.
सारेच पाय
मातीचेच आहेत
लोखंडाचे
नाहीच कोणी
समजू नका
कृपा करून
वाचवणारा एकच
असेल कोणी
टिकवायचा आहे त्यासाठी
सार्यांचा सार्यांवरचा विश्वास
टिकवायचा आहे
प्रत्येकाचा श्वास न् श्वास
टिकल्यावर पुन:
बघायचेही आहेच की
घेतला जाणार नाही
स्वातंत्र्याचा आपल्या घास
सारेच धर्म, सारेच देव
त्यांच्या प्रार्थनांची देव-घेव
विज्ञानाचे धरून बोट
सध्यातरी दूरच राखले आहे
नकाशावर जशा
आखल्या आहेत तशा
उरलेल्याच नाहीत
सीमा आता ढगाला
मात्र कठीण जाणार आहे पुढे
असेच टिकणे, टिकवणे
शिकणे, शिकवणे नव्याने
नव्या उरल्यासुरल्या जगाला
तरीही झाल्यावर
सारी पडझड
इथली जाळून
पुरून
दुरून दुरून
का होईना
पण उरायचे
आहेच पुरून
– श्रीपाद भालचंद्र जोशी.