बौद्धांनो, लग्ने तरी वेळेवर लावा! – बी. व्ही. जोंधळे

बौद्धांनो, लग्ने तरी वेळेवर लावा! – बी. व्ही. जोंधळे

लग्नसराईचा सध्या हंगाम सुरू आहे. ऊन मी म्हणत आहे. मध्येच अवकाळी पाऊस, गारपीठ, वादळी वार्‍यांचा धुमाकूळ, विजांचा लखलखाट सुरू आहे. लोक अवकाळीने बेजार झाले आहेत आणि काही जणांना उष्माघाताची बाधा होत आहे. मी वयाने पंचाहत्तरीच्या घरात पोहोचलो आहे. म्हटले तर म्हातारा ‘माणूस’. ‘म्हातारा’ हा शब्द ऐकायला जरा कसा तरी वाटतो म्हणून भाषा पंडितांनी म्हातारा, वृद्ध या शब्दास जरा गोड, आदरार्थी शब्द म्हणून ‘ज्येष्ठ नागरिक’ या नावाने ओंजारले-गोंजारले आहे. आता केसांना डाय लावून ते काळे केल्यामुळे जसे वय लपून तारुण्य येत नाही. तसेच ‘ज्येष्ठ नागरिक’ म्हटल्यामुळे वृद्धावस्था काही लपत नाही. सांगण्याचा मुद्दा असा, की मन कितीही हिरवे, टवटवीत आणि तरुण असले तरी सत्तरी-पंचाहत्तरीत हात पाय थकलेलेच असतात. थकवा हा जाणवतच असतो. हे मी का सांगत आहे? तर अशा या आजच्या तप्त ऊन्हाळी वातावरणात 200 मैलावरील एका खेडेगावात मी एका लग्नासाठी टॅक्सीने हजर झालो. सोबत कुटुंबीय मंडळी होतीच. लग्नाची वेळ लग्न पत्रिकेवर दुपारी 3 वाजेची दिली होती. ऊन्हाच्या तप्त आहया (उष्ण वारे) सोसात-झेलत त्या गावात आम्ही बरोबर साडेतीन वाजता पोहोचलो. म्हणजे अगदी लग्नाच्या वेळेवर. वाटले आपण साडेतीन वाजता मांडवदारी आलो म्हणजे लग्नविधी किमान 4 वाजता तरी सुरू होईल. पाहतो तर काय? दुसर्‍या गावी असणार्‍या नवरदेवाचे लग्नस्थळी आगमनच झाले नव्हते. त्याची वरात वाजत-गाजत येत होती. लग्नाची वेळ भलेही तीनची असेल व त्याच्या वर्‍हाडी मंडळीला, डुलत-डुलत, वाजत-गाजत, नाचत येणार्‍या मंडळींना वेळेशी काही घेणेदेणे नव्हते. लग्न कधी लागेल याची चौकशी केली, तर कळले पाच तरी वाजतील. जीव आंबून गेला होता. खेडेगावातील लग्न असल्यामुळे तिथे पाहुण्यांसाठी खुर्च्या वगैरे ठेवण्याचा प्रश्‍नच नव्हता. तिथे होती भारतीय बैठक. त्यात मला पायदुखीचा त्रास. शेवटी विसावा घेतला तो लग्नासाठी उभारलेल्या स्टेजवर बसकन मांडून. बसवत नव्हते, सहा वाजत आले. मग मंडळींनी एकदाची लग्नाची तयारी सुरू केली. कशी? तर आधी आहेर घेण्या-देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. तो चालला चांगला तासभर. तो आटोपत आल्यावर वाटले आता लग्नविधी सुरू होईल. पण कसचे काय आणि कसले काय? लग्नाच्या घरधन्यानी टूम काढली, आता आधी जेवणाची पंगत ऊठवू या. बायका-पोरांची, गडी माणसांची पहिली पंगत जेवायला बसली. ती चालली चांगली अर्धा-पाऊण तास. सात वाजून गेले होते. मग एकदाचे नवरा-नवरी लग्न मंडपात आले. बोहल्यावर चढले. (बोहला हा शब्द हिंदू ब्राह्मणी तर नव्हे ना? शंका आहे म्हणून आपण स्टेजवर आले असे म्हणू या.) वाटले आता लग्नविधी ताबडतोब सुरू होईल. पण असे घडलेच नाही की हो! वधु-वर ताटकळत स्टेजवर बसून होते आणि लग्नाच्या कारभार्‍यांना गावातील प्रतिष्ठित माणसांचा सत्कार करण्याची लहर आली. मग एकेकाची नावे पुकारली जाऊ लागली. त्यांचा शाल पुष्पहाराने सत्कार होऊ लागला. आठ वाजत आले होते व अखेर एकदाचा लग्नविधी सुरू झाला. तो अर्ध्या-पाऊण तासात संपला. म्हणजे 3 ची वेळ दिलेले लग्न चक्क 9 वाजता लागले. म्हणजे 6 जास ते उशीरा लागले. लग्न अर्थातच बौद्ध समाजातील आणि ते माझ्या जवळच्या नात्यातीलच होते, हे वेगळे सांगणे नलगे!
बौद्ध समाजातील लग्ने हा जसा एक चर्चेचा विषय आहे तसाच तो चिंतनाचाही आहे. बौद्ध होऊनही आणि स्वतःस बौद्ध म्हणवून घेतानाही आम्ही लग्नात जसा हुंडा घेतो-देतो, तसेच लग्ने जुळविताना पूर्वाश्रमीच्या पोटजातीही पाळतो. अपवाद म्हणून बौद्ध समाजातील पूर्वाश्रमीच्या पोटजातीत काही लग्ने होतातही! नाही असे नाही. पण लग्ने जुळविताना पोटजाती पाहिल्या व पाळल्या जातात, हे नाकारण्यात काही अर्थ नाही. लग्नाच्या वरातीत अपेयपान करून धुंदफुंद होऊन नाचण्यातही बर्‍याच जणांना परमानंद मिळतो. जेवणाच्या पंगतीत अन्नाची नासाडी होते. प्रश्‍न असा, की बौद्ध म्हणविणार्‍यांनी तरी बुद्ध धम्मास शोभेल अशी आदर्श लग्नपद्धती अवलंबू नये काय? आणि आदर्श-सुसंस्कृत लग्नपद्धती व लग्नाची आचारसंहिता बौद्ध भिक्खूंनीही तयार करू नये काय? अर्थात, या प्रश्‍नावर स्वतंत्रपणे चर्चा करता येईल. तूर्त इतकेच नम्रपणे सुचवावे वाटते, की बाकीचे सोडा; पण लग्न तरी आपण दिलेल्या वेळी लावून इतरांसमोर एक चांगला आदर्श ऊभा केला पाहिजे की नाही? किमान करावा ही अपेक्षा. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.