धर्म-संस्कृतीची मूलतत्त्वे आणि स्त्री – डॉ. शशिकला राय

धर्म-संस्कृतीची मूलतत्त्वे आणि स्त्री – डॉ. शशिकला राय

मनू फार नुकसान केलंस आमचं, अजूनही करत आहेस. जयपूरच्या स्थानिक न्यायलयात तुझी मूर्ति न्यायाच्या कोणत्या व्याख्येसाठी लावलीय कळत नाही! ‘मनुस्मृती’चं दहन केलं गेलं, पण मनू तर पितृसत्ताक सत्तेचं बीजतत्त्व आहे, चिरंजीवी ज्याला आग लागू शकत नाही, न वारा उडवून देऊ शकतो. बलात्कार पुरुष करतो आणि चारित्रहीन बाई ठरते. तिहार जेलमधील बलात्कारी पुरुषांच्या मुलाखतीवरून कळून येतं, की त्यांना आपल्या कृत्याचा जराही पश्‍चाताप नाहीये.  उलट प्रश्‍नरुपी आरोप होतो, की असले कपडे का घातले? निर्जन जागी कशाला गेली?  हे निंदनीय आहे.

स्त्री बनण्याच्या सामाजिक प्रक्रियेत स्त्रीच्या जीवनापेक्षा रितिरिवाज, तथाकथित मूल्य, धर्म व संस्कृती महत्त्वाची झाली. पितृसत्तात्मकतेच्या क्रुर्तेत भारत, पाकिस्तान, अथेन्सच्या भूमीत काही फरक राहिला नाही. हवा असो, श्रद्धा वा असातीरी सगळ्यांची व्यथा ती आणि तशीच. जेव्हा मी या प्रवासात सहभागी होण्यासाठी चालू लागले तेव्हा लेखणी आपली वाट विसरून गेली, जे काही पाहिलं-जाणवलं ते सगळं एकत्रित मांडण्याच्या प्रक्रियेत एक विश्रृंखल कोलाज बनलं. ज्यामध्ये जागोजागी काळे-निळे डाग उमटले, जिथं शरीर काळ्या-निळ्या डागांपासून वाचलं तिथं आत्म्यावर हे डाग दिसायला लागतात. इथं १ ‘सारा लोहा भी उन्हीं का है और धार भी उन्हीं की?’ सिमोन विचारते ‘स्त्री काय कशी असते?’ पण त्याही आधी प्रश्‍न‘स्त्री आहे का?’ जनसंख्येच्या अर्धा हिस्सा असताना ही स्त्री माता असते, बहीण असते, पत्नी, प्रेमिका, कन्या असते. पण ‘स्त्री’असते का?
(गावात जेव्हा एखादी बाई रेल्वेखाली येऊन चिरडून मरते तेव्हा पंचायत बसते. बायांना सहनशीलता नाही-घर म्हटलं, की छोट्या-मोठ्या गोष्टी होतच असतात. हे चांगलं, की ती मुलाला सोडून गेली. आमच्या गावचं वैशिष्ट्य हे, की दरवर्षी पाच-सात केसेस होतात. पण पोलिस चौकीचं नाव नाही. बायांना काय कमी, दुसरी आणू.)
हे धर्माच्या मूलगामी तत्त्वांच्या मजबूत धाग्यांनी विणलेलं समाजशास्त्र आहे. नैतिकता, संस्कृती, मूल्ये व रूढी या बेड्यात जखडलेली ती काय स्त्री आहे? तिच्यासाठी उर्ध्वगामी होण्याची कोणती व्यवस्था आहे का? चांगल्या मुलीची तुलना भारतीय समाजात गाईशी केली जाते. अगदी गरीब गाईसारखी आहे हो! आत्मभान (अस्तित्व) नसणं म्हणजे गाय असणं. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच स्त्री-देह हा सांप्रदायिक विमर्शाचे महत्त्वाचे सूत्र म्हणून वापरला जाऊ लागला. हिंदू महिलेकडे शक्तिशाली हिंदू संतती जन्माला घालू शकण्यास सक्षम समर्थ ‘गर्भाशया’च्या रुपात पाहिलं जाऊ लागलं. ती फक्त ‘गर्भाशयधारी’ होती, त्या व्यतिरिक्त तिची काही किंमत नव्हती. तिच्यासाठीची आदर्श मूल्ये ‘कल्याण’चे अंक निश्‍चित करू लागले. ‘रजोदर्शनानंतर बराच काळ स्त्रियांना काम व मातृत्वाच्या अवयवांचा उपयोग करू न दिल्यामुळे त्यांच्यात वैफल्य निर्माण होऊन ते काही आजारांनाही निमंत्रण देते.’ ही भूमिका मांडणार्‍या अशा नैतिकतावाद्यांनी बालविधवा विवाहाला मात्र विरोध केला-का ती तरुण होत नाही? रजस्वला होत नाही? सगळं ढोंग व फसवणूक! आणि आश्‍चर्य म्हणजे हे ढोंग स्त्रीला भूषणावह असणारी मूलगामी तत्त्व निश्‍चित करते. लज्जा स्त्रीचं आभूषण आहे. पहिल्यांदा हे निश्‍चित झाल्यावर मग स्त्रीनं आपले रूप, गुण व बुद्धी यांविषयी लाज बाळगावी, ही अपेक्षा केली जाते. जर तसं नाही केलं तर तिला डाकिण ठरवलं जाईल. विनय, संयम, तप, समाधान, क्षमा, वीरता, धैर्य, गंभीरता, सहिष्णुता, स्वच्छता, कष्टाळूपणा, कुंटुब वत्सलता, भक्ती, साधेपणा, सतीत्व, पतिव्रत्य, कर्मबंधन हे स्त्रीला ‘स्त्री’ बनवते. हेच धर्माचं सांगणं आहे. हे झुगारून देण्याचा प्रयत्न ‘नारी जागृति’ नाही, ‘नारीमरण’ म्हटलं जाऊ शकतं. स्त्रीची दूषणं कुठली-कलह, निंदा, हिंसा, ईर्ष्या, फूट, विलासिता, हौस-मौज, वायफळ खर्चिकपणा, गर्व, देखावा, वाचाळता, व्यभिचार, हास्य-विनोद आणि म्हणून ती नरकाचं द्वार आहे. त्यासाठी‘मार-झोडी’च्या लायकीची आहे.


