गांधी अजून जिवंत आहे! – चंद्रकांत वानखेडे

गांधी अजून जिवंत आहे! – चंद्रकांत वानखेडे

२ ऑक्टोबर २०१९ रोजी गांधीजन्माला १५० वर्ष पूर्ण झाली. गांधींच्या मृत्यूलाही ७० वर्षे होऊन गेली, तरीही गांधी अजूनही जिवंत आहेत असं वाटत राहतं. गांधींच्या मृत्यूनंतर विनोबांना विचारलं गेलं, ‘गांधींच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांत प्रथम कोणता विचार तुमच्या मनात आला? त्यावर उत्तर देताना विनोबा म्हणाले, “माझ्या मनाला असेच वाटले की गांधीजींचा मृत्यू झालाच नाही आणि आजपर्यंत माझ्या मनात हाच विचार आहे की ते जिवंत आहेत. सज्जनांचा कधी मृत्यू होत नाही, ते सदाचे जिवंत असतात आणि दुर्जन कधी जिवंत असतच नाहीत, ते फक्त कल्पनेच्या जगात जगत असतात.”

म्हणूनच मग प्रश्न पडतो, ‘गांधी का मरत ‘नाही’

जग बदललं आहे असं आपण म्हणतो. तंत्रज्ञानाच्याबाबतीत हे खरंही असेल; पण सनातन मूल्यांच्याबाबतीत हे खरं आहे का? मूल्यांच्याच बाबतीत बोलायचे झाल्यास सत्य, प्रेम, अहिंसा, प्रामाणिकता सर्वांनाच हवी आहे. जग बदललं असेल, पण जगात असा कोण आहे ज्याला प्रेम नकोय, द्वेष हवाय. जगात असा कोण आहे ज्याला इतरांनी त्याच्याशी खोटं बोललेलं आवडेल? स्वतःपुरता विश्वास, प्रामाणिकता कोणाला नको आहे? कोणाला बंदुकीच्या गोळीने मरावं असं वाटेल? कोणालाच असे वाटणार नाही आणि खरा पेच इथंच आहे. मी साऱ्या जगाचा द्वेष करीन, पण मला मात्र जगाकडून प्रेमच हवे आहे. मी जगाचा विश्वासघात करेन, पण जगाकडून मला मात्र विश्वासच पाहिजे. मी जगाशी अप्रामाणिक राहीन, पण जगाने मात्र माझ्याशी प्रामाणिकच राहिले पाहिजे. मी हिंसा करेन पण कोणाच्या बंदुकीच्या गोळीला मी मात्र बळी पडता कामा नये. माझ्याबाबतीत मला अहिंसाच पाहिजे. मी कसाही लोकांशी वाईट वागत असलो तरीही लोकांनी माझ्याशी चांगलेच वागले पाहिजे, हीच माझी अपेक्षा असते. ही मूल्ये जोपर्यंत मरत नाहीत तोपर्यंत तरी गांधी मरत नाहीत. कारण गांधींनी आयुष्यभर याच मूल्यांचं प्रतिनिधित्व केलं.

‘पेराल तेच उगवेल’ हा तर निसर्गनियम. टोमॅटोचं बी पेरलं आणि वांग्यांचं रोप येईल? धोत्र्याचं कलम लावले तर त्यावर मोगरा फुलेल ? शक्य नाही. त्याप्रमाणे प्रेम हवे असेल तर प्रेमच पेरावे लागेल. सत्य हवे असेल तर त्याचीच (कास धरावी लागेल. इथेच गांधींचं आणि आपलं थोडं बिनसतं. आम्हाला प्रेम तर हवे आहे, पण द्वेषाची पेरणी करून आम्हाला अहिंसा तर हवी आहे, पण हिंसेचा मार्ग पत्करून. यालाच गांधींनी साधन आणि साध्य म्हटले आहे. साध्याच्या अनुरूपच साधन असावे हा त्यांचा आग्रह म्हणूनच आहे. शुद्ध परिणामांची अपेक्षा असेल तर शुद्ध साधनांचाच वापर केला जावा, हा त्यांचा कटाक्ष होता. धर्मकारणात असलेली ही बाब त्यांनी राजकारणातही मोठ्या प्रमाणावर प्रथमत:च उपयोगात आणली. त्यांच्या मते साधन आणि साध्य ह्यात संबंध नाही असे म्हणणे म्हणजे समुद्र तरून जायचा आहे आणि बैलगाडीचा वापर केला तर काय बिघडते असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. समुद्र तरून जायचा असेल तर साधन जहाज हेच होऊ शकेल. त्याऐवजी आपण बैलगाडीच पाण्यात घातली तर त्या गाडीसकट आपण सर्वच तळ गाठू जसा देव तशी पूजा. साधन हे बीज आहे आणि साध्य हे झाड आहे. बीजाचा आणि झाडाचा जसा आणि जितका संबंध आहे तसा आणि तितकाच संबंध साधन आणि साध्यात आहे. सैतानाची भक्ती करून ईश्वर-भजनाचे फळ मिळणे शक्य होणार नाही. आपण जर असे म्हटले की, ‘आम्हाला ईश्वराचीच भक्ती करावयाची आहे, मग साधन सैतान असले म्हणून काय झाले? तर मग हे म्हणणे अगदीच अज्ञानाचे होईल.’ पेराल तेच उगवेल हा निसर्गनियम जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तरी गांधींना कोणी कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी गांधी सुतराम मरण्याची शक्यता नाही.

