आठवलेंची भाटागिरी – बी.व्ही. जोंधळे

आठवलेंची भाटागिरी – बी.व्ही. जोंधळे

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच शिर्डी मुक्कामी पार पडले. मा. रामदास आठवले हे जेव्हा जेव्हा त्यांच्या रिपाइंचे अधिवेशने घेत असतात तेव्हा ती खरोखरच त्यांच्या पक्षाची असतात, की अन्य पक्षांची म्हणजे त्यांची ज्या पक्षाशी राजकीय मैत्री असते त्या पक्षाची वकीली करणारी असतात, असा प्रश्‍न कायमच उपस्थित होत असतो.
मंत्री रामदास आठवले यांची जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी मैत्री होती तेव्हा तेव्हा ते राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला निमंत्रित करायचे. आता शिर्डीतही असेच घडले. आठवले साहेबांची आता भाजपशी मैत्री आहे म्हणून यावेळी त्यांनी राज्याचे महसूलमंत्री भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना निमंत्रित केले होते. जगाच्या पाठीवर कुठेही आपल्या पक्षाच्या पक्षीय कार्यक्रमात अन्य पक्षाच्या नेत्यांना पाचारण करण्याची रित नाही. पण रामदास आठवले असा चमत्कार करू शकतात जो खरे तर गिनीज बुकातच नोंद करावा असाच आहे. असो.
रामदासजी आठवले जेव्हा पँथरमध्ये होते तेव्हाचा त्यांचा लढाऊपणा व अत्याचाराविरुद्धची त्यांची चीड विसरता येत नाही हे खरे. पण जेव्हापासून त्यांना सत्तेची चटक लागली तेव्हापासून त्यांचे राजकारण आंबेडकरी मूल्यांशी फारकत घेणारेच ठरले आहे. हे इतके स्पष्ट नि स्वच्छ आहे, की त्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज भासू नये. रामदास आठवले यांनी सत्तेसाठी ज्या तत्त्वशून्य राजकारणाचा अवलंब केला आहे त्याचेशी सुसंगत विचार म्हणूनच त्यांनी शिर्डी अधिवेशनात व्यक्त केलेले दिसतात. आठवले शिर्डीच्या रिपाइं अधिवेशनात काय म्हणाले? तर ते म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी इकडे-तिकडे न फिरता आमच्यासोबत यावे. आम्ही त्यांचे स्वागत करू. वंचित बहुजन आघाडीमुळे कोणाची सत्ता आली नाही. आता आंबेडकर आमच्यासोबत आले, तर दोघे मिळून भाजपसोबत काम करू.” आठवले इथेच थांबले नाहीत, तर भाजपची वकिली करताना ते असेही म्हणाले, की ‘आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 350 जागांवर विजयी होईल.’ यालाच म्हणतात, ‘बेगानी शादीमे अब्दुला दिवाना’. तर रामदास आठवलेंची भलामण करताना राधाकृष्ण विखे पाटील वदले, “देशाच्या राजकारणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा म्हणून रामदास आठवले यांचा प्रभाव आहे.”
शिर्डीच्या रिपाइं अधिवेशनात ही जी शब्दसुमने उधळली गेली ती आंबेडकरानुयायांना मुळीच रूचण्या वा पटण्यासारखी नाहीत हे उघड आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाची चर्चा हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण म्हणून भाजपची टिमकी वाजविताना आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना भाजपसोबत यावे, असा अंगातूक सल्ला देण्याची गरजच काय आहे? राधाकृष्ण विखे पाटलांनी आठवले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा चालवित आहेत असे प्रशस्तीपत्र देण्याची तरी काय आवश्यकता आहे? त्यांना जे काय आपसातील सत्तालंपट लोचट राजकारण करावयाचे आहे ते त्यांनी जरूर करावे. पण यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ओढण्याची गरजच काय आहे? केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाजपशी सत्तेच्या चतकोर तुकड्यासाठी जी अभद्र युती केली आहे, ती आंबेडकरी तत्त्वज्ञानाशी केलेली बेईमानीच आहे. बाबासाहेबांचा हिंदू राष्ट्र संकल्पनेला तीव्र विरोध होता. लोकशाही हा त्यांचा श्‍वास होता. धर्मनिरपेक्षता हा त्यांचा जीव की प्राण होता. धर्मांधतेचे ते वैचारिक शत्रू होते. जातीव्यवस्थेचे बाबासाहेब कर्दनकाळ होते. भाजप जाती-धर्माचे धर्मांध राजकारण करतो. लोकशाहीला तिलांजली देतो. आंबेडकरी नीतीमूल्यांशी ज्या भाजपचा सुतराम संबंध नाही त्या भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार्‍या रामदास आठवले यांनी म्हणूनच भाजपची ध्येय धोरणे आंबेडकरी समाजाला समजाऊन सांगण्याची मुळीच गरज नाही आणि कुणा नेत्यांना भाजपसोबत या असा अनाहून अंगातूक सल्ला देण्याची गरज नाही. इतःवर रामदासजी आठवले यांना भाजपचा फारच पुळता येत असेल, तर त्यांनी त्यांच्या महान व्यापक (?) राजकारणाला अनुसरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-समाजवादी गट-अन्य प्रादेशिक पक्ष यांना भाजपसोबत येण्याचे जरूर आवाहन करावे. म्हणजे भाजपच्या संकल्पनेतील विरोधीपक्ष व लोकशाही मुक्त भारत जन्माला येईल. आंबेडकरवाद्यांना आहे तिथेच राहू द्यावे. त्यांची चिंता आठवलेंनी न केलेली बरी. दुसरे काय? 

— बी.व्ही. जोंधळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.