कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र? – बी.व्ही. जोंधळे

कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र? – बी.व्ही. जोंधळे

1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्या ऐतिहासिक घटनेला 1 मे 2023 रोजी 63 वर्षे पूर्ण झाली. नेहमीप्रमाणे यंदा 1 मे रोजी महाराष्ट्रदिनही साजरा झाला. मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात यावे म्हणून 1955 ते 1960 च्या दरम्यान महाराष्ट्रात मराठी भाषिकांनी मोठी चळवळ केली होती. लाठ्या-काठ्या खाल्ल्या होत्या. गोळीबार झेलला होता. 105 जणांना गोळीबारात हौतात्म्य पत्करावे लागले होते. एस.एम. जोशी, कॉ. डांगे, आचार्य अत्रे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, अ‍ॅड. बी.सी. कांबळे, दादासाहेब रुपवते अशांसारख्या किती तरी दिग्गज नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे झुंजार नेतृत्व केले. शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे, शाहीर गवाणकर, शाहीर आत्माराम साळवे, जंगमस्वामी अशांसारख्या किती तरी शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या वीरश्रीयुक्त शाहिरीने जीव ओतला. अखेर अपार त्याग व झुंजार लढ्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश दिल्लीकडून मान्य करवून घेऊन वाजत-गाजत आणला. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बोलताना यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, महाराष्ट्र हे कुणा एका जाती-धर्माचे राज्य न होता व महाराष्ट्र राज्याचा समतोल विकास साधण्यात येईल. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकाससही यशवंतराव चव्हाणांनी प्राधान्य दिले होते. शेती, औद्योगिक विकास, सहकार चळवळीचा पायाही त्यांनी घातला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्वच काँगे्रसी आणि विरोधी पक्षांचे नेते सुसंस्कृत-सभ्य नि शालीन होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते एकमेकांवर कठोर टीका करीत असत. पण त्यांनी टीकेची पातळी कधीही घसरू दिली नाही. मुद्यांची, प्रश्‍नांची, लोकहिताची त्यांची भाषा होती. सर्वांनीच सुखी-संपन्न महाराष्ट्र राज्याचे स्वप्न पाहिले होते. प्रश्‍न असा आहे, की महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन आता 63 वर्षे उलटून गेल्यावर महाराष्ट्र राज्य खरेच सुखी-संपन्न नि सुसंस्कृत झाले आहे काय? तर दुर्दैवाने नाही हेच त्याचे उत्तर आहे.

महाराष्ट्र राज्यात आज काय चालू आहे? तर सर्वपक्षीय नेते सभ्यता खुंटीला टांगून अत्यंत असभ्य-असंस्कृत-शिवराळ नि गलीच्छ भाषेत एकमेकांवर किळसवाणी टीका-टीपणी करीत आहेत. नेते म्हणविणार्‍यांची भाषा इतकी लाज आणणारी आहे, की ती ऐकून सभ्य माणसांची मान शरमेने खाली गेल्यावाचून राहत नाही. पण नेते म्हणविणार्‍यांना त्याचे काहीच वाटत नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जे नेते लढले, झुंजले ते मूल्यांचे मूल्याधिष्ठीत राजकारण करणारे होते. आता कट-कारस्थान, कपटनीतीचे असहिष्णू, निर्दय, कुटील राजकारण करणारे नेते उदयास आले आहेत. राजकारणाचा स्तर कमालीचा खालावत चालला आहे आणि विकासाचे काय? तर त्या आघाडीवरही सारी बोंबाबोंब दिसत आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शेतकरी, कामगारांनी जीवाची बाजी लावून नेटाने चालविली. पण तेच आज देशोधडीला लागले आहेत. मुंबईचा विकास करण्यात ज्या कामगारांनी वाटा उचलला, मुंबईस खरे वैभव मिळवून दिले तो मुंबईतील कामगार कापड गिरण्या नष्ट झाल्यामुळे भिकेला लागला. भांडवलदारांची चंगळ झाली आणि कामगारांच्या जीवनाची होळी पाहायला मिळाली. शेतकर्‍यांचे हाल तर विचारता येत नाहीत. रयतेचे राज्य आणणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्यात शेतकरी रोज आत्महत्या करीत आहेत. मुंबई-पुणे-नाशिक व थोडाफार छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) व नागपूर परिसराचा औद्योगिक विकास सोडला, तर उभा महाराष्ट्र आजही औद्योगिक विकासापासून वंचितच आहे. भ्रष्टाचाराला ऊत आला आहे. सहकार नि बँकिंग क्षेत्र भ्रष्टाचाराने पोखरून निघाले आहे. राज्यात एकेकाळी शेतकर्‍यांचे, कामगारांचे, स्त्रीमुक्तीचे, युवकांचे, विद्यार्थ्यांचे सर्वसमावेशक लढे व्हायचे. आता प्रत्येक जातीचे लढे होतात. जातीचे मोर्चे निघतात, जातीची संमेलने भरतात, जातीच्या संस्था उदयास येतात. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जाती नष्ट न होता जाती धष्टपुष्ट मात्र होत चाललेल्या दिसतात. म. जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री मुक्तीसाठी, त्यांच्या माना-सन्मानासाठी अपार खस्ता खाल्ल्या. पण त्यांच्या महाराष्ट्रात स्त्रियांवर आजही अमानुष अत्याचार झालेले पहावयास मिळतात. दलितांचा तर कुणी वालीच राहिला नाही. खेडोपाडी आजही ते विपन्नावस्थेतच जगतात आणि जात दांडग्याच्या अत्याचाराला बळी पडतात. आदिवासी-भटक्या विमुक्तांच्या दारी, डोंगर-दर्‍यांत, माळरानात तर अजूनही स्वातंत्र्याचा सूर्यच उगवला नाही आणि मराठी भाषेचे काय सांगावे? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर मिळतच नाही. पण मराठी भाषिकांच्या मराठी राज्यातच मराठी शाळा धडाधड बंद होताना दिसतात. महाराष्ट्र राज्याचे गत 62 वर्षीय राजकीय-सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक-भाषिक-सांस्कृतिक चित्र हे असे विदारक आहे. ते केव्हा बदलणार? हा खरा प्रश्‍न आहे. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत ऐकायला गोड वाटते. पण महाराष्ट्राची आज गर्जण्यासारखी स्थिती आहे, की अगतिकपणे कपाळावर हात मारून घेण्यासारखी अवस्था आहे, याचा राज्यकर्त्यांनी विचार केलेला बरा. दुसरे काय? 

Related Articles

1 Comment

Avarage Rating:
  • 0 / 10
  • डॉ.धोंडोपंत मानवतकर , May 4, 2023 @ 4:25 pm

    सन्माननीय बी.व्ही. जोंधळे सरांनी आपल्या लेखातून महाराष्ट्रातील भूतकालीन आणि वर्तमानकालीन घडामोडींचे वास्तव उजागर केले आहे. अभिनंदन सर. 💐

Leave a Reply

Your email address will not be published.