उत्क्रांती : एक निखळ वास्तव – प्रा. जयप्रकाश म्हात्रे

उत्क्रांती : एक निखळ वास्तव – प्रा. जयप्रकाश म्हात्रे

सांप्रतकाळी प्रागतिक विचारांची व विज्ञानाची चाके उलटी फिरवण्याचा उद्योग शासनाच्या आशीर्वादाने होताना दिसत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे डॉ. अरुण गद्रे यांचे ‘उत्क्रांती एक वैज्ञानिक अंधश्रद्धा?’ हे नुकतेच प्रसिद्ध झालेले पुस्तक आणि त्याला महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले यांच्या नावाने असलेला पुरस्कार देऊन या पुस्तकाचा केलेला गौरव. वरवरून वैज्ञानिक भासणार्‍या या तद्दन अवैज्ञानिक पुस्तकाला पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने अत्यंत चुकीचा व घातक पायंडा पाडलेला आहे आणि म्हणूनच या अदखलपात्र पुस्तकाची दखल घेणे भाग पडत आहे.

डॉ. अरुण गद्रे हे निष्णात शल्यचिकित्सक असून आरोग्य क्षेत्रात त्यांचे चांगले योगदान आहे. त्यांनी काही चांगले लिखाणही केलेले आहे; परंतु त्यांचे हे पुस्तक अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे असून विज्ञानाची चाके उलटी फिरवणारेही आहे आणि म्हणून त्याचा परामर्श घेणे व प्रतिवाद करणे हे प्रत्येक विचारी व्यक्तीचे व समाजाचे कर्तव्य होऊन बसते. चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांती सिद्धांताला आक्षेप घेणारे व टीका करणारे डॉ. अरुण गद्रे हे काही पहिले व्यक्ती नव्हेत. अगदी डार्विनच्या काळापासून ते आजतागायत ही टीका सुरूच आहे. तथापि, आजवर झालेल्या संशोधनातून या टीकेला परस्पर उत्तरे मिळालेली असून डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हे एक वैज्ञानिक सत्य म्हणून आता मान्यता पावलेले आहे.


डार्विनचा सिद्धांत


चार्ल्स डार्विन यांनी सन 1831 ते 1836 या पाच वर्षांच्या प्रदीर्घ सागरी मोहिमेनंतर व प्रदीर्घ निरीक्षण-परीक्षण पडताळा व निष्कर्ष या वैज्ञानिक कसोट्या पार करून 1859 मध्ये ‘ओरिजीन ऑफ स्पिसिज बाय नॅचरल सिलेक्शन’ हा ग्रंथ पूर्ण करून प्रकाशित केला. त्यात त्यांनी सजीवांच्या उत्पत्ती व उत्क्रांतीसंबंधात सिद्धांत कथन केला. तो थोडक्यात पुढीलप्रमाणे:
1. सजीवांमध्ये प्रचंड प्रमाणात प्रजोत्पादन करण्याची क्षमता असते. प्रचंड मोठ्या संख्येने सजीवांना जन्म
देतात. इतक्या मोठ्या संख्येला पुरेल एवढे अन्न उपलब्ध नसल्याने त्यांच्यामध्ये अन्न मिळवण्यासाठी धडपड सुरू होते. या धडपडीतून अन्न मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सजीव आपल्या शारीरिक गुणात बदल करतात व आपली अन्न मिळवण्यासाठी क्षमता वृद्धिंगत करतात. ज्या सजीवांना हे शक्य होते, तेच सजीव भोवतालाशी समायोजन करू शकतात व स्पर्धेत यशस्वी होतात. जे सजीव असे बदल करू शकत नाहीत, ते भोवतालाशी समायोजन करू शकत नाहीत आणि म्हणून ते नष्ट होतात. भोवतालाशी जुळवून वा समायोजन करू शकणारे गुण टिकून राहतात व सजीवांना नव्या पर्यावरणात तगून राहण्यासाठी सक्षम करतात. पिढ्यान्पिढ्यांच्या संक्रमणातून अशा गुणांचा संच तयार
होतो व अशा संचातून नव्या प्रजाती उदयास येतात. बदलत जाणार्‍या पर्यावरणाशी जे गुण जुळवून घेतात, अशा गुणांची निवड निसर्ग करीत राहतो. यालाच नैसर्गिक निवड असे म्हणतात. पिढ्यान्पिढ्यांच्या नैसर्गिक निवडीतून व्यामिश्र सजीव निर्माण होत गेले व ही सृष्टी अनेक विविध सजीवांनी बहरून गेली.
2. सुरुवातीच्या साध्या सजीवापासून कोट्यवधींच्या निसर्ग निवडीच्या प्रक्रियेतून व्यामिश्र सजीव क्रमाक्रमाने उदयास आले. गुण एका पिढीतून पुढील पिढीत संक्रमित होत जातात हे जरी डार्विनने प्रतिपादन केले असले, तरी ते कसे होतात हे त्याने सांगितले नव्हते. ते पुढे डार्विनचा समकालीन ऑस्ट्रियन धर्मगुरू ग्रेगर जॉन मेंडेल याने आपल्या चर्चच्या बगीचामध्ये केलेल्या वाटाण्याच्या वेलीवरील प्रयोगातून सांगितले, की हे गुण सजीवांच्या पेशीत असलेल्या घटकातून संक्रमित होतात. हे घटक म्हणजेच जनुके (Genes) होत, असे पुढील प्रयोगातनू सिद्ध झाले. जनुके जीव रेणूंनी (DNA-Deoxyribo Nucleic
Acid) बनलेली असतात, हेही नंतर शास्त्रज्ञाने शोधून काढले. 1953 मध्ये वॉटसन आणि क्रिक या शास्त्रज्ञांनी या जीव रेणूची (DNA) रचना शोधून काढली. सुमारे साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील विविध अणूंपासून जीव रेणू तयार झाला व हा जीव रेणू स्वतःचे पुनरुत्पादन करू लागला व त्यातून पुढे पेशी व त्या पेशीपासून अनेक सजीव निर्माण होत गेले. हा सर्व इतिहास शास्त्रज्ञांनी अथक संशोधनातून जगापुढे उघड केलेला आहे.


