भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन: एका समग्र परिवर्तनाचा प्रारंभ – उत्तम कांबळे

भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन: एका समग्र परिवर्तनाचा प्रारंभ – उत्तम कांबळे

उत्तम कांबळे यांचे दुबईतील भाषण

मित्र हो, भारतातच नव्हे, तर जगाच्या पाठीवरही मि ऐतिहासिक ठरलेल्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा क्रांतिकारक वसा सांगणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर दुबईत होत असलेल्या संमेलनाचे किंवा समारंभाचे उद्घाटक आणि जागतिक पातळीवरील थोर विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, अशा संमेलनाच्या पहिल्या महिला स्वागताध्यक्ष होण्याचा मान ज्यांना मिळाला त्या भारतातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मनीषा जगताप, महाराष्ट्र आणि राज्यभर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा व्रतस्थ आणि समर्पित भावनेने प्रचार-प्रसार करणारे डॉ. रोहिदास जाधव जे फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार मंडळाचे अध्यक्ष आहेत; दुबईतील संमेलनाच्या संयोजनासाठी भारतात राहून समन्वयाचे खूप मोठे काम करणारे युवा उद्योजक आणि कार्यकर्ते आबासाहेब थोरात, संमेलन यशस्वी करण्यासाठी आणि ते आंतरराष्ट्रीय बनवण्यासाठी गेले काही महिने अहोरात्र प्रयत्न करणारे दुबईतील आणि भारतातील माझे सर्व धम्म बांधव, संमेलनात निबंधवाचन आणि परिसंवादात भाग घेण्यासाठी उपस्थित असलेले माझे सर्व मित्र आणि सर्व धम्म बंधू-भगिनींनो, सर्वांना जय बुद्ध आणि जय भीम. एका अतिशय महत्त्वाच्या संमेलनाचे अध्यक्षपद मला दिले याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. भौतिक प्रगतीमध्ये जगात अग्रेसर असलेल्या दुबईत हे संमेलन होत आहे. या संमेलनामुळे दुबईतील निळे आकाश आणखी स्निग्ध होईल, याची मला आशा आहे. मित्रहो, आपण सारे एका धगधगत्या जगात पोहोचलो आहोत. अशा वेळी ‘युद्ध नको,बुद्ध हवा’ हे एका सुरात जगाला सतत सांगत राहण्याची गरज आहे. त्यासाठी संमेलनाला खूप महत्व आहे. संमेलन म्हणजे केवळ एकत्र येणे नसते, तर बुद्धाने दिलेला उजेड चौफेर उधळण्यासाठी पुन:पुन्हा प्रयत्न करणे असते. आपण पृथ्वीच्या पाठीवर कोणत्याही टोकावर असू आणि सोबतीला बुद्ध असेल, तर आपले जगणे आणखी सुंदर होते. शांततामय होते. सुरक्षित होते. पूर्वी भन्तेंच्या संगिनी भरत असत. आता त्या कमी होत गेल्या. त्याची जागा अशा संमेलनांनी घेतल्यास खूप चांगले होईल.

मित्रहो, माझ्यापूर्वी डॉ. कसबे यांचे बुद्धावर अतिशय सुंदर भाषण झाले आहे. बुद्ध आणि बाबासाहेब यांचे ते गाढे अभ्यासक आहेत आणि मी या सर्वांचा वाचक आहे. बुद्ध काही एका ग्रंथात, एका संमेलनात किंवा एका अध्यक्षीय व्याख्यानात मावणारा विषय नाही. तो नव्या माणसाच्या, नव्या उजेडाच्या आणि ज्ञानाच्या कणाकणात भरून पावला आहे. प्रज्ञा, शील, करुणा आणि बंधुतेवरची तो छत्रछाया आहे. अशा बुद्धावर सलग बोलण्याची वेळ आणि जागा ही नाही, याची मला जाणीव आहे. मित्रहो, बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्याने जे पहिले प्रवचन दिले, त्याचाच विचार मी माझ्या अध्यक्षीय भाषणात करणार आहे. तो तुम्ही समजून घ्याल, अशी आशा आहे. तशी विनंतीही आहे.

दुःखाची कारणे शोधण्यासाठी, त्यासाठीचे ज्ञान शोधण्यासाठी सिद्धार्थ घराबाहेर पडला. सत्ता, संपत्ती, नाती आदींचा त्याने त्याग केला होता. अखंड प्रवास सुरू केला. या प्रवासात त्याने अनेक ऋषी-मुनींची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा केली. प्रश्नोत्तरे केली.
प्रसंगी वादविवाद केले; पण त्याला उत्तर सापडत नव्हते. जे सांगितले जात होते ते त्याला पटत नव्हते. त्याची भ्रमंती चालूच होती. तो आराड मुनीच्या आश्रमात गेला. मग उद्दक रामपुत्त ऋषीने केलेल्या उपदेशानुसार त्याने अभ्यास पूर्ण केला. शेवटची समाधी त्याला प्राप्त झाली होती. उद्दकनेही ते मान्य केले. सिद्धार्थाचे कौतुक केले. बोधिसत्त्व बनलेला सिद्धार्थ मात्र समाधानी नव्हता. आपल्याला समाधी साध्य झाली असली तरी ती पुरेशी नाही. आपल्याला निर्वाणाकडे जायचे आहे आणि त्यासाठी केवळ समाधीत राहून चालणार नाही. समाधीमुळे दुष्ट विकारांचे दमन होईल. ते दाबले जाऊ शकतात. पण विकार दाबण्यापुरता, दमनापुरता आपला प्रयत्न असू नये. तसे झाल्यास दबलेल्या दुष्ट मनोवृत्ती पुन्हा उफाळून वर येऊ शकतात. त्या आपल्यावर ताबा मिळवू शकतात. आपल्याला केवळ समाधीपर्यंत थांबायचे नाही. केवळ दमनापुरते थांबायचे नाही. निर्वाणापर्यंत पोहोचायचे आहे. त्यासाठी कोणाचा पंथ, मठ आपल्याला उपयोगी पडणार नाही, तर स्वतःच कष्टाने निर्वाणाचा मार्ग शोधून काढला पाहिजे, या निर्धाराने उद्दकचा निरोप घेऊन सिद्धार्थ बाहेर पडला. प्रवास करता करता तो एका रमणीय प्रदेशात पोहोचला.

