जेहि घट प्रेम न संचरै – डॉ. शशिकला राय

जेहि घट प्रेम न संचरै – डॉ. शशिकला राय

२००५ ते २००९ या चार वर्षात वीस स्त्रियांची हत्या करणारे मोहन, कर्नाटक आणि तामिळनाडूतील तीस बलात्कार व पंधरा हत्या करणारे जयशंकर, बहराइचे लाल महाराज कायद्याने शिक्षा होईलही ( काहींना होणारही नाही.) पण खरंच ते एकटेच गुन्हेगार आहेत का ? ती माती, ते वातावरण, ती हवा यांचं काय जे अशांना पोसतं , त्यांना ‘रक्तबीज” बनवतं .

कबीर म्हणतात, ‘ज्या हृदयी प्रीतीचा, प्रेमाचा ओलावा क नाही ते हृदय स्मशानवत् भासते.’ ‘प्रेम’, ‘इश्क’, ‘मुहब्बत’ म्हणजे काय? मी दुःख, वेदना व उद्वीग्नतेशी झगडत असताना हे जाणून घेण्याची मला का आवश्यकता वाटते आहे? माझ्या अवती-भोवती श्रद्धा, बिल्किस व बहराइचची तरूणी व त्यासोबत अशाच शापित नावांची अखंड मालिका आहे. ही आरसा बनून त्यात आपला क्रूर चेहरा दखवत आहे. वाटतं- भारतेंदु हरिश्चंद्रांसारखं जगाला आवाहन करावं, ‘आवहू सब मिलि रोहू भाई हा हा भारत दुर्दशा देखी न जाइ।’ खरंच दुःख, निराशा, लाज शरम यांबाबत लिहिलं जाऊ शकतं- लिहिता येतं? नाही ना मग मी ‘काळा’वर लिहिते आहे, कारण लिहिलेला काळ सरून जात नाही, त्याचे तुकडे केले जाऊ शकत नाहीत. त्याची हत्याही केली जाऊ शकत नाही. लक्षपूर्वक ऐकू या, ऐकू येईल की, येणारा काळ आपला धिक्कार करत आहे. आपल्या सर्वांना मिळून एका रुग्णाइत मानसिकतेशी लढायचं आहे. हाच धर्म आहे. हीच आताची नैतिक जबाबदारी आहे.

प्रेम म्हणजे काय ? लोकशाही की हुकुम शाही आहे? ही शिक्षा आहे की संजीवनी ? हे देणं जाणतं का फक्त घेणं? खुदा आहे की सैतान ? शरीर आहे का आत्मा ? हेशक्यतांमध्ये वास करतं का इतिहासात ? नीत्शे सारखं का म्हणू नये, ईश्वरच नाही तर प्रेम’ ही मेलंय? मृत ईश्वर आणि मृत प्रेम इतकं हिंसक का बनलंय ? तथागत कुठल्या ‘मैत्री’ची गोष्ट करताहेत? का म्हणतात सारं नेस्तनाबूत झालं तरी करूणा शाबूत राहिल ? ‘मैत्र’ टिकून राहिल ? कबीर कुणाबाबत म्हणत आहेत- ‘ढाई आखर प्रेम का पढ़े सो पंडित होय ।’ मित्रांनो प्रश्न विचारत रहा! मी एक माणूस आहे (फक्त स्त्री मानली जाण्यासाठी शापित, केवळ ‘योनी’ मानली जाणारी, युगानुयुगांची यात्रा करणारी ‘अहिल्या ‘मी’) आणि अशा विचित्र मनस्थितीत आहे की, चित्त थत्तऱ्यावर नाही आणि मन स्वस्थ नाही. मी आणि माझ्यासारखी शेकडो माणसं या कारणास्तव जिवंत आहेत, का की, त्यांना जीवापाड प्रेम करणारं कोणी भेटलं नाही म्हणून? मला कळतंय, वाचणाऱ्या तुम्हाला हे विचित्र व काहीसं असंतुलित वाटेल. जरा विचार करून पाहा, मी स्त्री देहाचे पस्तीस तुकडे, ओरबाडून काढलेलं गर्भाशय व जखमी योनी, अकरा मोकाट तुटलेल्या मि शांना पीळ देणाऱ्या बलात्काऱ्यांच्यात, ऍसिडने जळणाच्या भूमिवर बसले आहे आणि माझ्या आसपास आहेत लक्ष्मी, मनोरमा, सोनी सूरी. तुम्ही माझ्याकडून संयमित संतुलित राहण्याची अपेक्षा करता आहात? कोणता योगाभ्यास आहे? आमच्यासाठी, तसेही ‘राम देवबाबांनी’ योग सर्कशीतील कसरतीसारखा केलाय.

