काश्मीर फाइल्स चित्रपट की धर्मास्त्र?

काश्मीर फाइल्स चित्रपट की धर्मास्त्र?

प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा हिंदी चित्रपट प्रचंड गाजणार, हे या चित्रपटाच्या निर्मितीवेळीच सिद्ध झाले होते. ते खरेही ठरले. गेल्या काही वर्षांत गाजणारे चित्रपट आणि त्यांच्या विषयावर नजर टाकल्यास एक लक्षात येईल, की इतिहासात राष्ट्रवादी, धर्मवादी ठरलेल्या अनेक विषयांवर वा व्यक्तींवर चित्रपट येत आहेत. लोकांना इतिहास पाहायला आणि त्यात रमायला आवडते. त्यांना तेथेच अधिक काळ राहता येईल यासाठी प्रयत्न करणार्‍यांमध्ये चित्रपटही महत्त्वाची भूमिका बजावतात. आपली जात, आपला नेता इतिहासात महानायक कसा होता, याचा आनंद घेता येतो. प्रत्येक जाती-धर्मात आता इतिहासामध्ये डोकावण्याची चढाओढ सुरू झाली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ तर पृथ्वीवरील भूदेवाचा विषय. म्हणजे काश्मीर पंडितांचा विषय.

हिंदुत्ववाद टिकवणार्‍यांचा आणि त्याचा पुरस्कार करणार्‍यांच्या विषय. हिंदुत्वाची लाट सुरू असल्याच्या काळात शहाणा-व्यावसायिक दिग्दर्शक अशा विषयांना हात न घातल्यास नवलं! तसा त्याने तो घातला आणि चित्रपट प्रदर्शित करणार्‍या चित्रगृहांना जणू एखाद्या प्रचार सभेचे, निषेध सभेचे स्वरूप प्राप्त झाले. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी चित्रपट पाहून कलाकारांचे कौतुक केले होते. तसे पंतप्रधानांनी करणे योग्य की अयोग्य, असा प्रश्‍न विचारण्यासारखी सध्याची स्थिती नाही. अनेक ठिकाणी चित्रपट करमुक्त झाला. शंभर हिंदुत्ववादी संघटना जे करू शकणार नाहीत ते ‘द काश्मीर फाइल्स’ने करून दाखवले. सर्वच पातळ्यांवर चित्रपट हिट ठरला. विक्रमाचे, प्रसिद्धीचे, कौतुकाचे विक्रम त्याच्या नावावर जमा झाले. कुणी सांगावे उद्या अग्निहोत्रीही पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराचे धनी होतील, तर मूळ अग्निहोत्री ब्राह्मणांमधील एका उच्च जातीचे. त्यांचा संबंध पवित्र अग्नीशी म्हणजे यज्ञाशी येतो. पृथ्वी आणि स्वर्ग, माणूस आणि देव यांना जोडणारा, त्यागाचे प्रतीक म्हणून अग्नीत काही तरी टाकणारा हा विधी म्हणजे यज्ञ. तो आपला धर्म, कर्म आणि संस्कृतीशी जोडला गेला आहे.