नैरंजना नदीच्या परिसरात सिद्धार्थ पोहोचला. जी गयेजवळ उरुवेला प्रदेशात वाहत होती. नदीच्या दोन्ही काठांवर वनश्री सजली होती. जणू काही ती सिद्धार्थाच्या स्वागतासाठी उभी होती. पक्ष्यांचे गुंजन चालू होते. मोरांचे पिसारे दिसत होते. नदीचा मंद आणि संथ प्रवास मनाला भावत होता. मध्येच खळखळ व्यक्त करून आपली चाहूल देऊन नदी शांत व्हायची. जणू काही मौनात जायची. तिचे मौन भंग करण्यासाठी पक्ष्यांचे गुंजन सुरू व्हायचे. एक सुंदर खेळ सुरू होता. नदीपात्रावरून पक्षी विहार करत होते. ते एका काठावरून दुसऱ्या तीरावर जायचे. हिरव्यागार वनश्रीत लपायचे. पानाफुलांत स्वतःला लपेटून घ्यायचे. त्यांची चाहूल कुणाला लागायची नाही. गुंजनावरून वेध घेण्याचा प्रयत्न व्हायचा. वेगवेगळ्या रंगांतील आकारांतील पक्षी होते. प्राण्यांच्या हालचाली दिसायच्या. सायंकाळी आणि सूर्योदयाच्या वेळी नदीच्या संथ प्रवाहावर, नाजूक लाटांवर सोनेरी किरणे अलगद उतरायची. क्षणभर खेळायची. नदीला सोनेरी वस्त्र देऊन पुढे सरकायची. नदीच्या दोन्ही तीरांवर आठ- दहा-वीस घरांची छोटी छोटी गावे वसली होती. या गावांनी नदीला पावित्र्य बहाल केले होते. अशा मोहक वातावरणात तपश्चर्या करावी, असे सिद्धार्थाला न वाटल्यास नवलच म्हणावे लागेल. त्याने या पवित्र आणि सुंदर नदीच्या काठावर तपश्चर्येला बसण्याचा निर्णय घेतलाही. विशेष म्हणजे, या रम्य परिसरात काही साधूही तपश्चर्या करत होते. पूर्वीही काहींनी ती केली होती. कठोर तपश्चर्येचा अवलंब केला की, ज्ञानकांडात सांगितलेले ब्रह्म प्राप्त होऊन मोक्षसिद्धी होते, असे हे साधू सांगत होते. इंद्रियाधिष्ठित त्रासापासून मुक्त होता येते. बंधमुक्त होऊन ब्रह्मात विलीन होता येते. आम्ही त्यासाठी तपश्चर्येला बसलो आहोत, असेही साधू सांगत होते. मोठ्या जिद्दीने ते तपश्चर्येत उतरले होते. मगध देशातील वनश्रीने सजलेली ही भूमी ‘तपस्याभूमी’ म्हणून ओळखली जात होती. सिद्धार्थाने घोर तपश्चर्येचा निर्धार केला..

सिद्धार्थाच्या आयुष्यातील अतिशय उग्र तपश्चर्येला प्रारंभ झाला. दररोज तो ओंजळभरच अन्न खाऊ लागला. पुढे दिवसातून एकदा आणि पुढे पुढे आठवड्यातून एकदाच तो अन्न खाऊ लागला. पुढे तर भिक्षेसाठी जाण्याऐवजी हिरव्यागार गवतासारख्या वनस्पती, ज्वारी-बाजरीसारखे नुकतेच उगवू पाहणारे धान्याचे कोंब पाण्यातल्या वनस्पती आणि अजूनही असेच काही खायला त्याने सुरुवात केली. वाऱ्याने हलून झाडावरून पडलेली फळे, कंदमुळे किंवा रानटी फळे शोधून तो खाऊ लागला. अन्नापासून दूर दूर जाऊ लागला. डोक्यावरचे आणि दाढीचे केस त्याने हाताने उपटून टाकले. उभा राहिला की सतत उभाच राहायचा आणि मांडीचे

आसन करून बसला की तसेच बसायचा. वैराग्याच्या एकेक पायऱ्या तो चढू लागला. अन्न आणि वस्त्र, अंघोळ त्याने सोडून दिली. तो जळालेल्या हाडांची उशी करे, उन्हा-पावसात, थंडी-वाऱ्यातही त्याने फक्त वैराग्याचा मार्गच पकडला. अन्न आणखी कमी करत त्याने ते तांदूळ किंवा डाळीच्या एका कणावर आणले. त्याने प्रचंड दुःख, यातना, पीडा भोगायला सुरुवात केली. त्याचे पोट मागे मागे जाऊन छातीला भिडले. चामड्याच्या मागे लपलेली शरीरातील सर्व हाडे दिसू लागली. प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला. शरीरात त्राण राहिले नाही. ज्याची आस लागली होती त्या ज्ञानाचा उजेडही कोठे दिसेना. एवढे वैराग्य स्वीकारून, शरीराचा एवढा छळ करून, अन्न- वस्त्रांचा त्याग करून, सर्व तीव्र ऋतू झेलूनही काही घडत नव्हते. सिद्धार्थाच्या मनात प्रचंड अस्वस्थता, प्रचंड घालमेल चालू होती. तो जणू काही जगण्या-मरण्याच्या अरुंद सीमेवर पोहोचला होता. श्वासांचे आयुष्यही कमी झाल्यासारखे वाटत होते आणि हृदयाची स्पंदने, रंध्रे थंडावत चालल्यासारखी वाटत होती. डोळे खोल खोल गेले होते. कोणे एकेकाळी अतिशय सुंदर, बलवान, सुंदर शरीरयष्टी आणि राजबिंडा असलेला सिद्धार्थ सापळ्यासारखा दिसू लागला. देहदंडन केल्याशिवाय मोक्षाकडे जाणार नाही, या सिद्धांताच्या सापळ्यातच तो अडकला होता. अनेकदा त्याला चक्कर यायची. तो कोसळायचा. पुन्हा वनस्पतींचा आधार घेऊन उभा राहायचा. कधी बेशुद्धावस्थेत जायचा.

एके दिवशी नेहमीप्रमाणे झाडाखाली चिंतनात मग्न झालेला असतानाच त्याच्या कानांवर कोठून तरी सतारीचे अतिशय गोड डोळे तो ऐकू लागला. स्वरांच्या दिशेने कान टवकारले. सूर पसरवणारे वाद्य सतार होते की आणखी काही, याचाही विचार त्याला करावासा वाटला नाही. जे काही सूर होते ते त्याच्या मनात आणि काळजात खोल खोल जाऊ लागले. संवेदना बनू त्याच्या लागले. त्याला काहीतरी सांगू लागले. पुढे या स्वरांत तेवढेच गोड शब्द मिसळू लागले. कोणी तरी वनकन्या, कोणी तरी आदिवासी कन्या, कोणी तरी जंगलकन्या गाणे म्हणत जात असाव्यात. सतारीच्या स्वरांत त्या आपले गोड शब्द मिसळत होत्या. एक अवीट गोडीचे गाणे जन्माला येत होते.

त्या म्हणत होत्या, ‘सतार खूप उंच लावू नका म्हणजे तिच्या तारा खूप उंच नेऊन ताणू नका आणि खूप तळाला नेऊ नका म्हणजे सैलही सोडू नका. सतार अशा एका अवस्थेत ठेवून वाजवली, की तिच्यातून बाहेर पडणारे बोल ऐकणाऱ्यांची मने जिंकून घेतात. त्यांना आपल्याकडे खेचतात. त्यांचे मन काबीज करून टाकतात. पण बरोबर त्याच्या उलटे झाले तर? म्हणजे सतारीच्या तारा खूपच ताणल्या की त्या तुटतात आणि खूपच सैल सोडून दिल्या की सतारीचा आवाजच बंद होतो. ती मुकी होते. सतारीच्या आवाजातील सौंदर्य-गोडवा खलास होतो. ‘

