काँग्रेसी विजयाचे स्वागत असो! – बी.व्ही. जोंधळे

काँग्रेसी विजयाचे स्वागत असो! – बी.व्ही. जोंधळे

सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने मिळवलेल्या घवघवीत यशाचे सर्वत्र कौतुक होणे स्वाभाविक आहे. कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा जो दणदणीत पराभव केला त्याचे अप्रूप यासाठी, की कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यात वीसहून अधिक सभा घेतल्या. याशिवाय भाजपचे पाच मुख्यमंत्री, सोळा केंद्रीय मंत्री या सर्वांनी तीस हजारांहून अधिक प्रचारसभा नि मेळावे घेतले. रोड शो करून झाले. पुष्पवृष्टी करून झाली. हे सारे कमी होते की काय म्हणून भाजपने त्यांचा हुकूमी एक्का असलेल्या जातीय ध्रुवीकरणाचा खेळही खेळून पाहिला. हिजाब, लव्ह जिहाद, हलाल, मास या जोडीला तोंडी लावायला केरला स्टोरी, टिपू सुलतान आदी विषय होतेच. शेवटी कहर केला तो साक्षात पंतप्रधानांनी. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात आपण जर सत्तेवर आलो तर धर्मांध राजकारण करणार्‍या बजरंग दलावर बंदी घालू, असे आश्‍वासन दिले. पंतप्रधानांनी हे निमित्त साधून काँग्रेसने बजरंगबलीचा अपमान केला म्हणून ‘जय बजरंगबली’ म्हणून मतदान करा व काँग्रेसची वाट लावा, असे आवाहन केले. हा धार्मिक प्रचारच होता. पण निवडणूक आयोगाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेले दिसले. जोडीला देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी तर धमकीवजा भाष्य करताना असेही म्हटले, की काँग्रेस जर निवडून आली तर दंगे होतील. प्रचाराचा असा काही धुमधडाका उडवून दिल्यावरही कर्नाटकी मतदारांनी भाजपच्या भुलभुलैयी प्रचारास बळी न पडता काँग्रेसला भरघोस मते टाकून विजयी केले हे महत्त्वाचे. तेव्हा प्रश्‍न असा, की काँग्रेसच्या दणदणीत विजयाचे आणि भाजपच्या मोठ्या पराभवाचे कारण ते काय?
भाजपने शेवटपर्यंत कर्नाटक विधानसभेची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी व्हावी यासाठी जंगजंग पछाडून पाहिले. पण काँग्रेसने दाखविलेले शहाणपण असे, की काँगे्रसी नेतृत्त्वाने भाजपच्या या व्यक्तिकेंद्रीत निवडणूक रणनीतीत न अडकता स्थानिक प्रश्‍नांवर व बेकारी-महागाईवर अधिक भर दिला. भाजपच्या बोम्मई सरकारच्या भ्रष्ट कारभारावर नेमके बोट ठेवले. गरीब महिलेस काही एक मासिक उत्पन्न, सार्वजनिक वाहतूक सेवेतून मोफत प्रवास, गॅस सिलेंडरसाठी अनुदान, दरमहा दहा किलो मोफत तांदूळ, 200 युनिटपर्यंत वीज मोफत अशा योजना जाहीर केल्या व मग मतदारांनी भाजपच्या धु्रवीकरणी राजकारणास बळी न पडता काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मते टाकली व भाजपस नाकारले. भाजपने काँग्रेसने गरीबांसाठी जाहीर केलेल्या योजनांनी भलेही ‘रेवडी’ म्हणून संभावना केली असली, तरी भाजप जेव्हा मतदारांना भुलवण्यासाठी अशाच ‘रेवडी’ घोषणा करीत असतो त्या मात्र जनकल्याणाच्या योजना असतात, हा जो भाजपचा दांभिकपणा आहे तो ओळखून मतदार काँग्रेसच्या मागे उभे राहिले. भाजपच्याच एका मंत्र्याने भाजपस पुरेसे यश मिळाले नाही, तर आपला प्लॅन बी तयार आहे, असेही सांगून टाकले होते. म्हणजेच काँग्रेस पक्षात वा अन्य प्रादेशिक पक्षात फोडाफोडी करून आपण सत्ता मिळवू, हा याचा अर्थ. भाजप फोडाफोडीत ‘माहीर’ आहे, हे तर उघडच आहे. अरूणाचल प्रदेश, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात भाजपने आपले फोडाफोडीचे हे कौशल्य तसे सिद्धच करून ठेवले आहे. पण भाजपच्या दुर्दैवाने काँग्रेस पक्षास कर्नाटकात जे दणदणीत बहुमत मिळाले आहे व विरोधी पक्षही भाजपच्या विरोधात जागरूक झाले आहेत, हे पाहता भाजपस कर्नाटकात फोडाफोडीचा खेळ खेळताना हजारदा विचार करावा लागेल, हे मात्र निश्‍चित. अर्थात, काँग्रेसच्या घवघवीत यशास राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा जशी कारणीभूत ठरली, तसेच राहुल गांधींची खासदारकी ज्या पद्धतीने संपुष्टात आणण्यात आली त्याबाबतचा रोषही कर्नाटकी मतदारांनी व्यक्त केलेला दिसतो.
काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला हे खरे. पण म्हणून 2024 च्या लोकसभा निवडणुकीतबाबत निश्‍चिंत राहणे काँग्रेसला परवडण्यासारखे नाही. कर्नाटकात काँग्रेसने घवघवीत यश जरी मिळविले असले, तरी भाजपच्या मतांच्या टक्केवारीत फरक झालेला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. जनता दलाच्या मतात घट होऊन ती मते काँग्रेसला मिळाल्यामुळे काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 8 टक्क्यांनी वाढली, हे समजून घेतले पाहिजे. म्हणजे भाजपची मते कर्नाटकात शाबूत राहिली हा याचा अर्थ. अजून दुसरे असे, की भारतीय मतदार विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करताना फरक करतो. विधानसभेला कर्नाटकी मतदारांनी काँग्रेसला मतदान केले याचा अर्थ लोकसभा निवडणुकीतही ते काँग्रेसलाच मतदान करतील असे नाही. उदा. 2019 साली ओदिशात एकाच वेळी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदार करताना राज्यात बिजू जनता दलाला सत्तेवर आणले, तर त्याच वेळेच लोकसभेत भाजप उमेदवारांना पाठविले. तात्पर्य, कर्नाटक विधानसभा जिंकली म्हणून 2024 साली काँगे्रस दिल्ली सर करेलच करेल असे नाही. तात्पर्य, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जनतेच्या मूलभूत प्रश्‍नावर लक्ष केंद्रीत करतानाच छोट्या पक्षांशी जुळवून घेण्याचे धोरण काँग्रेसला अवलंबावे लागेल आणि त्याच वेळी भाजपच्या एकतंत्री सत्तेपासून देशाला वाचविण्यासाठी प्रादेशिक पक्षांनीही एकत्र येण्याचे प्रौढपण दाखवून एकास एक उमेदवार दिला पाहिजे. कर्नाटकमधील काँग्रेसी विजयाचे स्वागत करतानाच अखिल भारतीय काँगे्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचेही विशेष अभिनंदन केले पाहिजे. आंबेडकरी विचाराने झपाटलेले व भारावलेले खरगे यांच्या नेतृत्वाखाली काँगे्रसने जो विजय मिळविला तो निश्‍चितच गौरवास्पद नि अभिनंदनीय आहे. अशा आहे खरगेंचे प्रगल्भ नि सर्वसमावेशक राजकारण 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला यश मिळवून देईल. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.