‘नारी सुभाऊ सत्य सब कहहिं, अवगुण आठ सदा उर रहहिं ।’ – तुलसीदास


(सर्वांचे म्हणणे बरोबर आहे की, नारीच्या मनात सतत आठ अवगुण असतात)
स्वभावतःच अपवित्र-अर्थात स्त्री जात्याच अपवित्र असते. कितीही चांगली असली तरी तिच्यात आठ अवगुण हे असणारच, असे तुलसीदास म्हणतात. ज्यांच्यासाठी सगळं जग ‘सियाराममय’ आहे. (सियाराममय सब जग जानी) तरी ही स्त्री अपवित्र असते. तर मी पण अशीच स्त्री आहे आठ अवगुणी! पण मी तुलसीदासांवर नाराज नाहीये, का माहीत आहे? कारण एकट्याचा आवाज प्रातिनिधिक नाही मानला जाऊ शकत. तुलसीदास एकटे नाहीयेत. त्यांच्या तोंडून सगळा पितृसत्ताक समाज बोलत आहे. कबीर ही असंच काहीसं म्हणून जातात –


नारी की झाईं पडत अंधा होत भुजंग
कबीरा तिनकी कवन गति जो नित नारी संग-


(स्त्रीची सावली पडल्यावर भुजंग आंधळा होतो, मग त्यांची काय गत जे नित्य स्त्रीसोबत असतात. असे कबीर म्हणतो.)
तर आता कबीर बाबू ईश्‍वर-भेटीसाठी तुम्हाला तीच स्त्री बनण्याची आस का लागली होती?