वनकन्या सांगत होत्या की, सतार सुंदर वाजवायची असेल तर ती मध्यम मार्गावर आणून ठेवायला हवी. फार ताणायची नाही आणि फार सैलही सोडायची नाही. सिद्धार्थाने या लोकगाण्यातून जो बोध घ्यायचा तो घेतला असावा. आपण तपश्चर्येच्या, शरीरक्लेशाच्या मागे लागून स्वतःलाच गमावले तर काय उपयोग? अशा अवस्थेत काही ज्ञान मिळाले तरी त्याचा काय उपयोग? मिळालेले ज्ञान सांगण्यासाठी आपणच जिवंत राहणार नसू तर काय उपयोग ? काहीतरी वेगळे असायला हवे. टोकाचे नको. या विवेचनाचा अर्थ असा नव्हे की, वनकन्यांनी गायिलेल्या गाण्यामुळे सिद्धार्थाला हे सुचले! मार्ग शोधण्यासाठी, ज्ञानाचा वेध घेण्यासाठी त्याची लढाई तर कधीपासून चालली होती. सिद्धार्थ स्वतःच असंख्य प्रश्न बनायचा, तोच या प्रश्नांची उत्तरे द्यायचा. त्याला हवे तसे उत्तर मात्र मिळत नव्हते. पण त्याने प्रयत्न मात्र सोडलेला नव्हता. या सर्व बाबतची घालमेल आणि तो उत्तरांकडे सरकला आहे किंवा उत्तर त्याच्याकडे सरकले आहे याबाबतचे एक सुंदर प्रतीक कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी तयार केले आहे ते त्यांच्या ‘गौतम बुद्धाचे चरित्र’ या ग्रंथात (पान ६९-७०) आहे. विशेष म्हणजे, बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या विद्यार्थी अवस्थेत हेच चरित्र केळूसकर यांनी एका समारंभात भेट दिले. एका अर्थाने पुस्तकरूपी बुद्धच सोपवला. बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात आपल्या लाखो बांधवांसमवेत धम्म स्वीकारला. आपल्या बांधवांसाठी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर १९५७ मध्ये तो प्रसिद्ध झाला. बाबासाहेबांचा हा ग्रंथ म्हणजे जणू काही एक महाकाव्यच म्हणावे लागेल. सुलभ पण सुंदर भाषा आणि प्रतिभेचा सुंदर संचार या ग्रंथात पाहायला मिळतो.

तपश्चर्येच्या काळात सिद्धार्थाची म्हणजे बोधिसत्त्वाची घालमेल मांडताना बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात म्हटले आहे की, सहा वर्षांच्या कठोर आणि उग्र तपश्चयें नंतर त्याचा देह इतका क्षीण आणि दुर्बल बनला, की त्याला हालचाली करता येईनात. त्याला प्रकाशाचा कवडसाही दिसत नव्हता. हा काही ज्ञानप्राप्तीचा किंवा तृष्णामुक्तीचा मार्ग असू शकणार नाही, असे सिद्धार्थाला वाटू लागले. उजेडाकडे जाण्यासाठी घेतलेली झेप केलेले प्रयत्न यांना सिद्धार्थाने दोषी ठरवले नाही; पण हा पंखांशिवाय, आधाराशिवाय आकाशात उडण्याचा प्रयत्न आहे. शरीराला पीडा देणे, त्याला क्लेशाच्या चक्रव्यूहात पिळून काढणे याला धर्म कसे म्हणता येईल ? काहीतरी वेगळे असायला हवे. जे आपल्याला सापडत नाही असे काही वेगळे असायला हवे. देहाला प्रचंड पीडा देऊनही ते दिसत नाही. देहपीडा आणि त्याचा काही संबंध असेल का? असा संबंध नसावा, असे सिद्धार्थाला वाटू लागले. शरीराला पीडा देऊन काही साध्य होणार नाही. पीडा देण्याच्या कार्यात विचार कुठे असेल आणि विचाराशिवाय हा मानवी देह कुत्र्यासारखा आहे. त्याला काही महत्त्व नाही आणि पावित्र्यही नाही. जो मुळातच भूक-तहानेने व्याकूळ, अतिकष्टाने आणि पीडेने भरलेले शरीर घेऊन त्रस्त आणि अतिदुबळा झाला आहे. शक्ती गमावून बसला आहे. ज्याचे चित्त शांत नाही अशा माणसाला उजेड कसा दिसणार? शेवटी सिद्धार्थाने तपश्चयें तून बाहेर पडायचे ठरवले. त्याने सुजाताने दिलेली खीर खाल्ली. तत्पूर्वी नदीत स्नान केले. तपश्चर्येसाठी बसलेला सिद्धार्थ तपश्चर्या सोडताना पाहून त्याच्याबरोबरचे पाच तपस्वी त्याला सोडून आणि दोष देऊन निघून गेले. अन्नग्रहण करून प्रफुल्लित झालेल्या सिद्धार्थाने सुजाताच्या सेविकेने आणलेले अन्नाचे भांडे निरंजना नदीत सोडले. मला जर ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे भांडे नदी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाईल आणि ज्ञानप्राप्ती होणार नसेल तर ते प्रवाहातीत होऊन प्रवाहाबरोबर जाईल. भांडे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत गेले. (बुद्ध आणि त्याचा धम्म, डॉ. आंबेडकर, पान ६०, प्रकाशक : राइट थिंकर्स). सिद्धार्थ उरुवेलातून गयेकडे गेला आणि पिंपळ वृक्षाखाली पद्मासन घालून बसला. आता आपले शरीर रक्तामांसाशिवाय कोरडे झाले काय किंवा देहावर त्वचा उरली नाही, मज्जा, हाडे उरली नाहीत तरी हे स्थान सोडून देणार नाही, असा निर्धार करून त्याने ४० दिवस ध्यानसाधना केली. आपल्या अंतर्जगाचे जणू काही मैदान करून लाखो मारांशी युद्ध केले. ज्ञानप्राप्तीसाठी त्याला चार आठवडे लागले. या कालावधीत त्याचा विवेक, एकाग्रता, मनोनिग्रहाशी संयोग झाला. समचित्ताचा मनोनिग्रहाशी आणि पावित्र्याचा समचित्ताशी संयोग झाला.

सिद्धार्थ उजेडात न्हाऊन निघत असताना आणि आपल्याला काहीतरी गवसले आहे, या भावनेत असताना माराच्या एका योद्ध्याने त्याला प्रश्न विचारला, ‘हे बोधिसत्त्वा, तू दानपारमिता पूर्ण केलीस याला साक्षी कोण ?’ त्यावर बोधिसत्त्व आपला उजवा हात पृथ्वीकडे करून म्हणाला, ‘हे मार, (किंवा मारा) माझ्या पुण्यकर्माला इथे कोणी जिवंत साक्षीदार मिळणे कठीण आहे; पण ही सर्व सहाव्यापी वसुंधरा माझ्या पुण्यकर्माला साक्ष देईल.’ (बुद्ध चरित्र, धर्मानंद कोसंबी, पान ६१), बोधिसत्त्वाने हे शब्द उच्चारताच भयंकर गर्जना झाली. पृथ्वी दुभंगली. त्यातून एक सुंदर देवता प्रकट झाली. ती माराला म्हणाली, ‘होय मारा, मी बोधिसत्त्वाच्या पुण्यकर्माला साक्षी आहे. आता पुन्हा साक्ष काढू नकोस. याने याचकाच्या हातावर सोडलेल्या पाण्याने भिजलेले माझे केस अद्याप ओले आहेत.’ शेवटी वसुंधरेने आपले ओले केस पिळताच पाण्याचा एक प्रचंड मोठा महापुरासारखा प्रवाह तयार झाला. तो इतका जोरदार होता, की मार, त्याची सेना आणि त्यांचा गिरिमेखल हत्तीही वाहून गेला. मार पुरते नष्ट झाले किंवा सिद्धार्थाकडून युद्धात पराभूत होऊन गेले. सिद्धार्थ आता बुद्ध झाला होता. उजेडाचा नवा आविष्कार झाला होता. तो कोणत्याही माराशिवाय जगणार होता. बुद्ध एक विचार एक मार्ग बनला होता. असा मार्ग जो त्याने स्वतःच बनवला होता. असा मार्ग जो त्याच्या पावलांतून तयार झाला होता. असा मार्ग जो मारसेनेच्या पराभवातून तयार झाला होता. असा मार्ग पृथ्वीच्या पाठीवर प्रथमच तयार झाला होता. ज्या मार्गावर फक्त बुद्धाचीच पावले होती. रस्त्याच्या दुतर्फा उभी राहिलेली झाडे तोच होता. झाडांची रम्य सावलीही तोच होता. अथांग पसरलेल्या निळ्याशार आकाशात चकाकणारे तारे तोच होता. तोच होता प्रकाश आणि वाटेवरचे मैलाचे दगड आता त्याला अंधाराची भीती नव्हती. कोठून उसना उजेड घेण्याची गरज नव्हती. तो स्वतःच उजेड बनला होता. त्याच्या अंतरंगातील रंध्रारंध्रांचे रूपांतर लाखो दिव्यांत झाले होते. त्याची पावले उजेड, त्याच्या सावल्या उजेड, त्याची दृष्टी उजेड, त्याचे स्मित उजेड, त्याचे शब्द उजेड… एक विलक्षण उजेड पृथ्वीतलावर अवतरला होता. स्वतःतल्या सर्व विकारांवर, मारांवर, तृष्णेवर, लालसेवर मात करणारा मुक्त उजेड होता. इतर ग्रहांना लागते तसे ग्रहण या उजेडाला लागणार नव्हते. अखंड तेवत राहणारा, हवाहवासा, मंद, स्निग्ध असा हा उजेड सारे जग पाहणार होते. हा नवा ज्ञान उजेड, शील उजेड बघण्यासाठी देवलोकांनी पिंपळाच्या वृक्षाखाली गर्दी केली. खरे तर एव्हाना पिंपळाला नवे अजरामर नाव मिळाले होते- बोधि !

