जुन्याच थोबाडाचं नवं पर्व – संपादक

जुन्याच थोबाडाचं नवं पर्व – संपादक

पुन्हा कोरोना येईल, या कुणीतरी  घातलेल्या भीतीनं अस्वस्थ झालेल्या मनःस्थितीतच सामान्य माणसानं नव्या वर्षाचं स्वागत केलं. स्वागत करताना एक वर्ग आणि उद्याचा भरवसा या मानसिकतेत जगणारा दुसरा समाज नव्या वर्षात गेला. गॅस आणखी महाग होईल या भीतीनं तो दबकत दबकत वापरणारा एक समाज आणि नव्या वर्षासाठी खालपासून वरपर्यंत उजेडाचा प्रचंड महापूर करणारा दुसरा समाज यांना मावळलेलं आणि उगवलेलं वर्ष साक्षी आहे. कॅलेंडरच्या पानावरची 365 घरे संपली, की आपण जुनं गेलं आणि नवं आलं असं समजतो. प्रत्यक्षात घडतं असं, की गोधडी तीच असते; पण ठिगळे बदलत जातात. एखादं ठिगळ जुन्याच्या जागी आलं, की गोधडी कधी बदलत नसते. कलई करून करून जुनं भांडं कधी नवं करता येत नाही आणि साय गमावून बसलेल्या दुधाला कधी नवी साय आणता येत नाही. नवं-जुनं करणारी एक व्यवस्था असते. जुने अश्रू नव्या वर्षात पुरवून पुरवून वापरा असं सांगत असते. ते क्षणभर तरी दुर्लक्षित व्हावेत म्हणून रात्री बाराच्या ठोक्याला वीज बंद केली जाते. अंधारात माणूस भोवताल थोडा वेळ विसरतो. उजेड आला, की जुन्याचं तेच थोबाडं पुन्हा उभं राहतं. नव्याला ते आपोआपच चिकटतं. ते घेऊन नवं प्रवास करतं. कॅलेंडरवरची 365 घरे संपली, की पुन्हा थोबडे हस्तांतराचा सोहळा सुरू होतो. नव्या वर्षात आपले कारभारी सुरक्षा व्यवस्थेत आणि वातानुकूलित यंत्रणेत राहून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतील. अशा शुभेच्छा की जणू सर्वांचचं मंगल झालं, भलं झालं. पण शुभेच्छा म्हणजे एक चकवाच असतो. सर्वांचं भलं होवो अशी शुभेच्छा देताना खूप आनंद होतो; पण खरंच भलं कसं करायचं असा प्रश्‍न निर्माण झाला, की शुभेच्छा देणारे आणि त्यांच्या शुभेच्छा मुक्या होतात.
मावळून गेलेल्या वर्षात केवळ भारतामध्येच नव्हे, तर सर्व जगात मूलतत्त्ववाद आणखी स्थिरस्थावर होत असल्याचे सर्वांनीच पाहिले. मूलतत्त्ववादाला आता कोणतंही खाद्य चालतं. कोणत्याही गोष्टीचं रवंथ त्याला करता येते. जसं की धर्म, संस्कृती, परंपरा, भाषा, रंग, वंश, देव, स्वकीय आणि परके, वस्त्र, अन्न, महापुरुषांच्या जयंत्या-मयंत्या इत्यादी इत्यादी. या सर्व गोष्टी मुबलक असतात. कुठंही उपलब्ध असतात. आता भारतातलंच बघा… हिंदुत्ववादाची, मूलतत्त्ववादाची प्रयोगशाळा, उपप्रयोगशाळा असणार्‍या अनेक राज्यांत, अनेक गावांच्या सीमांवर हिंदू राष्ट्राचे बोर्ड दिसू लागले आहेत. हिंदू राष्ट्रातील गावांत आपले स्वागत असो, असा मजकूर त्यावर लिहिला गेला आहे. याबद्दल कुणाचा आक्षेप नाही. आक्षेप घेणार्‍यांचा आवाज क्षीण झालाय किंवा ते दबले गेले आहेत. एरवी एखाद्या चित्रपटात किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी रंगांची थोडी जरी सरमिसळ झाली की काय घडते, हे आपण पाहत आलोय. अगदी चित्रपट अभिनेत्याला ठार मारण्याच्या धमक्या देण्यापर्यंत अनेकांची मजल जाते. इथं मात्र तसं होत नाहीय. 2014 ला दिल्लीत कारभारी बदलले आणि असे बोर्ड गुजरात, मध्य प्रदेश आदी ठिकाणी झळकू लागले. आता फक्त परमेश्‍वर, सत्युग आने वाला है वगैरे फलक तर वेगळेच. पूर्वी दबकत दबकत असे फलक लावले जायचे. आता फलक लावणारे नव्हे, तर पाहणारे दबकत असतात. फलक लावणार्‍यांना महागाई-बेकारीशी काही देणेघेणे नाही. त्यांना हिंदू राष्ट्र हवं होतं ते आता आकाराला येईल, असं त्यांना वाटतंय किंवा तसं वातावरण केलं जातंय. या राष्ट्राच्या शिल्पकार असलेल्या कारभार्‍याला मूर्तीत, देवाच्या कल्पनेत सजवण्याचा प्रयत्नही सुरू आहे. सामान्य माणूस नव्या नव्या आश्‍वासनांचं रवंथ करत लाळ गाळत राहतो. एकदा मंदिर बांधू, एकदा समान नागरी कायदा आणू, एकदा काश्मीरची स्वायत्तता संपवू, एकदा तलाक बंद करू, एकदा बुरखा बंद करू, एकदा बांग बंद करू, एकदा कोणती तरी सीमेपलीकडची यात्रा बदं करू. मग सगळेच प्रश्‍न सुटतील आणि रामराज्य येईल, सोन्याचा धूर निघेल, प्रत्येकाच्या खात्यावर पैसे जमा होतील वगैरे आश्‍वासने आली आणि गेलीही. बर्‍याच गोष्टी बंद करण्यात कारभार्‍यांना यश आलेही; पण मूलभूत प्रश्‍न जसेच्या तसे पाठीवर पडून राहिले. ते ना कूस बदलतात ना उठून बसतात. जेव्हा केव्हा ते हलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पुन्हापुन्हा त्यांना त्याच गोष्टी ऐकवल्या जातात ‘सत्युग आनेवाला है, रामराज्य आनेवाले है…’ याच घोषणा ऐकत देशातील मूठभर भांडवलशाहीने देशातील नव्वद टक्के संपत्ती ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ म्हणत आपल्या हातात घेतली. काहींनी भिकार्‍यांना केक विकण्याचा तर काहींनी बेकरीवाल्यांनाच ब्रेड विकण्याचा धंदा सुरू केला. काहींनी विहीरवाल्यांनाच बंद बाटल्यातील पाणी विकणे सुरू केले, तर दर कोसळला म्हणून डोळ्यात पाणी आणणार्‍या कांदा उत्पादकांनाच कांदा विकणे सुरू केले. या नव्या डावपेचाचे खतपाणी घेऊन देश जागा झाला आणि इंडियाचं रूप घेऊन तो चकाकू लागला, धाऊही लागला. दहा देशांच्या गरीब राष्ट्राच्या टीमचा कॅप्टन झाला. बेकारी वाढत राहिली, सामाजिक अन्याय वाढत राहिले, महागाईचे वाढते आकडे कोणा गणितात मावेनासे झाले. राष्ट्रभक्तीच्या कल्पना इतक्या सैल झाल्या, की कुठे कधी या कल्पनांचा स्फोट होईल, हे सांगता येत नव्हतं. राजकारण विचारांऐवजी सूड, द्वेष, बदला यांभोवती केंद्रित झालं. मूलतत्त्ववादामुळे तेही हळवं बनलं. भाकरी मागण्यासाठी आता मोर्चा निघत नाही, तर श्रद्धा, भावना, इतिहास पंक्चर झाला म्हणून मोर्चे निघतात. असे बहुतेक मोर्चेही भांडवलदारी एनजीओंनी आयोजित केलेले असतात.  