शाळेत असताना थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायचा असला तर अनेक परवानग्या मिळवाव्या लागत. पहिले सिनेमा पाहायची परवानगी. नंतर सिनेमाच्या नावाला संमती आणि यातून सहीसलामत सुटलोच तर वडिलांची अर्थसंकल्पाला मंजुरी. हे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर थिएटरवरील तिकिटांच्या रांगेतील यशस्वी कामगिरी, थर्डक्लासचे तिकीट घेऊन आत गेलो की सिनेमा सुरू होण्याची वाट पाहायची. सिनेमा सुरू होईपर्यंत थर्डक्लासच्या प्रेक्षकांचा धिंगाणा सुरू असायचा. कोणी तरुण मुलगी दिसली की त्यांचे अचकट-विचकट बोलणे, छेडखानी, टिंगलटवाळी सुरू असायची, सिनेमा सुरू झाल्यावर मात्र हे सर्व बंद व्हायचं. सिनेमात मात्र पडद्यावर कोण्या तरुण मुलीची छेडखानी कोणी करीत असेल आणि नायक ह्याच कारणासाठी कोणाला चोप देत असेल, तर प्रेक्षक त्याला आनंदाने टाळ्या वाजवून, शिट्या वाजवून साद द्यायचे. सिनेमा सुरू होण्यापूर्वी जो प्रेक्षक स्वतः तेच करत होता, त्याला तेच पडद्यावर करताना नायक चोप देत असेल तर तोच प्रेक्षक टाळ्या वाजवतो? जी गोष्ट ‘वाईट’ आहे ती करणाऱ्यांना चोप देणे चांगले आहे, असे वाईट कृत्य करणाऱ्यांना अंतर्मनात वाटत असेल तर चांगुलपणाला ‘मरण’ कोठे आहे? आणि चांगुलपणालाच मरण नसेल, मग तो कोणताही का काळ असेना, गांधींना मरण कसं असू शकतं ? कोणताही सिनेमा घेतला तर त्यात नायक-खलनायक, चांगल्या-वाईटाचा संघर्ष, सुष्टाने दुष्टावर केलेली मात असाच साधारण सारांश असतो. सिनेमा बघणारा प्रेक्षक सर्वच चांगल्या प्रवृत्तीचा असेल अशी शक्यता नाही. त्यातही चांगल्या- वाईटांचा समावेश तर निश्चितच असेल. तरीदेखील थिएटरमधील सरसकट सर्वांनाच चांगल्याचं प्रतिनिधित्व करणारा नायकच जिंकावा असं का वाटत असावं? ही या देशातील थिटरटरमधीलच भावना असते असं नाही. ‘हरी पॉटर’ हा सिनेमा जगभरातील थिएटरमध्ये पाहिला गेला असेल, पुस्तकाच्या रूपात जगभर वाचलाही गेला असेल. परत हॅरी पॉटर म्हणजे चांगुलपणाचं प्रतीक. त्या चांगल्याचा वाईट, दुष्ट प्रवृत्तीशी संघर्ष, त्यात हॅरी पॉटरचा दुष्ट प्रवृत्तीवर मात करून विजय. हा विजय पडद्यावर तर होतोच; पण त्याचाच विजय व्हावा असं सर्व प्रेक्षकांना अंत:करणापासून का वाटत असतं? सर्वच प्रेक्षक चांगल्याच प्रवृत्तीचे असतात ? चांगला माणूसच जिंकावा असं चांगल्या माणसांप्रमाणेच वाईटांनाही वाटत असेल, तर निश्चितच काळ कोणताही असला तरीही चांगुलपणाला मरण नाही. आणि चांगुलपणाला मरणच नसेल तर कितीही नथुराम आले आणि त्यांनी गांधींना मारलं तरीही गांधींना ‘मरण’ असत नाही, आणि म्हणून गांधी कधी मरत नसतात. म्हणूनच कदाचित म्हटलं जात असावं, ‘सत्य परेशान हो सकता है, मगर पराभूत ‘नहीं’.