रोहित वेमूला म्हणतात, ‘आपण मानवी इतिहासाच्या सर्वाधिक बिकट काळात जगत आहोत.’ हो खरंच आपण प्रेमविहीन काळात जगत आहोत जिथं मुहब्बत- ‘प्रेम’ आपला खरा अर्थच गमावून बसलंय. आपण सगळे ‘गिधाडं’ बनत चाललोय, आपण हत्या, आत्महत्या, दंगे, वुद्दाम वासनेसोबत आपले भयावह पंख पसरून चहूबाजूला घिरट्या घालत आहोत. वंश, वर्ण, जात, धर्म यांची पोटपूजा करता यावी ज्यामुळे घृणा, विद्वेष मजबूत होतील असं ‘महाभोज ! ‘कुठे माठाचं पाणी, कुठे मिघवाल कुठे स्त्रीदेह घाला घाला की मग मारण्याच्या कलेत झालात निष्णात! जगभरात हिंसा दिवसेंदिवस वाढत चालली आहे व अधिकाधिक शक्तिशाली (बलशाली) पण! हिंसेच्या आगीत लेखक, पत्रकार, चिंतक, दार्शनिक, शिक्षक, वकील-बुद्धिजीवींचे चेहरे चमकताहेत. आपण हिंसेवर भाषणं देतो, वाहवा टाळ्या मिळवतोय मुक्तिबोधांच्या शब्दात सांगायचं तर ‘गुन्हेगारांचं मोठं एकच कुटुंब’, दुःखाचा बाजार भरभराटीत आहे, भाव वाढतोय, शेअर वधारतोय. चला आपण सगळे मिळून ‘स्वप्नातील भारता’वर बोलू या. (बापू क्षमा करा. ) स्वप्नं नेहमी भविष्याच्या गोष्टी करतात. स्वप्नं वर्तमानाची प्रत्येक दोषातून सुटका करतात. आपल्याला ‘आज’ व ‘आता’ला बदलायचं आहे. मला वर्तमानासाठी लढायचं आहे. मला आजचा भारत बदलायचा आहे. ‘बदलायचंय’ हा शब्दसुद्धा केवळ ‘निरर्थक’ बडबड बनून गेलाय. या अपेक्षांचे खंदे पाठीराखे, पायिक नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश मात्र सुळावर चढवले गेले. आपण सगळे अनवाणी पायांनी हिंसक अंतहीन रस्त्यावर चालत आहोत. धोका सर्वव्यापी आहे. माणूसकीचे झरे आटत चाललेत, प्रेमाचं इंधन संपत आलंय. कबीर डोक्याला हात लाऊन बसलेत की, की हे काय म्हणून गेलो, ‘शीश उतारै भुई धेरै।’ गालिब पश्चाताप करत आहेत असं म्हणून की ‘मुहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का।’

एखादी नजर कधी कोणावर उत्कटनेते, समुद्राच्या खोल तळातून उठावी अशा उमाळ्यातून भिडते आणि सांगते, ‘माझ्यावर विश्वास ठेव, मी आहे ना?’ एखाद वेळी या नजरेतलं प्रेम आटलं अटूते हरकत नाही पण हिंसा व क्रौर्य प्रकट व्हावं पाहणारा तिथंच गोठून जातो.