या लेखाला सुरुवात करण्यापूर्वी कोणत्याही कलाकाराला असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर ठेवला पाहिजे. कलाकाराने म्हणजे निर्माता आणि दिग्दर्शकाने काय करावे आणि काय करू नये, हा त्याचा हक्क आहे. त्याविषयी कोणाचाच हस्तक्षेप असता कामा नये, हे गृहीत धरले आहे. मान्य केले आहे. तरीही कलाकृती जेव्हा प्रेक्षकांसमोर येते तेव्हा तोही कलाकृतीचा मालक बनतो आणि तिची चिकित्सा करण्याचा हक्क त्याला लाभतो. खूप वर्षांपूर्वी ‘फायर’ नावाचा चित्रपट आला होता. विशिष्ट समाजातील विधवांवर, मुंडण करणार्‍या विधवांवर, आत्मभान राहणार्‍या विधवांवर हा चित्रपट बेतला होता. या चित्रपटाला विरोध करण्यासाठी अनेक धार्मिक संघटना पुढे आल्या होत्या, कोर्टात गेल्या होत्या. आज त्या संघटना ‘द काश्मीर फाइल्स’चा उदोउदो करताना दिसत आहेत. ‘फायर’ चित्रपटात धर्माच्या अंगाने होणारी महिलांची पिळवणूक दाखवली होती आणि ‘द काश्मीर फाइल्स’ (के एफ)मध्ये धर्मातील उच्च घटकाची पिळवणूक दाखवली आहे. एखादी कलाकृती सामान्यांच्या मनावर चौफेर परिणाम करू शकते. या परिणामाचे स्वरूप विधायक की द्वेषमूलक हेही ठरत असते. ‘समाज को बदल डालो’ हा चित्रपट आला तेव्हा देशभर संपांना प्रोत्साहन मिळाले आणि संतोषी मातेवर म्हणजे आपल्याकडे नसलेल्या देवीवर चित्रपट आला तेव्हा देशभर तिची मंदिरे उभी राहिली. कलेचा परिणाम कसा असतो, हे अनेकदा समाजाने पाहिले आहे. असा एखादा चित्रपट का तयार करावा, हा त्या-त्या निर्मात्याचा प्रश्‍न असतो; पण ही कलाकृती कशा प्रकारचा संदेश देऊ पाहते, काय परिणाम घडवू शकते, धार्मिक-सामाजिक-राजकीय असा कोणता परिणाम घडवते हेही आपण पाहतच असतो.
पल्लवी जोशी या मराठी नटीचा असलेला पती अग्निहोत्रीने 2005 पासून ते 2022 पर्यंत म्हणजे सतरा-अठरा वर्षांत चित्रपटसृष्टीत आपले चांगले स्थान निर्माण केले आहे. शहरी नक्षलवादालाही त्याने हात घातला होता. चॉकलेट (2009), धन धना धन गोल (2007), हेट स्टोरी (2012), जिद (2014), बुद्धा इन ए ट्रॅफिक जॅम (2014), जुनूनियत (2016), द तास्कंद फाइल्स (2019) आणि आता ‘द काश्मीर फाइल्स’ असा त्याचा प्रवास आहे.
फाइल्स म्हणजे इतिहास आहे. जो दुर्लक्षित झालेला असतो. इतिहासाच्या गुहेत शिरणे जसे आनंददायी असते, तसेच ते जोखमीचेही असते. इतिहास मुका असतो. गुहेत शिरणारा त्याला शब्द देतो. हालचालीसाठी स्वतःची शक्ती देतो. बहुतेक वेळा काही तरी गृहीत धरून, काही तरी वेगळा अर्थ लावायचा, असे समजून एखादा गुहेत प्रवेश करतो. इतिहासाला स्वतःच्या भाषेत बोलायला लावतो. इतिहासाच्या फायलीत घटना-घडामोडींची नोंद असते; पण घटना का घडली, याची चिकित्सा नसते. इतिहासाच्या गुहेत शिरणारा आपल्या सोयीने चिकित्सा करतो. त्याची कलाकृती करतो. काश्मिरी पंडित म्हणजे काश्मिरी ब्राह्मणांवर बनलेल्या या चित्रपटाचे तसेच आहे. विशेष म्हणजे, काश्मिरी पंडितांचा नरसंहार करण्याचा प्रयत्न नव्वदीच्या दशकात मुस्लिमांच्या अतिरेकी संघटनांनी केला, हे सिद्ध करण्यात आले आहे आणि एएनयू (म्हणजे जेएनयू) विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनीही ते शेवटी मान्य केले आहे.