तन रत कीन्हीं मन रत कीन्हीं
पंचतत बाराती रामदेव मोरे पाहुन
आये मैं यौवन मद्माती-


सीतेनं लक्ष्मणरेषा ओलांडली, लक्ष्मणरेषा म्हणजे मर्यादा. ही मर्यादा कोण ठरवणार? पुरुष? स्त्रियांनी ती मर्यादा ओलांडता कामा नये, त्यांनी स्वतः काही निर्णय घेऊ नयेत. पतिव्रतेला सृष्टितील सर्वात शक्तीशाली स्त्री म्हणून गौरवलं गेलं. पतिव्रता शांडिलीसारखी असते. कुष्ठरोगी पतीचं वेश्येवर मन बसलं, तर ती त्याचं वेश्येशी मिलन घडवून आणते आणि आपलं शास्त्र ह्याला धार्मिक कार्य समजतं.


तुलसीदांनी लिहिलंय –
बुद्धी रोग सब जडमति हीना
अंध बधिर क्रोधी अति दीना
ऐस हूँ पति कर अपमाना
नारि पावे दुरव यमपुर नाना.


(पती किती दुर्गुणी असला तरी त्याचा अपमान करणारी स्त्री यमयातना भोगेल.)
वाईटातल्या वाईट-दुर्गुणी पतीचा अपमान पतिव्रतेनं करता कामा नये. डॉ. बाबासाहेब म्हणतात, ‘नवरा दारू पिऊन आला तर त्याला जेवायला देऊ नका.’ आणि सिनेमा दाखवतो, की अशा पतीचे स्वागत करून त्याचे जोडे उतरून त्याला पांघरून घाला. त्याच्या शिव्या खा आणि भारतीय स्त्री परंपरेच्या ‘आदर्श फ्रेम’मध्ये शोभायमान व्हा.
असमानतेवर बेतलेल्या या नैतीक (?) रचनेच्या आधारावर होणार स्त्रियांची अग्निपरीक्षा! या संदर्भात राम व बेबी कांबळे यांच्या आत्मकथेत वर्णिलेला ‘पति’ यामध्ये काहीच फरक नाही. ‘मनुस्मृती’ ग्रंथ म्हणतो-पत्नी आपल्या इच्छेने सोडून गेल्यानंतर परत आली तर तिला पत्नी मानू नये. तिला मृत घोषित करून तिचं श्राद्ध केलं जावं; परंतु पती कुमार्गी असला तरीही त्याचा त्याग करू नये. त्याला समजवावे-मंदोदरीसारखं! सगळी मूल्यं स्त्रीच्या ठायी असावी. कारण ती संस्कृतीची रक्षक असते. स्त्रीवर समाधान, क्षमा, संयम, त्याग, समर्पण हे नैतीक दबावाखाली लादलं जातं, जेणेकरून पुरुषसत्तेची अराजकता, मनमानी जशीच्या तशी कायम राहील. आत्मसंयम म्हणजे सामाजिक दास्यातून रचलेल्या व्यवस्थेपुढे संपूर्ण समर्पण! एंगेल्स म्हणतात, कुटुंब संस्थेच्या स्थापनेचा अर्थ, स्त्रीलिंगासाठी सतीत्वाची कल्पना ज्याने स्त्रियांना वैयक्तिक संपत्तीच्या स्वरुपात बदलून टाकले. ताराबाई शिंदेनी लिहिले, की त्या काळातील ऋषींबाबत काय बोलावं-कोणी हरिणाच्या, कोणी गाईच्या, कोणी पक्षिणीच्या पोटातून जन्माला येतो, असं म्हणणार्‍यांचं पुढे ‘वेदवाक्य’ ठरलं? आणि ते भोगायला लागलं स्त्रियांना! सभांमध्ये लांबच लांब भाषणं ठोकून मिशांवर पीळ देत परतणं हे यांचं शौर्य! शास्त्रकारांची वक्रदृष्टी स्त्रियांवरच का? सतीत्वाच्या कल्पनेप्रमाणेच चारित्र्याच्या कल्पनेनेही स्त्रियांचं जीवन दुःखाच्या खाईत लोटलं, बदफैली तर पत्नीच असतात. पती म्हणजे परमेश्‍वर! स्त्रिया-पुरुषांना आपल्या मोहजालात ओढतात. मनू तर असंही म्हणतो- स्त्रिया पुरुषांचं रंग, रुप, वय या कशाचाही विचार न करता जो पुरुष लाभेल त्याच्याशी भोगरत होतात. सृष्टीनिर्मात्यानं काम, क्रोध, बेईमानी, चरित्रहीनता सगळे दुर्गुण स्त्रीत ठासून भरून ठेवलेत. मनू फार नुकसान केलंस आमचं, अजूनही करत आहेस. जयपूरच्या स्थानिक न्यायलयात तुझी मूर्ति न्यायाच्या कोणत्या व्याख्येसाठी लावलीय कळत नाही! ‘मनुस्मृती’चं दहन केलं गेलं, पण मनू तर पितृसत्ताक सत्तेचं बीजतत्त्व आहे, चिरंजीवी ज्याला आग लागू शकत नाही, न वारा उडवून देऊ शकतो.
बलात्कार पुरुष करतो आणि चारित्रहीन बाई ठरते. तिहार जेलमधील बलात्कारी पुरुषांच्या मुलाखतीवरून कळून येतं, की त्यांना आपल्या कृत्याचा जराही पश्‍चाताप नाहीये.  उलट प्रश्‍नरुपी आरोप होतो, की असले कपडे का घातले? निर्जन जागी कशाला गेली? आताच फेसबुकवर एका मित्राची पोस्ट वाचली, ते माझी स्तुती याकरता करत होते, की मी कट्टर हिंदुत्वाचा विरोध केला. पण तेच आपल्या पोस्टमध्ये लिहितात-‘रहेगी तुम नकाब में, तो मर्द रहेगा औकात में।’ वा रे पुरुषांना मर्यादेत ठेवण्यासाठी बाईच्या कपड्यांवर नियंत्रण! चार वर्षाच्या मुलीवरही बलात्कार होतो, इतकंच काय-जयपूरच्या जवळ कबर खोदून बाईला बाहेर काढून बलात्कार केला गेला. नागराज मंजुळे म्हणतात, की लहानपणी आम्हीही नेहमी पाहत आलोय- खिडकीतून दिसणारं हॉस्पिटलच्या शवागारातील दृश्य!
गीतेत म्हटलंय, की शरीर मिथ्या व नश्‍वर आहे, आत्मा अमर आहे. मग आता सांगा, बलात्कार शरीरावर झाला म्हणायचा, की आत्म्यावर? मूसूवी यहूदी शरीअत यशबिन लिहितात- ‘बाईमुळेच गुन्हा सुरू होतो आणि आम्ही मरतो. अंथेन्स आधुनिक लोकशाही आणि कलांचं उद्भव स्थान आहे. एकेकाळी तिथे पत्नी आजारी असेल किंवा बाळंतपणानंतर सुधारत असेल, त्या काळात पतीला त्याची प्रेमिका किंवा वेश्या शय्यासोबत करत असे व त्या दरम्यान पत्नीला एखाद्या खोलीत कोंडून ठेवले जात असे. कायद्याने कठोर मनाई केली जायची व विशेष मॅजिस्ट्रेट तिच्यावर नजर ठेवायचे. तामिळनाडूमध्ये कट्टरपंथी ब्राह्मण दलित स्त्रीशी संग केल्यावर आपलं जानवं तोडून टाकून पवित्र स्नान करून नवीन जानवं घालून पुन्हा ब्राम्हण होत असे. दलित स्त्रियांवर बलात्कार म्हणजे यौनहिंसेंच्या माध्यमातून केलेलं प्रभुत्वाचं प्रदर्शन असतं. असं असूनही न्यायाधीश म्हणतात, ‘ब्राह्मण दलित महिलेवर बलात्कार करत नाही.’ ब्राह्मणा (पंडित)चा धर्मभांड्यांच्या बाबतीत भेद करतो, शय्येच्या बाबतीत नाही. मनूनं म्हटलंय -मृत बालकाला जन्म देणार्‍या महिलेला दहाव्या वर्षी व आई बनू न शकणारीला अकराव्या वर्षात सोडून द्यावं; परंतु तिला स्वतंत्र न ठेवता घरात दासीसारखं ठेवावं. तिनं पळून जाण्याचा प्रयत्न केला तर दोरीनं बांधून ठेवावं. हे सगळं भूतकाळात जमा झालंय, असं समजू नये. सिनेमा व टी.व्ही. बराच काळापर्यंत हीच प्रतिमा जपत आणि पुष्ट करीत आला आहे, की घराबाहेर काम करणार्‍या बायका-मुली पुरुषांना आपल्या मोहजालात ओढतात. मार्क्सनं म्हटलंय, स्त्रीचे स्वाभाविक गुण व लादलेली नैतिकता तिला दासी बनवण्यास कारणीभूत ठरते. मार्क्स आयुष्यभर पितृसत्तेच्या श्रेष्ठत्वातून उद्भवणार्‍या दास्यत्व व शोषणाचा विरोध करत राहिला. मार्क्सवादी तत्त्वज्ञानानेच ‘अगस्त बैबल’कडून ‘स्त्री आणि समाजवाद’ पुस्तक लिहून घेतले. फ्रान्सच्या क्रांतीनंतर महिला संघटना निर्दयपणे दाबून टाकण्यात आल्या. राजकारणात भाग घेणार्‍या महिलांना देशातून बाहेर काढण्यास भाग पाडलं. (जलावतनी) सन 1970 मध्ये जेव्हा फ्रान्सच्या समाजवादी व मार्क्सवादी महिलांच्या एका गटाने युनिव्हर्सिटीच्या विरोधात आंदोलन केलं, तेव्हा त्याबाबत अत्यंत तीक्ष्ण व कटू प्रतिक्रिया रॅडिकल पुरुषांची होती, जे स्वतः फ्रेंच सरकारच्या विरोधात लढत होते.
सन 1985 मध्ये रख्माबाई केसच्या विरोधात लढणार्‍यांमध्ये बाळ गंगाधर टिळकांसारखेही होते. हिंदू कोड बिलाचा विरोध करणार्‍यांमध्ये त्या काळातील प्रखर नेतेही होते. रख्माबाईच्या बाजूने दिलेल्या निकालात मुख्य न्यायाधीशांसमवेत दोन जणांच्या बेंचने बदल केला. रख्माबाईंनी आपल्या मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय-‘आम्ही कोर्टाच्या निकालाने इतकं आश्‍चर्यचकित नाही झालो. आमच्यासाठी आश्‍चर्याची गोष्ट ही आहे, की प्रबळ हिंदू कायदे, बलाढ्य सरकार जवळपास तेरा कोटी पुरुष आणि तेहतीस कोटी देव-देवता या सर्वांनी रख्माबाईंना नेस्तनाबूत करण्यासाठी कट रचला व रख्माबाईसारख्या असहाय्य, सामान्य महिलेनं विरोध केला. रख्माबाईंच्या या विरोधी आवाजाने बायकांचं जग बदलून टाकलं. ‘सीमंतनी उपदेश’ लिहिणारी अज्ञात स्त्री लिहिते- ‘अर्धांगिनी- यातलं अर्ध अंग दुःखात पिचत राहील आणि अर्ध मौज-मजा करेल.’ स्त्रियांसाठी पतिव्रता धर्म व पुरुषांसाठी कोकशास्त्र. हिंदू देवदेवतांशी लग्न लावलं जातं स्त्रियांचं. यालाच कुराण शरीफमध्ये ‘हके बख्शाई’ म्हटलं जातं. मला जाणून घ्यावं वाटतं, की ज्या मंदिर व मस्जिदींचे दरवाजे स्त्रियांसाठी बंद असतात, त्या देवता व धर्मग्रंथांशी स्त्रियांची लग्नगाठ घालताना या लोकांना लाज-शरम वाटत नाही!
रूशन्दरी देवी यांचं ‘आमार जीवन’ सन 1876 मध्ये येतं, ताराबाई शिंदे यांचं ‘स्त्री-पुरुष तुलना’ सन 1882 मध्ये व रमाबाईंचं ‘द हाई कास्ट हिंदू विमेन’ सन 1886 मध्ये प्रकाशित होतं. त्या काळापासून स्त्रिया त्यांच्या प्रश्‍नांबाबत, समस्यांबाबत जागृत होत्या व त्यावर विचार करत होत्या. ‘अशी कोणती बाब आहे, जी विधवेला अपवित्र व सतीला शुभ बनवते?’ मीरा नंदा यांच्या या प्रश्‍नाच्या संदर्भात स्त्रियांची स्थिती समजून घेता येईल. हिंदू धर्मात नवर्‍याच्या मृत्यूला पत्नीला जबाबदार मानलं जातं. याला पत्नीच्या कर्माचा भोग मानतात. सती होऊन ती आपल्या दुष्कर्मांचे प्रायश्‍चित घेणे अशी समजूत असे. गांधीजी म्हणतात, ‘अनिष्ट आणि दूषणावह प्रथांच्या बळावर मूर्खतेला मूर्ख व अयोग्यतेला अयोग्य पुरुषही स्त्रियांवर प्रभुत्व गाजवत आले आहेत.’ पंडित नेहरुंनी लिहिलंय- ‘पुरुषांनी निर्माण केलेले रितीरिवाज व कायद्यातील जुलमांतून स्त्रीने स्वतःची सोडवणूक करून घ्यायला हवी.’ अंध संस्कारांचे कारखाने बनलेल्या बाहुल्यांशी खेळण्याचे भयानक दृश्य ज्यांनी पाहिलं, जाणलं तोच त्याच्याविरोधात उभा राहू शकतो. द्रौपदी, मीरा, ललद्द, अक्क-महादेवी, शकुंतला, सावित्रीबाई, रख्माबाई, रमाबाई, गांधी, नेहरु, ई.व्ही. आर. पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मार्क्स, स्टुअर्ट मिल, सिमोन, जाहिदा, हीना, तहमीना दुर्रानी, तस्लिमा हे सारे एक चांगलं जग निर्माण करण्यासाठी लढा देणारे योद्धे होते. दुसरीकडे, किशोरीदास वाजपेयींसारखे भाषाशास्त्री असं म्हणतात, ‘उच्च शिक्षण स्त्रियांसाठी हानिकारक आहे. मुलींना विज्ञान नाही. गृहविज्ञान शिकवलं पाहिजे. आजचं शिक्षण स्त्रियांमधील स्वाभाविक मातृत्व, सतीत्व, सुगृहिणी, शिष्टाचार स्त्रियोचित हार्दिक सौंदर्य-माधुर्य हे गुण नष्ट करीत आहे. सौंदर्य आणि माधुर्य ही सनातनी स्त्रीची सर्वापरी गुणवत्ता मानली गेली आहे. मुलांबरोबर शिकल्यावर मुली आपलं चारित्र्य-शील पवित्र राखू शकणार नाहीत.’ प्रश्‍न हा आहे, की चारित्र्य हा शब्द पुरुषांबरोबर का जोडला जात नाही? ते बलात्कार करूनही पवित्र आणि केवळ संशयावरून स्त्रीची हत्या किंवा ती आत्महत्या करते. जाहिदानं सांगितलंय, ‘एका पतीनं पत्नीचा यासाठी खून केला, की तिनं त्याच्याशी स्वप्नात बेईमानी केली.’ एखादी स्त्री तुमच्या ताब्यात, हुकुमात राहत नसेल तर तिचं चारित्र्यहनन करा, पतीत बायांबाबत काय बोलायचं. पतीत कोण? हे ठरवणारे लोक याबाबत मौन राखतात.