मला मार्च २०१८ मध्ये जाळून मारण्यात आलेल्या ऐश्वर्या बिलरवान आठवते मोठ्या-मोठ्या डोळ्यांची, सावळ्या- रेखीव चेहऱ्याची! प्रेमात पडली होती! प्रेम विचारून थोडंच झालं होतं. आतून आलं आणि सर्वच घेऊन गेलं. आपलं प्रोजेक्ट मैत्रिणीकडे देऊन पहाटे पाच वाजता बाहेर पडली प्रियकराला भेटायला घरी पोहोचताच प्रिरूकरानं शरीरावर रॉकेल वा पेट्रोल टाकून काडी पेटवून दिलीन. एक जिवंत शरीर धगधगत्या आगीत भस्मसात होत होतं. तसंच दरवाजाबाहेर ढकलून दिलं गेलं. शेजाऱ्यापाजाऱ्यांची दारं बंद! खिडक्या शरमून थोड्याफार किलकिल्या ! जळत्या ऐश्वर्याच्या तोंडातून किंचाळी फुटली नाही. “अहिल्या सिंड्रोम’ ग्रस्त. तिथून जाणाऱ्या पोलीसांच्या जीपने जळती आकृती पाहून जीप थांबवली. मागून घेतलेल्या कांबळ्यात गुंडाळून तिला पुण्यात आणलं गेलं. तिथं दोन-तीन दिवसांत शेवटचा श्वास घेऊन जात, धर्म, समाज, प्रांत सगळ्यांना निर्दोष मुक्त केलंन. ही घटना तिथं घडली जिथं आसपास ‘डिस्कव्हरी इंडिया’ लिहिलं जाण्याचा गंध व्यापलेला आहे. विद्यापीठ गप्प! एखाद दुसरी श्रद्धांजली टाकली गेली फेसबुकवर बस! निर्भया कांडच्या वेळी कॅन्डल मार्च काढणारं विद्यापीठ ??? एक शोकसभा पण नाही. अजब सहिष्णू जगद्गुरू आहे हा देश. इथं गुन्हा करणं अनैतिक वा अश्लील नाही, त्यावर बोलणं अश्लील आहे. खरं बोलल्यामुळे देश, धर्म, जात, संस्कृती सगळे दुखावले जातात. पूजा, सत्य + नारायणाची केली जाते. म्हणजे सत्य हेच नारायण मानून आणि पोथी वाचली जाते कलावतीच्या खोटेपणाची.

२००५ ते २००९ या चार वर्षांत वीस स्त्रियांची हत्या करणारे मोहन, कर्नाटक आणि तामिळनाडूतील तीस बलात्कार व पंधरा हत्या करणारे जयशंकर, बहराइचचे लाल महाराज यांना कायद्याने शिक्षा होईल ही (काहींना होणारही नाही.) पण खरंच ते एकटेच गुन्हेगार आहेत का? ती माती, ते वातावरण, ती हवा यांचं काय जे अशांना पोसतं, त्यांना ‘रक्तबीज’ बनवतं. हिंसा व वासनेला जन्म देणारं हे भोवताल पाहून वाटतं, सांगावं तरूण मित्रांना ‘बाबांनो, प्रेमात पडू नका.’ पण रूमी अडवतात हे सांगत- “मैं इश्क से परहेज करूँ तो राबता किससे रखू।” (“मी प्रेमापासून दूर राहू तर कुठं गुंतून घेऊ ?’ ) प्रेमाचा धडा जीवनातून गायब का झालाय ? छाती कफानं भरलीय आणि इनहेलरने उपचार करतोय, का फसव्या हकीमाच्या जाळ्यात सापडलोय? आपण आपल्या प्रिय व्यक्तिच्या सहवासात असताना ‘प्रेमात असताना माणूसकीचा विचार करत नसू, कल्याणाचा विचार करत नसू तर किंवा प्रेमाची पर्वाच नसेल तर आपलं जगणं आणि जिणं लांछनास्पद आहे. प्रत्येक युद्धाच्यामागे रूग्णमानसिकता असते. मला एकदा अफताबची हिंसक मानसिकता समजावून घ्यावी वाटते. जी श्रद्धाच्या शरीराचे तुकडे तुकडे करते व आपल्या जगण्यावर प्रेम करते. बचावाचे मार्ग शोधते. बहराइचच्या लाल महाराजांच्या मनोरचनेचा वेध घ्यायचाय तांत्रिक लाल महाराज बहराइचच्या गावात आपला चांगला जम बसवून होते. गावातील लेकी-सुनांबरोबर आपली उद्दाम वासना तृप्त करत होते. तंत्र मंत्रांचा हवाला देत, धाकदपटशा करत! गावातील एक तरूण मुलीवर त्यांचा डोळा होता. ती हाती लागत नव्हती. एकदा ती मुलगी आजारी असताना भूतबाधेचं भय व बरं करण्याचं अमिष दाखवून त्यांनी संपूर्ण कुटुंबावर कब्जा केला. एकदा सगळ्यांना दारू पाजून त्या मुलीवर बलात्कार केला. हळूहळू जेव्हा घरची माणसं व मुलगी शुद्धीवर येऊन आरडा- ओरडा व विरोध करू लागले तेव्हा त्या महाराजाने मुलीच्या अंगावर झडप घेऊन तिच्या योनितून ओरबाडत गर्भाशय ओढून काढत बाहेर फेकून दिलं. माझा या सगळ्यावर विश्वास बसला नसता जर माझ्या मैत्रिणीच्या डॉक्टर मुलीकडे ही केस आली नसती. अचानक याचा फोटो समोर आल्यावर मी थरारले वाटलं स्त्री असण्याची एवढी क्रूर शिक्षा! सैरभैर मनःस्थितीत वाटलं डोकं आपटून घ्यावं दगडावर!