काश्मिरी पंडित म्हणजे काश्मीरमधील विद्वान. ते सर्वच क्षेत्रांत विद्वान आहेत. त्यांना प्रचंड मानसन्मान आहे, कारण ते भूदेव आहेत. ते करमुक्त होते, त्यांचे राजे होते, त्यांचे प्रधान होते. अगदी काश्मीर भारताचा अविभाज्य घटक होईपर्यंत तेथे अनेक हिंदू राजे होऊन गेले; पण लोहारा राजाच्या राजवटीत या पंडितांचा समावेश करण्यात आला. पंडित नाराज होते. पुढे तुर्की, अरब आणि मुस्लिमांच्या हल्ल्यांत सर्व देशच जसा अडचणीत आला आणि गुलाम झाला, तसे हे पंडितही अडचणीत आले. त्यांचा खूप छळ झाला, शस्त्रांच्या जोरावर धर्मांतरे घडली, कत्तली झाल्या, जशा त्या देशात इतरत्रही झाल्या. एक मजेशीर गोष्ट आहे आणि ती म्हणजे, भारतात अडीच-तीन हजार वर्षांपासून मनुस्मृतीच्या नावाने सत्तर-ऐंशी टक्के लोकांचा छळ होत होता. त्यातील अनके अस्पृश्य ठरले होते. नियम मोडणार्‍यांच्या किंवा हक्क मागणार्‍यांच्या कत्तली झाल्या होत्या; पण हे इतिहासाच्या कोणत्या फायलीत कोणी लिहून ठेवले नाही. ज्यांना लिहिता वाचता येत होते, ज्यांचा तो हक्क होता, त्यांना तसे लिहिण्याची गरज नव्हती. कारण पिळवणुकीचा हक्क त्यांच्याकडेच होता. महाडमध्ये डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती जाळेपर्यंत मनुच्या फायलीकडे कोणाचे लक्ष नव्हते, तर काश्मीर पंडितांबाबत तसे झाले नव्हते. या समाजात खूप मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या. देशाचे सत्ताधीश होणार्‍या या व्यक्ती होत्या. मोतीलाल नेहरू, त्यांचे पुत्र जवाहरलाल नेहरू, त्यांची कन्या इंदिरा गांधी, बीना काक (केंद्रात मंत्री), पी.एन. हकसर, तेज बहाद्दूर सप्रू, तपेस्वर सिन्हा (लष्करप्रमुख), जीवन (हिंदी नट), एम.के. रैना, मणी कौल, अनुपम खेर, कुणाल खेमू, मोहित रैना, मानव कौल, पल्लवी शारदा (सर्व चित्रपट क्षेत्रातील), सुरेश रैना (क्रिकेट), समय रैना (कॉमेडियन) याशिवाय जुनी आणि नवी, अशी अनेक नावे देता येतील. देशात आणि देशाबाहेर, पडद्यावर आणि पडद्याबाहेर त्यांच्या पावलांच्या खुणा दाखवता येतात. अनुपम खेरसारखे अनेक नट हिंदुत्ववादाचा गजर करत संसदेत शिरले. भाजपाने त्यांना आपलेसे केले, तर हा सारा पंडिती समाज अडचणीत आला तो नव्वदीच्या दशकात. ज्या काळात देशात आणि सीमेवर अनेक हालचाली गतिमान झाल्या होत्या. अतिरेक वाढला होता. पंजाबमध्ये खलिस्तानची चळवळ चालू होती. त्यात काश्मिरी पंडिताचा म्हणजे इंदिरा गांधींचा बळी गेला. त्यानंतर काही वर्षांत त्यांच्या मुलाचा म्हणजे राजीव गांधींचा बळी गेला. धर्म समर्थन आणि धर्म सुधारणा अशा दोन्ही चळवळी चालू होत्या. भारतात मुस्लिमांच्या हक्काची चळवळ चालू होती. शाह बानो प्रकरण, बुरखा हटाव प्रकरण, सती प्रथा वगैरे अनेक गोष्टी सांगता येतील. नव्वदीत जम्मू-काश्मीरमध्ये ‘आझादी’च्या नावाखाली अतिरेक्यांच्या चळवळी वाढल्या. तिने पंडितांचेच नव्हे, तर अनेक मुस्लिम-हिंदू नेते, कार्यकर्ते, पत्रकार यांचे बळी घेतले. श्रीनगरमध्ये मोजता येणार नाहीत एवढ्या मुस्लिम युवतींवर-महिलांवर बलात्कार झाले. ते अतिरेक्यांनी केलेच, शिवाय पुढे जवानांची नावेही त्यात गुंतवली जाऊ लागली. अनेक मुले निराधार झाली. रोज जाळपोळ होत होती. तेथेही उपासमार होत होती. संशयित अतिरेकी म्हणून हजारो मुस्लिम युवकांना तुरुंगात डांबले होते. कोणावरही आरोपपत्र नव्हते. याच काळात एक प्रसिद्ध संवाद जन्माला आला आणि तो म्हणजे, ‘प्रत्येक मुस्लिम अतिरेकी नसतो; पण प्रत्येक अतिरेकी मात्र मुस्लिमच असतो.’ मुस्लिमांना लाभलेल्या ‘खान’सारख्या आडनावावरून काय होते यावरही ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट आला होता. नव्वदीमध्ये जम्मूत असलेल्या पंडितांची म्हणजे त्यांच्यावर झालेल्या अन्याय-अत्याचाराची जशी फाइल्स तयार होत होती, तशी ती श्रीनगरमधील मुस्लिमांची नसेल का, असा प्रश्‍न अग्निहोत्रीसारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकाला पडला की नाही आणि पडला असेल, तर त्याचे आकलन त्याने कसे करून घेतले आणि घेतले असेल, तर काश्मीर फाइल्समध्ये गैरहजर कसे राहिले? अर्थात, असा प्रश्‍न प्रेक्षकाला पडू शकतो, अग्निहोत्रींना नाही. कारण त्यांनी आपल्या कॅमेर्‍याची चौकटच अशी केली, की त्यात फक्त काश्मिरी पंडितच बसतील. अतिरेकी कोणतेही असोत, त्यांना कोणता धर्म नसतो. त्यांचा धर्म म्हणजे हिंसा असते. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते कोणालाही मारतात. पंजाबमध्ये शीख फुटीरवाद्यांनी आपल्याच धर्मातील किती जणांची हत्या केली याचाही इतिहास ताजा आहे. मुळात कोणत्याही अतिरेक्याला धर्म जोडता कामा नये, जात जोडता कामा नये, त्यासाठी त्यांना नालायकच ठरवले पाहिजे.
नव्वदीच्या दशकात देशात आणि काश्मीरमध्ये जे राजकारण होते ते काही पंडितांच्या विरोधातले नव्हते. काश्मीरच्या मुख्यमंत्र्याने राजीनामा दिला होता आणि त्यांच्या जागी कडवे हिंदुत्ववादी असलेल्या जग मोहन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. ते भाजपाचे निष्ठावान सदस्य होते आणि पुढे त्यांना पद्मविभूषण हा सन्मान लाभला. पाकिस्तानमधील हाफिजाबादमध्ये जन्माला आलेले मनमोहन बरेच दिवस काँगे्रसमध्येही होते. इंदिरा गांधी यांच्या काळात बुलडोझर लावून झोपड्या उद्ध्वस्त करण्याचे काम त्यांनीच केले. 1984 ते 1989 या काळात ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल झाले. दोन वेळा त्यांना या पदावर राहता आले. त्यावेळी पाकच्या पंतप्रधान असलेल्या बेनझीर भाग मोहन म्हणायच्या, तर अतिरेकी त्यांचे तुकडे-तुकडे करू म्हणायचे. गंमत म्हणजे, हिंदुत्ववाद्यांना त्यांचा राज्यपाल जसा काश्मीरमध्ये होता व त्यांचे दिल्लीत सरकारही होते. व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारला भाजपाचा बाहेरून पाठिंबा होता. आपल्या लोकांसाठी हवे ती करण्याची संधी भाजपाला होती. या सर्वांच्या फाइलीही अर्थातच कुठेही उपलब्ध असणार याविषयी कुणालाही शंका नाही. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती. केंद्रात मुस्लिम गृहमंत्री, सरकारला हिंदू भाजपाचा पाठिंबा, राज्यपाल हिंदुत्ववादी, पंतप्रधान मंडलवादी, अशा गोष्टी असताना काश्मीर फायली का भरत होत्या? मंडल आणि कमंडल, कसे एकत्र आले आणि पंडितांसाठी काय घडले, आदी प्रश्‍नांची उत्तरे मिळाली असती, तर चित्रपट कदाचित वेगळाही घडू शकला असता; पण तसा तो अग्निहोत्रीला घडवायचा नसावा.