बोधिवृक्षाखाली जमलेल्या देवदेवतांनी बुद्धावर फुले उधळली. त्याचा जयजयकार केला. त्याच्यासमोर ते नम्र झाले. पृथ्वीवर देवदेवतांचा जन्म काही नवा नव्हता; पण स्वतःला विकारमुक्त, भयमुक्त, लालसामुक्त, स्वार्थमुक्त करून जन्माला आलेला बुद्धरूपी उजेड विरळाच होता. हा सर्व उत्सव बघून बुद्ध स्वतःशीच पुटपुटला, असे कोसंबींनी लिहिले आहे. त्यांनी बुद्धाच्या या उद्गाराचा मराठी अनुवाद केला आहे. (बुद्धलीला सार संग्रह, पान ६२)

अनेकजातिसंसारं संघविस्सं अनबिस्सं गहकारकं गवेसन्तो दुकखा
जाति पुनप्युनं ।

गहकारकं दिट्टोऽसि पुन गेई नकाहसि सब्बा ते फासुका
भगा गहकूटं विसंखितं विसंखारगतं चितं तन्हानं स्वयमज्झगा ।

जन्मजन्मींची संसृती अपार,
धावता मी पावलो कष्ट अपार,
कोण कर्ता या देह मंदिराचा,
बोध कर्त्यांचा आज मला झाला,
पुनः घरटे बांधिता नये त्याला
सर्व त्याची साधने झालि भिन्न,
देहगेहाचें कूट तसे छिन्न,
टाकुनिया संस्कार चित्त माझे,
लोभ तृष्णेचे दूर कमी ओझे,
मार सेनेची भीती नसे आता
ज्ञानलाभ होईल जगताला

उजेड बनलेल्या बुद्धाने स्वतःच स्वतःला हे सांगितले आहे. ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियेत त्याचे काय आणि कसे झाले, याचे एक सुरेख वर्णन या स्वसंवादात आहे. खरे तर स्वतःच स्वतःशी बोलणे श्रेष्ठ, सुंदर आणि विलोभनीय असते. बुद्ध बन्याच वेळा त्याच्या सुंदर स्मितातून, आसनातून, टपोऱ्या डोळ्यांतून, रुंद कपाळातून, हाताच्या लांबसडक बोटांतून बोलत असतो. अनेकदा हे बोलणे शब्दांपेक्षा सामर्थ्यवान ठरते.ज्ञानप्राप्तीपूर्वी सिद्धार्थ गौतम बोधिसत्त्व होता. ज्ञानप्राप्तीनंतर तो बुद्ध झाला असे सांगत डॉ. बाबासाहेब म्हणतात की, जीवनाच्या दहा स्थित्यंतरांतून बोधिसत्त्व पुढे जात असतो. त्या अवस्था संक्षिप्त स्वरूपात अशा :

१) पहिल्या अवस्थेत स्वतः तले विकार काढण्याच्या प्रयत्नात तो आनंदी होतो. ढगांतून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे तो प्रकाश देतो. २) दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता म्हणजे शुद्धता प्राप्त होते. ३) तिसऱ्या अवस्थेत त्याची बुद्धी आरशासारखी स्वच्छ झालेली असते. तो स्वतः तेजस्वी बनतो. ४) चौथ्या अवस्थेत तो विलक्षण बुद्धी प्राप्त करून घेतो. ५) पाचव्या अवस्थेत तो विजयी होण्यासाठी परिस्थिती प्राप्त करून घेतो. ६) सहाव्या अवस्थेत तो अभिमुखी होतो. या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणिमात्रांविषयी त्याच्या अंतः करणात अगाध करुणा उत्पन्न होते. ७) सातव्या अवस्थेत तो अनंताशी एकरूप होतो. जगातील मोहांपासून दूर होतो. ८) आठव्या अवस्थेत त्याला धर्माचे ज्ञान होते. सन्मानावरून त्याला कोणी परावृत्त करू शकत नाही. ८) आठव्या अवस्थेत तो अचल होतो. जे जे चांगले ते करण्यात तो यशस्वी होतो. ९) नवव्या अवस्थेत तो साधुमति म्हणजे कालातीत होतो. १०) दहाव्या अवस्थेत त्याला दिव्यदृष्टी प्राप्त होते. बोधिसत्त्वाचा बुद्ध होतो..

ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बुद्ध पुन्हा एका पेचात अडकतो. अर्थात, हा पेच बाहेरून तयार झालेला नाही, तर त्याच्या मनातच तयार झालेला आहे. काही करावे की न करावे, आपल्याला जे प्राप्त झाले आहे ते लोकांना सांगावे की न सांगावे, दुसऱ्याला उपदेश करावा की स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आयुष्य खर्च करावे, आपल्याला लाभलेले तत्त्वज्ञान सामान्य माणसालाच नव्हे, तर बुद्धिमान माणसाला हे लवकर कळणार नाही किंवा त्याला ते आचरणात आणता येणार नाही, परमेश्वर आणि आत्मा यातून सुटका करून घेणे, श्रद्धेचा त्याग करणे, कर्मवादापासून मुक्तता करून घेणे, आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही आणि तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणे लोकांना कठीण जाईल, स्वार्थ सोडून सदाचरणाचा मार्ग पकडणे सामान्य माणसाला कठीण जाईल, जर मी लोकांना शिकवण दिली आणि ती त्यांना समजली नाही, जर समजल्यावर त्यांनी मान्य केली नाही आणि मान्य करूनही त्यांनी आचरणात आणली नाही तर त्यांना आणि मलाही त्रासच होईल. त्याऐवजी जगापासून दूर राहून, एक संन्याशीच बनून मी स्वतः चे तरी कल्याण करून घेऊ शकेन, कशाला बोलू मी? बुद्धाच्या मनात जे तीव्र स्वरूपाचे द्वंद्व सुरू होते त्याला ‘विषादयोग’ म्हणतात. माणूस एका मोठ्या गुंतागुंतीच्या पेचात अडकतो. ‘होय किंवा नाही’ याच्या कात्रीत सापडतो. बुद्धाची ती अवस्था पाहून ब्रह्म सहपती विचार करतो की, खरोखरच जग नष्ट होत असल्याच्या काळात जर सम्यक बुद्ध निष्क्रियतेकडे झुकतील तर जगाचा विनाश होईल. ब्रह्म सहपती परत परत बुद्धाला विनंती करतो, आळवतो, प्रार्थना करतो, विषादयोगातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळी उदाहरणे देऊन विनंती करतो. पर्वत शिखरावर उभा राहणारा माणूस ज्याप्रमाणे खाली उभ्या असलेल्या भोवतालच्या लोकांकडे पाहतो, त्याप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर उभ्या असणाऱ्या भगवंताने दुःखाच्या सागरात बुडालेल्यांकडे बघावे. ‘हे विजयी वीरा उठ, जगाकडे जा. पाठ फिरवू नको…’ – बुद्धाने शेवटी ब्रह्म सहंपतीची विनंती मान्य केली आणि आपली शिकवण जनतेला देण्याचा निश्चय केला.

