पांढर्‍या हत्तीसाठी समाजानं एवढं थोडं करायलाच हवं…

पांढर्‍या हत्तीसाठी समाजानं एवढं थोडं करायलाच हवं…

पांढरे हत्ती म्हणजे नोकरशाही, बाबूशाही, नोकरशाहीच्या नावानं तयार झालेली शोषकशाही, जबाबदारीचं तत्त्व नसलेली; पण लोकांसाठीच तयार झालेली यंत्रणा. खालपासून वरपर्यंत ती पसरली आहे. जनतेची सेवा करण्यासाठी ती सशक्त असावी म्हणून तिला लाखोंत पगार मिळतो. शरीराच्या आत-बाहेर शस्त्रक्रिया करण्यासाठी सवलती मिळतात. एवढ्या सार्‍या रजा, गाड्या, सेवक मिळतात. शोषक नेहमी एकसंघ असतात. तसंच या पांढर्‍या हत्तीचे आहे. स्वतःच्या संघटना बळकट करून त्या लोकांच्या संघटनांवर लाठ्या-काठ्या चालवतात. बिचारे पिचलेले लोक त्यांना मालक, देव, राजे आणि नशिबकर्ते म्हणून हाक मारतात. नोकर एसीत बसतात आणि मालक बाहेर शिपायाला चिरीमिरी देत बसतात. मालक बनलेल्या नोकरानं कागदाचा एक तुकडा घ्यावा एवढीच लोकांची अपेक्षा असते; पण मालकांना वेळच नसतो. तो उशिरा कार्यालयात येतो. लवकर जातो. मध्ये वेळ मिळाला तर पुढार्‍यांची चमचेगिरी करत फिरत राहतो. त्याच्याकडे कागद घ्यायला वेळ असतोच कुठं? काय करेल बिचारा! स्वतःचं बघेल की पुढार्‍याचं? या चक्रातून दूर होण्यासाठी तो संघटित होतो. स्वतःच्या मागण्या एका झटक्यात मान्य करून घेतो. आदिवासींना आपल्या मागण्यांचे गाठोडे डोक्यावर घेऊन मुंबईपर्यंत लाँग मार्च काढावा लागतो. टाचा रक्तबंबाळ करून घ्याव्या लागतात. पांढरे हत्ती त्याची समजूत काढतात. लोकशाहीच्या मार्गानं जा म्हणतात. पांढरे हत्ती बलवान असल्यानं त्यांची भूकही मोठी असते. कोणत्याही नंबरचा आयोग लावा, त्यांची भूक भागतच नाही. ज्यांची भूक भागत नाही, ते तर पांढरे हत्ती असतात. ज्यांना भूक लागूच दिली जात नाही, जाणवूच दिली जात नाही ते कुपोषित दुर्बल मालक लोक असतात. जनता असते. आपल्या देशातला नागरिक कसा आहे, याचे एक चित्र काढून म. फुल्यांनी इंग्लंडच्या राणीला पाठवले होते. हाडे दिसत असलेला एक माणूस, त्याचे पोट पाठीला लागले आहे. त्याच्या डोक्यावर, खांद्यावर सावकाराची कर्जे आहेत. त्याला पिळणार्‍या धर्माचे ओझे आहे आणि एवढे सारे कायदे आहेत. हे सारे ओझे घेऊन तो वाकला आहे. कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी त्याची अवस्था आहे. हे चित्र पांढर्‍या हत्तींना त्यांच्या स्पर्धा परीक्षेत, प्रशिक्षण काळात आणि मालक होण्याच्या काळात कधीच दिसत नाही किंवा दाखवले जात नाही. कारण तो समृद्ध देशाचा मालक होणार असतो. समृद्ध म्हणजे अर्थातच दारिद्य्राने, भुकेने, पिळवणुकीने समृद्ध असलेला भारत. मालकांसाठी इंडिया आणि नोकर, याचक बनवल्या गेलेल्यांसाठी भारत. जय हो… किती भारी आहे हे सारं…
