शुभांगी तू आम्हाला माफ कर! – बी.व्ही. जोंधळे

शुभांगी तू आम्हाला माफ कर! – बी.व्ही. जोंधळे

वैद्यकीय शिक्षण घेऊन भावी आयुष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणार्‍या नांदेड जिल्ह्यातील महिपाल पिंपरी गावातील शुभांगी जोगदंड हीने एका तरुणाशी प्रेम केले म्हणून साक्षात तिच्या बापा-भावाने तिचा खून केल्याचे वृत्त नुकतेच वाचण्यात आले. प्रेम करणे हा नैसर्गिकरित्या काही गुन्हा नव्हे. प्रेम काही कुणाची परवानगी वगैरे घेऊन करता येत नाही. ते तारुण्यसुलभ स्वभावानुसार कुणावरही-कधीही होऊ शकते; पण जातीय अहंता जोपासणार्‍या व ‘खानदानकी इज्जत’ जपणार्‍या बुरसटलेल्या रुढी-परंपरावाद्यांना हे मान्य नसते. म्हणून मग ते रुढी-परंपरेचा पोकळ अभिमान बाळगून साक्षात पोटच्या गोळ्यासही निदर्यपणे मारून टाकतात.
हरियाणा-राजस्थान वगैरे भागात आंतरजातीय विवाह केल्यामुळे जसे ऑनरकिलिंगचे प्रकार घडतात, तसे ते आता पुरोगामी म्हणविणार्‍या महाराष्ट्रातही घडू लागले आहेत. ही बाब अधिक चिंताजनक म्हटली पाहिजे; पण आता या सबंध प्रकरणाचा विचार करता खरोखरच शुभांगीचे प्रेम करून काही चुकले काय, असा प्रश्‍न निर्माण होतो. शुभांगीचे प्रेम भलेही कितीही नैसर्गिक-स्वाभाविक आणि तारुण्यसुलभ असले, तरी प्रेम करताना तिने हजारवेळा विचार करायला हवा होता की काय? कारण आंतरजातीय विवाह केल्यामुळे ‘सैराट’ चित्रपटाचा शेवट भलेही रंक्तरंजित दाखविला गेला असला, तरी प्रत्यक्ष जीवन व्यवहारात प्रेम मान्य नसणारे प्रेमाचे शत्रु प्रेमी युगुलांची हत्या करीत असतात, हे शुभांगीला कळायला नको होते काय? खर्ड्यातील नितीन आगेला आंतरजातीय प्रेम केल्यामुळेच मारून टाकण्यात आले आणि सोनाईतही प्रेम करणार्‍यांचे तुकडे-तुकडे करण्यात आले, हे शुभांगीला आठवायला नको होते काय? आंतरजातीय विवाह केल्यामुळे जालन्यात पोटच्या मुलीला मारून तिने फाशी घेतल्याचा बनाव तिच्या जन्मदात्यांनीच रचला नाही काय? आता यावर शुभांगी भलेही असे म्हणू शकेल, की मी कुठे दुसर्‍या जाती-धर्मातील युवकाशी प्रेम केले होते? मी तर स्वजातीय तरुणाशी प्रेम केले होते. मग मला जीवे मारण्याची शिक्षा का दिली गेली? प्रश्‍न बिनतोड असला तरी मुद्दा असा आहे, की तिचे प्रेम तीच्या बापा-भावाला मान्य अयासला हवे होते ना? प्रेम वगैरे करण्याचा तीला अधिकार कुणी दिला? रुढी-परंपरा काय सांगते? म. फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी भलेही स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरला असेल आणि वर आंतरजातीय विवाहांचाही पुरस्कार केला असेल; पण म्हणून काय झाले? शेवटी रुढी-परंपरा नावाची काही गोष्ट आहे का नाही? कायदा-कानून-घटना-संविधान भलेही समानतेचा आग्रह धरत असेल; पण रुढी-परंपरा बलिसयी मानूनच पंतप्रधान असणार्‍या इंदिरा गांधींना शंकराचार्यांनी दर्शन नाकारले होते ना? शबरीमाला मंदिरात रजस्वला स्त्रीयांना प्रवेशबंदी आहे ना? अंधश्रद्धेविरुद्ध एल्गार पुकारला म्हणूनच नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश आदींच्या सनातन्यांनी हत्या केल्या ना? थोडेसे विषयांतर झाल्यासारखे वाटते ना? नाही. पण ते तसे नाही. सांगण्याचा मुद्दा असा आहे, की तोंडाने भलेही आपण व आपला समाज सुधारणावादांच्या तसेच स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारत असलो, तरी रुढी-परंपरेचे, अंधश्रद्धेचे, जातीय अंहतेचे, दांभिक प्रतिष्ठेचे ‘खानदान की इज्जत’चे भूत आपल्या डोक्यावर इतके काही स्वार झाले आहे, की विवेक, शहाणपणा, मानवता, माणूसकी ही सर्व मानवी मूल्ये त्यापुढे शरणागती पत्करतात. शुभांगीची हत्या म्हणूनच मन हेलावून सोडणारी आहे. रुढी-परंपरा, पुरुषसत्ताक-पितृसत्तेने तीचा बळी घेतला आहे. असो. शुभांगी तू निर्मळ निर्व्याज तारुण्यसुलभ प्रेम केले म्हणून तुझ्या बापा-भावाने जी तुझी निर्देय हत्या केली, त्याबद्दल त्यांना आणि त्यांना तसे करायला भाग पाडणार्‍या बुरसटलेल्या समाजव्यवस्थेला तू जमले तर माफ कर. रुढी-परंपरेचे, बुरसटलेल्या समाजव्यवस्थेचे आम्ही दास नि गुलाम आहोत. क्षमस्व! 

– बी.व्ही. जोंधळे (लेखक आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.