उत्क्रांतीचे पुरावे


1.सुरुवातीच्या साध्या एकपेशीय सजीवापासून ते आताच्या आधुनिक मानवापर्यंतच्या सर्व व्यामिश्र सजीवांमध्ये जो मूलभूत रेणू आहे, तो म्हणजे जीव रेणू (DNA)
2. जीव रेणू अणूंच्या व्यामिश्र रचनातून विविध जनुके निर्माण होत गेली व या जनुकांपासून विविध सजीव निर्माण होत गेले. अशा अनेक सजीवांचे जनुकीय नकाशे तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले आहे. मानवाचा जनुकीय नकाशा इ.स. 2000 मध्ये पूर्ण करण्यात आलेला आहे.
3. चिंपांजी व मानव यांचा 98.5 टक्के जीव रेणूसारखा आहे. सुमारे 70 लाख वर्षांपूर्वी चिंपांजी व मानव यांचा समान पूर्वज विभक्त होऊन चिंपांजी व मानवी प्रजाती विभक्त झाल्या याचा हा पुरावा होय.
4. समान पूर्वज व आधुनिक मानव यांच्यामधील जवळजवळ 31 उत्क्रांतशील मानवी प्रजातींचे जीवाश्म हुडकून काढण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले आहे.
5. सरपटणारे प्राणी व उडणारे पक्षी यातील दुवा Archaeopteryx या प्राण्याचे जीवाश्म जर्मनीमध्ये डार्विनच्या सिद्धांतानंतर सापडलेले आहेत. या उडणार्‍या प्राण्यात सरपटणारे प्राणी व उडणारे पक्षी या दोघांचे गुण दिसून आले आहेत.
6.पाच लाख वर्षांपूर्वी उदयास आलेला आपला नजीकचा पूर्वज होमोनीअंडरटरेन्सिस याचा जीव रेणू व आपला जीव रेणू 99.5 टक्के सारखा आहे. अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे सत्तावीस हजार वर्षांपूर्वीपर्यंत फ्रान्स व स्पेन येथील गुहेत राहात असल्याचे पुरावे सापडलेले आहेत.
7. तीन लाख वर्षांपूर्वी उदयास आलेला आणखी एक आपला नजीकचा पूर्वज होमोडेनिसोव्हा याचा जीव रेणू व आपला जीव रेणू 99.8 टक्के सारखा आहे. त्याचे अवशेष सायबेरियातील अल्ताई पर्वतराजीतील गुहेत अलीकडेच सापडलेले आहेत व तो 11000 वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात होता.
8. गेल्या 70 वर्षांत जनूकशास्त्राने व रेणवीय जीवशास्त्राने पुराव्यांचे ढिगारे उत्क्रांतीच्या बाजूने सादर केलेले आहेत व ते अजून सादर होत आहेत.


बिनबुडाचे अक्षय व धर्मसंस्थांचा थयथयाट


इ.स. 1859 मध्ये डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत जगासमोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. इंग्लंडमध्ये एक उमराव पत्नी इतकी घाबरली, की जीवसृष्टी परमेश्‍वराने निर्माण केली नसून ती उत्क्रांतीने घडत आली हे सत्य लोकांपर्यंत पोहोचले, तर हाहाकार उडेल व लोकांचा परमेश्‍वरावरील विश्‍वास उडेल. म्हणून उत्क्रांतीचा हा सिद्धांत लोकांपासून लपवून ठेवायला हवा, असे तिने आपल्या पतीला सांगितले. इंग्लंडच्या चर्चचे मुख्य धर्मगुरू विल्यम विल्बर फोर्स हे खूप संतापले व त्यांनी डार्विनवर बहिष्कार टाकला. 30 जून 1860 रोजी ऑक्सफर्ड विद्यापीठात डार्विनच्या उत्क्रांतीवादावर वादविवाद आयोजित करण्यात आला होता. ईश्‍वरनिर्मित सृष्टीचे समर्थक विल्यम विल्बर फोर्स व उत्क्रांतीनिर्मित सृष्टीचे समर्थक थॉमस हक्सले यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विल्बर फोर्स यांनी बायबलच्या आधारे सृष्टीचे वयही निश्‍चित केले होते. त्यांच्या प्रतिपादनानुसार विश्‍व 4,000 वर्षांपूर्वी निर्माण झाले होते व जीवसृष्टी केवळ सात दिवसांत निर्माण झालेली होती. एवढी जकड वेळ व व्यामिश्र जीवसृष्टी क्रमाक्रमाने निर्माण होणे केवळ अशक्य असून ती परमेश्‍वरानेच निर्माण केली.
थॉमस हक्सले यांनी, पुराव्यानिशी जीवसृष्टी ही साध्या जीवापासून ते आताच्या माणसापर्यंत क्रमाक्रमाने उत्क्रांत होत गेली, असे ठामपणे प्रतिपादन केले. आधुनिक मानव मर्कट प्रजातीपासून उत्क्रांत झाला हेही त्यांनी पुराव्यानिशी सांगितले. धर्मग्रंथाशिवाय दुसरा कोणताच पुरावा विल्बर फोर्स यांच्याकडे नव्हता आणि त्यांनी संतापाने आणि कुचेष्टेने हक्सले यांना प्रतिसवाल केला, की त्यांचे पूर्वज म्हणजे आजी-आजोबा मर्कट प्रजातीतून उत्क्रांत झाले असतील, तर नेमके कोणत्या माकडापासून तुम्ही जन्माला आलात असे हक्सले यांना विचारले. सभागृहातील विद्वान श्रोत्यांना कळून चुकले, की विल्बर फोर्स हे हरले आहेत.
निर्मितीवाद (Creationism) आणि बुद्धिमान अभिकल्प (Intelligent Design)सृष्टीचा जगड्व्याळ व गुंंतागुतीचा व्यामिश्र पसारा नसैर्गिक निवडीतून उत्क्रांत होणे शक्य नाही, असे म्हणणार्‍यांनी निर्मितीवादाचा व बुद्धिमान संकल्पाचा पोकळ पर्याय देण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. बायबलमधील लिखाणानुसार, ईश्‍वराने सहा दिवसांत सृष्टीची निर्मिती केली हा निर्मितीवाद पुढे नेत विल्यम पॅले या अठराव्या शतकातील धर्मगुरूने बुद्धिमान अभिकल्पाची संकल्पना मांडली. त्यासाठी त्याने गवताच्या गंजीत सापडलेल्या घड्याळाचे उदाहरण दिले. एवढे सुंदर नीटनीटके घड्याळ पूर्व अभिकल्पाशिवाय तयार होऊ शकत नाही व तो अभिकल्प तयार करणार्‍या (Designer) शिवाय निर्माण होऊ शकत नाही, अशी बिनतोड वाटणारी मांडणी पॅलेने केली. सृष्टी निर्माण करणारा हा निसर्गाचा घड्याळ (Nature’s Watch maker)ही सुंदर सृष्टी निर्माण झाली असे जोरदार प्रतिपादन त्यांनी केले. 1930 च्या दशकात अमेरिकेत उत्क्रांतीविरोधी चळवळच उभी करण्यात आली होती. 1990 च्या दशकात रेण्वीय जीवशास्त्रज्ञ मायकेल बेहे याने त्यापुढेही जाऊन निसर्गातील काही घटिते डार्विनच्या निसर्ग निवडीने घडू शकत नाहीत, असे प्रतिपादन केले व त्यासाठी त्यांनी तीन उदाहरणे दिली –
1) इ कोलाय या जिवाणूची हालचालीस उपयुक्त ठरणारी शेंडी (Flagellim)
2) रक्त गोठण्याची क्रिया (Blood Coagulation) 3) रोगप्रतिबंधक शक्ती (Immunity)
वरील उदाहरणे देऊन मायकेल बेहे यांनी कधीही कमी न होणार्‍या व्यामिश्रतेचा (Irreducible Complexity) सिद्धांत मांडला. त्यांच्या मते, जीवसृष्टीतील विविधता व रेण्वीय पातळीवरील आत्यंतिक व्यामिश्रता व गुंतागुंतीची प्रक्रिया यांचे स्पष्टीकरण नैसर्गिक निवडीचा सिद्धांत देऊ शकत नाही; परंतु त्यांची ही मांडणी अतार्किक असून साध्या रचना व साध्या क्रिया यापासूनच क्रमाक्रमाने व्यामिश्र गुंतागुंतीच्या रचना व क्रिया उन्नत होत जातात, या सिद्ध झालेल्या कार्यपद्धतीला छेद देणार्‍या आहेत. उदाहरणार्थ, मानवी डोळ्याची निर्मिती ही कोट्यवधी वर्षांच्या एकपेशीय डोळ्यापासून झाली, हे डोळ्याच्या उत्क्रांतीचा अभ्यास केल्यानंतर सहज लक्षात येते. सुरुवातीच्या साध्या प्राण्यांचे डोळे एकपेशीय होते. त्यानंतर ते द्वीपेशीय झाले व पुढे पुढे ते अनेकपेशीय होऊन नंतर व्यामिश्र व गुंतागुंतीची रचना असलेले व कार्यपद्धती असलेले मानवी डोळे निर्माण झाले. झुरळांसारखे अकणाआधारित प्राणी व माशांसारखे कणाधारी प्राणी अशा विविध प्राण्यांच्या डोळ्यांचा अभ्यास केला असता हे सहज लक्षात येते. म्हणून बेहे यांचा सिद्धांत अतार्किक ठरतो. ही सर्व हुशार मंडळी बायबलच्या प्रभावाखाली असल्याने हे घडत आहे. धार्मिक प्रभावाखाली असलेल्या अशा प्रकारच्या तथाकथित विद्वानांचा आपल्याकडे तर सुकाळच!
आंध्र प्रदेशातील एका कुलगुरूने तर आपले दशावतार पुराण हे डार्विनच्या उत्क्रांतीवादापेक्षा किती तरी श्रेष्ठ आहे, असे उद्गार काढलेले होते. त्यांच्याच रांगेत आता डॉ. अरुण गद्रे बसले आहेत. त्यांचे ‘उत्क्रांती एक वैज्ञानिक अंधश्रद्धा?’ त्यातलाच एक नमुना होय. हे पुस्तक दखलपात्र नाही; परंतु महाराष्ट्र शासनाने त्याला महात्मा फुले यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार प्रदान केला म्हणून त्यावर भाष्य करणे गरजेचे वाटले. अनेक शास्त्रज्ञांच्या संशोधनांचे चुकीचे अर्थ काढून त्यांनी सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा जोरदार प्रयत्न केलेला आहे. डार्विनचा विजय तसेच डार्विनचा पराजय अशा कोलांटउड्याही त्यांनी मारलेल्या आहेत. आणि शेवटी जगड्व्याळ व वैविध्यपूर्ण जीवसृष्टी उत्क्रांतीने निर्माण होऊ शकत नाही,  असा जावईशोधही लावलेला आहे. कोणी तरी निर्मिकाने बुद्धिमान संकल्प तयार करून ही सृष्टी निर्माण केली, असे ते आवर्जून सांगतात. आपल्या प्रतिपादनाला वजन प्राप्त व्हावे, म्हणून संशोधकांच्या संशोधनांचा चुकीचा वापर त्यांनी केलेला आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या गद्रेंवर ख्रिस्ती धर्माचा प्रभाव आहे व त्या प्रभावामुळेच त्यांनी हे धाडस केलेले आहे. चांगले लेखक असल्याने खरे तर त्यांनी या विषयावर धर्मग्रंथ लिहिणे उचित ठरले असते; परंतु त्यांनी हे न करता वैज्ञानिक वास्तवांना अंधश्रद्धा म्हणण्याचे धाडस केले आहे. खरे तर, त्यांनी बुद्धिमान अभिकल्प व त्या अभिकल्पाला जन्म देणार्‍या अभिकल्पकर्त्याचा शोध लावला असता, तर त्यांना निश्‍चित नोबेल पारितोषिक मिळाले असते.


उत्क्रांती हा ऐतिहासिक दस्तऐवज तर नैसर्गिक निवड हा सिद्धांत


डेव्हिड अटेंनबरो हे बीबीसीवर वैज्ञानिक मालिका सादर करणारे प्रसिद्ध संशोधक व संयोजक. त्यांना एका मुलाखतकर्त्याने उत्क्रांतीविषयी प्रश्‍न विचारला असता, त्यांनी त्यावर ”Evolution is history and natural selection is theory of
life”असे उत्तर दिले. म्हणजे उत्क्रांती हा सजीवांचा इतिहास असून नैसर्गिक निवड हा या इतिहासाचा सिद्धांत आहे. आत्तापर्यंत सापडलेले सजीवांचे जीवाश्म या इतिहासाला दुजोरा देणारेच आहेत. जीव रेणूच्या रचनेचा शोध लागल्यानंतर तर उत्क्रांतीच्या बाजूने पुराव्यांचे ढीगच शास्त्रज्ञांनी सादर केलेले आहेत. तथापि,  उत्क्रांतीचा प्रवास हा कधीच सरळ सोपा नव्हता व नाही. स्टीफन जे गोल्ड या अमेरिकन शास्त्रज्ञाने सखोल अभ्यासांती असा निष्कर्ष काढला आहे, की उत्क्रांतीची प्रक्रिया वळणावळणाची व खाचखळग्यांची आहे. प्रजातींच्या सलग दीर्घ अस्तित्वानंतर पर्यावरण बदलाच्या दबावाने त्या प्रजातीत उत्परिवर्तने (Mutations) होतात व त्यामुळे नव्या प्रजाती उदयास येतात. या प्रक्रियेला ते खंडित समतोल (Punctuated Equilibrium) म्हणतात. ही खंडित समतोलाची प्रक्रिया कोट्यवधी वर्षांतून सातत्याने घडत आली व त्यातून नवनव्या प्रजाती उदयास येत गेल्या, तर काही जुन्या प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या.
बुद्धिमान अभिकल्प व निर्मितीवाद या संकल्पना छद्म विज्ञान असल्याचा निष्कर्ष  जाणत्या व ज्यांच्यावर धार्मिक प्रभाव नाही अशा शास्त्रज्ञांनी व विचारवंतांनी काढलेला आहे. उत्क्रांती ही निखळ वास्तव व विज्ञानाने सिद्ध केलेली प्रक्रिया आहे, हे सत्य आता प्रस्थापित झालेले आहे.

– प्रा. जयप्रकाश म्हात्रे
(लेखक प्राणिशास्त्राचे अभ्यासक व संशोधक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.