सामान्य माणसाच्या मनाचा आणि शरीराचा थरकाप होईल आणि अतिरेक्यांविषयी नव्हे, तर मुस्लिमांविषयी टोकाची द्वेषभावना तयार होईल, असा टोकाचा हिंसाचार चित्रित करण्यात आला आहे. दगडाच्याही डोळ्यात पाणी येईल, अशी भावनात्मक दृश्ये आहेत. कोणत्याही परिस्थितीत पंडित आपल्या देवधर्माला चिकटून राहतो, त्यासाठी त्याग कसा करतो, हेही अनेक दृश्यांत दाखवले आहे. चित्रपट पाहताना लोक घोषणा देतात, रडतात आणि मारून टाका रे दुश्मनाला, असे सहज बोलून जातात. ते जेव्हा भावनेच्या बाहेर पडतील आणि त्यांना विचारले जाईल, की दुश्मन कोण? उत्तर काय येईल. हातांच्या बोटांवर मोजता येतील इतके अतिरेकी, एक मोठा समूह, जो हजारो वर्षे आपल्याच बरोबरीने राहतो आहे. या सार्‍या प्रतिक्रियांना जबाबदार कोण? कला कितीही सुंदर असली तरी तिला नैतिक मूल्यांचे, सामाजिक मूल्यांचे एक चारित्र्य असतेच. ते सैल झाले, की आगीत तेल ओतल्यासारखे होते. शाळेत शिक्षक मुलांना शिकवतो की अधिकारी आले, की त्यांना आम्हाला बाकी काही नको मशीद पाहिजे, असे सांगायचे. आपली देवी सरस्वती आहे, असे पंडित सांगतात, तर तिकडे अल्लाहला शरण जाण्यास सांगतात. हा जो तिढा आहे, तो कोण तयार करते आणि त्याच्या फायली कोण, कुठे आणि का लपवून ठेवतो? चार दिवसांपूर्वीच गुजरात आणि कर्नाटक सरकारने पाठ्यपुस्तकात भगवद्गीता सक्तीने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम विद्यार्थी काय करतील? पाठ्यपुस्तकांत कोणत्याही देवादिकांची गर्दी असायलाच हवी का, असे विचारणारे आवाज असतात; पण ते क्षीण असतात. अग्निहोत्री त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. शेवटी ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट आहे, की एक नवे धर्मास्त्र आहे, जे कलेच्या आडून वापरले गेले आहे. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी इमान राखूनही याचा विचार करता येतो. सामान्य माणसाला खूप लवकर हळवे बनवता येते. चित्रपटातील बच्चनची गरीब आई, शिलाई करताना बोट फाडून घेणारी आई कितीतरी वर्षे प्रेक्षकांना रडवत होती, प्रेक्षकही रडत होते, रुमाल भिजवत होते; पण आईचे असे दुःखात रूपांतर व्हायला जबाबदार कोण, असा प्रश्‍न कधी प्रेक्षकांच्या मनात तयार होत नाही. तो तसा तयार करण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. फायलीत काय सापडले, हे जसे योग्य आहे, तसे ते का घडवले गेले आणि त्याला फक्त अतिरेकीच जबाबदार आहेत, की तत्कालीन राजकारण, व्यवस्था, सामाजिक-धार्मिक द्वेषही जबाबदार आहे, आदी सारे प्रश्‍न चित्रपटात मुके होतात. खरे तर, ज्याला आपण पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतो ते काश्मीर एक भळभळती जखम बनले आहे. येथे असलेल्या बुद्धिस्ट, हिंदू आणि मुस्लिमांच्या जखमाही कोरड्या होण्याऐवजी ओल्या होत आहेत. या जखमांची सुखवणूक आरोग्यशास्त्र वापरल्याने होईल, धर्मास्त्र वापरून नव्हे किंवा सिनेमा काढून नव्हे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.