या देशाचा गौरव म्हणजे सीता आणि पद्मिनी. त्यांनी तुमची मान गर्वाने उंचावली व जगण्याची इच्छा करणार्‍यांनी तुम्हाला शरमेने मान खाली घालायला लावली. एक साधा-सरळ प्रश्‍न विचारू- सीतेला ज्या अग्नीनं जाळलं नाही, त्यानं पद्मिनीला जाळून कसं टाकलं? आणि मग दोन्ही खरं कसं? बलात्कार पीडितेचं नाव लपवलं जातं, ती समाजात तोंड दाखवायला लायक रहात नाही. सिनेमातही नायिका म्हणते- मी तुझ्यालायक नाही राहिले! कुणाला तोंड दाखवण्यालायक नाही राहिले. याचा अर्थ काय? शारीरिक शुचिता म्हणजे नेमकं काय? सन 1979 मध्ये पाकिस्तानमध्ये कायदा झाला, की शिक्षा बलात्कारित स्त्रीलाही व्हावी. यानुसार आंधळ्या साफिया बीबीच्या तोंडावर थापडा मारण्यात आल्या व वीस फटके मारण्यात आले. इस्लामी ऑर्डनसने पुरुषांना उभं करून व स्त्रियांना खाली बसवून फटके मारावेत, असा कायदा पास केला. झिया उल हक यांना इस्लाम धर्माचे रक्षक मानले गेले. हे सन 1977 मध्ये ‘जिना मेड पाकिस्तान’ला निरोप दिला गेला. सन 1944 मध्ये जिनांनी आपल्या एका भाषणात म्हटलं होतं, माणुसकीच्या विरोधातला हा एक गुन्हा आहे, की आपल्या स्त्रियांनी घराच्या चार भिंतींमध्ये कैद्यासारखं जीवन जगावं, आपल्या बायका नाईलाजानं ज्या प्रकारचं लज्जास्पद जीवन जगत आहेत, ते कोणत्याही दृष्टीनं उचित नाही. तुम्ही जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना कॉम्रडसारखं आपल्याबरोबर वावरू द्या; परंतु स्वातंत्र्याच्या जिनांच्या भाषणासंदर्भात जाहिदा हीना लिहितात- ‘त्यात पाकिस्तानमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्‍चन यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. दगड-विटांनी बनलेल्या मंदिर-मस्जिदींचा उल्लेख आहे. पण स्त्रियांसाठी एकही शब्द नाहीये.’ बस हेच आहे स्त्रियांचं स्थान. ज्ञान व राष्ट्रवादाच्या राजकारणामध्ये भारतात असो किंवा पाकिस्तानात, रख्माबाईसारख्या स्त्रिया कुठं आहेत?
बांगड्या भरून बसलाय काय? पुरुषासारखा पुरुष असून रडतोस काय? बाईच्या जातीला हे शोभतं का? असं म्हणणही भेदभाव आणि अन्यायकारक आहे. तरीही आम्ही दैनंदिन जीवनात याचा वापर करतो. मुलगी बिघडली याचा अर्थ तोच होत नाही, जो मुलगा बिघडला याचा होतो.
मीरा गाते –


