राहुल गांधींच्या ‘नफरत छोडो-भारत जोडो’ यात्रेचे मोल- बी.व्ही. जोंधळे  

राहुल गांधींच्या ‘नफरत छोडो-भारत जोडो’ यात्रेचे मोल- बी.व्ही. जोंधळे  

‘राहुल गांधी यांच्या नफरत छोडो-भारत जोडो’ या यात्रेमुळे त्यांची प्रतिमा एक प्रोढ-परिपक्व नि प्रगल्भ नेता म्हणून समोर आली आहे. राहुल गांधी यात्रेच्या प्रारंभापासून असे सांगत आहेत, की या यात्रेचा निवडणुकीशी वा राजकारणाशी संबंध नसून देशात जे असहिष्णू आणि द्वेषाचे राजकारण पसरले आहे, ते संपवून देशात सद्भाव-प्रेम-मैत्री वृद्धींगत करण्यासाठी आपण भारत यात्रेवर निघालो आहोत.
राहुल गांधींच्या या यात्रेत ठिकठिकाणी हजारो लोक सामील होत आहेत. राहुल गांधी जे प्रश्‍न उपस्थित करून देशात फिरत आहेत त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून लोकांत स्नेहभाव-मैत्री-प्रेम-करूणा या मानवी मूल्यांविषयी आस्था निर्माण झालेली दिसत आहे; पण गंमत अशी, की या यात्रेची प्रारंभी टवाळी करणारा भाजप काहीसा गोंधळलेला दिसत आहे. अगोदर असे भासविण्यात आले होते, की राहुल गांधी चार पावले चालतील आणि मग वातानुकुलित मोटारीतून बसून यात्रा पूर्ण करतील; पण भाजपच्या मंडळींचा हा अंजादही चुकला व राहुल गांधी ऊभा देश पायी फिरून पिंजून काढताना दिसले. मग त्यांचा टी-शर्ट किती रुपयांचा आहे, हा बावळट प्रश्‍न विचारला गेला. कशाचाच काही परिणाम होत नाही म्हणून मग कोरोनाचे निमित्त करून यात्रेत खोडा घालण्याचा प्रयत्न झाला; पण राहुल गांधींचा कारवाँ न थांबता पुढे-पुढेच जात आहे. हे पाहून भाजपने राहुल गांधी जे मूलभूत प्रश्‍न उपस्थित करीत आहेत, त्याची उत्तरे न देता 2024 ची आगामी लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेऊन परत त्याच त्या ध्रुवीकरणाचा त्याने अवलंब करण्याचे ठरविलेले दिसते.
सध्याच्या राज्यकर्त्यांच्या व त्यांच्या समर्थकांच्या मते देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले ते 2014 साली. त्या आधी सारा अंधार होता. अंधार हटायला सुरुवात झाली ती 2014 पासून; पण केंद्रातील सरकार आठ वर्षांच्या सत्ताकाळात खरोखरच देशाती अंधार दूर करू शकले काय? 2014 साली ‘सबका साथ, सबका विकास’ असे स्वप्न दाखविण्यात आले. 2019 साली ‘सबका साथ, सबका विकास’ला ‘सबका विश्‍वास’ची जोड देण्यात आली. झाला का सबका विकास! 2020 मध्ये भारत महासत्ता होणार होता? झाला का महासत्ता? 2022 साली प्रत्येक कुटुंबाला सर्व सोयीनिशी पक्के घर मिळणार होते. मिळाले का पक्के घर? हटली का बेकारी? तरुणांना मिळाल्या का नोकर्‍या? बेरोजगारीचा सध्याचा दर अधिक आहे, हे वास्तव कसे नाकारणार?
सध्याच्या सरकारच्या काळात 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारीचा दर नोंदविला गेला, हे खरे नाही काय? या नि अशा काही प्रश्‍नांवर बोलण्याऐवजी भाजपा 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोणते प्रश्‍न चर्चेत आणत आहे? तर लव्ह जिहाद, समान नागरी कायदा वगैरे. कुणी तरी साध्वी कर्नाटकात जातात आणि घरात धारधार चाकू सुरे ठेवा म्हणतात? तात्पर्य लोकांचे जीवन-मरणाचे प्रश्‍न बाजूलाच ठेऊन मतांच्या सौदेबाजीसाठी धु्रवीकरणाचा व समाजा-समाजात द्वेषाच्या भिंती उभ्या करण्याचा भाजप जुनाच धोकादायक खेळ परत खेळत आहे.
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेने जनमानसात मोठा प्रभाव निर्माण केल्यामुळे गृहमंत्री अतित शहांना पुन्हा एकदा राम मंदिराचा आश्रय घ्यावा लागला असून जानेवारी 2024 पर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण झालेले असेल, तसे त्यांना सांगावे लागले. गृहमंत्र्यांच्या या भूमिकेवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी म्हटले, की ‘राम मंदिराचे काम कधी पूर्ण होईल, हे सांगणे देशाच्या गृहमंत्र्यांचे काम नाही.’ हा त्यांच्याशी संबंधित मुद्दा नाही; पण गृहमंत्री पुजार्‍याची जबाबदारीही घेत आहेत; पण प्रत्यक्षात लोकांच्या मुख्य प्रश्‍नांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच परत राम मंदिराचा मुद्दा पुढे करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी सुद्धा गृहमंत्र्यांनी पुढार्‍यासारखे वागावे-पुजार्‍यासारखे नव्हे, या शब्दात गृहमंत्र्यांवर टीका केली आहे.
भाजपच्या समाजमाध्यमाने राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेची आधी टिंगल-टवाळी केली; पण आता भाजप राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे विचलित होताना दिसत आहे, हे त्यांनी जाहीररित्या कबूल न केले तरी वास्तव असेच आहे. उत्तर प्रदेशातील अवघ्या 72 तासांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. कारण ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण काँगे्रसने राम मंदिराचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येन्द्र दास यांना दिले आणि विशेष म्हणजे, भाजप वा संघ परिवाराला न विचारता आचार्यांनी राहुल गांधींना आशीर्वाद देणारे पत्र लिहिले. आचार्य सत्येन्द्र दास यांच्या या भूमिकेवर विश्‍व हिंदु परिषदेच्या वर्तुळातून नाराजी जरूर व्यक्त झाली; पण विश्‍व हिंदु परिषदेचे एक नेते आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपतराय यांनीही काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे अप्रत्य स्वागतच केले. ते म्हणाले, ‘एक तरूण भारत भ्रमण करून आपला देश समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याचे कौतुक केले पाहिजे.’ भाजपचे मुख्य पुजारी आचार्य सत्येन्द्र दास व चंपतराय यांच्या या भूमिकेमुळे काहीशी गोची झाली असून हिंदुत्ववादी मते ही भाजपची मक्तेदारी नाही, हा संदेशही जनमानसात निश्‍चितच गेला आहे. अर्थात, निवडणुकीशी ‘भारत जोडो’ यात्रेचा काही संबंध नाही, असे जरी राहुल गांधी वारंवार सांगत असले, तरी यात्रेनंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीस सामोरे जाताना राहुल गांधी व काँग्रेसला झडझडून काम करावे लागेल, हेे उघड आहे. 

– बी.व्ही. जोंधळे  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.