बुद्ध शिकवण देणार, ही गोष्ट ब्रह्म सहपती ओरडून सांगत होता. धावत होता. जगातील सर्व दुःखी लोकांनो, जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्या जिवांनो, शुभवार्ता ऐकून आनंदी व्हा… जखमी झालेल्यांनी आपल्या जखमा बऱ्या झाल्या असे समजावे, भुकेले राहिलेल्यांनी आपले पोट भरले असे समजावे, तहानलेल्यांनो आपली तहान भागवून घ्या. बुद्धाचा धम्म म्हणजे सत्य, पूर्ण सत्य, केवळ सत्य आहे. जगातील सर्व दुःखांचे आणि पापांचे मूळ बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडला आहे. ब्रह्म सहपती मोठ्या आनंदाने हे सारे सांगत सुटला होता. असंख्य विनंत्या करून त्याने बुद्धाला विषादयोग सोडण्यास भाग पाडले होते.बुद्ध शिकवण देण्यास तयार झाला. आपल्याला मिळालेले ज्ञान, तत्त्वज्ञान हे लोकांसाठीच आहे. ते त्यांच्याच मालकीचे आहे. त्याद्वारे आपल्याला एक नवा समाज, नवा माणूस घडवायचा आहे, असा निर्धार बुद्धाने केला. सारे आयुष्य याचसाठी खर्च करण्याचे ठरवले. बुद्ध म्हणजे ज्ञानाचा नवा सूर्य. जगाच्या भल्यासाठी तो आता मंद किरणांनी झळाळणार होता. सारे जग बुद्धाच्या पहिल्या प्रवचनाची वाट बघत होते.

प्रवचन देण्याचा म्हणजे आपल्याला जे काही अतिशय खडतर प्रवासात, चिंतनात लाभले आहे ते जनतेसमोर व्यक्त करण्याचा निर्णय तर झाला; पण सर्वप्रथम कुणाला उपदेश करायचा, कुणाला शिकवण द्यायची, कुणाला सांगायचे, हा प्रश्न होताच. शिवाय कसे व्यक्त व्हायचे, हाही प्रश्न होताच. जेव्हा एखाद्याला नवे काही लाभते ते व्यक्त करण्यासाठी जुनी भाषा चालत नाही. त्यासाठी नवी भाषा, नवी शैली कमवावी लागते. तसे झाल्याशिवाय मौनातून प्रवचनाकडे वळता येत नाही. सामान्याला समजेल अशी साधी, सोपी आणि सुंदर भाषा, सामान्यांची शैली, त्यांच्या पर्यावरणात खोल खोल शिरणारी आणि त्यांचे मन घेऊन वर वर येणारी भाषा आवश्यक असते. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी ज्ञान संपादन केले, ते ते त्यांनी अवघड भाषेत सांगितले. लोकांना न समजणाऱ्या संस्कृतमधून, वेदांमधून सांगितले. बुद्ध तसे करणार नव्हता. खळाळती, प्रवाही, सोपी आणि सामान्यांची जीवनशैली किंवा त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनलेली भाषा तो वापरणार होता. जे जे साधे असते ते सुंदर आणि सामर्थ्यवान असते, तेच नैसर्गिक असते, हे तत्त्व जर मान्य केले तर बुद्धाची शिकवण किती सुंदर आणि सामर्थ्यशाली भाषेत होती, हेही आपल्या लक्षात आल्यावाचून राहत नाही. तर मग बोलायचेही ठरले आणि तेही लोकांच्या काळजात वास करणाऱ्या भाषेत बोलायचे ठरले. पण सर्वप्रथम ही अमृतवाणी, नवजीवनवाणी, तत्त्ववाणी कुणासमोर व्यक्त करायची, हा प्रश्न तयार झाला. त्यावर बुद्धानेच उत्तर शोधले. बुद्धाने सर्वप्रथम आलारकालामचा विचार केला. त्याच्या मते आलरकालाम विद्वान, शहाणा आणि चांगले आचरण करणारा होता. त्याचा शोध घेता कळले, की तो निधन पावला आहे. असाच अनुभव उद्दक रामपुत्ताच्या बाबतीतही आला. दुर्दैवाने त्याचेही निधन झाले होते. त्यानंतर बुद्धाच्या समोर उभे राहिले ते त्याचे जुने पाच सोबती. नैरंजना नदीवर तपश्चर्येच्या काळात त्यांनी बोधिसत्त्वाला मदत केली होती. काळजी घेतली होती. शोध घेतला असता कळले, की ते सारनाथला ऋषिपतनाच्या मृगदाय वनात राहत आहेत. बुद्ध तेथे गेला. तपश्चर्या सोडून गेलेला माणूस म्हणून प्रारंभी या पाच जणांनी बुद्धाचा तिरस्कार केला. त्याला मानसन्मान द्यायचा नाही, असे ठरवले. पण ज्ञानपुरुष बनलेल्या, उजेड बनलेल्या बुद्धाचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला, की त्यांनी आपला निर्णय बदलला. बुद्धाच्या चेहऱ्यावरून वाहणाऱ्या तेजात त्यांनीही न्हाऊन घेण्याचा निर्णय केला. या पाच जणांशी बुद्धाची आपल्याला ज्ञानप्राप्ती कशी झाली, त्याचे स्वरूप कसे आहे, दुःख काय, मध्यममार्ग काय, तपश्चर्या आणि आत्मपीडा व्यर्थ कशी आहे, केव्हाही दोन अतिरेकी टोके टाळावीत आणि मध्यममार्ग स्वीकारावा आदी गंभीर विषयांवर चर्चा झाली. माझा धम्म मार्ग मीच शोधून काढला आहे आणि म्हणूनच मी कोणाचा शिष्य आहे हे मला सांगता येणार नाही, असे बुद्ध म्हणाला. ही गोष्टही खूप महत्त्वाची आहे. कोणत्याही गुरूशिवाय बुद्धाने नव्या ज्ञानाचा शोध लावला होता. तोच स्वतःचा गुरू आणि स्वतःचा शिष्य बनला होता. त्याने स्वतःलाच असंख्य प्रश्न विचारले होते आणि स्वतःच त्यांची उत्तरे दिली होती. उत्तरे चूक की बरोबर, हे स्वतःच तपासले होते. सर्व काही तो स्वतःच होता.

