी नारायणची आई मला माझीच वाटते. वास्तविक नारायणच्या मामाची परिस्थिती खूप चांगली. आईने कधी भीक मागितली नव्हती. नवर्‍यासाठी, लेकरांसाठी मात्र तिला दारोदार फिरावे लागले. आईचा सुजलेला पाय, आई आणि वडिलांची होणारी भांडणे त्यातून लेकरांची होणारी हलाखीची परिस्थिती. एकदा तर आईच्या पायावर उपचार करण्यासाठी डॉक्टरकडे गेल्यावर माझ्याकडे पैसे नाहीत, असे नम्रपणाने लेखकाच्या वडिलांनी सांगितले. शिक्षणाच्या अभावाने या जमातीत आलेली अंधश्रद्धा भोसले यांनी पदोपदी अधोरेखित केली आहे. त्याचबरोबर ती घालविण्यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जपला पाहिजे, हे सांगायला ते विसरले नाहीत. शिक्षण घेत असताना हळूच सिनेमा पाहायला आणि फोटो काढायला जाणारा लेखक पुस्तकात रमणारा आहे. आपणही नवर्‍याबरोबर फोटो काढावा म्हणून नवर्‍याला आग्रह धरणारी नारायणची आई अखेर नवर्‍यासमवेत फोटो काढण्यात यशस्वी होते. शाळा सुटल्यावर दुपारी जेवायला काही नाही म्हणून रोगाने मेलेल्या कोंबड्यांची पार्टी करणारा नारायण आणि पतार नावाच्या एका धार्मिक विधीमध्ये चांगले जेवण मिळते म्हणून लेखक त्याची वाट पाहत असे. कारण त्यादिवशी किमान पोटभर जेवण मिळत असे. लेखकाची आई आणि लेखकाच्या वडिलांची बहीण यांच्यातील नणंद व भावजय हा सुप्त संघर्ष आजही समाजात दिसून येतो. लेखकांच्या वडिलांची यामधून होणारी घुसमट ही फार काही सांगून जाणारी आहे. लेखकाच्या आईने बारा रुपयांना नवी साडी विकत घेतली. आयुष्यात प्रथमच विकत घेतलेली नवीन साडी आई वापरणार होती. आनंद मिळणार होता. पोलिसांची धाड पडली तर भीक मागणारे तुम्ही नवीन साडी कशी घेता, अशी वेगळीच भीती आता कुटुंबाला पडली.
लेखकाचे शिक्षण आणि पाटीपुराण तर फार वाचण्यासारखे आहे. नारायण भोसले यांची शाळा सुरू झाली. खरे तर शाळा शिकणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. भोसले यांची पाटी व पाटीपुराण शाळेत जाणार्‍या आणि गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने वाचले पाहिजे. शाळेला फी, प्रवास खर्च, पाटी, दप्तर, पेन्सिल या गोष्टी तशा त्यांना दुर्मीळ होत्या. कारण खर्च करून घेणे परवडत नव्हते. ते घेण्यासाठी त्यांच्या परिवाराकडे पैसे नव्हते. आजीने खापराची पाटी घेऊन दिली. नारायण म्हणतात, मी पाटी जिवापाड जपायचो. कारण ती फुटायची माझ्या नशिबासारखी. कधी थुंकून पाटी पुसणारा नारायण आता पाटी पुसण्यासाठी पाणी नेऊ लागला. याचे श्रेय नारायणला नव्हे, तर त्याच्या आजीला. आपला नातू अभ्यास करतो की नाही, हे आजीला कळावे म्हणून ती नातवाला मोठ्याने वाचायला सांगत असे. स्वस्त धान्य दुकानाचे भोसले यांनी केलेले वर्णन म्हणजे भ्रष्टाचार किती खोलवर दडला आहे आणि पुरेपूर पसरला आहे, याची जाणीव करून देणारे आहे. वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षापर्यंत नारायणच्या घरात कधी गरम चपाती व भात शिजला, हे त्याला आठवत नाही. या एका वाक्यावरून आर्थिक परिस्थितीची कल्पना आपणास येऊ शकेल. रस्त्यावरच्या कडुलिंबाच्या निंबोळ्या विकून नारायणने पाटी घेतली. सर्वांसाठी कडू असणारा निंब नारायणसाठी मात्र गोड होता. गावदेवी आणि मारुती हा परिच्छेद वाचताना समाजाच्या घटकांमध्ये अंधश्रद्धा किती खोलवर रुजली आहे, याचा प्रत्यय येतो. मात्र, या यात्रेमधून खोबरे आणि साखर मिळत असे म्हणून नारायणला यात्राही आनंदाची वाटत असे. पोटाची खळगी भरताना सुकडीचा खाऊ हा काहीतरी वेगळेच वाटे. सुकडीमध्ये असणार्‍या अळ्या नारायण अलगद बाजूला काढे आणि बाकी सुकडी खाऊन घेत असे. यातही त्यास समाधान वाटे, की आपल्याबरोबर एक जीव जगतो आहे. सुकडीच्या पोत्यात उंदीर आणि घुशीच्या लेंड्या सापडत. गरिबी काय असते आणि त्यातून अपमान कसा केला जातो हे सांगणारे हे उत्तम उदाहरण. भूक आणि तहान या गोष्टीवर अजून दिलेले उत्तर फार गंभीर आहे. टोपल्यात भाकरी आहे. मात्र, ती ताजी नाही. कारण भाकरी ही मागून आणलेली असे. सख्ख्या भावंडांमध्ये ती भांडण लावत असे.  भुईमुगाच्या शेंगा शेतात काढण्यासाठी जाणे म्हणजे शेंगा उपटणे कमी आणि खाणे जास्त, हा नारायणचा उद्योग. भुईमुगाच्या शेंगा म्हणजे गरिबाचे बदाम, असे आजी म्हणत असे.