हे कधी आणि कसं व्हायला लागलं की आपण अशा घटनांच्या बाबतीत भावनाशून्य बधीर होऊ लागलो? कधी हत्या करणाऱ्या तरूण पिढीला (केवळ तरूणच काय ?) गुन्हे करूनही अपराधभावना वाटेनाशी झाली? थोडं थोडं विष कधीचंच दिलं जाऊ लागलं होतं. कशी व कधी भारतीय समाजाला याची सवयच होऊन गेली, हे सगळं सहज अंगवळणी पडत गेलं. दुसऱ्याला दुःख देणं हे कधी मूल्य (?) बनलं. जर हत्याकांडांचं कारण ‘प्रेम’ असेल तर तो भारतीय समाज बुद्धाचा भारत असू शकत नाही. स्त्रियांच्या मृतदेहात सांप्रदायिक विमर्शाची बीजे पेरली जात आहेत, रोपली जात आहेत. जगभरातील हेल्पलाइन्स, कौनसेलर्स, मानसोपचारतज्ज्ञ असा विश्वास व दिलासा देण्यात अपयशी ठरत आहेत की, ‘आम्ही आहोत तुमच्याबरोबर !’

साधन-संपत्तीमध्ये वाढ करत-करत भौतिकतेच्या अधिकाधिक आहारी जात असलेला भारतीय समाज दिवसेंदिवस मनोरुग्ण होत चाललाय. सुटून आलेल्या गुन्हेगारांचं, बलात्कारींचं ज्या जल्लोषात व जयजयकारात स्वागत केलं जात आहे. त्यावरून सिद्ध होतंय की आपण गुन्ह्यांचं व गुन्हेगारांचं समर्थन करत आहोत. आपण पूर्वनिर्धारित पूर्वग्रहांमुळे आपल्या मुलांमध्ये लिंग, वंश, जात, धर्म यावर आधारित घृणेची विद्वेषाची बीजं पेरत आहोत. ‘शरयूचं पाणीसुद्धा आपण सोडलं नाही.’ दुसरीकडे श्रद्धेची हत्या व श्वेता यादवची आत्महत्या यांबाबत सोशल मीडियावर माहिती- बातम्यांचा पूर लोटलाय. श्वेतासाठी उपदेश की असं करायला नको होतं… असं तसं आणि हे…हे… आणि श्रद्धाबाबत – पहा तुमची मुलगी कुठं चालली आहे? काय तुमची मुलगी अमक्या अमक्या (एखाद्या धर्माच्या) मुलावर प्रेम करते म्हणे! एवढी सूट देऊ नका. त्यांच्या घरी फ्रिज आहे का हे बघून घ्या. आणि मग हसरा इमोजी ! आपण भारतीय माणसं एखाद्याच्या दुःखानं हळहळण्याची संवेदना हरवत चाललोय. रूमी म्हणतात-

‘ऐ दिल तू ऐसे किसी के पास बैठ
जिसे दिलों की खबर हो । ‘

दिशा पिंकी शेख मनुष्य आहे. (समाजाच्या नजरेत लिंगभेदानूसार तृतीयपंथी) मला इथं तिच्या कवितेच्या काही ओळी केल्याशिवाय राहवत नाही. –

‘चल कपडे काढ, नको साहेब
टाकू आतमध्ये तुला ? उद्यापासून एकपण
दिसणार नाही तुमच्यातलं स्टेशनला
असं नका करू हो साहेब….
एच. आय. व्ही. आहे मला असं म्हणून
रडायला लागली ती.
ठीक आहे, खाली बस मग
माझ्या तोंडालापण इन्फेक्शन हाये साहेब
उगा थोड्यासाठी तुमचा आणि तुमच्या
तिचा पण जीव का धोक्यात घालता ?
असं म्हणत डोळे पुसले तिने…

ठीक आहे. ठीक आहे, चल हातानं तरी करू दे’ (दिशा पिंकी शेख, ‘कुरूप’)