पहिल्या प्रवचनात बुद्धाने आपल्या धम्माचे सार वेगवेगळ्या टप्प्यांत सांगितले. त्याविषयी तयार होणाऱ्या आणि त्या पाच परिव्राजकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. जगातल्या सर्व धर्माचा म्हणजे धम्माचा उच्चार होईपर्यंतच्या आणि नंतर आलेल्या धर्मांचा देवाशी, आत्म्याशी संबंध असतो. मरणानंतरही जगता यावे यासाठी आत्म्याला जन्माला घातले गेले आहे. स्वर्ग-नरक यांसारख्या कल्पना जन्माला घातल्या आहेत. बुद्धाचा धम्म यापैकी काहीही मान्य करत नाही. देव, आत्मा वगैरे गोष्टींपासून तो धम्माला अलग ठेवतो. ज्याला प्रारंभ आहे त्याला शेवट आहे, असे तो सांगतो. मरणोत्तर जीवनाशी धम्माला काही देणेघेणे नाही. कर्मकांडांशी घेणेदेणे नाही. धम्म प्रारंभापासून शेवटापर्यंत फक्त माणसाभोवती फिरतो. माणूस हाच त्याचा केंद्रबिंदू आहे. माणूस आणि माणसाशी असलेले त्याचे नाते याचाच तो विचार करतो. माणसाच्या अंतरंग आणि बाह्यरंगाला तो भिडतो. तो आतून विचार करायला लागतो आणि त्याची दृश्ये बाहेर पाहायला सांगतो. धम्म असा जगातला पहिला आहे, की ज्याचे अधिष्ठान माणूस आहे. बुद्ध त्याला आपल्या धम्माचे पहिले अधिष्ठान आहे, असे सांगतो.

सारे जग आणि त्यातील माणूस सतत एकाच गोष्टीने त्रस्त असतो. ती गोष्ट म्हणजे दुःख ! दुःख कोणालाच नको असते. ते चुकवण्यासाठी पृथ्वीवरच्या माणसांनी आणि त्याच्या धर्मांनी नाना तऱ्हेचे प्रयत्न सांगितले. दुःखाचा जन्म वेगवेगळ्या ठिकाणी शोधला. पाप-पुण्य, पूर्वजन्म-पुनर्जन्म, स्वर्ग-नरक, आत्मा-परमात्मा, जात-पंथ वगैरे अनेक गोष्टींना दुःखाचे गर्भाशय म्हणून सांगितले जात होते. दुःखातून सुटका करून घेण्यासाठीही वेगवेगळे चित्रविचित्र मार्ग सांगितले जात होते. दुःखातून मुक्त होण्यासाठी सर्वांची धडपड होती; पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता. बुद्धाने आपल्या पहिल्याच प्रवचनात दुःखाची चिकित्सा करून त्याविषयीचा सिद्धांत मांडला. ‘चार आर्यसत्ये’ या नावाने तो जगभर पसरला. दुःख असतेच आणि त्यापासून कोणाला पळ काढता येत नाही. दुःख वास्तव असते, केवळ कल्पना नसते. दुःख जीवनाच्या सर्वच भागांत पुरून उरलेले असते. दुःख असते एवढेच मान्य करून चालत नाही, तर त्यामागे कारणे असतात. ही कारणेही वेगवेगळी असतात, जन्म-मरण, लालसा, पीडा अशी असंख्य कारणे असतात. कारणे असतात एवढेच मान्य करून चालत नाही, तर ती नष्टही करता येतात आणि अर्थातच नष्ट करण्याचे मार्ग असतात. दुःखावर उतारा सांगणारी आणि माणसाला दुःखमुक्तीचे आश्वासन देणारी ही चार तत्त्वे आहेत. आर्यसत्ये आहेत. हीच तत्त्वे धम्माचा पाया आहेत. या अतिशय मूलभूत गोष्टी आहेत. माणूस सतत दुःखाच्या आसपास, आत-बाहेर जगत असतो. कधी तो दुःख चुकवण्याचा, तर कधी ते पचवण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न दुःखाचे अस्तित्व मान्य करण्याचा, त्याची कारणमीमांसा करण्याचा आणि ते नष्ट करण्याचा आहे. ज्यावर धम्माने सर्वप्रथम मार्ग सांगितला. जगभर धम्म पसरण्याला हे तत्त्वज्ञानच उपयोगी ठरले आहे. बुद्ध ‘दुःखापासून दूर पळा’ असे सांगत नाही, तर ते संपवण्याचे मार्ग सांगतो आणि ते संपवता येते याचे सुंदर आश्वासन देतो. जे यापूर्वी कोणी केले नव्हते. या अतिशय प्राथमिक वाटणाऱ्या गोष्टींचा जो धर्म स्वीकार करत नाही तो धर्मच नाही, असे बुद्ध सांगतो. अगदी आग्रहाने सांगतो.

दुःख नष्ट करता येते आणि त्याचे मार्ग आहेत एवढ्यावरच बुद्ध थांबला नाही, तर त्याने नेमकेपणाने दुःखमुक्तीचे मार्ग सांगितले. जो पावित्र्याचा, चांगले आचरण करण्याचा आणि शीलमार्गाचा अवलंब करतो तो दुःखमुक्तीकडे जातो. म्हणजेच या तीन तत्त्वांतून दुःखमुक्तीकडे जाता येते. म्हटले तर हा अतिशय सोपा मार्ग आहे. कुणालाही तो स्वीकारता येतो. जात- पात, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, स्त्री-पुरुष, बालक-म्हातारा असे कसल्याच प्रकारचे बंधन नाही. जो जो माणूस आहे तो तो दुःखमुक्तीच्या मार्गावरून चालत जाऊ शकतो. इथे कुणाच्या नावाने गंडादोरा बांधायचा नाही, कोणत्या अमानवी शक्तींवर विश्वास ठेवायचा नाही. स्वतः चालत राहायचे आहे. कसल्याही कर्मकांडाच्या मागे न लागता चालत राहायचे आहे. या सगळ्याचा साधा-सरळ असा अर्थ होतो की, आपण कोणत्या वाटेवरून चालतो यावरच आपण कुठे पोहोचणार, हे ठरणार असते. रस्ता महत्त्वाचा. चालत राहणे महत्त्वाचे. मुक्कामाचे ठिकाण कोणते आणि तेथे काय आहे, हे पाहणेही महत्त्वाचे. बुद्धाने याबाबतीत माणसाला परावलंबी ठेवलेले नाही, तर त्याला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. माणसाला परावलंबी, दैववादी, कर्मकांडवादी बनवणाऱ्या सर्व गोष्टी अगदी खरडून खरडून काढल्या आहेत. त्यामुळेच बुद्धाचे पहिले प्रवचन निखळ माणसासाठीचे आणि त्याच्या उद्धारासाठीचे ठरते. हा उद्धार केवळ भौतिक किंवा वस्तुवादी नाही, तर तो माणसाचे माणूसपण आणि त्याचे स्वत्त्व जागवणारा आणि त्याचेच मंगलगीत गाणारा आहे….

( उर्वरित भाग पुढच्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे .)