नारायणला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला जाण्यासाठी दुसर्‍या गावी तीन दिवस जावे लागणार होते. आता सोबत किमान दोन कपडे हवेत. नारायणकडे दुसरी चड्डीही नव्हती. आजच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी नारायणची शाळा हा परिच्छेद फार बारकाईने वाचला पाहिजे, असा माझा आग्रह आहे. अशा विपरीत परिस्थितीमध्येही नारायणची शाळा सुटली नाही. नारायणची आई कमालीची स्वच्छता पाळणारी. कपडे फाटके का असेना; पण शिवून व स्वच्छ असत. इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतल्यावर नारायण दररोज सात किलोमीटर पायी जा-ये करत असे. अखेर नारायणला बोर्डिंग मिळाले. किमान दोन वेळच्या पोटभर जेवणाची सोय झाली.
नारायणचे कुटुंब म्हणजे आई-वडील भिक्षा मागण्यासाठी दिल्लीकडे निघाले. वास्तविक कोठे जायचे हे काही पूर्वी ठरलेले नसायचे. ज्या बाजूला अन्न मिळेल म्हणजे पोटाची सोय होईल, त्याचा अंदाज बांधून तिकडे जावे लागत असे. भारताची राजधानी दिल्ली येथे जाण्याचे एक कारण होते ते म्हणजे दिल्लीत भंगार गोळा करण्याची संधी होती. कचरा आणि भंगार गोळा करून पोटाची भूक भागविण्याचा भोसले परिवाराचा इरादा आता पूर्ण होईल, असे वाटू लागले. दिल्लीत राहण्याचे ठिकाण म्हणजे मोठी गटार जिथे वाहते त्या सांडपाण्याजवळ आपले पाल उभारणे. सांडपाण्याचा येणारा वास नेहमीचा असल्याने तो फार त्रास देत नसे. ते जे काही भंगार गोळा करत होते, तसेच त्यांचे विचार भंगार होऊ लागले, असे नारायण म्हणतो. कारण त्यातील बरेच जण व्यसनांच्या आहारी गेले. ती माणसे वाईट जीवनाचा भाग बनू लागली.
नारायणचे वडील आसाम बंगाल आणि ओरिसा राज्यांत पोट भरण्यासाठी निघून गेले. एकीकडे नारायण शाळा शिकत होता आणि नारायणचा भाऊ आप्पा मात्र सातवीतून शाळा सोडून वेगळेच काहीतरी करू लागला. प्रचंड ताकतीचा असलेला आप्पा कुस्तीत करिअर करू शकत होता. जिथे खायलाच काही नाही तिथे दिशा कोण देणार, अशी या जमातीची दशा वाईट होती.
नारायणची आई अंगावर दागिने घालत नसे म्हणून इतर बायका काहीशा तिलाही कमी लेखत. त्यावर आई म्हणे. दाग अन् दागिना हा नुसता जिवाला घोर. पोटीचं लाल माझ्या माझं हे सरकार. काय दाविती दागिने काना-नाकातले. माझी बाळं अक्षरे फोडीती कागदातलं. नारायण आईचं हे गाणं तू खरं करून दाखवलं. शाळेत न गेलेली नारायणची आई म्हणत असे; होईल साहेब शाळेत जाता मूल माझं. किती हा विश्‍वास.
वसतिगृहातील दिवस नारायणला स्वर्गासारखे वाटू लागले. पोटभर खाण्यास मिळे. हे त्याचे मुख्य कारण; पण प्रत्येकाच्या ताटात किड्यांशिवाय भाजी आणि भाकरी येतच नसे. तो म्हणतो आज भाजी कशाची वांगे आणि अळ्याची. आजारी पडले तर मात्र डॉक्टर सर्वांना एकाच प्रकारच्या गोळ्या देत असे. मग आजार कोणता हे डॉक्टरला कळे की न कळे याविषयी डॉक्टरच जाणे. आपणास वसतिगृहातून घरी जाण्यासाठी किती आनंद वाटतो. नारायणला मात्र दुःख होई. कारण वसतिगृहात पूर्ण जेवण मिळे. असे पूर्ण जेवण घरी मिळेल की नाही, याची शाश्‍वती नाही, म्हणून वाईट वाटे; पण सुखावह बाब म्हणजे मायाळू, दयाळू नारायणची आजी म्हणत असे, दत्तू नारायण बाळ नेत्र माझं श्रीहरी. दत्तू नारायण बाळ माझी वाचती पुस्तक. गुरुजी आणि मास्तराचं होई चकित मस्तक. आजीचे हे गाणे नारायणला प्रसंगी पोटाची भूक विसरायला भाग पाडत असे.
या संपूर्ण ग्रंथामध्ये मला जशी नारायणची आजी खूप पुरोगामी वाटली, तसेच नारायणचे वडील कधीही कोणत्याच शाळेत गेले नाहीत तरी कबीर परंपरेचे ते पाईक आहेत, असे मला वाटते. कधीही शाळेत न गेलेला हा माणूस कबीरांचे हजारो दोहे मुखोद्गत करतो आणि उत्तर भारतात अनेक साधूंना स्वतःच्या हुशारीने आणि मौखिक परंपरेने पराभूत करतो. हा बाप सर्वांत महत्त्वपूर्ण आहे. आपणा सर्वांना नम्रतेची विनंती, नारायणचे ‘देशोधडी’ हे पुस्तक किमान एकदा पाहा, वाचा आणि संग्रहित ठेवा. अर्थात प्रेमाचा आग्रह बस एवढेच. 

– लहू गायकवाड

(लेखक इतिहास विभागात प्राध्यापक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *