आठवलेंचा नागालँडमधील डंका! – बी.व्ही. जोंधळे

आठवलेंचा नागालँडमधील डंका! – बी.व्ही. जोंधळे

सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले हे एकेकाळचे लढाऊ-झुंजार असे पँथर कार्यकर्ते म्हणून सुपरिचित आहेत. रामदासजी आठवलेंची विशेषता अशी, की पायाला भिंगरी लावल्यागत ते देशभर फिरत असतात. दलित पँथरमध्ये असताना जिथे कुठे दलित समाजावर अन्याय-अत्याचार होत असत, तिथे ते तडफेने धाऊन जात असत. आजही या त्यांच्या फिरस्तीच्या स्वभावात फारसा फरक पडलेला नाही. नामांतर आंदोलनातील त्यांची भूमिका व त्यांचे योगदानसुद्धा दुर्लक्षित करता येण्याजोगे नाही. एक शीघ्र कवी म्हणूनही ते अनेकांना खळखळून हसायला भाग पाडतात, ही सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक लोभस विशेषता राहत आली आहे.
अशा या रामदासजी आठवलेंना शरद पवारांमुळे एकदाची सत्तेची चटक लागली व तेव्हापासून त्यांचे सारेच राजकारण आंबेडकर अनुयायात वादाचा विषय ठरले.

रामदास आठवलेंना सत्तेची एवढी गोडी लागली, की खासदारकी व मंत्रीपद मिळविण्यासाठी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना ते भाजपा असा थेट प्रवास केला. काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेली त्यांची युती-मैत्री आंबेडकरानुयायांच्या डोळ्यात फारशी खुपली नाही. अर्थात, त्यांच्या काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेल्या मैत्रीवरही आंबेडकरानुयायांकडून टिकाटिप्पणी वा नाराजी व्यक्त होतच होती; पण त्यांनी शिवसेना व्हाया भाजपशी जी मैत्री केली, ती विशेष टीकेस पात्र ठरली. हे स्वाभाविक सुद्धा होते आणि आहे. कारण आंबेडकरी विचार मूल्यांचा जो हिंदुराष्ट्रवादी भाजप वैचारिक विरोधक आहे, त्या भाजपशी मंत्रीपदासाठी रामदासजी आठवले यांनी जी युती केली, ती आंबेडकरानुयायांना रुचणे, पचणे वा आवडणे शक्यच नव्हते नि कदापी नाही; पण हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. आज इथे एका वेगळ्याच कारणासाठी रामदासजी आठवले यांचे माझे त्यांच्याशी वैचारिक मतभेद असतानाही अभिनंदन करावयाचे आहे. ते अशासाठी, की नुकत्याच झालेल्या काही विधानसभा निवडणुकीत रामदासजी आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला नागालँडमधील विधानसभा निवडणुकीत दोन ठिकाणी स्वबळावर मिळालेल्या दोन आमदारकीच्या जागा, हे होय. नागालँडमध्ये आठवलेंनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आठ उमेदवार उभे केले होते. त्या आठांपैकी दोन जण विजयी झाले तर अन्य चार उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर राहिले. नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाने जे यश मिळविले त्याचा अन्वयार्थ कसा लावायचा? तर रिपब्लिकन पक्षाच्या या यशाबाबत असे म्हणावे लागेल, की जिद्द दाखवली, मेहनत नि कष्ट घेतले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष म्हणून जनता रिपब्लिकन पक्षाला डोक्यावर घेऊन नाचते. फक्त गरज आहे, ती रिपब्लिकन पक्ष बांधण्याची. प्रश्‍न आहे तो असा, की पक्षबांधणीचे हे आव्हान रामदासजी आठवले महाराष्ट्रात स्वीकारू शकतील काय आणि स्वीकारणार असतील, तर ते कसे? देश आज मोठ्या संक्रमणावस्थेतून वाटचाल करीत आहे. हिंदुराष्ट्रवाद फोफावतो आहे. विरोधकांची मुस्कटदाबी होत आहे. देश एकाधिकारशाहीकडे वाटचाल करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मनिरपेक्षता लोकशाही संकटात सापडली आहे. अशा स्थितीत रामदासजी आठवले स्वप्रेमातच अडकून पडणार आहेत, की भाजपची साथ सोडून रिपब्लिकन पक्षाची आंबेडकरी मूल्यांवर स्वतंत्रपणे उभारणी करणार आहेत? एक गोष्ट मान्यच आहे ती अशी, की काँग्रेसने रामदासजी आठवले यांचा शिर्डीत ठरवून पराभव केला. दिल्लीत त्यांना बंगला रिकामा करायला लावला. काँग्रेसचे हे वर्तन अशोभनीय नि असमर्थनीयच होते, याविषयी शंकाच नाही; पण प्रश्‍न असा, की व्यक्तिगत मानापमान्याच्या पुढे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मनिरपेक्ष लोकशाही आजच्या स्थितीत वाचविण्यासाठी रामदासजी आठवले कुठला राजकीय पवित्रा घेणार आहेत हा! गेल्या वीसएक वर्षांपासून रामदासजी आठवले आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदे भूषवित आले आहेत. आता आंबेडकरी चळवळीची एक गरज म्हणून सत्तेच्या मोहातून मुक्त होऊन ते रिपब्लिकन पक्ष उभारणीचे आव्हान पेलू शकतील काय? अर्थात, या प्रश्‍नाचे उत्तर भावी काळच देईल. तोपर्यंत आपण थांबलेले बरे. दुसरे काय? 

Related Articles

1 Comment

Avarage Rating:
  • 0 / 10
  • Sandesh Zende. , March 13, 2023 @ 10:20 am

    His victory is neither personal nor of party but of the candidates. In Nagaland, constituency are very small & of @ 8000-10000 people in which victory is very simple.
    Even Rastrawadi can win there.

    Nobody can think that Athavale or Pawar are building a party there.

Leave a Reply

Your email address will not be published.