मुक्ती संग्रामातील दलित चळवळीचे योगदान- बी.व्ही. जोंधळे

मुक्ती संग्रामातील दलित चळवळीचे योगदान- बी.व्ही. जोंधळे

हैदराबाद संस्थानात जुलमी, पिसाट व धर्मांध निजामी सत्तेविरुद्ध स्टेट काँग्रेस, आर्य समाज, कम्युनिस्ट, समाजवादी गट यांनी जसा लढा पुकारला होता; तसाच तो दलित स्वातंत्र्य सैनिकांनीही छेडला होता. हैदराबाद संस्थानातील बी.एस. व्यंकटराव, बी. शामसुंदर, जे.एच. सुबय्या यांनी हैदराबाद संस्थानात दलितहिताचे मोठे काम केले. बी.एस. व्यंकटराव व बी. शामसुंदर निजामाशी संधान बांधून होते हे खरे; पण दलित हितासाठी व त्यांच्या विकासासाठी त्यांनी निजामाशी केलेली ही राजकीय तडजोड होती. याचा अर्थ निजामी सत्तेने संस्थानातील लोकांवर जे जुलूम केेले ते त्यांना मान्य होते असे नाही. निजाम व इत्तेहादूल मुसलमानच्या धर्मांध राजकारणास व इस्लामीकरणास त्यांचा पाठिंबा नव्हता. जे.एच. सुबय्या हैदराबाद संस्थानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे राजकारण करीत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निजामास विरोध केला होता. निजामी हैदराबाद संस्थानाने भारतीय संघराज्यात विलीन झाले पाहिजे, असे बाबासाहेबांनी ढणकावून सांगितले होते. हैदराबाद संस्थान मुक्त करणार्‍या पोलिस कारवाईतही बाबासाहेबांची भूमिका निर्णायक ठरली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार मराठवाड्यातील दलित स्वातंत्र्यसैनिकांनी निजामविरोधी लढ्यात आपला लक्षणीस सहभाग नोंदविला होता. पण त्यांचा सहभाग अनुल्लेखाने मारण्यात आला. हैदराबाद मुक्ती लढ्यातील सत्याग्रह पर्व, सशस्त्र क्रांतीचे पर्व व जंगल सत्याग्रहाचे पर्व अशा सर्व आघाड्यांवर झालेल्या लढ्यात दलितांचा सहभाग होता. जंगल सत्याग्रहात शिंदीची झाडे तोडण्याचा लढा स्टेट काँग्रेसने पुकारला होता. या लढ्यात पंचवीस लाख शिंदीची झाडे तोडण्यात आली. झाडे तोडण्याचे अवघड काम दलितांनी केले. झेंडा सत्याग्रहातही दलितांनी भाग घेतला. आर्य समाजाने पुकारलेल्या निजामविरोधी लढ्यातही दलितांचा सहभाग लक्षणीय होता. हैदराबाद मुक्ती लढ्यात लढणार्‍या दलित कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षाही ठोठावण्यात आल्या होत्या. य.दि. फडके यांच्या विसाव्या शतकातील महाराष्ट्र खंड 6 मध्ये नोंदविल्याप्रमाणे जांब (बु.) येथील हनुमंत साधू गायकवाड यांना 2 फेब्रुवारी 1948 रोजी एक वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कोंडीबा जयराम टेकाळे (लातूर) यांना दोन महिन्यांची शिक्षा झाली होती. उमरी बँक लूट प्रकरणीही निजामाने काही दलित स्वातंत्र्य सैनिकांवर खटले भरून त्यांना तुरुंगात डांबले होते. मराठवाड्यात भाऊसाहेब मोरे, हरिहरराव सोनुले, व्ही.एल. सूर्यवंशी, कडकनाथ हटकर, प्रभाकर हिंगोले आणि शेकडो दलित कार्यकर्त्यांनी निजामविरोधी लढ्यात भाग घेेतला होता. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी दलित समाजाचे कार्यकर्ते आमच्या लढ्यात होते, असे म्हटले आहे. (प्रजावाणी दि. 11/8/1988) ‘हैदराबाद मुक्ती संग्राम’ या पुस्तकाचे लेखक प्रा. उत्तम सूर्यवंशी यांनी म्हटलेय, या लढ्यात हिंदू, मुस्लिम, दलित, आदिवासी, स्त्रिया यांचा सहभाग होता. निजामावर बाँब फेकण्याच्या कटातील एक सूत्रधार आर्यवीर दलाचे स्वयंसेवक आर्य जगदीश आर्य (हैदराबाद) यांनी म्हटलेय, ‘मराठवाड्यातील दलितांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय मदत केली; परंतु तेच आज अज्ञातावस्थेत आहेत.’ भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणार्‍या दलितांचे जे प्रमाण आहे त्यापेक्षा अधिक प्रमाण हैदराबाद मुक्ती लढ्यात दलितांचे आहे, असे स्वातंत्र्य सैनिक अमृत द. कुरुंदकर यांनी अंबड येथील मराठवाडा इतिहास परिषदेत सादर केलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे. वसंत पोतदार यांनी ‘हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम’ या ग्रंथात दलित हुतात्म्यांची नावे दिली आहेत. अनंत भालेराव यांनी ‘हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा’ या ग्रंथात दलित हुतात्म्यांचा उल्लेख केला आहे. मराठवाड्यातील हुतात्मा स्मारकाच्या उभारणीच्या निमित्ताने प्रकाशित ‘हुतात्मा दर्शन’ या जिल्हा माहिती पुस्तिकेतही दलित हुतात्म्यांची नावे आढळतात. स्वातंत्र्य चळवळीतील दलितांच्या सहभागाचा पुरावा म्हणजे ‘स्वातंत्र्य सैनिक चारित्रकोष महाराष्ट्र राज्य, मराठवाडा विभाग’ हा ग्रंथ होय.
दलित स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्रे ठेऊन निजामी सत्तेविरुद्ध संघर्ष करताना मोठा त्याग केला. पण त्यांची उपेक्षा झाली. त्यांचा संघर्षमय इतिहास दडपण्यात आला. शासकीय लाभापासूनही ते वंचित राहिले. हैदराबाद नि मराठवाडा मुक्ती संग्रामांचा अमृतमहोत्सव साजरा करताना दलित स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना शासकीय लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवरून झाला पाहिजे. दलित स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची दखल घेतली पाहिजे. दुसरे काय? 

-बी.व्ही. जोंधळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.