गांधी पदोपदी आडवे येतात, ज्या मूल्यांसाठी गांधी जगले त्या मूल्यांची पायमल्ली आपण करू शकतो. पण आस तर अखेर त्याच मूल्यांची असते.. प्रामाणिक जगतातलं जगणं, उद्योग, व्यापार, व्यवसाय याना प्रामाणिक माणसांची गरज असणं तर स्वाभाविक; पण बेईमानीचा धंदा करणाऱ्यांनाही माणसं इमानदारच लागत असतील, फसवणुकीचा व्यवसाय करणाऱ्यांनाही माणसं विश्वासूच लागत असतील आणि अप्रामाणिक असणाऱ्यांनाही माणस मात्र प्रामाणिकच लागत असतील तर सज्जनांचा या मूल्यांवरील विश्वास उडण्याचं कारणच काय? चोराच्या घरातसुद्धा ‘चोर’माणूस कामधंद्यासाठी ठेवला जात नसेल आणि त्यांनादेखील साव माणूसच लागत असेल तर गांधींनी ज्या मूल्यांची प्राणपणाने जोपासना केली, त्या मुल्यांना मरण कसे असणार? आणि त्या मूल्यांना मरण नसेल तर गांधी तरी कसे मरणार ?

त्यामुळे विनोबा म्हणतात तेच खरं. गांधी कधी मरत नसतात आणि नथुराम कधी जगत नसतात.

कुसुमाग्रजांच्या एका कवितेत थोर पुरुष एकत्रित येऊन चबुतऱ्यावर गप्पा मारत असतात व आपल्या व्यथा मांडतात. एक म्हणतो, ‘मी केवळ त्याच जातीचा झालो. दुसरा म्हणतो, ‘माझीही तीच व्यथा लढलो. साऱ्या समाजासाठी आणि उरलो फक्त स्वत: च्या जातीपुरता, त्यावर गांधी म्हणतात, ‘तुमच्यामागे किमान तुमची जात तरी आहे. माझ्या मागे आहेत फक्त सरकारी भिंती. ही कुसुमाग्रजांची कविता असली तरीही त्यात व्यक्त झालेली भावना केवळ त्यांचीच कशी म्हणता येईल? हे या देशातील एक भीषण असं वास्तवच आहे. केवळ आपल्यामागे सरकारी भिंत असून चालत नाही, तर एखादी जात भिंतीसारखी उभी असावी लागते. गांधींमागे एखादी जात भिंतीसारखी उभी नाही हे खरंतर त्यांचं सर्वात मोठं वैभव आहे. पण या देशात त्यामुळेच ते ‘आरोपी च्या पिंजऱ्यात सातत्याने उभे केले गेले. होती नव्हती ती लांच्छनं त्यांना लावली गेली. त्याचा प्रतिवाद फार कमी केला गेला. आणि मग ही लांच्छनच खरी मानली गेली. प्रश्न पडतो, त्यांच्या मागे अशी एखादी ‘जाती’ची भिंत असती तर अशी लांच्छन त्यांच्यावर त्या जातीच्या भिंतींनी लावू दिली असती का? जातीय अस्मितेचा भडका उडाला असता तर त्यांच्यावर आरोप करताना जरा जपून केले गेले नसते. का? नथुराम गांधींची हत्या करतो तेव्हा त्याच्या हातातील पिस्तूल, त्यातून सुटणारी गोळी, त्यातून गांधींच्या म्हाताऱ्या शरीराची झालेली चाळणी आणि गांधींचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला देह न दिसता; नथुरामने गोळी झाडण्यापूर्वी गांधींना ‘वंदन’ कसे केले होते, हेच दिसत असेल तर नथुरामच्या मागे उभी असलेली जातीची भिंत त्याचे संरक्षण तर करतेच आणि हिंदुत्ववादी म्हणजे प्रामुख्याने ब्राह्मणवादी ‘बुलेटप्रूफ जॅकेटही त्याचा सातत्याने बचाव करते. सुमार बुद्धीचा असलेला नथुराम याच भितीमुळे ‘पंडित’ ठरविला जातो. आणि स्त्रीलंपट असलेला नारायण आपटे आणि स्त्रीगंड असलेला नथुराम गोडसे ‘देशभक्त’ ठरविला जातो. अर्थात भ्रमाच्या पायावर उभ्या झालेल्या भिंती भुईसपाट व्हायला किती वेळ लागणार? पण भ्रमाचंच सत्तेच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीटीकरण सुरू झालं तर? सध्या तेही होताना दिसत आहे.

गांधी सर्वांचेच होते. काही टिचभरांचे हितसंबंध धोक्यात आल्यामुळे ते दुखावले असतील, त्यातून त्यांनी त्यांचा द्वेष, तिरस्कार केला असेल, पण गांधी सर्वांचेच होते, याचा दुसरा अर्थ ते कोणाचेच नव्हते असाही होतो का? कारण ‘सर्व’ हा शब्द तसा निर्गुण, निराकारच. त्या तुलनेत ‘जात’ कशी आकारात. गांधी ह्यात असताना या ‘सर्व’ शब्दाला एक आकार, अर्थ आणि चेतना गांधींनी दिली हे खरं आहे. पण गांधींच्या नंतर हे ‘सर्व’ विरत गेले आणि ‘जात’ अधिक मजबूत होत गेली. त्यामुळे गांधींवर आरोप करणारे ‘सतेज’ होत गेले आणि गांधींवर प्रेम करणारे ‘निस्तेज’. गांधींनी आयुष्यभर ‘विवेका’चा सूर जागवला. तोच विवेकाचा सूर जेव्हा जेव्हा लयास जायला लागतो, तेव्हा तेव्हा जाती, धर्माच्या ‘भिंती’ जरा जोरातच बोलतात. या भिंतीच्या आधाराने नथुरामही जरा जोरातच बोलत असेल तर नवल काय ?

गांधींच्या बाबतीत दुर्दैव एवढंच आहे की ज्यांच्यासाठी त्यांनी आयुष्य झिजवलं, त्यांना त्याची तेवढी तीव्र जाण नाही. पण त्यांच्या नेतृत्वात झालेल्या स्वातंत्र्य आंदोलनात गांधींनी ज्यांच्या हितसंबंधांना एक कायमची जी ‘पाचर'” ठोकली आहे, त्यांना त्याची तीव्र जाणीव आहे. अशा अवस्थेत गांधींवर होणारे आरोप त्वेषाने होतात आणि त्याचा होणारा प्रतिवाद तेवढाच उदासीन असतो; कारण गांधींनी ‘सत्य हाच परमेश्वर’ मानला असेल. पण बऱ्याच वेळा आमच्यासाठी ‘सोय हेच सत्य’ बनतं आणि पर्यायाने ‘सोय हाच परमेश्वर ही बनतो.

तरीदेखील गांधी मरत नाही. कारण सोय हेच सत्य मानणाऱ्यालादेखील व्यक्तिशः ‘सत्य हीच सोय’ असते. कारण त्याच्याशी खोटं बोलणारा हा त्याच्यासाठी गैरसोयीचा असतो. त्याला स्वतःसाठी का होईना त्याच्याशी ‘सत्य’ बोलणाराच हवा असतो. त्याच्याशी प्रामाणिक राहणाराच हवा असतो. त्याचा विश्वासघात करणारा नको असतो. त्याच्याशी ‘इमान’ राखणाराच हवा असतो आणि हे जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत,

गांधी मरत नसतो.

– चंद्रकांत वानखेडे (लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

(‘गांधी का मरत नाही’ ग्रंथातील एक भाग लेखक चंद्रकांत वानखेडे यांच्या सौजन्याने.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.