पुनःपुन्हा ही गोष्ट सांगायला नको की, बुद्धाचा मार्ग, त्याचा धम्म हा नवा माणूस, नवा समाज घडवणारा आहे. मानवी मनावर शेकडो वर्षे स्वार्थी आणि अंध धर्मांनी आणि तशाच कर्मकांडांनी बनवलेली जळमटे घासून-पुसून काढणारा आहे. शरीराचा आणि मनाचा भाग बनलेली जळमटे खरडून काढल्याशिवाय निखळ माणूस दिसणार नाही आणि त्याच्यावर ज्ञानाचा प्रकाश पडणार नाही आणि पडलाच तर तो केवळ पृष्ठभागावर खेळेल. बुद्धाच्या दृष्टीने केवळ जगणे महत्त्वाचे नव्हते. तसे तर सर्व प्राणिमात्र जगतच असतात. जन्माला येतात, जगतात, मरतात. एका चक्रात त्यांचा प्रवास सुरू होतो आणि संपतोही. बुद्धाला अर्थपूर्ण आणि सुंदर कारण असलेले जगणे हवे होते. म्हणजे आपण का जगतो, याचे कारण शोधण्याची प्रेरणा त्याला मानवी समूहाला द्यायची होती. जगणे सुंदर, पीडामुक्त, अर्थपूर्ण करायचे असेल तर त्यासाठी एक सुंदर कारणही बनवावे लागते. शोधावे लागते. जगण्याचा मार्ग कसा असावा, यावर पहिल्या प्रवचनात बुद्धाने सुंदर मार्ग सांगितला आहे. त्याला ‘विशुद्ध मार्ग’ म्हणतात. कसलाही डाग नसलेला, कलंक नसलेला, व्रण नसलेला, कसल्याही तृष्णेत न अडकलेला, स्वतःसाठी स्वेच्छेने काही बंधने घालून घेणारा, या तत्त्वांचे पालन करणारा हा मार्ग म्हणजे विशुद्ध मार्ग होय. ज्यांना चांगला माणूस व्हायचे आहे त्यांनी विशुद्ध मार्गावर चालायचे आहे. जेथे त्याला पुढील पाच तत्त्वे हमखास भेटतात. या तत्त्वांना आलिंगन देऊन, त्यांच्या हातात हात घालून विशुद्ध मार्गावर चालायचे आहे- जो की भगवान बुद्धाने दाखवला आहे. या मार्गावर पाच प्रमुख तत्त्वे उगवलेली, फुललेली आणि सुगंधित झालेली आहेत. ती अशी : १) कोणत्याही प्राणिमात्राची हिंसा न करणे, २) चोरी न करणे, ३) व्यभिचार न करणे, ४) खोटे न बोलणे आणि ५) मादक द्रव्ये, मादक पेये यांचे सेवन न करणे. यातील प्राणिमात्राची हत्या न करणे हे अतिशय महत्त्वाचे तत्त्व आहे. ते तोडले की, आपण इतरांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतो. त्यांना ठार करून, हत्या करून, इजा पोहोचवून तो हिरावून घेतो. निसर्गात “जगा आणि जगू द्या’ हे तत्त्व आहे. धम्मातही ते ठळक आले आहे. बुद्धपूर्व काल आणि महावीरपूर्व काल हा यज्ञात द्यावयाच्या बळींनी भरून गेला होता. रोज यज्ञात हजारो पशू-पक्ष्यांना आणि प्रसंगी माणसांना बळी द्यायचे. जगण्याचा हक्क काढून घेण्याच्या या क्रूर वृत्तीला देवाधर्माचे अधिष्ठान देण्यात आले होते. हत्या करून पुण्य कसे मिळवणार, हत्या करून देवाची कृपा कशी संपादन करणार आणि दुसऱ्या जिवांची हत्या करण्याचा हक्क आपल्याला दिला कुणी, याचा विचार धर्माचे ठेकेदार करत नव्हते. माणसासाठीच्या जगण्यात अडसर ठरणारी ही गोष्ट बुद्धाने काढून टाकली आणि हे जग हिंसेऐवजी अहिंसेवर, खूनखराब्याऐवजी प्रेमावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला. सत्य बोलणे, चोरी न करणे यांसारख्या तत्त्वातून माणसाचे शील संवर्धित होत असते आणि शीलामुळे माणूस शक्तिमान होत असतो. शस्त्रे धारण करून शीलवान होता येत नाही, तर शील धारण करून होता येते. युद्धातून युद्धे जन्माला येतात, हिंसेतून हिंसा जन्माला येते आणि ती टाळण्यासाठी सारे जगच प्रेम नावाच्या एका महान तत्त्वात बसवण्याचा प्रयत्न बुद्धाने केला आहे.

शील मार्गाचे अतिशय खोलवर विवेचन करून बुद्ध अष्टांगिक मार्गाकडे वळतो. या आठ मार्गांची आयुष्यात उपयुक्तता का व कशी आहे, हेही बुद्ध सविस्तर सांगतो. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक जीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हे ते आठ मार्ग आहेत. जे करायचे ते सम्यक दृष्टी बाळगून. टोक कधीच गाठायचे नाही. तराजूला दोन पारडी असतात आणि दांड्याला काटा असतो. न्याय व्हायचा असेल तर कोणतेही पारडे खालवर होऊन चालत नाही. काटा मध्यभागी जातो आणि पारडी सरळ रेषेत येतात. कोणतीही गोष्ट अति करू नये किंवा सोडूनच देऊ नये. चांगले जगायचे, बोलायचे, शरीर चांगले ठेवायचे, स्मृती ठेवायच्या तर या आठ मार्गांचा अवलंब केला पाहिजे. या मध्यममार्गात माणसाचे मन मेंदू-मनगट या तिन्हींचा विचार आहे. समाधीच्या निमित्ताने ध्यानाचा विचार आहे..

माणूस शीलवान बनला तरच त्याचा समाज शीलवान होतो. अनेक प्रश्न सुटतात आणि प्रेमाचे, आनंदाचे झरे वाहू लागतात. एकूण जगच आनंदी आणि सुखी होते. १) शील, २) दान, ३) उपेक्षा, ४) निष्क्राम्य, ५) वीर्य, ६) शांती, ७) सत्य, ८) अधिष्ठान, ९) करुणा आणि मैत्री आदी दहा गुणांचे पालन करून शील मार्गावर चालता येते एवढेच बुद्धाने सांगितलेले नाही, तर या दहाही गोष्टींचे विश्लेषण केले आहे. अतिशय सुंदर आणि सर्वसामान्यांना कळेल असे हे विश्लेषण आहे.

बुद्धाचा धम्म फक्त दुःखाचा विचार करतो, जग दुःखाने भरले आहे असे सांगतो, तो फक्त दुःख आणि दुःखाचेच दिग्दर्शन करतो याचा अर्थ तो निराशावादी आहे का, अशी शंका तेव्हाही घेतली जात होती आणि आजही काही जण घेतात. बुद्धाला याची कल्पना तेव्हाच आली असावी म्हणून की काय, या शंकेचे निरसनही त्याने पहिल्या प्रवचनात शेवटच्या भागात केले आहे. माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही (पहिले पाच परिव्राजक ) म्हणण्याचा संभव आहे; पण तो तुमचा चुकीचा दृष्टिकोन असेल. मी दुःखाचे अस्तित्व मान्य करतो मन ते दूर करण्याचे मार्गही सांगतो. माझ्या धम्मात जगण्याचा उद्देश आणि आशाही आहे. माझा धम्म अविद्या नष्ट करतो. कारण अविद्या हेच दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान असते. माणसाच्या जीवनातील दुःखाचा शेवट करण्याचा मार्ग माझा धम्म दाखवतो….. हे सांगतच त्याने परिब्राजकांना प्रश्न केला, ‘हे म्हणणे तुम्हाला मान्य आहे की नाही ?’ परिव्राजक म्हणाले, ‘होय, आम्हाला मान्य आहे.’ खरे म्हणजे धम्म संस्थापकांचा आणि परिव्राजकांचा म्हणजे शिष्यांचा असा आरोग्यवर्धक संवाद यापूर्वी कधी झाला नसावा. यापूर्वीचे महागुरू, धर्म, चमत्कारी बाबाबुवांनी एकतर्फीच स्वतःला सर्वांवर लादले होते. बुद्धाचे वैशिष्ट्य येथेच आहे की, तो स्वतः ला लादत नाही. समोरच्याशी अखंड संवाद करतो, त्याला पटेपर्यंत बोलत राहतो. त्याच्या प्रश्नांची उत्तरे देत राहतो. विशेष म्हणजे, याच प्रक्रियेतून ज्ञान जन्माला येते आणि ते झळाळते. पहिल्या प्रवचनाचे अतिशय संक्षिप्त स्वरूपात विश्लेषण येथे केले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या ‘बुद्ध व त्यांचा धम्म’ या ग्रंथातील मूळ प्रवचन येथे वाचकांसाठी देत आहे.