माझे वडील, भाऊ, मित्र, सहकारी सगळेच्या सगळे ‘क्षणभंगुर केवळ वीर्य’ बनून गेलेत का ? त्यांना काय जिंकायचं आहे? कशावर विजय मिळवायचा आहे? हे कुठलं व कसलं विश्व आहे? आपण तर ऐकून आहोत की ‘प्रेम’ मरणालाही जीवदान देते. बाबूषा कोहलींना वाटतं, ‘या जगात गीत-संगीत, बहरत राहावं, निसर्ग सानिध्य, वाढावं, गोष्टी सांगणारे तरूण आजी-आजोबा वाढावे. पण वाढत गेलं काय तर दुःख, सेल्फलव, झोपेच्या गोळ्या, हत्या आणि आत्म हत्या ( भाप के घर में शीशे की लड़की) नाही वाढत गेलं प्रेम, नाही वाढत गेली माणूसकी. आपण सगळे आपल्या मनाचे ‘मालक’ झालोय. याचा अर्थ असा होतो की आपण सगळे आपल्या मनाचे गुलाम आहोत. भयावह तुटलेपणा व गडद अंधारलेल्या काळात आपली नैतिक जबाबदारी वाढली आहे, केल्याशिवाय सुटका नाही. विन्सेंट गॉग माणसाची तुलना दिव्याशी करतात. ते म्हणतात- ‘प्रेमाविना माणूस विझलेल्या दिव्यासारखा असतो आणि प्रेमामुळे होतो तेवणाऱ्या दिव्यासारखा, दिवा तर तो होताच पण आता तो प्रकाशदाता होतो. ‘उलट सगळ्यांची मनं तर क्रूर निर्दय बनत चालली आहेत. चहुबाजूला आग आहे. धुमसती अशा वेळी आपणही बाबूषांसारखं पाण्याच्या बाजूला असायला हवं.

डिसेंबर झुकत्या मानेने समोर उभा आहे. मी विद्यार्थ्यांकडे पाहते, त्यांचं निष्कपट हास्य सांगतंय ‘आमचं स्वागत करा.’ मी म्हणते- गा काहीतरी आणि मन गुंतवून टाकणारे स्वर निनादू लागतात. मी पाहते त्यांचे डोळे हे हिंसक क्रूर होऊ शकतील? नाहीऽऽऽ आणि झाले तर… मग आपण सगळे काय करत आहोत ? सगळे आगीच्या बाजूने का आहेत? ‘ऐ जिंदगी गले लगा ले’ गीताचे भावबोध त्यांच्या म नात का रूजवू शकत नाही? मग मीच शिक्षक म्हणून कमी पडत असेन. महिनोनमहिने गलेलठ्ठ पगाराची रक्कम खात राहिलेय. मी नाही करू शकले या भावनेची रुजवण की प्रियकर भले दुरावला तरी ‘प्रेमभावना’ जपा. एका बुद्धानं दुसऱ्यातील सुप्तावस्थेतील बुद्धाला जागं करावं बस एवढीच मनोमन अपेक्षा! माझ्यातील बुद्ध दुसऱ्यातील बुद्धाची वाट पाहतोय. माझी भावचेतना बुद्धाच्या करूणेनं ओथंबून येते. मी हार मानणार नाही. उमेद व आशेची हत्या नाही केली जाऊ शकत, तिचे तुकडे तुकडे नाही केले जाऊ शकत, तिची योनी नाही फाडली जाऊ शकत उमेदव शुभाकांक्षा नित्य व ‘जिवंत ‘शब्द’ आहे. ही उमेद माझ्या असण्याचा, अस्तित्त्वाचा धर्म आहे. हेच माझ्या असतेपणाचे मर्म आहे, गमक आहे.

– मुळ लेख हिंदी डॉ. शशिकला राय.
लेखिका ज्येष्ठ विचारवंत असून सा. फु. वि. पु. येथे हिंदी
विषयाच्या प्राध्यापक आहेत.

मराठी अनुवाद : – डॉ. जया परांजपे

संदर्भग्रंथः
बाबूषा कोहली, ‘भाप के घर में शीशे की लडकी’, रुख पब्लिकेशन, नई दिल्ली, २०२१

निःशब्द नूपुर, ‘रूमी की सौ गजलें, सं. बलराम शुक्ल, राजकमल प्रकाशन, नई दिल्ली, २०१८

‘आज के प्रसिद्ध शायर’, सं. कन्हैयालाल, राजपाल एन्ड सन्स, नई दिल्ली, २००१

‘मुझ पर भरोसा रखना’, विंसेंट गॉग के पत्र भाई थियो के नाम, रोशनाई प्रकाशन, पश्चिम बंगाल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.