म्हरो मण-मगण स्याम लोक कह्या भटकी
मीरा गिरधर हाथ बिकाणी लोक कह्या बिगडी
काजल टीकी राणा त्यागे भगवी चादर पहर


(माझं मन कृष्णात रमलं-लोकं म्हणाले ही वाट चुकली, मी त्याला वाहून घेतलं- लोक म्हणाले ही बिघडली. काजळ, टीका सोडले, भक्तिण झाली.)
‘वीर भोग्या वसुंधरा’- आता समजतंय, की स्त्रीला धरणी का म्हटलं जातं. असल्या या वीरांच्या विरोधात युद्धाचा शंखनाद मीरेने केला होता. सहजी कळून येईल, की एक स्त्री कोणत्या दुर्गम उंचीवर पोहोचल्यावर म्हणू शकते –


राणाजी म्हाने बदनामी लगे मीठी
कोई निंदो कोई बिंदो चाल चलूंगी अनूठी
गिरधर गास्या और सती नही होर्‍यां


(राणाजी कितीही बदनामी करा, मला ती गोड वाटेल, कोणी निंदा वा वंदा मी अनोख्या वाटेवरच चालेन, कृष्णाचे गायन करत राहीन, सती नाही जाणार.)
गल्लीत जातीच्या व घरात पितृसत्ताक वर्चस्वाच्या समन्वयातून ‘दलित स्त्रीवादा’चा जन्म झाला. गोपाळ गुरू आणि सुंदर रुक्काई यांच्यातील संवादाचा एक भाग म्हणजे – दलित आंदोलनात पितृसत्तांचा विद्रूप चेहरा व स्त्री आंदोलनातील जातीभेदाचे विकृत रूप पाहून दलित स्त्रियांनी आपली वेगळी संघटना सुरू केली.’ दलित आणि स्त्री या दोन्ही अभिशापाच्या संघर्षयात्री आहेत. त्यांचा आपल्या साथीदारांना प्रश्‍न आहे –


दामन पे कोई छींट न खंजर पर कोई दाग
तुम कल करे हो कि करामात करे हो।


(कपड्यावर शिंतोडा नाही, न खंजरवर डाग, तू खून करतोयस की करामत!)
एकीकडे सांस्कृतिक हुकुमशाहीचा कपटी धारू होतो नितळ कांति, रुप-रंग आणि गोर्‍या कातडीबाबत आणि दुसरीकडे, मार्केटिंग विशेषज्ञांची मागणी-उन्मुक्त भोग-उपभोग नारीमुक्तीचे पर्याय व्हावेत. दिल्लीच्या व्यापार मेळाव्यात काम करण्यासाठी निवडलेल्या मुलींना मोबदला, त्या जेवढं शरीर प्रदर्शनासाठी तयार असतील त्या आधारावर दिला गेला. तीनशे रुपये साडी नेसणारीला व तीन हजार मिनीस्कर्ट घालणारीला. पुराणापासून आजच्या बाजारापर्यंत स्त्रियांसाठी ज्या निती ठरल्या, त्या छळ-कपटाच्याच आहेत. शरशय्येवर पडलेले भीष्म पितामह आठवा. महाभारतातील ‘शांतिपर्वात’ ते कौरव-पांडवांना जेव्हा राजनीतिचे धडे देत होते, तेव्हा द्रौपदी हसली. स्त्रियांचं असं हसणं रहस्यमय असतं. ते समजून घ्यायला हवं. विनोद पदरज यांच्या प्रस्तुत ओळींसह –


उसका हँसना युद्ध
पूरी सदी के विरुद्ध


(मुळ लेख हिंदी डॉ. शशिकला राय. लेखिका ज्येष्ठ विचारवंत असून सा.फु.वि.पु. येथे हिंदी विषयाच्या प्राध्यापक आहेत.)
– मराठी अनुवाद – डॉ. जया परांजपे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.