बुद्धाचे पहिले प्रवचन

१. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या पाच परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारले, ‘तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय?” बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले. २. बुद्ध म्हणाला, ‘जीवनाची आत्यंतिक अशी दोन टोके आहेत. एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे.’ ३. ‘एक म्हणतो, खा, प्या, मजा करा. कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो, सर्व वासना मारून टाका. कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत.’ हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्याने ते नाकारले. ४. भगवान बुद्ध मध्यममार्ग मानणारे होते- मज्जिम पतिपद- मधला मार्ग, जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही. ५. बुद्ध परिव्राजकांना म्हणाला, ‘माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय?’ ते (परिव्राजक) उत्तरले, ‘आपण म्हणता ते बरोबर आहे.’ ६. ‘जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही, तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल?’ त्यांनी उत्तर दिले, ‘आपण म्हणता ते बरोबर आहे.’ ७.’जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल, तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा, प्या. ८. सर्व प्रकारची विषयासक्ती शक्तिपात करणारी असते. विषयासक्त मनुष्य कामवासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती अधःपतन करणारी व नीच कर्म असते. तथापि, माझे तुम्हाला सांगणे असे की, जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही.’ ९. ‘हे परिव्राजक, ही गोष्ट समजून घ्यावी की, ही दोन आत्यंतिक टोके अशी आहेत की, माणसाने त्यांचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते, त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुंबत राहणे. तृप्ती मिळविण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश. हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे.’ १०. ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यममार्गाची शिकवण देतो आहे. ११. त्या पाच परिव्राजकांनी त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की, ‘आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय काय केले ?’ तेव्हा आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि चार आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला, हे सर्व भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले. १२. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता, जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना केली. १३. भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली. १४. सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की, आपला जो मार्ग जो धम्म आहे, त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाही. १५. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. १६. बुद्धाने सांगितले की, आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. १७. मनुष्यप्राणी दुःखात दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे, हे त्याचे दुसरे तत्त्व होय. हे सर्व जग दुःखाने भरलेले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे-तिसरे काहीही नाही. १८. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय. १९. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही, तो धर्मच नव्हे. २०. ‘खरोखर, हे परिव्राजक हो ! जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे.
हे ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना ( धर्मोपदेशकांना) समजत नाही, ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नव्हेतच. याच जीवनात धम्माचा खराखुरा अर्थ काय आहे, हे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही.’ २१. नंतर परिव्राजकांनी बुद्धाला विचारले, ‘दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो सांगा. २२. भगवान बुद्धाने सांगितले की, या धम्मानुसार जर प्रत्येकाने (१) पावित्र्याचा मार्ग अनुसरला, (२) सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि (३) शीलमार्गाचा अवलंब केला, तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल. २३. आणि त्यांनी सांगितले की, अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे.

भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन (पूर्ण)

१. बुद्धाने आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिव्राजकांना विचारले २. ‘व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टींचा पाया नाही काय? त्यांनी उत्तर दिले, “आपण म्हणता ते बरोबर आहे!’ ३. नंतर बुद्धाने विचारले, ‘लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चौर्य, व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत नाही काय? या वाईट गोष्टींवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय? माणसांमध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होऊ शकेल? आणि परिव्राजकांनी उत्तर दिले, ‘आपण म्हणता तसेच आहे. ४. ‘आणखी असे की, दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? दुसऱ्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काही का वाटत नाही? माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत, हेच त्याचे कारण नव्हे काय?’ आणि परिव्राजक उत्तरले, ‘बरोबर आहे. ५. ‘जर प्रत्येकाने अष्टांगमार्गांचा सम्यक् दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् आजीविका, सम्यक् कर्मान्त, सम्यक् प्रयत्न, सम्यक् स्मृती आणि सम्यक् समाधी यांचा थोडक्यात सदाचार मार्गांचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय?’ त्यावर ते म्हणाले, ‘होय.’ ६. शील किंवा सद्गुणांच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धाने विचारले, ‘गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय ? जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय ? निःस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय? वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय?’ ७. ‘माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय?’ आणि ते म्हणाले, ‘होय.’ ८. ‘याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही. खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ मानवाविषयीच नव्हे, तर सर्व प्राणिमात्रांविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. ती मानवापुरती मर्यादित नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आपले मन निःपक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे म्हणून आपणा स्वतःला जो आनंद हवा असतो, तोच आनंद सर्व प्राणिमात्रांना मैत्रीखेरीज यापेक्षा दुसऱ्या कशाने मिळू शकेल ? ९. ते सर्व म्हणाले, ‘होय.’ १०. परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची बुद्धीची जोड दिली पाहिजे.’ ११. बुद्धाने विचारले, ‘प्रज्ञा आवश्यक नाही काय ?’ परिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले, ‘दुष्कर्म न करणे, वाईटाचा विचार न करणे, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसाच्या अंगचे गुण होत. ‘ परिव्राजक म्हणाले, ‘होय, ते बरोबर आहे.’ १२. ‘परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय ?’ भगवान बुद्धाने विचारले, ‘मी म्हणतो ‘नाही’ हे पुरेसे नाही.’ भगवान बुद्ध परिव्राजकांस पुढे म्हणाले, ‘हेच जर पुरेसे होते, तर तान्हे मूल नेहमीच चांगली कृत्ये करते असे म्हणावे लागेल. कारण तान्ह्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते. पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करू शकणार नाही. बोलणे म्हणजे काय, हे त्याला कळत नाही. त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलूच शकणार नाही. आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय, हे त्याला कळत नाही. उपजीविका म्हणजे काय, हे त्याला कळत नाही; त्या अर्थी आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही.’ १३. सद्गुणमार्ग प्रज्ञेच्या कसोटीला उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे.’ १४. ‘प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्त्वाची व आवश्यक का आहे, याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे; परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे; परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमिताच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञा पारमिताचे दुसरे नाव आहे.’ १५. ‘माझे म्हणणे असे की, अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते, याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते, याचे ज्ञान व जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते, याचेदेखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही. म्हणूनच मी म्हणतो की, प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे. ‘ १६. नंतर परिव्राजकांना पुढीलप्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपविले : १७. ‘माझा धम्म निराशावादी आहे, असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे. कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधतो. मी असे सांगतो की, माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल.’ १८. ‘माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही; परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो, हे विसरू नका. १९. ‘माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे.’ २०. ‘माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय.’ २१. ‘त्यात आशा आहे. कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो.’

समाप्त…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *