सब कुछ शरद पवार! – बी.व्ही. जोंधळे

सब कुछ शरद पवार! – बी.व्ही. जोंधळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजीनामा नाट्य गत आठवड्यात उभ्या महाराष्ट्राने अनुभवले. मध्यंतरी त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात दोन राजकीश भूकंप होणार असे एक विधान केले होते. शरद पवारांची उद्धव ठाकरे व खा. संजय राऊत यांनी भेट घेतली होती. या भेटीवर आधारित ‘सामना’मधून लेख लिहिताना संजय राऊतांनी म्हटले होते, ज्या 16 आमदारांच्या पात्रतेचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट आहे त्याचा निकाल शिंदे-फडणवीस सरकारच्या दृष्टीने जर प्रतिकूल लागला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडून सरकार स्थिर ठेवण्याचे प्रयत्न भाजपकडून पडद्याआड चालू आहेत. त्यांनी असेही म्हटले होते, की खुद्द शरद पवार असे सांगतात, की आमच्यातून काहीजण भाजपशी जुळवून घ्यावे या मताचे आहेत. अर्थात, भाजपशी जुळवून घेऊ पाहणारे हे आमदार मनापासून राष्ट्रवादीतून बाहेर पडावे या मताचे नाहीत. पण ईडीच्या भीतीने ते बाहेर पडू इच्छितात. ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जावे. पण पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपशी जुळवून घेणार नाही. याच दरम्यान पक्षात भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे, असेही एक विधान शरद पवारांनी करूनच ठेवले होते आणि या सगळ्या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या सुधारित राजाकीय आत्मकथनाच्या प्रकाशन समारंभात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत आहोत, अशी घोषणा केली व राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात भूकंप झाला. नेते, कार्यकर्ते पवारांच्या घोषणेमुळे आश्‍चर्यचकीत झाले. पवारांनी राजीनामा देऊ नये, तो त्यांनी परत घ्यावा यासाठी आर्जवे-विनंती केली जाऊ लागली. तरीही पवार राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम होते. पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी त्यांनी एक समितीही गठीत केली. पण कार्यकर्त्यांचा वाढता दबाव लक्षात घेऊन शरद पवारांनी राजीनामा परत घेण्याचेही संकेत दिले. कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर करणार नाही, असे ते म्हणाले. अर्थात, त्यांचे राजीनामा नाट्य पवार कुटुंबियांना माहीत होते. म्हणूनच तर पवारांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई, कन्या सुप्रिया सुळे, अजितदादा पवार, ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्र्रमात शरद पवार राजीनाम्याची घोषणा करीत असताना शांत बसून होते. फक्त राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते अनभिज्ञ होते. देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांचे व राष्ट्रवादीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचे राजीनामा न देण्याचे मत मान्य करून शरद पवारांनी आपला राजीनामा परत घेतला व अखेर या राजीनामा नाट्यावर पडदा पडला.
शरद पवारांचे हे राजीनामा नाट्य पाहता त्यांना हेच सिद्ध करावयाचे होते, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे ‘सब कुछ शरद पवार’ असून इथे अन्य कुणाला आपणापेक्षा वरचे स्थान नाही. शरद पवारांची ही राजकीय शैली अर्थातच कमालीची यशस्वी झाली. कारण ज्या कुणाला ईडीच्या भीतीमुळे भाजपशी जुळवून घ्यायचे आहे त्यांनी तसे जरूर करावे. पण पक्ष माझ्या बरोबर आहे, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, हे शरद पवारांनी सिद्ध केले व पक्ष सोडू म्हणणारांना उघडे पाडले. परिणामी अजितदादा पवारांनाही आपण ‘अखेर पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहू’ अशी घोषणा करावी लागली अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडू पाहणार्‍यांना त्यांनी जशी वेसण घातली, तसेच महाविकास आघाडीत वरचढ होऊ पाहणार्‍या उद्धव ठाकरेंचेही महत्त्व कमी करण्याचा डाव खेळला तो वेगळाच. त्यांनी आपल्या सुधारित ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मवृत्तात उद्धव ठाकरेंविषयी लिहिताना म्हटले, उद्धव ठाकरेंनी संघर्ष न करताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, हे बरोबर नव्हते. तसेच उद्धव ठाकरे हे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात फक्त दोन वेळा मंत्रालयात गेले, हेही पटण्यासारखे नव्हते.
अर्थात, शरद पवारांच्या या प्रतिपादनाचा प्रतिवाद करताना उद्धव ठाकरेंनी म्हटले, ‘कोरोना काळात आपण कसे काम केले, हे उभा महाराष्ट्र जाणतो, त्यासाठी आपणाला पुस्तक लिहिण्याची गरज नाही.’ ते कसेही असले, तर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान करून ठाकरेंनाही कह्यात ठेवण्याचा मनसुबा जाहीर केला, हे उघड आहे. याचा अर्थ असा, की महाविकास आघाडीचे आपणच शिल्पकार नेते आहोत, हेच शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर भाष्य करून अधोरेखित करून ठेवले. शरद पवारांचे हे राजीनामा नाट्य बारकाईने तपासले, तर एक निष्कर्ष असा निघतो, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी फूट पडू पाहत होती, ती शरद पवारांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारून तूर्त रोखून धरली. पक्ष सोडणार्‍यांनी पक्ष सोडायचा असेल व भाजपच्या वळचणीला जाऊन उभे रहायचे असेल, तर खुशाल त्यांनी तसे करावे. पण उभा पक्ष आपल्यासोबत आहे, हेच शरद पवारांनी दाखवून दिले. इतःपर आज जरी राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष फुटीपासून बचावला असला, तरी भविष्यात राष्ट्रवादीचे काहीजण भाजपशी जुळवूनच घेणार नाहीत, असे काही नाही. ते जुळवून घेऊ शकतात. पण असे जरी घडले, तरी पक्ष शरद पवारांच्या सोबतच राहील, हे उघड आहे. कारण राष्ट्रवादी म्हणजे ‘सब कुछ शरद पवार’ अशीच आजची त्यांच्या राजकीय पक्षाची स्थिती आहे. 

– बी.व्ही. जोंधळे (लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.