पांढर्‍या हत्तींची कूळकथा आणि त्यांचं वर्तमान, भविष्य आठवायचं कारण तसं साधं, सरळ आहे. चाळीस आमदारांचा गट घेऊन, त्याला झाडी-गाडी दाखवत आणि आसामच्या देवीचा आशीर्वाद घेऊन कारभारी बनलेल्याकडे नाशिकमध्ये सहा जानेवारीला नागरिकांनी शासकीय खात्यातील भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. पैशाशिवाय सात-बारा नोंदच होत नाही, ही मुख्य तक्रार. तलाठी बाबूपासून आयुक्तापर्यंत सर्वांना ती लागू होणार होती. कोणी तलाठी बाबूच्या मागं ईडी लावून बघावी. पुढार्‍यापेक्षा जास्त चमत्कार दिसतील. तर लोक छाती पिटून तक्रारींचा पाढा वाचत होते. कारभारी ऐकत होते. जो फक्त ऐकत राहतो, करत काहीच नाही. कारण करण्याचे नैतीक बळ नोकरशाही आणि सत्ताधारी या दोघांनीही गमावलेले असते. तर भ्रष्टाचाराची घुस कुठे, कशी-कशी पोखरते आहे, हे शेतकर्‍यांनी सांगितले. कारभार्‍यांनी ऐकले. सामान्य माणसाचं एक बरं असतं, की कोणी आपलं ऐकलं, की त्याला आपलं कामच झाल्यासारखं वाटत असतं. मालकाविरुद्ध ब्र काढण्याची इच्छा नाही. कारण तो कुठंही घालून कुणालाही धुतो. सात-बाराचा उतारा असो, गाळण्यासाठी उसाचं चिपाड असो, पाटाचं पाणी असो, ये-जा करणारी वीज असो, जातीचा दाखला असो, थाळी असो किंवा नैसर्गिक विधी असो, तो धुऊ शकतो. पिळू शकतो. लोकांना कधीच कळलं नाही, की आपण मालकाचे गुलाम कसे झालो, हात पसरणारे कसे झालो आणि नोकरांना एवढंच कळतंय, की आपलं पांढर्‍या हत्तीचं रुप सातत्यानं टिकवून कसं ठेवायचं. लोकशाहीत सर्वच ठिकाणी लोक मालक असतात; पण घडायला लागते वेगळेच. तर कारभारी लोकांच्या तक्रारी ऐकत होते, तेव्हा आणखी एक गोष्ट घडत होती ती म्हणजे लाचलुचपतीच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नावे अथवा फोटो जाहीर करू नयेत. तसं झालं तर कर्मचार्‍यांची मानहानी होते, त्यांच्या कुटुंबाला पश्‍चाताप होतो. कोर्टात गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच नावे जाहीर झाल्याने बदनामी होते. क्षणभर पांढर्‍या हत्तींच्या नेत्यांचे हे मान्य केले, तर मग हाच न्याय सर्व संशयित गुन्हेगारांना का लावायचा नाही. त्यांनाही नाव असते, कुटुंब असते आणि कोर्टात निर्णय होण्याची शक्यता असते.
कोर्टात निकाल लागण्यापूर्वी कोणीही संशयित गुन्हेगार असतो. दोन-सात वर्षे जामिनासाठी कोर्टात अडकलेले लोक आपल्याकडे आहेत. ते छोटे-मोठे आहेत. खून करणारा आहे, कोंबडा चोरणारा आहे, सात-बार्‍यात पैसे मुरवणारा आहे, रस्ता आणि भूखंड खाणारा आहे. या सर्वांनाच हा न्याय द्यावा लागेल. कारण कायद्यासमोर सारे समान असतात. सरकारी कर्मचार्‍यांची बदनामी होत असेल, तर ती तशी इतरांचीही होते. बलात्कार, बाल गुन्हेगारी यांच्यात अडकलेल्यांची नावे प्रसिद्ध करू नयेत, अशी सध्या तरतूद आहे. बालकाचे एक दीर्घ आयुष्य पुढे येणार असते आणि बलात्कारित महिलांना याच व्यवस्थेत पुन्हा प्रतिष्ठेने जगता यावे यासाठी काही घटकांना अशा नावांपासून मुक्त करण्यात आले आहे. बाकी पंतप्रधानांपासून ते ग्राम सेवकांपर्यंत ज्यांच्यावर आरोप होतो तेव्हा त्यांचे नाव प्रसिद्ध केले जाते. न्यायालयात ते