धार्मिक क्षेत्रात कोण त्यागी, कोण योगी आणि कोण भोगी यावरच चर्चा झडते. रंगा-रंगात, वस्त्रा-वस्त्रांत संघर्ष सुरू केला जातो. संघर्ष करणारे, न्याय देणारे आणि त्यासाठीची व्यवस्था करणारे जणू एका माळेत गुंतलेले आहेत की काय असे वाटते. एका मोठ्या बदलापूर्वी सांस्कृतिक घुसळण आवश्यक असते. ती सोपी आणि स्वस्त असते. एखाद्या चित्रपटावर निर्भीड प्रतिक्रिया दिली, की थेट देशाचाच अपमान होतो? स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेणार्‍यांची शिरगणती सुरू केली, की राष्ट्रद्रोह होतो. एखाद्या पुस्तकाचा अनुवादही देशद्रोह आणि नक्षलवाद्याचे रूप घेऊन उभे राहू शकतो. लोकशाही आणि राज्यघटनेचा जयजयकार करत किंवा त्यांना हारतुरे घालून फ्रेममध्ये बंद करत एकाधिकारशाहीकडे कसे जाता येते, लोकांची मते प्रचंड प्रमाणात मिळवत, हारतुरे झेलत एकाधिकारशाहीकडे कसे जाता येते, याचे प्रारूप रोज पाहायला मिळते. हे सारेच्या सारे मावळत्या वर्षाने पाहिले. नव्हे, तर त्याच्या चेहर्‍यावर कोरले गेले. या सार्‍यांमुळे देवीचे व्रण उठल्यानंतर जसे घडते तसा चेहरा नव्या वर्षाला लाभला आहे. तोच घेऊन त्याला नव्या कॅलेंडरमधली घरे पार करावी लागणार आहेत.
नव्या वर्षात, नव्या उजेडात एकूणच माणूस कसा असेल, त्याचा चेहरा कसा असेल, त्याचा धर्म कसा बनवला जाईल, सांस्कृतिक-सामाजिक संघर्षाचे ट्रिपल डोस त्याला कसे दिले जातील? यांत्रिकीकरण, बेकारी, महागाई, भांडवलशाहीची वाढलेली नखे आदींच्या चक्रव्यूहात अडकलेल्या समाजाचे, त्यातील माणसाचे काय होणार, हा प्रश्‍नही नव्या वर्षाच्या कपाळावर कोरलेला आहे. तोही ठळक दिसतोय. अंधूक दिसला तरी मोबाईलमधील टॉर्चच्या मदतीनं तो पाहता येतोय. जुन्या थोबाडाचं नवं वर्ष असं त्याला म्हणतात. हे सारं खरं असलं, तरी एक गोष्ट त्याहून खरी असते आणि ती म्हणजे कोणीही माणूस सतत एकाच अवस्थेत राहत नसतो, जगत नसतो. असंख्य वर्षे आणि असंख्य किलोमीटरचा प्रवास करत तो लोकशाहीपर्यंत पोहोचला आहे. त्याला ठाऊक आहे, की कालचा कुरूप चेहराही बदलाच्या प्रक्रियेत दुरूस्त करता येणार आहे. लोक जसे असतात तसे त्यांचे कारभारी असतात हेही खरे असले, तरी एकाच गोष्टीचे ओझे घेऊन माणसाला चालण्याची सवय नसते. एक तर तो ओझे कमी करतो किंवा असह्य झाल्यास फेकून देतो. विरोधी पक्षापासून देशाला मुक्त करणे, याचा अर्थ लोकांच्या खांद्यांवर आपणच बसणे असा होतो. मालक भले बसण्याचा प्रयत्न करतील; पण बसू कोण देईल, हा प्रश्‍न आहेच. 

– संपादकीय , द पीपल्स पोस्ट .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *