कवाडेंची पाखरं निघाली चार्‍याच्या शोधात..

कवाडेंची पाखरं निघाली चार्‍याच्या शोधात..

महाराष्ट्रात आणखी एका आघाडीचा जन्म होईल, अशी धुसफूस चालू होती आणि ती खरी ठरली. बंडोबा बनून मुख्यमंत्री झालेल्या शिंदेंच्या गटात स्वतःला महाविद्रोही, अतिजहाल, अतित्यागी, अतिलढाऊ समजणार्‍या कवाडे मास्तरांनी प्रवेश केला आहे. पूर्वी अशा आघाड्यांविषयी समाज आणि समीक्षक खूप गांभीर्यानं चर्चा करायचे. आता कोणी करत नाही. कारण एका ठिकाणचा चारा संपला, की पक्षी चार्‍याच्या शोधात कुठंही जाणार, हे लोकांनी गृहीत धरलं किंवा त्यांना ते उशिरा कळलं. परिणाम, आता चर्चा-बिर्चा होत नाही. कोण कुणाच्या उबेला गेला आणि कोण लोडशेडींग सुरू झालं म्हणून बाहेर पडला, हे कुणाला कळत नाही. हे सारं असंच चालणार. कारण ते राजकारण आहे. राजकारणात कोणी साधू-संत नसतात, नैतिकतेचे धनी नसतात, तर सत्तेचा खेळ खेळणारे व्यवहारी असतात. लोकांची स्मृती खूप तात्कालिक असते, म्हणून त्यांना इतिहास नीट आठवत नाही आणि आता तर तो आठवला, की वाद होतो म्हणून सामान्य माणूस इतिहासाच्या नादाला लागत नाही. वास्तव सांगणारा, खरे बोलणारा इतिहास कुणाला आवडतो? तर कवाडे मास्तरांचा गट पहिल्यांदाच कुणाशी तरी आघाडी करतोय असंही समजण्याचं कारण नाही. सर्वप्रथम तो ऐक्य प्रक्रियेत आला. मृगजळ ठरलेल्या या प्रक्रियेतून स्वतःच्या पायावरच उभा राहण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी त्यांनी दलित-मुस्लिम आघाडी तयार केली. खूप मोठा स्मगलर म्हणून गणल्या गेलेल्या हाजी मस्तान याच्याबरोबर ती आघाडी होती. या आघाडीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. धर्मनिरपेक्ष आंबेडकरवादी आणि कट्टर धर्मवादी मुस्लिम यांच्यात आघाडी कशी होईल, असा तो प्रश्‍न होता. आघाडी फार काळ टिकली नाही आणि प्रश्‍नही विस्मरणात गेला. पुढे काही वर्षांनी प्रकाश आंबेडकर यांनी हाच प्रयोग केला. ओवैसी यांच्या पक्षाबरोबर दिलजमाई केली; पण तीही निवडणूक निकालानंतर तुटली. इकडे रामदास आठवले यांनी काँग्रेस ते भाजप असा प्रवेश केला. नामदेव ढसाळ, अर्जून डांगळे शिवसेनेत गेले. प्रकाश आंबेडकर यांनी भरभक्कम वाटावी अशी वंचित बहुजन आघाडी काढली आणि अनेक पक्ष या आघाडीकडे आकर्षित झाले. कवाडे मास्तरांनी काँग्रेसमध्येच राहायचे ठरवले. त्याबद्दलचे बक्षिसही त्यांनी मिळवले होते. ते आमदार झाले होते. त्यांची दाढी वाढली होती. आता निवडणुका तोंडावर आल्याने अनेक घटकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. पक्षीही स्थलांतर करतात आणि पक्षही. दोघांसाठी चारा हे समान वैशिष्ट्य असते. स्वतःच्या ताकदीवर चारा निर्माण करण्याची आणि एव्हेंटमध्ये तो घेऊन जाण्याची क्षमता नसली, की मग तडजोडी होतात. अर्थात, विचार वगैरे गोष्टी त्यामागे नसतात. तसे असते तर भगवी शक्ती आणि भीमशक्ती, शिवशक्ती आणि भीमशक्ती, भीमशक्ती आणि हाजीशक्ती, भीमशक्ती आणि पांढरी टोपी शक्ती, भीमशक्ती आणि शिंदेशाही अशा विचित्र वाटाव्यात अशा जोड्या जुळल्या नसत्या किंवा तसा प्रयत्न कोणी केला नसता.
शिंदेंनी चाळीस आमदारांच्या जोरावर थेट मुख्यमंत्रिपदाला हात घातला. ते स्वतः एक सत्ताकेंद्र बनले. या सत्तेचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. कारण हिंदुत्वाचा अभ्यास केल्याचे प्रमाणपत्रही त्यांच्याकडे नाही. तसे ते अल्पशिक्षित. रिक्षाचालक ते मुख्यमंत्री अशी कर्तृत्वाची एक हनुमान उडी त्यांनी मारली आहे. शिवसेनेच्या शाळेतील या गुणी आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्याचे कवाडे मास्तरांना कौतुक न वाटल्यास नवल म्हणावे लागेल. शिंदे हे महाराष्ट्राला पुढे नेत आहेत. ते कार्यक्षम आहेत, लढाऊ आहेत वगैरे अनेक प्रमाणपत्रे एका दणक्यात कवाडे मास्तरांनी देऊन टाकली. परीक्षा घेण्याची किंवा वर्गात बोट वर करून उत्तर देण्याची संधीही कवाडे मास्तरांनी घेतली नाही. अलीकडे तर बिनतासाचे वर्ग चालतात. खिचडी मिळते म्हणून विद्यार्थी येतात. परीक्षाही नसल्यातच जमा. कवाडे मास्तर पुरोगामी असल्याने त्यांनी नव्या कारभार्‍याला परीक्षा देण्याची संधीही दिली नाही. परीक्षेशिवाय निकाल जाहीर केला. तसे अलीकडचे शिक्षक पेपर न वाचता सैल हाताने मार्क देतात. मुक्त विद्यापीठाकडे पाहावे तेथे एकच अभ्यासक्रम अनेक वर्षे प्रामाणिकपणे चालवला जातो आणि कुणाचेही नुकसान होऊ नये म्हणून प्रवेश घेईल त्याला घसघशीत मार्कांनी पास केले जाते. मनू शिकवायलाही हयगय केली जात नाही. आता कवाडे मास्तरांनी तेच केले. शिंदेशाहीला कदाचित ते जय भीम बोलायला शिकवतील किंवा त्यांची एखादी घोषणा आत्मसात करतील. नामांतराच्या लढाईत आपण कसा प्रखर भीम सांगत होतो, तेही विसरतील. कारणही नैसर्गिकच आहे आणि ते म्हणजे मास्तरांना विस्मरणाची सवय जास्त असते. एक लक्षात ठेवावे, की आता पूर्वीप्रमाणे एकसंघ भीमशक्ती नाहीय. ती गटातटात विभागण्यात आली आहे. तसे झाले तर नव्या चार्‍यासाठी नवे प्रयत्न करता येतात. बाबासाहेबांचा विचार नव्हे, तर प्रतिमा आणि श्रद्धा मिरवण्याच्या काळात हे सारे असेच घडत राहणार.

– पंक्चरवाला 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.