निर्दोष सुटण्याची शक्यता असेल म्हणून लाचखोरांची संशयित लाचखोरांची नावेच जाहीर करू नयेत, म्हणजे पांढर्‍या हत्तींनी स्वतःसाठी कायदे बदलून घेणे होय. नोकरशाही जेव्हा अन्य घटकांवर आरोप करते, नोटीस बोर्डावर नावे लावते, जप्ती करते, पाणीचोरीचा, करचोरीचा आळ घेते तेव्हा हे पांढरे हत्ती स्वतः कॅमेर्‍यासमोर येऊन आपला पराक्रम कसा सांगत असतात, हे सर्वच जण पाहत आलो आहोत. नोकरशाही कोणी पवित्र गाय नसते, तिला इतरांप्रमाणेच सर्व कायदे लागू असतात. एखादा पुढारी होताना कसा असतो आणि नंतर तो कसा होतो, तसेच पदावर जाताना पांढरा हत्ती किती अशक्त असतो आणि नंतर मालक बनून तो कसा सशक्त होतो, याची चौकशी करण्यासाठी आयोग नेमावा, अशी मागणी अधिकार्‍यांनी केली पाहिजे. खात्री आहे, की ते तसे करणार नाहीत. कारण तसे केल्यास त्याचे रुपांतर नोकरात होईल. कोणत्याही शाळेसमोर जा, मॉलसमोर जा तेथे लाल दिव्यांच्या आणि बिनलाल दिव्यांच्या सरकारी गाड्या किती आणि का उभ्या असतात, याचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. हिंमत असेल तर अधिकार्‍यांनी सरकारी गाड्यांचा बिनसरकारी वापर कसा होतोय, हे जाहीर करून टाकावे. मोठ्या हत्तीच्या घरात झाडलोट करणारेही शासकीय कर्मचारीच असतात. ते नेमलेले असतात वेगळ्या कामासाठी आणि हे वर्षानुवर्षे धुणीभांडी करत निवृत्त होतात.
वा रे पांढरे हत्ती! तुमच्या नावाला प्रतिष्ठा आहे आणि इतरांच्या नावांना नाही. खरंच बदनामीची भीती असेल, तर आपल्या संघटनेचा कोणीही छोटा-मोठा घटक लाच घेणार नाही किंवा देणार नाही, अशी प्रतिज्ञा करा. शोषक असे कधी करत नाहीत. कारण आठ-आठ सोंडांनी शोषण करण्यासाठीच त्यांचा जन्म असतो. अर्थात, सगळीच व्यवस्था अशी बरबटलेली आहे असा निष्कर्ष उताविळपणे कोणी काढता कामा नये. तसे असते, तर सगळा काळोख झाला असता. अधिकारी महासंघ असो किंवा कर्मचारी असो, कुळथे असोत अथवा वाटाणे असोत, या सर्वांनी आपण नोकर आहोत, हे समजून घ्यावे. मालक कसा जगतो आहे हे पाहावे. मालक अंधारात आणि नोकर शायनिंग मारत, असे चित्र तयार करणे बरोबर नाही आणि लोकांनी ते करू देऊ नये. नोकरशाही कोठून आभाळातून किंवा पृथ्वीचे पोट फोडून येत नसते. नोकरशाही काय किंवा नोकरशाहीच्या कुशीत ऊब घेणारे सत्ताधारी काय, हे सारे लोकांच्या वासनेतून जन्माला येतात. लोकांच्या गर्भाशयातच नोकरशाहीचा जन्म होतो. म्हणून हे गर्भाशय कुरतडणे किंवा स्वतःला वेगळे ठरवून वेगळा मलिदा मागत राहणे गैर तर आहेच शिवाय अनैतिकही आहे. लोकशाहीच्या पायाला अशी वाळवी किंवा विकृती लागली, तर लोकशाहीचा पाया ठिसूळ व्हावा लागतो. सबब पांढर्‍या हत्तीच्या नव्या मागणीचा दाही दिशांतून निषेध झाला पाहिजे. जी व्यवस्था भ्रष्टाचार कायमचा संपवण्याऐवजी अनेकदा भ्रष्टाचारमुक्त पंधरवडा साजरा करते, कायम सेवा देण्याऐवजी सेवासप्ताह करते, फायल्यांचा निचरा करण्यासाठी त्यांचाही पंधरवडा साजरा करते, भ्रष्टाचार्‍यांची नावे कळवा असेही तीच सांगते. कायम निर्धोक प्रवास देण्याऐवजी अपघातमुक्त सप्ताह साजरा केला जातो. त्यामुळेच गोर्‍यांची नोकरशाही परवडली, असे जुने लोक म्हणतात. गोरे काही झाले तरी बांधील होते आणि हे स्वतःशीच बांधील व्हायला निघाले आहेत. पोरे नापास झाली काय आणि पास झाली काय, कुणाच्या पगारावर परिणाम होत नाही आणि आठ महिने काम करून बारा महिन्यांचा पगार घेताना कुणाला संकोच वाटत नाही. लोक जेव्हा गुलाम होऊन जगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा नोकरशाही जबाबदारीचे तत्त्व विसरते आणि लोकांत जाण्याऐवजी लोकदरबार भरवते. पांढरे हत्ती आपला रस्ता बदलायला आणि खाद्य बदलायला तयारच नसेल, तर सरकारने लाचखोरांची म्हणजे संशयित लाचखोरांची नावे प्रसिद्ध करण्याचे बंद करावे. निदान कागदोपत्री तरी, छुप्या पद्धतीने तरी, भ्रम म्हणून तरी, आपला महाप्रदेश भ्रष्टाचारमुक्त झाल्याचे वांझोटे समाधान मिळेल.
प्रश्‍न एवढाच आहे, की सगळेच संशयित गुन्हेगार अशी मागणी करू लागले तर? कदाचित भ्रष्टाचाराच्या बातम्या होणे बंद होईल. लाच घेणार्‍यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक एकवर गेला आहे. त्यानंतर राजस्थान आणि तामिळनाडूचा नंबर येतो. महाराष्ट्रात 2020 मध्ये लाच घेण्याच्या 3,123 घटना घडल्या होत्या. त्यात सुमारे वीस टक्क्यांनी वाढ होऊन 2021 मध्ये लाच खाणार्‍यांची संख्या 3,745 वर गेली आहे. यातील 67 टक्के गुन्हेगारांना सापळा टाकून पकडण्यात आले आहे. अर्थात, असे नव्हे की सापळ्याचे धागे मऊ होत नाही किंवा त्यांनाही वाळवी लागत नाही. तसे घडते म्हणून तर शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असते. ते कमी असते म्हणून लाचखोरी कमी असते, असा निष्कर्ष काढता येणार नाही. निकाल साक्षी-पुराव्यांवर असतो आणि आपल्याकडे गुन्ह्याच्या वेळी जे ठळक साक्षी-पुरावे असतात, ते न्यायालयात प्रवास करेपर्यंत ठिसूळ होतात. अदृश्य होतात, काही वेळा फितूर होतात. सबब, शिक्षा होण्याचे प्रमाण कमी राहते. गल्लीबोळात हातभट्ट्या चालतात; पण शिक्षा होण्याचे प्रमाण खूप कमी असते. संशयित गुन्हेगारांची नावे जाहीर न करणे म्हणजे कायद्याचा वचक कमी करणे, संशयित गुन्हेगाराला पुन्हा बेभान आणि प्रतिष्ठित बनवणे, कायदा गुंडाळून ठेवण्याची वृत्ती तयार करणे होय आणि अधिकारी कोण आहेत, की ज्यांना वेगळ्या पारड्यात ठेवावे. तलाठ्याने केलेल्या गैरकृत्याचा परिणाम तसा मर्यादित असतो; पण मोठ्या पांढर्‍या हत्तीने केेलेल्या गैरकृत्याचा परिणाम मोठा असतो. सर्वांना भोगावा लागतो. जेव्हा एक मोठा पांढरा हत्ती भाकरीऐवजी लाच खाण्याची सवय लावून घेतो तेव्हा याच मार्गाने जाणारे अनेक छोटे पांढरे हत्ती तयार होतात. हे सर्व दुष्टचक्र थांबवण्यासाठी मुळात गैरआहार घेणे बंद करायला हवे.

– पंक्चरवाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.